आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता विनायक तुलशीराम साखरे विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा वीज ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 430590602382 आणि मीटर क्रमांक डी.एल. 000572 आहे. दिनांक 22/02/1989 रोजी विद्युत पुरवठा मिळाल्यापासून तक्रारकर्ता वीज बिलाचा नियमित भरणा करीत आहे.
3. तक्रारकर्त्याच्या घरी 3 सी.एफ.एल., 2 फॅन व एक टी. व्ही. एवढीच विद्युत उपकरणे असून ती दिवसातून केवळ दोन-तीन तास जळतात. तक्रारकर्त्याने 2012 ते 2013 या संपूर्ण वर्षात कधीही 100 युनिट वीज वापरली नाही. विरूध्द पक्षाने दिनांक 10/10/2013 ते 10/11/2013 या काळातील प्रत्यक्ष रिडिंग न घेता अंदाजे 1175 युनिट वीज वापर दर्शवून दिनांक 19/11/2013 रोजी रू.7,600/- चे बिल पाठविले. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या कार्यालयात जाऊन सदर बिलाबाबत तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यांत आली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 06/02/2014 रोजी बिल दुरूस्तीसाठी वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होऊनही विरूध्द पक्षाने त्याची पूर्तता न करता पुढील कालावधीच्या वीज बिलात वादग्रस्त बिलाची रक्कम जोडून वीज बिल देणे सुरू केले व वीज बिलाचा भरणा न केल्याने विद्युत पुरवठा बंद करण्याची धमकी देणे सुरू केले आहे. विरूध्द पक्षाची सदर कृती सेवेतील न्यूनता असल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
(1) तक्रारकर्त्याचे विद्युत बिल प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे दुरूस्त/कमी करण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
(2) तक्रारीचा निर्णय होईपर्यंत विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित करू नये असा आदेश व्हावा.
(3) शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रू.10,000/- देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
4. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने दिनांक 29/10/2012 रोजीचे विद्युत बिल, दिनांक 29/06/2013 चे विद्युत बिल, दिनांक 08/07/2013 ची पावती, दिनांक 30/08/2013 चे विद्युत बिल, दिनांक 12/09/2013 ची पावती, दिनांक 30/09/2013 चे विद्युत बिल, दिनांक 05/10/2013 ची पावती, दिनांक 28/10/2013 चे विद्युत बिल, दिनांक 09/11/2013 ची पावती, दिनांक 28/11/2013 चे विद्युत बिल, कनिष्ठ अभियंता यांचेकडे केलेली तक्रार, दिनलांक 02/01/2014 चे विद्युत बिल, वकिलामार्फत विरूध्द पक्षाला पाठविलेली नोटीस, पोष्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
5. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास वीज जोडणी मंजूर केली असून तो विरूध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे कबूल केले आहे. परंतु तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याकडे केवळ 3 सीएफएल, 2 फॅन आणि टी.व्ही. एवढीच विद्युत उपकरणे दिवसातून 2-3 तासच वापरत असल्याचे नाकबूल केले आहे.
त्यांचे म्हणणे असे की, जुलै, 2013 ते ऑक्टोबर 2013 या कालावधीत तक्रारकर्त्याचे वीज मीटर प्रत्यक्ष वीज वापर सुस्पष्ट दर्शवित नव्हते म्हणून त्या कालावधीत तक्रारकर्त्यास सरासरी वीज वापराचे बिल देण्यांत आले होते. नोव्हेंबर 2013 च्या रिडींगमध्ये मीटर रिडींग 4752 असे दिसून आल्याने मागील 5 महिन्यांतील वास्तविक वीज वापर 1175 युनिटचे बिल रू.7,600/- दिनांक 11/10/2013 ते 10/11/2013 या कालावधीसाठी आकारून त्या कालावधीत तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम वजा करून बिल देण्यांत आले. तक्रारकर्त्याचा 2012-13 या एक वर्षाच्या कालावधीतील प्रत्यक्ष मासिक वीज वापर कधीही 100 युनिट नव्हता हे विरूध्द पक्षांनी नाकबूल केलेआहे. तक्रारकर्त्याकडून तक्रार व नोटीस प्राप्त झाल्यावर विरूध्द पक्षाने त्यांना वीज वापर व वीज बिलाचा हिशेब समजावून कोणत्याही व्याज किंवा अधिकच्या आकाराशिवाय विद्युत बिल भरणा करण्याची संधी देऊनही त्याने बिलाचा भरणा केला नाही, म्हणून तक्रारीस कारण घडल्याचे विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे. तक्रारकर्त्याने केलेल्या प्रत्यक्ष वीज वापराचे बिल भरण्याची त्याची कायदेशीर जबाबदारी असतांना ती टाळण्यासाठी सदर खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. आपल्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्षाने ग्राहक खतावणीची नक्कल दाखल केली आहे.
7. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता विनायक तुलशीराम साखरे याच्या ग्राहक खतावणीची प्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याच्या घरी असलेल्या विद्युत मीटर क्रमांक 46/00650994 ची वीज मीटर वाचनाच्या वेळची स्थिती आणि वीज वापर खालीलप्रमाणे आहेः-
महिना | मीटर स्टेटस् | वीज वापर युनिट | मासिक वीज बिल रू. | थकबाकीसह वीज बिल |
2013 | | | | |
जानेवारी | नॉर्मल | 13 | 96.95 | |
फेब्रुवारी | -"- | 39 | 208.25 | |
मार्च | -"- | 74 | 569.89 | |
एप्रिल | -"- | 17 | 82.31 | |
मे | -"- | 22 | 127.93 | |
जून | -"- | 20 | 121.69 | |
जुलै | INACCE | 31 | 165.13 | |
ऑगष्ट | -"- | 31 | 335.28 | |
सप्टेंबर | -"- | 31 | 191.69 | |
ऑक्टोबर | -"- | 31 | 194.72 | |
नोव्हेंबर | नॉर्मल | 1175 | 7598.97 | |
डिसेंबर | -"- | 16 | 110.86 | 7873.14 थकबाकीसह |
2016 मीटर बदलले. नवीन मीटर क्रमांक 75/13711382
महिना | मीटर स्टेटस् | वीज वापर युनिट | मासिक वीज बिल रू. | व्याज व थकबाकीसह |
जुलै | नॉर्मल | 50 | 297.63 | 23,880.31 |
ऑगष्ट | -"- | 131 | 782.43 | 24,916.84 |
सप्टेंबर | -"- | 77 | 418.46 | 25,649.27 |
ऑक्टोबर | -"- | 125 | 815.06 | 26,661.62 |
नोव्हेंबर | -"- | 80 | 418.66 | 27,373.40 |
डिसेंबर | -"- | 49 | 242.43 | 27,998.47 |
जुलै, 2016 पासून डिसेंबर 2016 पर्यंतची रिडींग ही प्रत्यक्षात मोक्यावर जाऊन HHU पध्दतीने नोंदलेली असल्याने त्यात मानवी चूक किंवा हस्तक्षेप नाही व त्याबाबत तक्रारकर्त्याचा आक्षेपही नाही.
विरूध्द पक्षाने जुलै ते ऑक्टोबर 2013 या महिन्यात मीटर INACCE म्हणजे नोंद घेण्यासाठी उपलब्ध नसल्याचे दर्शवून सरासरी वीज वापर 31 युनिट दाखवून बिल दिले व ते तक्रारकर्त्याने भरले आहे. मात्र नोव्हेंबर 2013 चा वीज वापर (जुलै ते नोव्हेंबर 5 महिने) 1175 युनिट म्हणजे सरासरी दरमहा 235 युनिट दर्शवून वीज बिलाची आकारणी केली आहे. सदर बिल तक्रारकर्त्यास मान्य नाही कारण जानेवारी 2013 पासून डिसेंबर 2016 पर्यंतच्या कालावधीत तक्रारकर्त्याचा सलग 5 महिन्याचा सरासरी वीज वापर 235 युनिट नाही. सदर वीज वापर 5 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा असल्याचे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. नोव्हेंबर 2013 नंतरही सलग 5 महिन्यांत 1175 इतका मोठा वीज वापर कधीही नोंदविलेला नाही. म्हणूनच जुलै 2013 ते नोव्हेंबर 2013 या कालावधीचा एकूण वीज वापर 1175 युनिट दर्शविण्यास कोणताही तांत्रिक किंवा शास्त्रोक्त आधार नाही. असे असतांना तक्रारकर्त्याचा 5 महिन्याचा वीज वापर 1175 युनिट नोव्हेंबर 2013 या एकच महिन्यात दर्शवून त्यासाठी रू.7,600/- चे वीज बिलाची मागणी करण्याची व ते दिले नाही म्हणून पुढील बिलात समाविष्ट करून मागणी करण्याची व त्यावर वेळोवेळी दंड स्वरूपात व्याजाची आकारणी करण्याची आणि माहे नोव्हेंबर 2013 च्या चुकीच्या व बेकायदेशीर वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देण्याची विरूध्द पक्षाची कृती निश्चितच वीज ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
मात्र तक्रारकर्त्याने माहे जुलै, 2013 ते आतापर्यंत प्रत्यक्ष वापरलेल्या वीजेचे बिल भरणे देखील आवश्यक आहे. जुलै, 2013 ते ऑक्टोबर 2013 पर्यंतचे बिल प्रत्यक्ष वीज वापरावर आधारित नसून सरासरी पध्दतीने दिलेले अंदाजित बिल असल्याने ते प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे आकारण्याचा विरूध्द पक्षाला अधिकार आहे. म्हणून जुलै, 2013 ते नोव्हेंबर, 2013 या कालावधीचा प्रत्यक्ष वीज वापर जुलै, 2016 ते डिसेंबर, 2016 या कालावधीत HHU पध्दतीने नोंदलेल्या वीज वापराच्या सरासरीप्रमाणे काढून त्याप्रमाणे जुलै, 2013 ते नोव्हेंबर, 2013 या 5 महिन्याचे वीज बिल विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश देणे न्यायोचित होईल.
वरील तक्त्यांत दिल्याप्रमाणे HHU पध्दतीने माहे जुलै, 2016 ते नोव्हेंबर, 2016 या 5 महिन्यांत नोंदविलेला एकूण वीज वापर 463 युनिट म्हणजे मासिक वीज वापर सरासरी 92.6 इतका येतो. म्हणून विरूध्द पक्षाने माहे जुलै, 2013 ते नोव्हेंबर 2013 या 5 महिन्याचे बिल प्रत्येक महिन्याचा वीज वापर 93 युनिट (92.6 ऐवजी पूर्णांक) गृहित धरून कोणताही दंड व व्याजाची आकारणी न करता तयार करावे आणि सदर बिलापोटी तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम वजा करून उर्वरित रकमेची तक्रारकर्त्याकडे मागणी करावी.
डिसेंबर, 2013 पासून जानेवारी, 2017 पर्यंतच्या प्रत्यक्ष वीज वापराबाबत तक्रारकर्त्याची कोणतीही तक्रार नाही. मात्र विरूध्द पक्षाने सदर कालावधीच्या बिलात नोव्हेंबर, 2013 चे वादग्रस्त बिलाची रक्कम समाविष्ट करून बिलाची मागणी केल्याने ते तक्रारकर्त्याने भरले नाही यांत तक्रारकर्त्याचा कोणताही दोष नाही. म्हणून डिसेंबर, 2013 ते जानेवारी, 2017 पर्यंतचे बिल हे प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे त्यांत मागील थकबाकी, व्याज किंवा दंड याची आकारणी न करता तक्रारकर्त्यास द्यावे आणि सदर थकित बिलाची अर्धी रक्कम तक्रारकर्त्याने बिल प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याचे आंत आणि उर्वरित रक्कम पुढच्या 1 महिन्याच्या आंत भरणा करावी असा आदेश देणे न्यायोचित होईल.
तक्रारकर्त्याने नोव्हेंबर 2013 पासून प्रत्यक्ष वापरलेल्या वीज बिलाची कोणतीही रक्कम विरूध्द पक्षाकडे भरणा केलेली नसून सदर रकमेवरील व्याज माफ करण्याचे आदेश विरूध्द पक्षाला देण्यांत येत असल्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई किंवा तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश देण्यांत येत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे घरी असलेल्या मीटर क्रमांक 76/00650994 चे माहे जुलै, 2013 ते नोव्हेंबर, 2013 या 5 महिन्याच्या कालावधीचे दरमहा 93 युनिट प्रमाणे वीज वापर गृहित धरून स्वतंत्र वीज बिल तयार करावे (With monthly breakup) आणि सदर कालावधीत भरणा केलेली रक्कम वजा करून तक्रारकर्त्याकडे मागणी करावी.
3. डिसेंबर, 2013 पासून जानेवारी, 2017 पर्यंत तक्रारकर्त्याच्या घरी असलेल्या मीटर प्रमाणे जो वीज वापर नोंदविला असेल त्याचे (With monthly breakup) स्वतंत्र बिल तयार करावे.
4. वरील क्रमांक 1 व 2 प्रमाणे तयार केलेल्या बिलात विरूध्द पक्षाने कोणतेही व्याज, दंड, विलंब शुल्काची रक्कम आकारू नये.
5. वरीलप्रमाणे बिलाची मागणी विरूध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्त्याकडे करावी.
6. वरीलप्रमाणे जुलै, 2013 ते जानेवारी, 2017 चे मागणी बिल प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याने अर्ध्या रकमेचा भरणा 30 दिवसांचे आंत आणि उर्वरित रकमेचा भरणा त्यानंतर 30 दिवसांचे आंत करावा.
7. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
8. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
9. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.