आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता क्रमांक 1 मोहनदास पोहूमल गोपलानी हे विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक 430010088741 आहे. त्यांच्या घरी विरूध्द पक्षाने मीटर 2000160175 लावला आहे. सदर घराचा वापर बंद असल्याने मासिक वीज वापर महिन्याला सरासरी 4 युनिट इतका आहे व तक्रारकर्त्याने त्याबाबतचे विद्युत बिल वेळोवेळी भरलेले आहे.
3. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास माहे जानेवारी 2014 चे विद्युत बिल रू. 1,79,500/- पाठविले. त्यांत रू. 1,75,626/- इतकी थकबाकी दर्शविली होती. तक्रारकर्त्यास सदर बिल मिळताच आश्चर्याचा धक्का बसल कारण त्याचा वीज वापर नगण्य असतांना सदर बिल लाखाच्या घरात होते.
4. प्रत्यक्षात जे मीटर तक्रारकर्त्याच्या नांवाने बसविण्यासाठी निर्गमित करण्यांत आले ते तक्रारकर्त्याच्या घरी न बसविता अन्य ग्राहकाचे घरी बसविले आणि त्या मीटरचे विद्युत बिल मात्र तक्रारकर्त्याच्या नावाने पाठविण्यांत आले. तक्रारकर्त्याने त्याबाबत दिनांक 16/07/2013 रोजी तक्रार केल्यावर सदरची चूक दुरूस्त करून योग्य विद्युत वापराचे बिल यथावकाश देण्याचे आश्वासन देण्यांत आले. परंतु प्रत्यक्षात बिल दुरूस्ती केली नसल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना दिनांक 20/09/2013 आणि 29/11/2013 रोजी स्मरणपत्र दिले. परंतु केवळ आश्वासन देण्याशिवाय विरूध्द पक्षाने कोणतीही कृती न करता ऑगष्ट 2014 मध्ये बिलाची थकित रक्कम दाखवून रू. 38,880/- चे बिल पाठविले ते पूर्णतः चुकीचे व अन्यायकारक आहे. सदर चुकीच्या बिलाचा तक्रारकर्त्याने भरणा केला नाही म्हणून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली.
5. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा जुना मीटर बदलून नवीन मीटर लावला असून त्याप्रमाणे तक्रारकर्त्याचा विद्युत वापर केवळ 289 युनिट आहे. तक्रारकर्ता नवीन मीटर प्रमाणे प्रत्यक्ष वीज वापराचे विद्युत बिलाचा भरणा करण्यास तयार आहे. विरूध्द पक्षाची वरील कृती बेकायदेशीर असून विद्युत ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आहे म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे दुरूस्त विद्युत बिल देण्याचा आदेश व्हावा
(2) सेवेतील न्यूनतेबद्दल आणि शारीरिक व मानसिक त्रासाबाबत विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना रू. 20,000/- नुकसानभरपाई देण्याचा आदेश व्हावा.
(3) तक्रारखर्चाबाबत रू. 2,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दिलेला दिनांक 16/07/2013 रोजीचा अर्ज, जानेवारी 2014 चे विद्युत बिल, सप्टेंबर 2014 चे विद्युत बिल, तक्रारकर्त्याच्या घराचा फोटो व विद्युत मीटरचा फोटो इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्ता क्रमांक 1 विरूध्द पक्षाचा विद्युत ग्राहक असल्याचे मान्य केले आहे. मात्र तक्रारकर्ता क्रमांक 2 बरोबर विद्युत पुरवठ्याचा कोणताही करार नसल्याने तो विरूध्द पक्षाच विद्युत ग्राहक असल्याचे नाकबूल केले असून तक्रारीस कोणतेही कारण घडल्याचे नाकबूल केले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या नांवाने त्याच्या घरी ग्राहक क्रमांक 430010088741 अन्वये विद्युत पुरवठा दिल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारकर्त्याचा मासिक वीज वापर केवळ 4 युनिट असून त्याने विद्युत बिलाचा नियमित भरणा केल्याचे नाकबूल केले आहे. माहे जानेवारी 2014 चे रू. 1,79,500/- चे विद्युत बिल तक्रारकर्ता क्रमांक 1 ला देण्यांत आल्याचे विरूध्द पक्षाने मान्य केले आहे. मात्र त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याच्या घरी असलेले जुने विद्युत मीटर दिनंक 20/09/2013 रोजी बदलविण्यांत आले त्यावेळी तक्रारकर्त्याच्या घरी लावण्यासाठी विरूध्द पक्षाच्या कार्यालयातून मीटर क्रमांक 5802513887 निर्गमित करण्यांत आले. परंतु नजरचुकीने तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या घरी कर्मचा-याकडून मीटर क्रमांक 5812513852 बसविण्यांत आला. तक्रारकर्त्याच्या नांवाने निर्गमित मीटरची नोंद तक्रारकर्त्याच्या वैयक्तिक खतावणीत नोंदली असल्याने सदर मीटरचा विद्युत वापर तक्रारकर्त्याचा आहे असे समजून त्या मीटर रिडींगचे बिल तक्रारकर्त्यास चुकीने पाठविण्यांत आले. परंतु सदर बाब लक्षात येताच विरूध्द पक्षाने चुकीची दुरूस्ती केल्याने विरूध्द पक्षाला कोणताही आर्थिक भुर्दंड बसला नाही. तक्रारकर्त्याचा जुना मीटर बदलविला तेव्हापर्यंत म्हणजे दिनांक 20/09/2013 पर्यंत तक्रारकर्त्याकडे वीज बिलाची रू. 21,959.65 इतकी थकबाकी होती. त्यानंतर नवीन मीटर प्रमाणे प्रत्यक्ष वीज वापराची रक्कम धरून तक्रारकर्त्याला ऑगष्ट 2014 मध्ये रू. 38,880/- चे विद्युत बिल देण्यांत आले ते बरोबर असून सुध्दा तक्रारकर्त्याने त्याचा भरणा केला नाही. थकित वीज बिलाचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यांत येईल अशी दिलेली नोटीस कायदेशीर तरतुदीप्रमाणे असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही. नोटीस मिळूनही तक्रारकर्त्याने दिनांक 31/07/2013 पासून वीज बिलाचा भरणा केलेला नाही
तक्रारकर्ता क्रमांक 2 हसानंद गोपलानी यांनी विरूध्द पक्षाकडे तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या ग्राहक क्रमांक 430010088741 बद्दल तसेच चौथराम गोपलानी यांच्या ग्राहक क्रमांक 430010126406 संबंधाने तक्रार केली होती. त्याबाबत विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने अहवाल मागविला असता तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या नावाने निर्गमित केलेले विद्युत मीटर नजरचुकीने अन्य व्यक्तीच्या घरी बसविण्यांत आल्याचे लक्षात आल्याने बिलात योग्य दुरूस्ती करण्यांत आली. तक्रारकर्त्याने सत्यस्थिती मंचापासून लपवून ठेवली असून तक्रारकर्ता स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नसल्याने कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही म्हणून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक 1 मोहनदास गोपलानी याच्या ग्राहक खतावणीची प्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या घरी तक्रारीत नमूद मीटर क्रमांक 20100160175 च्या वाचनाप्रमाणे देण्यांत आलेले माहे ऑगष्ट 2012 चे वीज बिल रू. 3,510/- चा भरणा दिनांक 06/09/2012 रोजी केल्याची पावती तक्रारकर्त्याने दाखल केली आहे.
ऑगष्ट 2012 पर्यंतचे वीज बिल तक्रारकर्त्याने भरणा केले असून त्यानंतरचे वीज बिलाचा तक्रारकर्त्याने भरणा केला नसल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे.
विरूध्द पक्षाने दाखल केलेल्या खतावणीप्रमाणे तक्रारकर्त्याकडे मीटर क्रमांक 20/00160175 मार्च 2013 पर्यंत होते आणि एप्रिल 2013 मध्ये सदर मीटर बदलून नवीन मीटर क्रमांक 58/22079505 लावल्याची नोंद आहे. मात्र विरूध्द पक्षाच्या लेखी जबाबात याचा उल्लेख नसून दिनांक 20/09/2013 रोजी नवीन मीटर बसविल्याचा उल्लेख आहे आणि खतावणीमध्ये नवीन मीटर क्रमांक 58/02513887 नमूद आहे व सदर मीटरच्या वाचनाप्रमाणे तक्रारकर्त्यास ऑक्टोबर 2013 पासून फेब्रुवारी 2014 पर्यंत बिल देण्यांत आलेले आहेत. प्रत्यक्षात अन्य व्यक्तीचे घरी बसविला असून तक्रारकर्त्याचे घरी बसविलेला मीटर क्रमांक 58/12513852 असल्याचे विरूध्द पक्षाला मान्य आहे व त्याप्रमाणे फेब्रुवारी 2014 मध्ये रू. 1,46,226/- चे क्रेडिट देऊन समायोजन केले आहे व रू. 34,713/- चे बिल तक्रारकर्त्यास देण्यांत आले. परंतु सदर बिलाचा तक्रारकर्त्याने भरणा केला नाही म्हणून मार्च 2014 चे रू. 35,431.57, जून 2014 – रू. 37,448.20, जुलै 2014 – रू. 38,059.96 आणि ऑगष्ट 2014 मध्ये रू. 38,877/- चे बिल देण्यांत आले. सदर बिलात सप्टेंबर 2012 ते सप्टेंबर 2013 पर्यंतची थकबाकी रू. 21,959.65 जोडली असून ती तक्रारकर्त्यास मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की, त्याचे घर बंद असल्याने दरमहा वीज वापर सरासरी 4 ते 5 युनिट आहे. मात्र मीटर सदोष असल्याने मध्येमध्ये अवास्तव वीज वापर दाखवून त्याची आकारणी केलेली आहे. त्याबाबतची लेखी तक्रार दिनांक 16/07/2013 रोजी करण्यांत आली होती, त्यांत तक्रारकर्त्याच्या नावाने नवीन मीटर देण्यांत आल्याचे विरूध्द पक्षाच्या कर्मचा-यांनी सांगितले. परंतु सदर नवीन मीटर अन्य व्यक्तीकडे लावून त्याचे बिल मात्र तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या नावाने देण्यांत आल्याचे नमूद केले आहे. सदर तक्रारीची प्रत दस्त क्रमांक 1 वर आहे. तक्रारकर्त्याच्या घरी खतावणीत नमूद केल्याप्रमाणे एप्रिल 2013 मध्ये 20/00160175 हे मीटर बदलून 58/22079505 हे मीटर लावलेले नसतांना सप्टेंबर 2013 पर्यंत सदर मीटरच्या वाचनाप्रमाणे बिलाची आकारणी केली असून त्याची थकबाकी रू. 21,959.65 दाखविली आहे ती चुकीची आहे. तक्रारकर्त्याचा मासिक वीज वापर 4 ते 5 युनिट धरून सदर कालावधीची वीज बिल आकारणी करणे व ती बाकी नवीन मीटरप्रमाणे वीज वापरात जोडून नवीन बिल देणे ही विरूध्द पक्षाची जबाबदारी आहे. परंतु विरूध्द पक्षाने तसे न करता रू. 21,959.65 एवढी थकित बिलाची रक्कम मागणी करण्ो व ती दिली नाही म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी देणे ही सेवेतील न्यूनता आहे.
सदर प्रकरणात विरूध्द पक्षाने दाखल केलेल्या ग्राहक खतावणीचे अवलोकन केले असता Meter locked किंवा Reading not available या परिस्थितीत सप्टेंबर 2012 आणि जानेवारी 2013 मध्ये वीज वापर अनुक्रमे 1125 आणि 237 युनिट दर्शविला आहे. अन्य महिन्यांत सप्टेंबर 2012 ते मार्च 2013 या कालावधीत तो 3 ते 13 युनिटचे दरम्यान आहे.
विरूध्द पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे दिनंक 20/09/2013 रोजी मीटर बदलण्यांत आला. मात्र वैयक्तिक खतावणीत मीटर एप्रिल 2013 मध्ये बदलविण्यांत आल्याचे व त्यानंतर सप्टेंबर 2013 पर्यंत वीज वापर मे ते सप्टेंबर 2013 पर्यंत अनुक्रमे 1273, 543, 479, 270, 423 युनिट दर्शविला आहे. तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीत एप्रिल मध्ये त्याचा मीटर बदलविलेला नसतांना दुस-याच्या मीटरचे वाचन लावून त्याला बिल दिल्याचे म्हटले आहे. विरूध्द पक्षाने देखील आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याचा मीटर एप्रिल 2013 मध्ये बदलविल्याचे नमूद केले नसून मीटर दिनांक 20/09/2013 रोजी बदलविल्याचे म्हटले आहे. एप्रिल 2013 मध्ये मीटर बदल केल्याबाबत मीटर चेंज रिपोर्ट देखील विरूध्द पक्षाने दाखल केलेला नाही. दिनांक 20/09/2013 रोजी तक्रारकर्त्याचे घरी प्रत्यक्षात 58/2513852 क्रमांकाचा मीटर लावला असतांना ग्राहक खतावणीत त्याच्या नांवाने मीटर क्रमांक 58/02513887 या मीटर क्रमांकाचे बिल मार्च 2014 पर्यंत पाठविले आहे व ही बाब लक्षात आल्यावर मीटर क्रमांक 58/12513852 च्या प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे बिलात एप्रिल 2014 मध्ये दुरूस्ती केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे एप्रिल 2013 ते सप्टेंबर 2013 या कालावधीतील बिल तक्रारकर्त्याच्या घरी न बसविलेल्या मीटरचे देण्यांत आल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्षात तक्रारकर्त्याच्या घरी न बसविलेल्या मीटरच्या वीज वापराचे बिलाची थकबाकी जोडून तक्रारकर्त्यास बिल पाठविणे व त्याचा भरणा केला नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करण्याची दिनांक 11 मे, 2015 रोजी नोटीस देण्याची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः– विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घरी न बसविलेल्या मीटरचे बिल पाठविणे ही तांत्रिकदृष्ट्या सेवेतील न्यूनता असली तरी विरूध्द पक्षाने दिनांक 20/09/2013 पासून मार्च 2014 पर्यंतच्या नवीन मीटरच्या वीज वापराप्रमाणे बिलात दुरूस्ती करून दिली आहे. मात्र ऑगष्ट 2012 ते सप्टेंबर 2013 मधील विरूध्द पक्षाने दर्शविलेला वीज वापर व त्यापोटी नवीन बिलांत आकारलेली थकबाकी रू. 21,959.65 निराधार व चुकीने आकारल्याचे दिसून येते. नवीन मीटर योग्य वीज वापर दर्शवित असून त्याप्रमाणे सरासरी वीज वापर लक्षात घेऊन सदर कालावधीचे वीज बिल आकारणीस हरकत नसल्याचे तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांनी युक्तिवादात सांगितले. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याचे घरी 20 सप्टेंबर, 2013 रोजी नवीन मीटर बसविल्यापासून सप्टेंबर 2014 पर्यंतच्या 1 वर्षाच्या कालावधीचा नवीन मीटर क्रमांक 58/12513852 प्रमाणे येणारा सरासरी मासिक वीज वापर हा माहे सप्टेंबर 2012 ते 20 सप्टेंबर 2013 या कालावधीचा मासिक वीज वापर गृहित धरून माहे सप्टेंबर 2012 ते सप्टेंबर 2013 या कालावधीचे वीज बिल तयार करावे आणि त्या थकबाकीसह 20 सप्टेंबर 2013 पासून नवीन मीटर क्रमांक 58/12513852 ने दर्शविलेल्या वीज वापराचे डिसेंबर 2016 पर्यंतचे बिल विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक 1 यांना द्यावे असा विरूध्द पक्षाला आदेश देणे न्यायोचित होईल.
तक्रारकर्ता क्रमांक 1 यांनी माहे ऑगष्ट 2012 चे थकबाकीसह रू. 3,510/- चे वीज बिलाचा दिनंक 06/09/2012 रोजी भरणा केला आहे. मात्र त्यानंतर आजपर्यंत वीज बिलाचा भरणा केलेला नाही. म्हणून सदर तक्रारीचा खर्च आणि मागणी केलेली अन्य दाद मंजूर करणे योग्य होणार नाही.
तक्रार दाखल केल्यापासून आजपर्यंत मंचाने पारित केलेल्या आदेशास अनुसरून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे जी रक्कम जमा केली असेल ती रक्कम वरील प्रमाणे घेणे असलेल्या रकमेत विरूध्द पक्षाने समायोजित करावी आणि उर्वरित रकमेची बिलात मागणी करावी. बिलाच्या रकमेपेक्षा तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केल्यापासून विरूध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम अधिक असल्यास ती पुढील बिलात समायोजित करावी.
विरूध्द पक्षाने सदर आदेशाप्रमाणे विरूध्द पक्षाला द्यावयाच्या बिलात कोणतेही व्याज किंवा दंडाची आकारणी करू नये असाही आदेश देणे उचित होईल. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्ता क्रमांक 1 ची तक्रार विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचेविरूध्द संयुक्त व वैयक्तिकरित्या खालीलप्रमाणे मंजूर करण्यांत येत आहे.
1. तक्रारकर्त्याचे घरी लावलेले नवीन मीटर क्रमांक 58/12513852 चे दिनांक 20/09/2013 ते सप्टेंबर 2014 या एक वर्षाच्या कालावधीतील वीज वापराची मासिक सरासरी काढून येणारा मासिक वीज वापर हा तक्रारकर्त्याचा माहे सप्टेंबर 2012 ते 20 सप्टेंबर 2013 या कालावधीतील मासिक वीज वापर असल्याचे गृहित धरून सदर कालावधीचे स्वतंत्र वीज बिल (with monthly break up) तयार करावे.
2. मीटर क्रमांक 58/12513852 बसविल्यापासून दिनांक 20/09/2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत प्रत्यक्षात जो वीज वापर झाला असेल त्याचे (with monthly break up) स्वतंत्र वीज बिल तयार करावे.
3. वरील क्रमांक 1 व 2 प्रमाणे तयार करावयाच्या बिलात कोणताही दंड किंवा व्याजाची आकारणी विरूध्द पक्षाने करू नये.
4. वरील क्रमांक 1 व 2 प्रमाणे तयार केलेल्या वीज बिलाची स्वतंत्र किंवा एकत्र मागणी विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी. सदर बिलाच्या रकमेतून तक्रार दाखल केल्यापासून आजपर्यंत तक्रारकर्त्याने जी रक्कम विरूध्द पक्षाकडे जमा केली आहे ती वजा करून उर्वरित रकमेची मागणी करावी आणि बिलापेक्षा जमा केलेली रक्कम अधिक असल्यास ती पुढील बिलांत समायोजित करावी.
5. वरीलप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सप्टेंबर 2012 ते डिसेंबर 2016 पर्यंतच्या बिलाची मागणी प्राप्त झाल्यावर देणे निघणा-या रकमेचा तक्रारकर्त्याने 15 दिवसांचे आंत भरणा करावा.
6. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
7. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
8. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.