न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे शेतकरी आहेत. वि.प.क्र.1 हे शेतीला लागणारे बियाणे विकसीत करुन त्याची विक्री करतात तर वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 महामंडळाचे विक्रेते आहेत. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेवर विश्वास ठेवून सोयाबीन पिकासाठी लागणारे बियाणे वि.प.क्र.1 महामंडळाचे महाबीज वाण नं. 335 जेएस हे 30 किलो व सोयाबीन 441 बियाणे 25 किलो वि.प.क्र.2 यांचेकडून बिल नं. 355 दि. 05/06/2018 रोजी रक्कम रु.9,550/- भरुन खरेदी केले. सदर बियाणांची पेरणी दि. 08/06/2018 रोजी तक्रारदारांनी रितसर कृषी अधिकारी यांचेशी सल्लामसलत करुन शेतीची मशागत पीकास योग्य होईल अशा प्रकारे सुधारित पध्दतीने करुन टोकण पध्दतीने पेरणी केलली होती. तक्रारदार यांनी योग्य पध्दतीने केलेल्या पेरणीस पाणी व खते तसेच योग्य ती निगा राखून देखील सोयाबीनचे पिक आले नाही. याबाबत तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी जशा सिलबंद स्थितीत वि.प.क्र.2 यांना ती पिशवी वि.प.क्र.1 यांचेकडून प्राप्त झाली, तशाच सिलबंद स्थितीत वि.प.क्र.2 यांनी ती पिशवी तक्रारदार यांना विक्री केलेचे सांगितले. तदनंतर तक्रारदार यांनी दि. 27/8/2018 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर, कोल्हापूर यांचेकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची दखल घेवून उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर यांनी सदर बाबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन याकामी अहवाल दिलेला आहे. सदर अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की. महाबीज कंपनीचे जेएस 335 सोयाबिन बियाणे खरेदी केले होते तथापि सदर बियाणामध्ये दोष असलेने तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे. अशा प्रकारे भेसळ व निकृष्ट दर्जा असलेल्या वाणाचे बियाणे वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांना पुरवून वि.प.क्र.1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. वि.प.क्र.2 यांनी वि.प.क्र.1 यांचा माल आहे त्या स्वरुपात कोणत्याही प्रकारची खात्री करुन न घेता तक्रारदार यांना विक्री करुन तक्रारदार यांचे नुकसान केले आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून कृषी अधिका-यांचे दिले दाखलेवरुन नुकसानीची रक्कम रु.13,696/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, नुकसान भरपाईपोटी रु.2,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 9 कडे अनुक्रमे तक्रारदार यांना कृषी खात्याने दिलेला अहवाल, 8अ उतारा, 7/12 उतारा, माल खरेदी केलेली पावती, गावकामगार तलाठी यांनी दिलेला दाखला, सर्टिफाईड बियाणांचे बिल, बियाणांचा प्रकार, सदरबाबत शास्त्रज्ञांनी दिलेला अहवाल वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. क्र.1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे महाराष्ट्र शासन अधिनस्थ कार्यरत असलेल्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शास्त्रोक्त पध्दतीने चाचण्या करुन गुणवत्तेच्या निकषांवर पात्र ठरलेले असते.
iii) तक्रारदार यांनी महाबीज जेएस-335 हे 30 किलो बियाणे वि.प.क्र.1 महामंडळाचे असून सोयाबीन 441 हे कोणत्या कंपनीचे बियाणे आहे हे नमूद केलेले नाही. ते बियाणे वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेले नाही.
iv) वि.प.क्र.1 हे दर्जेदार गुणवत्तापूर्ण बियाणेची निर्मिती व विक्री करणारे महामंडळ असून वि.प.क्र.1 बिज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत प्रमाणीत झालेले बियाणेच विक्री करिता उपलब्ध करते. बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांचे देखरेखीली खाली बियाणेची चाळणी प्रक्रिया केली जाते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत प्रत्येक बियाणेचे नमूने काढून शासकीय प्रयोग शाळेत बियाणे उगवण शक्ती, शुध्दता इतर बाबींची तपासणी केली जाते. या सर्व तपासणीनंतरच बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांचेकडून बियाणे विक्रीचा मुक्तता अहवाल प्रमाणपत्र दिले जाते व त्यानंतर बियाणे विक्री केली जाते. तक्रारदार यांनी याकामी बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांना वि.प. केलेले नाही.
v) तक्रारदार यांनी खरेदी केलेले बियाणे मिक्स केलेबाबत तक्रारअर्जात काहीही नमूद केलेले नाही. उत्पादन किती झाले, अन्य जातीचे वाणाचे उत्पन्न मिळाले की नाही हेही नमूद नाही. विशेष म्हणजे तक्रारदाराने दोन वेगवेगळया वाणाचे बियाणे पेरल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
vi) शासन परिपत्रक क्र. सीपीएस-2013/प्र.क्र.266/1-अे/दि. 17/10/2013 रोजी समितीची फेररचना केली आहे. त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ/कृषी संशोधन केंद्र/कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषी अधिकारी, पंचायत समिती सचिव या सर्वांनी मिळून तक्रारदाराच्या क्षेत्राची तपासणी करुन अहवाल देणे आवश्यक होते. त्यापैकी वि.प.क्र.1 महाबीज कंपनी प्रतिनिधी यांनी अहवाल मान्य नसलेबाबत आक्षेप नोंदविला आहे. त्याचा उल्लेख अहवालात केलेला नाही. त्यामुळे अहवाल वस्तुस्थितीनुसार केलेला नाही. समितीच्या क्षेत्रीय भेटीच्या अभिप्रायामध्ये सोयाबीन मुख्य वाण जेएस 9305 असे नमूद आहे. यावरुन वाणाबाबत अभिप्रायामध्ये विसंगती असल्याचे स्पष्ट होते. सबब, अभिप्राय व अहवाल ग्राहय धरता येणार नाही.
vii) फक्त पाहणी व पंचनामा यांचे आधारे बियाणे भेसळ आहे हे अहवालात नमूद करणे चुकीचे आहे. त्या बियाणांचे बीज प्रमाणकरण तपासणी करणे आवश्यक होते. परंतु अहवाल देणेपूर्वी त्या बियाणांचे बीज प्रमाणीकरण न करता अहवालात बियाणांत भेसळ आहे असे म्हटलेले आहे. तसेच वि.प.क्र.1 यांनी विक्री केलेल्या महाबीज 335 बियाणे विकत घेणा-या अन्य शेतक-यांची कोणतीही तक्रार आलेली नाही.
viii) वि.प.क्र.1 हे फक्त 30 किलोचे पॅकेज करतात. जे सोयाबीन 25 किलो नमूद आहे, त्या बियाणांशी वि.प.क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. सबब, तक्रारदारावर रु. 50,000/- ची कॉस्ट बसवून प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प.क्र.2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. क्र.2 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.क्र.2 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प.क्र.2 यांनी सोयाबीन महाबीज 335 हे बियाणे वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केलेले होते व त्याची विक्री वि.प.क्र.2 यांनी तक्रारदार यांना रितसर बिल करुन विक्री केलेली होती.
iii) वि.प.क्र.1 यांचेकडून आलेल्या बियाणाच्या पॅक पिशव्या आहे त्या परिस्थितीत प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदार यांना तसेच अन्य ग्राहकांना देखील विक्री केलेल्या आहेत.
iv) प्रस्तुत वि.प. हे कोणताही माल स्वतः उत्पादित करीत नाहीत. त्यामुळे प्रस्तुत मालाच्या दर्जाबाबत, मालाचे उत्पादन क्षमतेबाबत कोणतीही तक्रार आलेस त्यास वि.प.क्र.2 हे जबाबदार नसून मालाचे उत्पादन करणारी संस्था जबाबदार असते. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांचे झालेल्या नुकसानीस वि.प.क्र.2 हे जबाबदार नाहीत. सबब, प्रस्तुतची तक्रार वि.प.क्र.2 विरुध्द नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.2 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. वि.प.क्र.1 यांनी. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. वि.प.क्र.1 यांचेकडून |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 महामंडळाचे महाबीज वाण नं. 335 जेएस हे 30 किलो व सोयाबीन 441 बियाणे 25 किलो वि.प.क्र.2 यांचेकडून बिल नं. 355 दि. 05/06/2018 रोजी रक्कम रु.9,550/- भरुन खरेदी केले. सदरचे बिल तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरची बाब त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात, वर नमूद बियाणांची पेरणी दि. 08/06/2018 रोजी तक्रारदारांनी रितसर कृषी अधिकारी यांचेशी सल्लामसलत करुन शेतीची मशागत पीकास योग्य होईल अशा प्रकारे सुधारित पध्दतीने करुन टोकण पध्दतीने केलली होती. तक्रारदार यांनी योग्य पध्दतीने केलेल्या पेरणीस पाणी व खते तसेच योग्य ती निगा राखून देखील सोयाबीनचे पिक आले नाही. याबाबत तक्रारदार यांनी दि. 27/8/2018 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर, कोल्हापूर यांचेकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची दखल घेवून उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर यांनी सदर बाबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन याकामी अहवाल दिलेला आहे. सदर अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की. महाबीज कंपनीचे जेएस 335 सोयाबिन बियाणे खरेदी केले होते, तथापि सदर बियाणामध्ये दोष असलेने तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर कार्यालय, कोल्हापूर यांचे दि. 22/05/2019 चे पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, तालुका स्तरीय समितीने तक्रारदाराचे प्लॉटची पाहणी केली असून तक्रारदाराचे तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार सदर प्रकरणाबाबत नुकसान भरपाई मिळणेकामी सदरचे प्रकरण मा. ग्राहक न्यायालय यांचेकडे दाखल करावे असे सदरच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्रासोबत तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा दाखल केला आहे. सदर क्षेत्रीय भेटीच्या सर्वसाधारण निष्कर्षामध्ये सोयाबीन पिकाच्या मुख्य वाण जे.एस.9305 मध्ये इतर सोयाबीन पिकाच्या वाणांची भेसळ झाली आहे असे नमूद करण्यात आले आहे. सदरचे अहवालात मुख्य वाण जे.एस. 9305 असा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु तक्रारदाराने याकामी श्री ए.ए.पिसाळ या शास्त्रज्ञांचे दि. 21/12/2019 चे पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये वर नमूद क्षेत्रीय पाहणी अहवालाचे निष्कर्षामध्ये बियाणांचे मुख्य वाण जे.एस. 9305 अशी चुकीची नोंद झाली असून त्याऐवजी बियाणे मुख्य वाण जे.एस. 335 अशी नोंद असणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे. सबब, सदरचे पत्रान्वये पाहणी अहवालामध्ये बियाणाचे नोंदीमध्ये झालेली चूक दुरुस्त केली असल्याचे दिसून येते. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व मजूकर व क्षेत्रीय पाहणीचा अहवाल त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारला आहे. परंतु वर नमूद क्षेत्रीय पाहणीच्या अहवालास छेद देणारा अन्य कोणताही पुरावा वि.प.क्र.1 यांनी याकामी दाखल केलेला नाही. वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेले वादातील सोयाबीनचे बियाणे हे दोषरहित होते हे दर्शविण्यासाठी वि.प.क्र.1 यांनी कोणताही स्वतंत्र व ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही. याउलट तक्रारदारांनी याकामी सक्षम समितीचा अहवाल दाखल केला आहे. सबब, वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे हे सदोष होते ही बाब तक्रारदारांनी याकामी शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांचेमार्फत तक्रारदारास सदोष बियाणांचा पुरवठा करुन सेवा देण्यात त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. वि.प.क्र.2 हे केवळ बियाणांचे विक्रेते असून त्यांचा बीज उत्पादनाशी कोणताही संबंध नाही. सबब, वि.प.क्र.2 यांना याकामी जबाबदार धरण्यात येत नाही.
10. क्षेत्रीय पाहणी अहवालातील निष्कर्षानुसार सदोष बियाणांमुळे तक्रारदाराचे रक्कम रु.13,696/- चे नुकसान झाले आहे. सबब, सदरची रक्कम वि.प.क्र.1 यांचेकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज वि.प.क्र.1 कंपनीकडून वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.क्र.1 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदाराने याकामी सदर वि.प.क्र.1 ने उत्पादित केलेले सदोष बियाणांमुळे पुढील हंगामात पीक येणेवर परिणाम झालेने होणा-या नुकसानीबाबत कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही. सबब, सदरची तक्रारदाराची मागणी मान्य करणे या आयोगास न्यायोचित वाटत नाही. वि.प.क्र.2 यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना पिकाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 13,696/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) वि.प.क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.