तक्रारकर्त्यातर्फे त्यांचे वकील : श्री. आर.यू बोरकर
विरूध्द पक्षा तर्फे वकील : श्री. एस.बी.राजनकर,
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. भास्कर.बी. योगी, अध्यक्ष -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दि. 15/02/2019 रोजी घोषीत.)
1. तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्षाविरूध्द या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून विदयुत जोडणी विज वापराकरीता स्वतःच्या घरासाठी घेतली आहे. तसेच ते वेळोवेळी आपल्या मालकीचे घर भाडयावरती दयायचे. तसेच भाडेकरूच्या गरजेनूसार हि विदयुत जोडणी व्यावसायीक वापराकरीता किंवा घरगुती वापराकरीता रितसर अर्ज करून त्या टेरीफप्रमाणे नियमीतपणे बदल करून बिल भरायचे. परंतू एप्रिल- 2013 मध्ये व्यावसायीक वापरातून घरगुती वापरामध्ये बदल करूनही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला जास्तीचे बिल दिले व वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्या बिलामध्ये दुरूस्ती केली नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्यानी या मंचापुढे योग्य न्याय मिळण्याकरीता हि तक्रार दाखल केली आहे.
3. विरूध्द पक्ष यांनी या मंचात हजर होऊन आपली लेखीकैफियत सादर केलेली असून त्यांनी असे आक्षेप लावले की, तक्रारकर्ता हा त्या घरी राहत नाही व नेहमी घर भाडयावरती देय असायचा परंतू एप्रिल- 2013 नंतर तो घर भाडयावरती चढवलेला नाही. म्हणून त्यांनी बिलाप्रमाणे पैसे भरले नसल्यामूळे जागेचा पंचनामा करून कायदयानूसार विदयुतचा सुधारीत बिल देऊनही तक्रारकर्त्याने दि. 19/03/2015 पर्यत उरलेली रक्कम जमा केली नाही. म्हणून माहे ऑक्टोबर- 2016 मध्ये त्यांचा विदयुत पुरवठा खंडित केला होता. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करण्याचा कारण दि. 22/05/2013 ते दि. 11/05/2016 या कालावधीचा असून तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार हि कालबाहय असल्यामूळे या मंचानी हि तक्रार कलम 24 (अ) नूसार खारीज करावे अशी मागणी केली. तसेच विरूध्द पक्ष यांनी माहे जुलै – 2016 रोजी सुधारीत बिलानूसार तक्रारकर्त्याला रू. 963.43 पैसे इतकी रक्कम दयावयाची होती ती तक्रारकर्त्याने आजपर्यंत भरली नाही. म्हणून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सेवा पुरविण्यात कोणताही कसुर केला नाही.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत जोडलेले कागदपत्र, पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केलेले आहेत. विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेली लेखीकैफियत व त्यासोबत जोडलेले कागदपत्र, साक्षपुरावा, लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तीवाद व कागदपत्राचे अवलोकन केल्यानतंर त्यावरील आमचे निःष्कर्ष कारणासहित खालीलप्रमाणे आहेतः-
:- निःष्कर्ष -:
5. विरूध्द पक्ष यांनी त्याची चूक स्विकारून तक्रारकर्त्याला सुधारीत बिलाप्रमाणे माहे फरवरी- 2016 मध्ये रू. 2338.88 पैसे तसेच माहे जून- 2016 मध्ये 6337.52 पैसे इतकया पैशाची क्रेडिट दिली आहे. तक्रारकर्त्याने हि तक्रार दि. 21/08/2016 रोजी दाखल केलेली असून विरूध्द पक्ष यांनी तक्रार दाखल करण्याच्या अगोदरच तक्रारकर्त्याला वादित कालावधी म्हणजे दि. 22/05/2013 ते माहे जुलै- 2014 व नोव्हेंबर – 2015 ते में – 2016 या कालावधीचा क्रेडिट जून- 2016 पर्यंत दिलेला आहे. म्हणून तक्रार दाखल करण्याचा कोणताही कारण राहिलेला नसून हि तक्रार दाखल करणे योग्य नाही. परंतू तक्रारकर्त्याचे अधिवक्तानी मौखीक युक्तीवादाच्या वेळेस असे म्हटले की, हि तक्रार दाखल करण्याच्या अगोदर विरूध्द पक्ष यांनी त्या कालावधीचा क्रेडिट तक्रारकर्त्याला दिली आहे अशी माहिती त्यांना सूचविली नाही. माहितीच्या अभावी त्यांनी हि तक्रार या मंचात दाखल केली.
6. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला क्रेडिट दिली असून तक्रार दाखल करण्याचा कोणताही कारण राहिलेला नसून हि तक्रार खारीज करणे योग्य राहिल असे या मंचाचे मत आहे.
वरील चर्चेवरून व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल काणेताहि आदेश नाही.
3. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.