तक्रारकर्ती तर्फे त्यांचे वकील : श्री. ए.बी. डहारे,
विरूध्द पक्षा तर्फे त्यांचे वकील : श्री. प्रकाश मुदंरा
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक 01/02/2019 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्राररकर्ती हि वरील नमूद पत्यावर राहते व ती ग्रा.सं.कायदयाचे कलम 2 (b) वाचा 2 (d) अन्वये ‘ग्राहक’ आहे. विरूध्द पक्षकार महाराष्ट्र शासनाचे खाते असून, ते लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करतात. तक्रारकर्तीने 20 वर्षापूर्वी घरगुती वापराकरीता मामा चौक, गोंदिया येथे 15mm नळजोडणी घेतली होती. तक्रारकर्तीचा ग्राहक क्र. 6800 हा आहे. तक्रारकर्ती नियमीतपणे पाण्याचे देयक दरमहिन्याला भरत होती. तक्रारकर्तीचे कुटूंब लहान असून, तिचा पाण्याचा वापर कमी आहे. त्यामुळे तक्रारकर्ती सरासरी 200 ते 300 रूपये पाणी देयक प्रत्येक दोन महिन्याला भरत होती.
3. माहे जानेवारी- 2013 पर्यंत कोणताही वाद नव्हता. तक्रारकर्तीला विरूध्द पक्षांकडून भरपूर पाणी मिळत होते. परंतू विरूध्द पक्षाने अचानक तक्रारकर्तीला संपूर्ण दिवस पाणी पुरविले नाही ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी 1 ते 2 तास पाणी पुरवित होते. त्याबाबत तक्रारकर्तीने कित्येक तक्रारी विरूध्द पक्षाकडे केल्या. परंतू ते गोंदियामध्ये तीन ते चार नविन टँक बांधत आहेत आणि 2016 पासून साठविलेले पाणी ग्राहकाला पुरविणार आहोत असे सांगत होते. सदर वस्तुस्थिती बघता, आणि परिस्थिती बदल्यामूळे तक्रारकर्तीने त्यांच्या घरामध्ये बोअरवेल खोदली आणि त्यामधून पाण्याचा वापर करू लागली. येथे असे नमूद करावेसे वाटते की, तक्रारकर्ती हि विरूध्द पक्षांकडून मिळत असलेल्या पाण्याचा वापर फक्त पिण्याकरीता करीत होती. विरूध्द पक्षांकडून पुरविण्यात येणा-या पाण्याचा वापर हा मर्यादित होता. त्यामुळे तक्रारकर्ती मिटर रिडींगप्रमाणे सरासरी बिल भरत होती. तक्रारकर्तीचे घरातील पाण्याचा वापर सप्टेंबर- 2012 ते ऑक्टोंबर- 2013 पर्यंत बिलाप्रमाणे पुढील तक्त्यामध्ये दर्शवित आहे.
महिना | युनिट | मापनयंत्र स्थिती |
सप्टेंबर- 2012 | 20 | M-Ok |
नोंव्हेंबर - 2012 | 20 | M-Ok |
जानेवारी- 2013 | 20 | M-Ok |
मार्च - 2013 | 2 | M-Ok |
में - 2013 | 3 | M-Ok |
जुलै -2013 | 5 | M-Ok |
ऑक्टोंबर– 2013 | 1 | M-Ok |
.
4. दि. 28/02/2014 ला विरूध्द पक्षाने डिसेंबर - 2013 ते जानेवारी- 2014 या कालावधीकरीता रू. 280/-,चे देयक निर्गमित केले. त्या बिलामध्ये पाण्याचा वापर शुन्य दाखवितो, घर बंद दाखवित आहे. त्याप्रमाणे दि. 30/04/2014 आणि 30/06/2014 ला फरवरी- मार्च 2014 आणि एप्रिल- में 2014 या कालावधीकरीता रू. 290/-,आणि रू. 290/-, चे बिल निर्गमित केले. त्या बिलामध्ये सुध्दा पाण्याचा वापर शुन्य दाखवितो, घर बंद दाखवित आहे. परंतू तक्रारकर्तीचे घर सदर कालावधीत बंद नव्हते. याबाबतीत विरूध्द पक्षाने सरासरी कमीत-कमी शुल्काचे निर्गमित केलेले देयक हे तक्रारकर्तीने भरले.
5. तक्रारकर्तीचे मापनयंत्र हे घरात नाही आहे. परंतू ते घरासमोरील जागेत आहे आणि सहजपणे कर आकारणी करता येते आणि विरूध्द पक्षाचे मापनयंत्र वाचक/कर्मचारी सहजपणे मापनयंत्राचे वाचन घेऊ शकतो. परंतू असे लक्षात आले की, त्या कालावधीमध्ये विरूध्द पक्षाचे मापनयंत्र वाचक/कर्मचारी तक्रारकर्तीचे घरापर्यंत आला नाही आणि तिचे मापनयंत्र वाचन केले नाही. माहे ऑंगष्ट- सप्टेंबर 2014 पर्यंत कोणतीच अडचण उद्दभवली नाही. तक्रारकर्ती विरूध्द पक्षाला नियमित देयक अदा करीत होती.
6. विरूध्द पक्षाने दि. 31/12/2014 ला ऑक्टोंबर- नोव्हेंबर 2014 या कालावधीकरीता रू. 280/-, चे देयक निर्गमित केले. त्या देयकामध्ये विरूध्द पक्षाने पाण्याचा वापर शुन्य मिटर बंद दाखविले आहे. परंतू, मापनयंत्र चालु स्थितीमध्ये होते, हि वस्तुस्थिती आहे. तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि कथन केले की, मापनयंत्र चांगल्या स्थितीत आहे आणि ते वाचन दाखवित आहे. परंतू विरूद पक्षाच्या कार्यालयाने सांगीतले की, पुढील महिन्यात जेव्हा मापनयंत्र वाचक तक्रारकर्तीचे घरी येतील त्यावेळी ते तपासतील. तक्रारकर्तीने सदर बिल अदा केले. पुन्हा दि. 28/02/2015 ला विरूध्द पक्षाने डिसेंबर- जानेवारी 2015 या कालावधीकरीता रू. 290/-,चे देयक निर्गमित केले त्या बिलामध्ये सुध्दा पाण्याचा वापर शुन्य आहे, मिटर बंद दाखविले आहे. तक्रारकर्तीने पुन्हा विरूध्द पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधला, गा-हाणे सांगीतले परंतू विरूध्द पक्षाच्या कार्यालयाने आधीचेच उत्तर दिले आणि देयक अदा करण्यास सांगीतले. तक्रारकर्तीने देयक अदा केले. माहे- फरवरी 2015 मध्ये विरूध्द पक्षाचे मापनयंत्र वाचक/कर्मचारी तक्रारकर्तीचे घरी आले आणि त्याने मापनयंत्रकाची तपासणी केली आणि लक्षात आले की, मापनयंत्र चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि दि. 28/02/2015 चे देयकामध्ये चालु वाचन 688 नोंद घेतली आहे. त्यानंतर विरूध्द पक्षाने फरवरी- मार्च 2015 या कालावधीकरीता रू. 842/-,चे दि. 30/04/2015 या तारखेचे देयक (वादग्रस्त) निर्गमित केले. त्यानंतर विरूध्द पक्षाने एप्रिल-में 2015 या कालावधीकरीता रू. 842/-,चे दि. 30/06/2015 या तारखेचे देयक निर्गमित केले. त्यानंतर जुन-जुलै 2015 या कालावधीकरीता रू. 842/-,चे दि. 31/08/2015 चे देयक निर्गमित केले. या तिन देयकामध्ये विरूध्द पक्षाने नमूद केले की, पाण्याचा वापर शुन्य आहे, मिटर बंद आहे. आणि त्यामुळे Flat दराने बिलाची आकारणी करण्यात आली. वरील नमूद तिनही बिलामध्ये मापनयंत्र वाचकाने दि. 30/04/2015, 30/06/2015 आणि दि. 31/08/2015 च्या देयकामध्ये चालू वाचनाची नोंद घेऊन, मिटर चालु स्थितीमध्ये असल्याचे दाखविले. हे सर्व देयक बघितल्यावर तक्रारकर्तीने पुनःच्छ संपर्क साधला आणि मापनयंत्र वाचकाने पाणी वापराबाबत दि. 28/02/2015, 30/04/2015, 30/06/2015 आणि दि. 31/08/2015 च्या देयकामध्ये नोंद घेतलेल्या नोंदी दाखविल्या आणि मिटर चालु स्थितीमध्ये आहे. परंतू विरूध्द पक्षाच्या कार्यालयाने तक्रारकर्तीवर दबाव टाकून देयक भरण्यास सांगीतले आणि मिटर बदलविण्यास सांगीतले. त्याबाबतीत तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाच्या कार्यालयाला Flat दराने बिलाची आकारणी न करता, कमीत-कमी कराचे देयक निर्गमित करण्याबाबत विनंती केली. परंतू विरूध्द पक्षाच्या कार्यालयाने तक्रारकर्तीला कमीत-कमी कराचे बिल निर्गमित करण्यास नकार दिला.
7. वरील नमूद देयके हे वादग्रस्त देयके आहे आणि मापनयंत्र वाचनाप्रमाणे नाही आहेत आणि त्यामुळे तक्रारकर्तीने सदर बिल भरण्यास नकार दिला. विरूध्दपक्ष मुबलक पाणीपुरवठा तक्रारकर्तीला देण्यास अपयशी ठरला आहे. तक्रारकर्तीला Flat दराने देयक देऊन विरूध्द पक्ष सेवा देण्यास अपयशी ठरला. वारंवार विनंती करून, विरूध्द पक्षाने पाण्याच्या वापराप्रमाणे दुरूस्ती बिल निर्गमित केले नाही. विरूध्द पक्षाचे वरीलप्रमाणे वागणे हे विरूध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता आहे. येथे विनंतीपूवर्क सादर करण्यात येते की, जर सदर मापनयंत्र सदोष आहे व मापनयंत्र हि विरूध्द पक्षाची मालमत्ता आहे आणि त्यामुळे सदोष मापनपयंत्र बदलविण्याची जबाबदारी आणि तक्रारकर्तीला खरे देयक निर्गमित करणे हि विरूध्द पक्षाची आहे. परंतू विरूध्द पक्ष हे करण्यास अपयशी ठरला आहे. तक्रारकर्तीने वारंवार मापनयंत्र बदलण्याची आणि सरासरी बिल देण्याची विनंती केली परंतू विरूध्द पक्षाने काळजी घेतली नाही आणि चुकीचे देयके तक्रारकर्तीला दिले. विरूध्द पक्षाचे वागणे हे बेकायदेशीर आणि कायदयाच्या तरतुदींच्या विसंगत आहे आणि ग्रा.सं.कायदा ध्यानात ठेवून विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनता केली आहे. विरूध्द पक्षाच्या वरील वागण्यामूळे तक्रारकर्तीला ब-याच वेळा काही कारण नसतांना विरूध्द पक्षाच्या कार्यालयाला जावे लागले. त्यामुळे मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला.
8. तक्रारकर्तीचे भागात जिथे जुनी पॉईप लाईन होती त्या भागात विरूध्द पक्षाने नविन पॉईप लाईन, जुन्या पॉईप लाईनच्या समांतर रेषेमध्ये टाकली. तक्रारकर्तीने प्रकरण दि. 12/01/2016 ला दाखल केले. प्रकरण मंचामध्ये प्रलंबित असतांना म्हणजे माहे फरवरी- 2016 ला विरूध्द पक्षाने जुनी पॉईप लाईन बंद केली जिथे तक्रारकर्तीची पाणी नळजोडणी आहे आणि नविन पॉईप जोडणीमधून पाणीपुरवठा सुरू केला. विरूध्द पक्षाचे वरील कृतीमूळे फक्त तक्रारकर्तीच नाही परंतू त्या भागातील पुष्कळ लोकांवर त्याचा परिणाम झाला. आणि त्यांना जुन्या पॉईप लाईनमधून पाणी मिळू शकले नाही. त्याबाबत तक्रारकर्ती व त्या भागातील इतर लोक विरूध्द पक्षाच्या कार्यालयाला पोहचले आणि त्याबाबत चौकशी केली. त्यानंतर विरूध्द पक्षाने सांगीतले की, प्रत्येकाला नव्याने नळजोडणी शुल्क जमा केल्यानंतर नविन नळजोडणी, नविन पॉईप लाईनवरून मिळेल. तक्रारकर्तीने वादग्रस्त बिल डिसेंबर– जानेवारी 2016 रू. 3780/-,दि. 10/05/2016 ला भरले आणि विरूध्द पक्षाच्या खात्याकडे जोडणी बदलविण्याकरीता मागणी केली. त्याबाबत तक्रारकर्तीने बदलविण्याकरीता रू. 400/-,खात्याकडे जमा केले. तसेच जुने जोडणी बदलविण्याकरीता तक्रारकर्तीने रू. 2,000/-, विरूध्द पक्षाच्या खात्याचे ठेकेदार यांना दिले. विरूध्द पक्षाने कोणत्याही प्रकारची नोटीस व माहिती तक्रारकर्ती किंवा लोकांना न देता, जुनी पॉईप लाईन बंद केली. जिथे तक्रारकर्ती यांची नळजोडणी अस्तित्वात आहे. विरूध्द पक्षाचे कार्यालयाने तक्रारकर्तीवर आणि लोकांवर (Affected ) नविन स्थलांतर शुल्क भरून, नविन जोडणी घेण्याकरीता दबाव टाकला. विरूध्द पक्षाची वरील कृती बेकायदेशीर आहे आणि पूर्णपणे नैसर्गीक न्यायाचे विरूध्द आहे. तसेच तक्रारकर्तीने जेव्हा जुने नळजोडणी घेतली तेव्हाच जोडणी शुल्क भरले होते. तद्नंतर पुन्हा-पुन्हा जोडणी शुल्क भरणे आवश्यक नाही.
9. विरूध्द पक्षाने कधीही पाण्याच्या वापराप्रमाणे खरे बिल निर्गमित केले नाही. त्याप्रमाणे तक्रारकर्ती विरूध्द पक्षाने निर्गमित केलेले चुकीचे बिल देण्यास जबाबदार नाही. तक्रारकर्ती सरासरी देयक देण्यास पात्र आहे. तक्रारीचे कारण माहे फरवरी- 2015 मध्ये उद्दभवले आहे. आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी नियमीत आहे. तक्रारकर्तीने त्याप्रमाणे खालील मागणी केलेली आहेः-
1) विरूध्द पक्षाने डिसेंबर-जानेवारी 2015 या कालावधीनंतर निर्गमित केलेले देयके चुकीचे आहे असे घोषीत करावे.
2) विरूध्द पक्षाला निर्देश दयावे की, त्यांनी पाण्याच्या वापराप्रमाणे तक्रारकर्तीला डिसेंबर- जानेवारी 2015 पासून खरे देयके निर्गमित करावे आणि घोषीत करावे की, तक्रारकर्ती देयकावर विलंब आकार देण्यास जबाबदार नाही.
3) मा. मंचाने विरूध्द पक्षाला निर्देश दयावे की, मिटर सदोष आढळल्यास, सदोष मिटर बदलवून दयावे आणि तक्रारकर्ती मिटर शुल्क भरण्यास जबाबदार नाही आहे.
4) या मंचाने विरूध्द पक्षाला निर्देश दयावे की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला वादग्रस्त देयक रक्कम रू. 3,780/-,परत करावे. जी तक्रारकर्तीने जोडणी बदलविण्याकरीता दि. 10/05/2016 ला अदा केले.
5) मा. मंचाने विरूध्द पक्षाला निर्देश दयावे की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला विरूध्द पक्षाच्या कार्यालयातून झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाकरीता रू. 50,000/-,दयावे व विरूध्द पक्षाने त्यांच्या पगारातुन सदर मानसिक व शारिरिक त्रासाकरीता शुल्क अदा करावे.
10. विरूध्द पक्षाच्या कथनानूसार तक्रारकर्तीने तिचे घरी विरूध्द पक्षाचे घरगुती पाण्याचे नळजोडणी घेतली होती. जी 20 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला पाणी देयके निर्गमित केली व तिने जानेवारी– 2013 पर्यंत भरली. मापनयंत्र हि तक्रारकर्तीची मालमत्ता आहे. जी 20 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि जी मुदतबाहय झाली आहे. मापनयंत्राचे व्यवस्थित काम करणे, हे त्याचे व्यवस्थित सांभाळ करणे, सुर्याची उष्णता यामुळे जंगपासून काळजी घेणे, आणि ती तक्रारकर्तीची विशेष मालमत्ता असून, ती तिचे परिसरात स्थापित केली आहे. परंतू तक्रारकर्तीचे मिटर घरासमोरील मोकळया जागेत ठेवले आहे त्यामुळे ते व्यवस्थित काम करीत नव्हते त्याचे फ्रि-व्हिल, संथ आणि जाम झाल्यामूळे वाचन दाखविणे बंद झाले होते आणि कधी ते वाचन कमी दाखवित होते तर कधी बंद. विरूध्द पक्षाचे मिटर वाचकाने तक्रारकर्तीला त्याबाबत तोंडी सांगीतले होते आणि शासनाचे मार्गदर्शक आणि नॉर्मप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये सरासरी बिल निर्गमित केले आणि तक्रारकर्तीला तिचे जुने मृत मापनयंत्र बदलविण्याबाबत सांगीतले. परंतू तिने बदलविण्याबाबत किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. पाण्याचे दर हे सुध्दा बदलले आहे आणि वेळोवेळी वाढले आहेत आणि स्लॅब शासनाने ठरविली आहे. हयाकडे तक्रारकर्तीने दुर्लक्ष केले आहे.
11. सुरूवातीला मापनयंत्र शासनाने जेव्हा सुरू केली त्यावेळी पुष्कळ पाण्याचा पुरवठा होता आणि ग्राहक कमी होते. त्यामुळे पाणी पुरवठा दिवसाला 10 ते 12 तास होता. परंतू त्यानंतर ग्राहक वाढत आहेत आणि पाण्याचा वापर वाढत आहे. विरूध्द पक्षाला शहरामध्ये पाणी पुरवठा मर्यादित नियमित करण्याबाबत निर्देश दिले होते की, सकाळी 3 ते 4 तास आणि संध्याकाळी 3 ते 4 तास, तो उन्हाळयामध्ये पाण्याच्या तुटवडयामूळे 1 ते 2 तास मर्यादित ठेवण्यात आला. पाण्याची नळजोडणी घेतेवेळी तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाशी शासनाने निःश्चित केलेल्या शर्ती व अटीबाबत करार केला होता की, ती शर्ती व अटीचे पालन करेल. त्यामुळे ती शर्ती व अटी पालनास बांधली आहे.
12. जेव्हा मापनयंत्र वाचक तक्रारकर्तीचे घरी गेला होता त्यावेळी तक्रारकर्तीचे घर बंद होते. मापनयंत्र फार जुने होते आणि त्याचे जिवन संपले होते आणि जंग लागल्यामूळे, ते संथ सुरू होते आणि ते बदलविण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची आहे. तिची स्वतःची मालमत्ता असल्यामूळे आणि जर तिने काही केले नाही आणि मापनयंत्र व्यवस्थित वाचन दाखवित नसेल किंवा बंद असेल तर नियमाप्रमाणे सरासरी बिल तक्रारकर्तीला निर्गमित केले. तक्रारकर्तीने तक्रार दाखल करण्यापूर्वी मापनयंत्र वाचकाविरूध्द तक्रार विरूध्द पक्षाकडे केले नाही.
13. विरूध्द पक्षाने गोंदिया शहरामध्ये नविन पॉईप लाईन स्थापित केली आणि नियमाप्रमाणे ज्या ग्राहकाकडे पाण्याचे थकीत बिल किंवा वादग्रस्त बिल प्रलंबीत नाही आहे त्यांचे जळजोडणी नविन पॉईप लाईनवर त्यांचे विनंतीनूसार
बदलविण्यात आली आणि वरील नमूद प्रकरणात सुध्दा तक्रारकर्तीने थकीत पाण्याचे बिल भरले आहे आणि नविन पॉईप लाईनवर नळजोडणी बदलविली आहे आणि हे सिध्द करते की, तक्रारकर्तीला विरूध्द पक्षांशी काही गा-हाणे नाही आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खारीज करणे गरजेचे आहे.
14. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्तीचे वकील श्री. ए.बी.डहारे तसेच विरूध्द पक्षातर्फे वकील श्री. प्रकाश मुंदरा यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
15. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्तीचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्षांनी लेखीजबाब, पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद सादर केला आहे. मंचानी त्यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ती हि ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्तीला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | नाही. |
3 | अंतीम आदेश | तक्रार खारीज करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
16. तक्रारकर्तीने 20 वर्षापूर्वी घरगुती वापराकरीता मामा चौक, गोंदिया येथे 15mm नळजोडणी घेतली होती. तक्रारकर्तीचा ग्राहक क्र. 6800 हा आहे. तक्रारकर्ती नियमीतपणे पाण्याचे देयक दरमहिन्याला भरत होती. तक्रारकर्तीचे कुटूंब लहान असून, तिचा पाण्याचा वापर कमी आहे. त्यामुळे तक्रारकर्ती सरासरी 200 ते 300 रूपये पाणी देयक प्रत्येक दोन महिन्याला भरत होती. तक्रारकर्तीचे वापरात असलेले मापनयंत्र हे घरासमोरील खुल्या जागेत स्थापित होते. तक्रारकर्तीचे निःष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीच्या वापरात असलेले मापनयंत्र जाम झाल्यामूळे वाचन बरोबर दाखवित नव्हते आणि ते कधी वाचन कमी दाखवित होते आणि कधी बंद दाखवित होते. विरूध्द पक्षाचे मिटर वाचकाने तक्रारकर्तीला त्याबाबत तोंडी सांगीतले आणि तसेच माहे फरवरी - मार्च 2015 चे दि. 26/05/2015 चे देयकामध्ये Please Repair or replace your defective meter Immediately नमूद केली आहे. तसेच माहे एप्रिल- में 2015 देयक दि. 24/07/2015 आणि माहे जून – जुलै 2015 देयक दि. 25/09/2015 चे देयकामध्ये तसे नमूद आहे. परंतू, तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाने मापनयंत्र दुरूस्ती करणे किंवा बदलविणे याबाबत काही कारवाई न करता, त्याकडे दुर्लेक्ष केले. मापनयंत्र हि तक्रारकर्तीची मालमत्ता असून, तक्रारकर्तीने सन- 1986 मध्ये नळजोडणी घेतेवेळी महाराष्ट्र शासन विरूध्द पक्षाशी करार केला होता की, करारातील अटीप्रमाणे महाराष्ट्र पाणी पुरवठा आणि सेव्हरेज बोर्ड अॅक्ट 1976 चा कायदा आणि नियम दोन्ही पक्षांवर बंधनकारक राहिल आणि महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाने वेळोवेळी ठरविलेले पाण्याचे दर मान्य राहिल.
17. महाराष्ट्र जिवन प्राधीकरण यांचे अधिसूचना क्र. म.जि.प्रा/वित्त-1/परिव्यय/88/2013 दि. 03/09/2013 मधील तरतुदींनूसार मापन यंत्र विरहित जोडणीस किमान आकार दर प्रतिमहा प्रतिजोडणी या मथळयाखाली खालीलप्रमाणे नमूद आहे-
सर्व नळजोडणीवर मापन यंत्र असावेत मात्र जेथे मापन यंत्र बसविले असतील परंतू तिन महिन्यापेक्षा अधिक काळ चालु स्थितीत नसतील अशा प्रकरणी व मागील तीन महिन्याचे सरासरी देयक खालील किमान आकारापेक्षा कमी असेल अशा वेळी पुढील दर्शविल्याप्रमाणे किमान आकार आकारण्यात यावेत. तीन महिन्याचे सरासरी देयक किमान आकारापेक्षा अधिक होत असल्यास, सरासरी देयक आकारण्यात यावे.
नळजोडणीचा व्यास | घरगुती | उपरोक्त एक-ब 2 (iii) मध्ये नमूद केलेल्या ना नफा ना तोटा तत्वावर चालणा-या संस्था या संस्थांसाठी | बिगर घरगुती |
15 मिली मिटर | 421 | 646 | 1621 |
20 मिली मिटर | 646 | 1285 | 3242 |
25 मिली मिटर | 1249 | 3242 | 6512 |
विरूध्द पक्षाने वरील नमूद सूचनामधील तरतुदींनूसार तक्रारकर्तीला माहे- फरवरी, मार्च 2015, एप्रिल, में. – 2015 व जून-जुलै- 2015 चे पाणी निर्गमित केले व ते बरोबर आहे. जलमापन यंत्र हि तकारकर्तीची मालमत्ता असून ती बदलविण्याची जबाबदारी हि तकारकर्तीची आहे. त्यामुळे जलमापन यंत्र तक्रारकर्तीला स्वखर्चाने बदलवावे लागेल. तक्रारकर्तीने स्वच्छेने आपली नळजोडणी नविन पाईप लाईनवर स्थलांतरीत करण्याकरीता अर्ज केला होता आणि तो विरूध्द पक्षाने मंजूर केल्यानंतर, तक्रारकर्तीने पाणी बिलाची थकबाकी भरून नळजोडणी स्थलांतरीत केली आहे. तक्रारकर्तीने स्वच्छेने नविन पाईप लाईनवर जळजोडणीकरीता अर्ज करून रू. 3,780/-,विरूध्द पक्षाकडे जमा केले. त्यामुळे तक्रारकर्तीची वादग्रस्त देयक रक्कम रू. 3,780/-,ची मागणी नाकारण्यात येत आहे.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 चा निःष्कर्ष होकारार्थी व मुद्दा क्र 2 चा निष्कर्ष नकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
4. अतिरीक्त संच तक्रारकर्तीला परत करण्यात यावे.
npk/-