तक्रारकर्त्या तर्फे त्यांचे वकील : श्री. एस.के.अनकर हजर.
विरूध्द पक्षातर्फे वकील : श्री. प्रकाश मुंदरा
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक 24/10/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा महाराष्ट्र जिवन प्राधिकरण गोंदिया यांचा ‘ग्राहक’ असून, त्याचा ग्राहक क्र. DR.-948 आहे. तक्रारकर्त्याच्या वापरात 15 MM नळ जोडणी असून, नळ जोडणीचा प्रकार हा घरगुती आहे. तक्रारकर्त्याच्या वापरात असलेल्या नळ जोडणीचा मिटर क्र. (जलमापक) बिलामध्ये नमूद नाही. तक्रारकर्त्याच्या कथनानूसार ऑगष्ट 2015 पर्यंत तक्रारकर्त्याच्या वापरात असलेले मिटर सुस्थितीत होते. आणि तक्रारकर्त्याचा पाणी वापर दर दोन महिन्याला 27 ते 30 युनिट होता. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, त्याच्या वापरात असलेले मिटर ऑगष्ट 2015 पासून बरोबर काम करीत नव्हते. त्याबाबत त्यांनी विरूध्द पक्षाला तसेच मिटर रिडरला वारंवार तोंडी तक्रार केली. परंतू, विरूध्द पक्षकारांनी जलमापकाची स्थिती ‘OK’ दाखवून मिटर वाचन माहे ऑक्टोंबर 2015 ला 85, डिसेंबर 2015 ला 82 व फेब्रृवारी 2016 ला 100 असे युनिट दाखविले आहे. आणि त्याप्रमाणे देयक तक्रारकर्त्याला देण्यात आले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानूसार सदरचे बिल, मिटर रिडर व विरूध्द पक्षकार यांचे निदर्शनास आणून देण्यात आले व तोंडी सांगण्यात आले. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, मिटर जर व्यवस्थीत काम करीत नसेल किंवा बंद असेल तर त्यावेळेस विरूध्द पक्षकाराने आधीच्या तीन बिलाची सरासरी काढून बिल आकारायला पाहिजे होते किंवा त्यापैकी जे जास्त होते ते आकारावयास पाहिजे होते. विरूध्द पक्षकाराने आकारलेले 85 ते 100 युनिटचे देयक हे नियमाला धरून नसून व्यावहारीक दृष्टया अशक्य आहे. ज्या उपयोग कर्त्याजवळ 15 MM घरगुती नळजोडणी आहे त्याचा वापर दोन महिण्याला 100 युनिट असणे हे व्यावहारीक दृष्टया अशक्यप्राय आहे.
3. तक्रारकर्त्याने आपल्या पुराव्याच्या शपथपत्रात नमूद केले आहे की, विरूध्द पक्षकाराने आकारलेले पाणी देयकाचा मी नियमीतपणे भरणा केला आहे. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक मंचामध्ये माहे जून 2016 मध्ये दाखल केल्यानंतर, विरूध्द पक्षकाराने माहे जून 2016 चे पाणी देयकामध्ये सरासरी बिल 90 युनिट आकारून पाणी देयक निर्गमित केले. तसेच, ऑगष्ट 2016 चे पाणी देयकात जलमापक स्थिती (मिटर स्टेटस ) सरासरी दाखवून पाण्याचा वापर 90 युनिट असलेले बिल दि. 31/08/2016 ला निर्गमीत केले व ज्यामध्ये “Please repair or replace your defective meter immediately” असे नमूद केले आहे.
4. तक्रारकर्त्यांने वारंवार विरूध्द पक्षाला तसेच मिटर रिडरला तोंडी तक्रार करून, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीबाबत काही दखल न घेतल्यामूळे तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास या मंचात भाग पाडले. तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे तक्रारीत प्रार्थना केली आहे. विरूध्द पक्षकारांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून सेवेत न्यूनता केली आहे. ऑगष्ट 2015, डिसेंबर 2015 व फेब्रृवारी 2016 चे पाणी देयक दुरूस्त करण्याबाबत विरूध्द पक्षाला निर्देशीत करावे. मानसिक त्रासाबद्दल रू.10,000/-,विरूध्द पक्षानी देण्याबाबत आदेश व्हावे.
5. विरूध्द पक्षकारानी तक्रारकर्त्याच्या वापरात असलेले जुने मिटर दि. 15/07/2016 ला बदलवले ज्याचा मिटर क्र. 2013A2192063 हा आहे. दि. 21/01/2017 ला नविन मिटरचे मिटर वाचन क्र.74 युनिट आहे व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने मिटर वाचन 74 युनिट असल्याचे मिटरचे छायाचित्र सोबत जोडले आहे. मिटरच्या वाचनाप्रमाणे 190 दिवसात पाण्याचा वापर 74 युनिट आहे. म्हणजेच दर दिवसाला 0.38 युनिट. नविन मिटरच्या वाचनानूसार दर महिन्याला 11 ते 12 युनिट हा सरासरी पाण्याचा वापर आहे. या व्यतिरीक्त तक्रारकर्त्याच्या घरी एक बोअरवेल असून, त्या बोअरवेलचा वापर सुध्दा घरगुती वापराकरीता व पिण्याच्या पाण्याकरीता उपयोगात येतो.
6. विरूध्द पक्षकार यांनी त्यांच्या लेखीउत्तरात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याच्या वापरात असलेले मिटर ऑगष्ट 2015 पर्यंत बरोबर काम करीत होते. तक्रारकर्त्याने ऑगष्ट 2015 पासून मिटर काम करीत नसल्याचे व विरूध्द पक्षकार व मिटर रिडरला तोंडी कळविल्याचे नाकबुल केले आहे व ते चुकीचे आहे, असे लेखीउत्तरात नमूद केले आहे. मिटर बंद असतांना किंवा काम करीत नसतांना देण्यात आलेल्या सरासरी बिलाबद्दल वाद नाही आहे. परंतू, ऑगष्ट 2015 पासून मिटर बंद असल्याचा तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये केलेला आरोप हा बरोबर नाही आहे. कारण, मिटर सुरू होते व आहे व त्याप्रमाणे मिटर पाणी वापर दर्शवित होते. करीता सरासरी बिल देण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही.
7. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचे वकील श्री. एस.के.अ अनकर हजर होते. विरूध्द पक्षकाराचे वकील श्री. प्रकाश मुंदरा यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्षकाराचे लेखीकैफियत, पुराव्याचे शपथपत्र, यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशत मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
9. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा जुना ‘ग्राहक’ असून, विरूध्द पक्षाने त्याच्या लेखीउत्तरात व पुराव्याचे शपथपत्रात कबुल केले आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या वापरात असलेले मिटर ऑगष्ट 2015 पर्यंत सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे व विरूध्द पक्षकार यांनी सादर केलेल्या कंन्झ्युमर अंकाऊंट लेजरनूसार तक्रारकर्त्याचा पाणी वापर माहे ऑगष्ट 2015 पर्यंत माहे फेब्रृवारी 2015, माहे एप्रिल 2015 व माहे जून 2015 चे अनुक्रमे 25, 30, 28 युनिट आहे. तक्रारकर्त्याने माहे ऑगष्ट 2015 पासून विरूध्द पक्षाला तसेच मिटर रिडरला मिटर काम करीत नसल्याबाबतची तोंडी तक्रार केली होती. परंतू, विरूध्द पक्षकारांनी त्याबाबत काहीही दखल न घेतल्यामूळे तक्रारकर्त्याने दि. 17/05/2016 ला मंचात तक्रार दाखल केली व विरूध्द पक्षाला मंचानी नोटीस पाठविली ती विरूध्द पक्षाला दि.24/05/2016 ला प्राप्त झाली. तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर, जुन-जुलै 2016 चे पाणी देयकात मिटर स्थिती सरासरी दाखवून सरासरी देयक 90 युनिटचे (पाण्याचा वापर) पाणी देयक दि. 31/08/2016 ला निर्गमीत केले व त्यामध्ये “Please repair or replace your defective meter immediately” असा पाणी देयकाद्वारे संदेश तक्रारकर्त्याला दिला. विरूध्द पक्षकारानी तक्रारकर्त्याच्या वापरात असलेले जुने मिटर दि. 15/07/2016 ला बदलवले ज्याचा मिटर क्र. 2013A2192063 हा आहे. तक्रारकर्त्याने सादर केलेल्या पाणी देयक माहे ऑगष्ट- सप्टेंबर/2016 दि. 31/10/2016 व माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2016 दि. 31/12/2016 चे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याचा ऑगष्ट - सप्टेंबर 2016 व ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2016 या चार महिन्याचा पाणी वापर जलमिटर वाचनाप्रमाणे एकुण 38 युनिट दिसतो. म्हणजे सरासरी दरमहा 9 ते 10 युनिट हा आहे. तक्रारकर्त्याने वारंवार विरूध्द पक्षाला तसेच मिटर रिडरला तोंडी तक्रार करून तसेच त्यांचे निदर्शणास आणून विरूध्द पक्षकारांनी मिटर दुरूस्तीबाबत किंवा तक्रारकर्त्याला दिलेल्या पाणी देयकाबाबत दखल घेतली नाही. परंतू, ज्यावेळी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या जाचाला कंटाळून दि. 17/05/2016 ला मंचामध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतरच विरूध्द पक्षकारांनी मिटर बदलविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली. असा आरोप तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये विरूध्द पक्षाविरूध्द केला आहे व त्या आरोपात तथ्य आहे असे म्हणण्यास वाव आहे. विरूध्द पक्षकारांनी सेवेत कसुर केला असून करीता मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षांना निर्देश देण्यात येत आहे की, ऑक्टोंबर 2015, डिसेंबर 2015 व फेब्रृवारी 2016, एप्रिल-2016, जून 2016 चे पाणी देयक रद्द करण्यात येत असून माहे ऑगष्ट - सप्टेंबर 2016 व ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2016 च्या पाणी देयकातील पाणी वापराचे युनिटची सरासरी काढून प्रतिमहा येणा-या पाणी वापराप्रमाणे (युनिटप्रमाणे) ऑक्टोंबर 2015, डिसेंबर 2015 व फेब्रृवारी 2016, माहे एप्रिल 2016, माहे जून 2016 चे पाणी देयक तक्रारकर्त्याला निर्गमीत करावे. सुधारीत पाणी देयकामध्ये तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षकारांकडे पाणी देयकापोटी (वरील रद्द करण्यात आलेल्या देयकापोटी) जमा केलेली रक्कम समायोजित करण्यात यावी.
3. विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्यांना मानसिक, शारिरिक त्रासाबाबत तसेच तक्रारीचा खर्च असे एकुण रू. 5,00/-, दयावे.
4. विरूध्द पक्षांना यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
6. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.