न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
यातील तक्रारदार नं.2 हे तक्रारदार क्र.1 यांचे कंपनीत उपसंचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कामाचा व्याप पाहून वि.प.क्र.1 यांनी त्यांचे मालकीची इर्टीगा कार वि.प.क्र.2 यांना वापरणेस दिली होती. सदर इर्टिगा कारचा रजि.नं. एम.एच.09-सी.एम.-8335 असा होता. वि.प.क्र.2 हे उदगाव येथे रहात असून ते दि. 13/06/2017 रोजी कृष्णा नदीत पोहण्यासाठी सकाळी सहा वाजता सदरची कार घेवून गेले. नदीच्या काठावर कपडे काढून ठेवले व पोहणेस गेले. पोहून परत आलेवर त्यांचे खिशातून कोणीतरी नमूद कारची किल्ली नेलेचे लक्षात आले. लगेचच ते कार पार्कींग केले ठिकाणी गेले असता त्याठिकाणी सदरची कार दिसून आली नाही व सदरचे कारची चोरी झालेचे त्यांचे लक्षात आले. त्यामुळे तक्रारदार क्र.1 यांनी जयसिंगपूर पोलिस स्टेशन व वि.प. विमा कंपनीस रितसर कळविले. शेवटी पोलिसांनी शोधाशोध करुनही सदरची कार मिळून आली नाही. म्हणून तक्रारदार क्र.1 आवश्यक ते पोलिस पेपर्स व गाडीचे कागदपत्र वि.प. कंपनीस दिले व वि.प. विमा कंपनीकडे विमा क्लेम दाखल केला. परंतु वि.प. विमा कंपनीने तक्रारदार क्र.1 यांचा विमा क्लेम नाकारला आहे. तक्रारदाराने कोणत्याही पॉलिसी अटी व शर्तींचा भंग केला नाही अथवा विलंब केला नसतानाही वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रु. 5,44,945/-, सबळ कारणाशिवाय वि.प. कंपनीने विमा क्लेम नाकारलेमुळे तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/-, तक्रारदाराची इर्टिगा कार चोरीस गेलेमुळे तक्रारदारास पर्यायी व्यवस्था करावी लागली त्यासाठी खर्च केलेली रक्कम रु.1,00,000/-, कोर्ट खर्चासाठी रु. 25,000/-, वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमाक्लेम विनाकारण नो क्लेम म्हणून पाठविलेले पत्र, तक्रारदारास क्लेमबाबत चौकशी वेळी उत्तर न देणे वगैरेसाठी दंडात्मक कारवाई म्हणून रु. 50,000/- अशी एकूण रक्कम रु. 9,19,945/- व सदर रकमेवर चोरीची घटना घडलेपासून रक्कम तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याज अशी सर्व रक्कम वि.प. विमा कंपनीकडून वसूल होवून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 12 कडे अनुक्रमे वि.प. ने तक्रारदाराचा क्लेम नाकारलेचे पत्र, कार चोरी झालेबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे दिलेली फिर्याद, तक्रारदार क्र.2 ची फिर्याद, पंचनामा, वि.प. विमा कंपनीकडे सादर केलेला क्लेम फॉर्म, सदर कारची इन्शुरन्स पॉलिसी, आर.सी.बुक, ड्रायव्हींग लायसेन्स, पोलिस एफ.आय.आर., तक्रारदाराने वि.प. यांना वाहन चोरीच्या क्लेमच्या तडजोडीसाठी दिलेले स्मरणपत्र, तक्रारदाराने वि.प. यांना चोरीस गेले वाहनाच्या विमा क्लेमबाबत दिलेले पत्र, तक्रारदाराने वि.प. यांना तडजोडीसाठी दिलेले पत्र व कॅनस्ल्ड चेक, तक्रारदारतर्फे वकील सलीम मुजावर यांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदरची नोटीस वि.प. यांना मिळालेची पोहोचपावती, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्र, अधिकारपत्र, वादातील कारची विमा पॉलिसी, तक्रारदाराने वि.प. कंपनीस कार चोरीस गेलेबाबत कळविलेचे पत्र, वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराकडून मागितले कागदपत्रांबाबत पत्र, तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीस पाठवून दिले कागदपत्राबाबत पत्र, तक्रारदार यांचा लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत, म्हणण्याचे अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत वादातील कारची विमा पॉलिसी, दि. 10/11/2017 रोजी वि.प. कंपनीने तक्रारदाराला पाठविलेले पत्र, दि. 7/2/2018 रोजी कंपनीने तक्रारदाराला दिलेले पत्र, तसेच दि. 07/03/2018 रोजीचे पत्र, वि.प. यांचे पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार क्र.1 ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असलेमुळे त्यांना ग्राहक कोर्टात दाद मागता येणार नाही व त्याप्रमाणे ग्राहक मंचाला सदर काम ऐकून निकाल देणेचे अधिकारक्षेत्र नाही.
iii) वि.प.तर्फे सदर कामातील इश्यु केलेल्या विमा पॉलिसीची मुदत दि. 10/07/2016 ते 05/07/2017 असून सदर विमा पॉलिसी ही वाहन क्र. एम.एच.09-सी.एम. 8335 या वाहनाकरिता एम.डी.श्रीम इलेक्ट्रीक कं.लि. यांचे नावे इश्यु केली असून त्याची प्रत याकामी हजर केली आहे. सदर विमा पॉलिसीप्रमाणे वादातील वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु. 5,44,945/- इतकी आहे.
iv) तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीस दि. 20/06/2017 रोजी प्रथमतः वाहन नं. एम.एच.09-सी.एम. 8335 ची चोरी झालेचे सांगितले. त्याचदिवशी वि.प. यांनी तक्रारदार यांना विमा क्लेम फॉर्म देवून सदर तक्रारदाराचे विमा क्लेमसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याचे पत्र देखील तक्रारदाराला दिले. तथापि तक्रारदार यांनी वि.प. चे मागणीप्रमाणे कागदपत्रांचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे वि.प. यांनी दि. 10/11/2017 रोजी आणि दि. 7/12/2018 रोजीचे दोन पत्रांद्वारे क्लेमसंबंधीत पूर्तता करणेस तक्रारदाराला सांगितले होते. तथापि तक्रारदाराने आवश्यक ती कागदपत्रे मागणी केलेप्रमाणे दिली नाहीत. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारदारांना दिले दि. 7/3/2018 चे पत्राप्रमाणे पूर्तता न केलेने क्लेम क्लोज करीत आहे असे तक्रारदाराला कळवले.
v) तक्रारदाराचे कथनाप्रमाणे दि. 23/03/2018 रोजी ए समरी घेवून वि.प. चे ऑफिसमध्ये तक्रारदार आले होते व वि.प. कडून मार्च एंडिंगमुळे क्लेम क्लोज केला आहे व एप्रिलमध्ये क्लेम रिओपनिंगचा अर्ज द्या असे सांगितले, याचा वि.प. स्पष्टपणे इन्कार करतात. सदचे तक्रारदारराचे कथन पूर्णपणे खोटे असून वि.प. ला मान्य व कबूल नाही.
vi) वि.प. यांचे म्हणणेप्रमाणे तक्रारदाराने सांगितलेप्रमाणे तक्रारदार क्र.2 हे सकाळी 6 वाजणेचे सुमारास नदीवर पोहायला गेले व त्यांनी पँटच्या खिशात गाडीची किल्ली ठेवून पँट तशीच ठेवून पोहण्यास नदीत गेले. वस्तुतः एवढया किंमतीची गाडीची किल्ली कोणताही अटेंडंट अगर देखरेख करणारा नसताना पँटच्या खिशात ठेवून पँट नदीकाठी ठेवणे व पोहणेस जाणे म्हणजेच चोराला आंमत्रण दिल्यासारखेच होते हा तक्रारदार क्र.2 चा निष्काळजीपणा होता व आहे. सबब, तक्रारदार क्र.2 चे निष्काळजीपणामुळे वाहन चोरीस गेलेचे स्पष्ट होते तसेच सदरचे वाहन वि.प.क्र.1 ने वि.प.क्र.2 ला ऑफिस कामासाठी दिले होते तथापि चोरी झाली त्यावेळी वाहन हे ऑफिस कामासाठी नाही तर वैयक्तिक कामासाठी वापरलेचे कथनावरुन स्पष्ट होते.
vii) वादातील वाहनाची चोरी झालेवर ताबडतोब तक्रारदाराने सदरची बाब पोलिसांना व वि.प. विमा कंपनीस कळविणे आवश्यक होते. तक्रारदाराने सदर चोरीच्या घटनेबाबत पोलिस स्टेशन व वि.प. यांना कळविण्यास विंलब लावला आहे. त्यामुळे वि.प. ने तक्रारदाराचा विमा क्लेम योग्य कारणासाठीच नामंजूर केला आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार नं.1 चे मालकीची मारुती इर्टिगा झेड.डी.आय. नं. एम.एच.09-सी.एम. 8335 या कारचा विमा तक्रारदार क्र.1 ने वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. सदरची विमा पॉलिसी याकामी दाखल असून तक्रारदाराने सदर विम्यासाठी रक्कम रु. 8,055/- इतका विमा हप्ता वि.प. विमा कंपनीकडे भरुन पॅकेज पॉलिसी घेतली होती. सदर विमा कालावधीसाठी वाहनाची आय.डी.व्ही. रु. 5,44,945/- इतकी केली होती. सदर विमा पॉलिसीचे कालावधीत सेवा पुरविणेची जबाबदारी व जोखीम वि.प. विमा कंपनीने घेतली होती. त्यामुळे तक्रारदार क्र.1 हे वि.प विमा कंपनीचे ग्राहक आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 ने सदर वाहन त्याचे निगराणीसाठी तक्रारदार क्र.2 ला वापरण्यास दिले होते. सबब, तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीचे ग्राहक असून वि.प. विमा कंपनी ही सेवापुरवठादार आहे या बाबी स्पष्ट व सिध्द होतात. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराचे तक्रारअर्ज व अॅफिडेव्हीट मधील कथनाप्रमाणे तक्रारदार क्र.1 ने त्यांची वादातील कार तक्रारदार क्र.2 यांस वापरणेसाठी दिली होती. वर नमूद वादातील इर्टिगा कारचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला होता. सदर वाहन घेवून तक्रारदार क्र.2 हे दि. 13/06/2017 रोजी सकाळी 6 वाजता कृष्णा नदीवर पोहणेसाठी गेले होते. त्यावेळी नमूद कार अंकली टोलनाका येथे रस्त्याच्या पश्चिम बाजूस पार्क केली. तक्रारदार क्र.2 कडे वैध चारचाकी गाडी चालवणेचे लायसेन्स होते. सदर लायसेन्सची प्रत याकामी दाखल आहे. तक्रारदार क्र.2 ने सदरची कार रितसर लॉक करुन वाहनाची चावी आपल्यासोबत घेवून ते कृष्णा नदीकाठावर गेले. तेथे त्यांनी किल्ली पँटच्या खिशात ठेवून कपडे नदीकाठावर ठेवून नदीत पोहणेसाठी गेले. पोहून परत आलेवर कपडे घालत असताना पँटच्या खिशातील गाडीची चावी नसलेचे आढळून आले. तक्रारदार क्र.2 ने पार्कींग केले ठिकाणी पाहिले असता वादातील कार त्याठिकाणी आढळून आली नाही. तक्रारदाराने त्याठिकाणी असले लोकांकडे चौकशी केली, गाडीची शोधाशोध केली परंतु गाडी दिसून आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने ताबडतोब सकाळी 9.30 वाजता जयसिंगपूर पोलिस स्टेशन येथे तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी प्रथम वाहनाचा शोध घ्या व त्यातूनही वाहन न मिळालेस उदया लेखी तक्रार घेतो असे सांगितले. तक्रारदार क्र.2 ने तक्रारदार क्र.1 ला तसे कळविले. पूर्ण दिवसभर वादातील कारचा शोध घेवूनही वाहन मिळून आले नाही. त्यामुळे तक्रारदार क्र.2 ने दि. 14/6/2017 रोजी गु.र.नं. 135/2017 अन्वये वाहन चोरीची फिर्याद दाखल केली व योग्य ते कागद पोलिस स्टेशनकडे दाखल केले.
8. सदरच्या घटनेनंतर तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे प्रथम तोंडी व दि. 20/6/2017 रोजी लेखी पत्र देवून वाहन चोरीस गेलेचे कळविले व क्लेम फॉर्मची मागणी केली. त्यानुसार तक्रारदराने ताबडतोब क्लेम फॉर्म, विमा पॉलिसी झेरॉक्स, वाहनाचे आर.सी.बुक झेरॉक्स, ड्रायव्हींग लायसेन्स क्लेम फॉर्मसोबत जोडून वि.प.कडे सादर केला व वि.प. कंपनीच्या दि. 20/6/2017 रोजीच्या नोटीसप्रमाणे मागणी प्रमाणे सर्व कागदपत्रे, अंतिम अहवाल व अ समरी रिपोर्ट वगळून वि.प. कंपनीकडे सुपूर्त केले. त्यानंतर वि.प. कंपनीने तक्रारदाराला पत्र पाठवले व कागदपत्रांची पूर्तता झाली नाही म्हणून नो क्लेम घोषीत करत असलेचे कळवले. तदनंतर जे.एम.एफ.सी. जयसिंगपूर यांचेकडून दि. 19/3/2018 रोजी अ समरी मंजूर होवून मिळताच तक्रारदारने त्याची सहीशिक्क्याची नक्कल काढून वि.प. कडे देण्यास गेले असता वि.प. ने सदर कागदपत्रे एप्रिलच्या दुस-या आठवडयात द्या, तुमची फाईल रिओपन करतो असे तक्रारदारास सांगितले. तदनंतर तक्रारदाराने दि. 24/8/2018 रोजी वि.प. कंपनीस लेखी पत्र देवून रक्कम रु.5,00,000/- तडजोडीने स्वीकारणेस तयार असलेबाबत कळविले व कॅन्स्ल्ड चेक देखील वि.प. ला सुपूर्त केला तसेच अॅड सलीम मुजावर यांचेमार्फत नोटीस पाठवून 15 दिवसात क्लेम मंजूर करावा असे कळविले. परंतु तक्रारदाराने सातत्याने संपर्क साधून व पत्रव्यवहार करुनही वि.प. कंपनीने तक्रारदाराचे विमाक्लेमबाबत तक्रारदाराला काहीही कळविलेले नाही. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदारचा वाहन चोरीचा क्लेम कोणतेही सबळ कारण न देता अप्रत्यक्षरित्या नाकारला आहे हे स्पष्ट होते आणि ही वि.प. ने तक्रारदाराला दिलेली सेवेतील कमतरता किंवा त्रुटी आहे व अनुचित व्यापारी पध्दती अवलंबिलेचे स्पष्ट होते. या सर्व बाबी दाखल सर्व कागदपत्रांवरुन व पुरावा शपथपत्र तसेच लेखी तोंडी युक्तिवाद यावरुन सबळ पुराव्यांसह तक्रारदाराने शाबीत केलेचे स्पष्ट होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य विमाक्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
9. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार व वि.प. ने दाखल केले सर्व कागदपत्रे पुरावा शपथपत्र, लेखी तोंडी युक्तिवाद यांचे मंचाने अवलोकन केले असता याकामी वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराने वाहनाची काळजी घेणेस निष्काळजीपणा केला असे मोघम कारण देत क्लेम नाकारला आहे. परंतु याकामी सर्व कागदपत्रे पुरावे यांचे अवलोकन करता वि.प. ने त्यांचे कथनाचे शाबीतीसाठी कोणताही ठोस पुरावा याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे वि.प. ने केलेली कथने सिध्द होऊ शकत नाहीत. याउलट तक्रारदाराने त्यांचे तक्रारअर्जातील सर्व कथने सबळ पुराव्यासह सिध्द केलली आहेत. सबब, याकामी तक्रारदार हे विमा पॉलिसीत नमूद केले वाहनाच्या आय.डी.व्ही. रक्कम रु.5,44,945/- वि.प. विमा कंपनीकडून वसूल होवून मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर विमा रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने व्याज वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी व कोर्ट खर्चापोटी रक्कम रु.10,000/- एवढी रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. याकामी तक्रारदाराने वाहनाची दुसरी व्यवस्था केलेबाबत ठोस पुरावा दिला नाही. सबब, त्याबाबतीत तक्रारदाराची मागणी मंजूर करता येणार नाही.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना वादातील कारच्या विमाक्लेमपोटी सदर वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम रु. 5,44,945/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.