आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता श्री. शब्बीरखान सरदारखान पठाण याच्या नावाने ग्राहक क्रमांक 430010504117 अन्वये विद्युत पुरवठा असून सदर विद्युत पुरवठा असलेले घर हे तक्रारकर्त्याच्या वापरात आहे.
3. विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांचेकडून विद्युत पुरवठ्याकरिता तक्रारकर्त्याचे घरी जुने मीटर दिनांक 13/03/2008 रोजी लावले होते. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 13/03/2008 रोजी मीटर लावल्यापासून विद्युत वापराचे बिल दिले नाही म्हणून तक्रारकर्त्याने स्वतः दिनांक 10/03/2012 रोजी विरूध्द पक्षाकडे विद्युत वापराबाबतच्या बिलाची मागणी केली. त्याप्रमाणे विरूध्द पक्षाने दिनांक 16/12/2012 रोजी रू. 41,690/- रकमेचे विद्युत बिल तक्रारकर्त्यास पाठविले. विरूध्द पक्षाने मीटर बिघडल्याचे कारण सांगून दिनांक 18/01/2013 ला तक्रारकर्त्याच्या घराची तपासणी केली व दिनांक 19/01/2013 रोजी नवीन विद्युत मीटर लावून दिले. नवीन मीटर लावण्याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक 18/01/2013 रोजी रू. 250/- चा भरणा विरूध्द पक्षाकडे केला.
4. तक्रारकर्त्याने त्याला प्राप्त झालेल्या सदर विद्युत वापराचे बिल रू. 41,690/- बाबत विरूध्द पक्षाकडे विचारणा केली असता विरूध्द पक्षाने सदर विद्युत वापराचे बिल 2008 पासून देय असल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले.
5. विरूध्द पक्षाने मार्च 2013 मध्ये तक्रारकर्त्याचे घरगुती विद्युत मीटर काढून नेले व तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे विरूध्द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिलेले रू. 41,690/- चे संपूर्ण बिल माफ करावे व तक्रारकर्त्याच्या घरी नवीन मीटर लावण्यांत यावे.
2. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.10,000/- देण्याचा विरूध्द पक्षास आदेश व्हावा.
3. तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांनी पाठविलेली विद्युत बिले, तक्रारकर्त्याचे पत्र, मीटर जोडणीकरिता भरणा केलेल्या रकमेची पावती इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 13/03/2008 रोजी तक्रारकर्त्यास विद्युत कनेक्शन दिल्याचे मान्य केले असून नजरचुकीने तक्रारकर्त्याचे नांव संगणक प्रणालीमध्ये टाकण्यात न आल्यामुळे दिनांक 13/03/2008 पासून तक्रारकर्त्यास विद्युत देयक देण्यांत आले नसल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्यास प्रथम विद्युत देयक मार्च 2008 पासून जुलै, 2012 पर्यंत वापरलेल्या 7842 युनिटचे बिल देण्यांत आले. तक्रारकर्त्याचे विद्युत मीटर क्रमांक 410901 हे दिनांक 13/09/2012 रोजी बदलण्यात आले व नवीन मीटर क्रमांक 1840098 हे लावण्यांत आले. दिनांक 13/09/2012 रोजी तक्रारकर्त्याकडील जुने मीटर क्रमांक 410901 बदलविण्याच्या वेळेस मीटर रिडींग 8130 युनिटस् इतके होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला थकबाकी व चालू रिडींगप्रमाणे ऑक्टोबर 2012 ला रू. 41,919/- चे विद्युत देयक देण्यांत आले. सदर बिल तक्रारकर्त्याने न भरल्यामुळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या घराचा विद्युत पुरवठा आधी तात्पुरता व नंतर कायमस्वरूपी खंडित केला.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने थकित विद्युत बिलापैकी पहिला हप्ता म्हणून रू. 5,000/- दिनांक 18/01/2013 रोजी विरूध्द पक्षाकडे भरणा केला तेव्हा तक्रारकर्त्याला नवीन विद्युत मीटर क्रमांक 2184283 द्वारे विद्युत पुरवठा पुन्हा चालू करण्यांत आला. परंतु तक्रारकर्त्याने थकित विद्युत बिलाचा पुढील हप्ता न भरल्यामुळे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा मार्च 2013 मध्ये खंडित केला. तक्रारकर्त्याने थकित रू. 42,632/- एवढी रक्कम न भरल्यामुळे तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची विरूध्द पक्षांची कृती ही सेवेतील न्यूनता नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
8. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय? | नाही |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबतः- सदरच्या प्रकरणात ग्राहक क्रमांक 430010504117 अन्वये दिनांक 13/03/2008 रोजी विरूध्द पक्षाकडून देण्यांत आलेला विद्युत पुरवठा हा शब्बीरखान सरदारखान पठाण यांच्या नांवाने त्याच्या घरी देण्यात आल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे. विद्युत पुरवठ्याकरिता विद्युत मीटर क्रमांक 410901 बसविण्यात आले.
विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विद्युत बिलासंबंधाने तक्रारकर्त्याचे Consumer Personal Ledger (C.P.L.) मंचासमोर दाखल केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | महिना | वापरलेले युनिट | बिलाची रक्कम |
1. | मे-2012 | 2530 | 10233.26 |
2. | जून – 2012 | 50 | 10651.04 |
3. | जुलै – 2012 | 7842 | 35199.74 |
4. | ऑगष्ट-2012 | 115 | 36310.99 |
5. | सप्टेंबर-2012 | 146 | 37466.83 |
6. | ऑक्टोबर-2012 | 480 | 41919.66 |
7. | नोव्हेंबर-2012 | 169 | 39309.38 |
8. | डिसेंबर-2012 | 286 | 41694.90 |
विरूध्द पक्ष यांनी मान्य केले की, त्यांनी दिनांक 13/03/2008 पासून जुलै, 2012 पर्यंत नजरचुकीमुळे तक्रारकर्त्याचे नांव संगणक प्रणालीमध्ये टाकण्यात आले नसल्यामुळे कॉम्प्युटर रिडींग घेण्यांत आले नाही आणि त्यामुळे तक्रारकर्त्यास बिल देण्यात आलेले नाही. तक्रारकर्त्याने एकूण 7842 युनिटस् चा वापर केलेला आहे. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 13/09/2012 रोजी तक्रारकर्त्याकडील जुने मीटर क्रमांक 4387039 बदलवून त्याऐवजी तक्रारकर्त्याकडे नवीन विद्युत मीटर क्रमांक 1840098 लावले त्यावेळेस जुन्या विद्युत मीटरचे रिडींग 8130 युनिटस् होते. त्याबाबतचा मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट विरूध्द पक्ष यांनी पृष्ठ क्रमांक 29 वर दाखल केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने जुलै, 2012 ते सप्टेंबर 2012 पर्यंत एकूण 288 युनिटस् चा वीज वापर केलेला आहे म्हणजेच तक्रारकर्त्याने सरासरी 144 युनिटस् चा दरमहा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे जुलै, 2012 चे बिल हे एकूण 52 महिन्यांचे आहे. त्यावरून स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने 52 महिन्यात एकूण वीज वापर सरासरी प्रमाणे 7842 युनिटस् चा केला आहे. तक्रारकर्त्याने मीटर नादुरूस्त असल्याबाबत व मीटर रिडींग जास्त येत असल्याबाबत विरूध्द पक्ष यांच्याकडे कधीही तक्रार केल्याचे अथवा मीटर बदलून देण्यासंबंधाने कधीही विनंती केली असल्याचे निदर्शनास येत नाही.
तक्रारकर्त्याने थकित विद्युत बिलापैकी पहिला हप्ता रू.5,000/- दिनांक 18/01/2013 रोजी भरणा केला व विरूध्द पक्ष यांनी नवीन विद्युत मीटर क्रमांक 2184283 द्वारे तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा चालू केला. परंतु तक्रारकर्त्याने थकित विद्युत बिलाचा पुढील हप्ता भरला नाही. म्हणून मार्च 2013 मध्ये तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा विरूध्द पक्ष यांनी बंद केला.
तक्रारकर्त्यावर विद्युत बिलाची रक्कम थकित असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष यांची सदरची कृती ही सेवेतील न्यूनता किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करणारी ठरत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविले आहेत.
10. मुद्दा क्रमांक 3 बाबतः- मुद्दा क्र. 1 व 2 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने तक्रारकर्ता मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 खाली दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.