तक्रारकर्त्यातर्फे –वकील श्री. एस.बी.डहारे
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 –तर्फे श्री. वकील एस.बी राजनकर
(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री.सु.रा.आजने)
- आदेश -
(पारित दि. 28 ऑगष्ट, 2018)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता हा शेतकरी असून मौजा पाऊलदोना येथे त्याची शेती आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेतात विहीर खोदलेली आहे. त्यासाठी तक्रारकर्ता यांनी आपल्या शेतात विजजोडणी घेतलेली आहे. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा खुप जुना ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 431211600137 हा आहे.
3. तक्रारकर्ता यांच्या शेतातील जुना मिटर बंद पडलेला होता त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 07/11/2011 व दि. 28/11/2011 ला मिटर बदलविण्याबाबत विरूध्द पक्षकार यांना विनंती अर्ज दिला होता. त्यावरून विरूध्द पक्षकार यांनी दि. 07/12/2011 ला नविन मिटर क्र. 5225467 लावण्यात आला.
4. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हा विज बिल नियमीतपणे पटवित होता. जुना मिटर बदलवितांना त्याने संपूर्ण रक्कम भरलेली होती. त्यामुळे माहे डिसेंबर 2011 ला विरूध्द पक्षकार यांनी शुन्य रकमेचा बिल पाठविलेला होता. परंतू विरूध्द पक्षकार यांनी माहे जून 2012 चा दि. 28/07/2012 ला रू. 1540/-, व माहे सप्टेंबर 2012 चा दि. 19/10/2012 ला रू. 2700/-,चा बिल देयक पाठविले. या दोन्ही बिलात चुकीचा मिटर क्रमांक नमूद आहे व चालु रिडींग Locked दाखवित आहे व मागील रिडींग 3665 दाखवित आहे. तक्रारकर्ता सांगु इच्छितो की, विरूध्द पक्षकार हे कधीही रिडींग घ्यावयास आले नाही. विरूध्द पक्षकार यांनी पाठविलेले देयक व मिटरमधील रिडींग यात तफावत होती. सदरचे हलगर्जीपणाचे व बेकायदेशीर कृत्य पाहून तक्रारकर्त्यांनी मिटर चेक करून, चेक रिपोर्ट देण्याची विनंती केली. त्यावरून दि. 12/11/2012 ला मिटर चेक करण्याचा व चेक रिपोर्ट देण्यात आला. दिलेल्या चेक रिपोर्टप्रमाणे मिटर रिडींग 00125 होती. तरी सुध्दा त्यानंतर विरूध्द पक्षकार यांनी माहे डिसेंबर 2012 चा दि. 10/01/2013 ला विज बिल रू. 4,320/-, देयक पाठविला. सदर बिल चेक रिपोर्ट प्रमाणे नव्हता. विरूध्द पक्षकार यांनी पाठविलेला देयक खुप जास्त रकमेचा असल्यामूळे तक्रारदार यांनी विरूध्द पक्षकार यांच्या ऑफिसला भेट देऊन झालेली चुक लक्षात आणुन दिली. त्यामुळे विरूध्द पक्षकार यांनी विज देयकात दुरूस्ती करून, रू. 3,000/-,सुधारीत रकमेचा विज देयक दिला. त्यानुसार तक्रारकर्त्यांनी दि. 30/01/2013 ला बिल पटविले होते.
5. विरूध्द पक्षकार हे तक्रारकर्ता यास नियमीतपणे विज देयक पाठवित नसत. विरूध्द पक्षकार यांनी माहे मार्च 2013 चा विज देयक पाठविला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता स्वतः विरूध्द पक्षकार यांच्या कार्यालयात जाऊन, विचारणा केली. तेव्हा विरूध्द पक्षकार यांनी माहे जून 2013 चा रू. 1550/-,चा विज देयक दिला. तो विज देयक सुध्दा तक्रारकर्ता यांनी दि. 23/09/2013 ला पटविले होते.
6. विरूध्द पक्षकार यांचे वारंवार देण्यात येणारे चुकीचे देयक पाहून तक्रारकर्ता याने दि. 03/03/2014 ला विरूध्द पक्षकार यांच्याकडे विनंती करून पुन्हा मिटर चेक करून घेतला व त्यानूसार विरूध्द पक्षकार यांनी चेक रिपोर्ट दिला. त्या चेक रिपोर्टच्या अनुषंगाने विज देयक देण्याबाबत तक्रारकर्ता यानी दि. 04/03/2014 ला विरूध्द पक्षकार यांच्याकडे विनंती केली. तरी सुध्दा विरूध्द पक्षकार यांनी माहे मार्च 2014 चा दि. 01/05/2014 ला रू. 6680/-,चा विज देयक पाठविला. वारंवार माहिती देऊन, व चेक रिपोर्ट देऊन सुध्दा विरूध्द पक्षकार यांनी चुकीच्या मिटर क्रमांकाचे, चालु रिडींग Faulty व मागील रिडींग 3655 दाखविले आहे. सदरचे विज देयक पाहून पुन्हा दि. 02/05/2014 व 03/12/2014 ला लेखी तक्रार विरूध्द पक्षकार यांना दिली व विज देयक रिडींगनूसार देण्याची विनंती केली. सदर बाब विरूध्द पक्षकार यांच्या सेवेतील त्रृटी आहे.
7. दि. 28/08/2014 मिटर चेक केला व त्या रिपोर्टमध्ये सुध्दा मिटर Ok आहे त्यामुळे वारंवार पत्रव्यवहार करून विनंती केल्यानंतर सुध्दा विरूध्द पक्षकार यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे अधिक्षक अभियंता गोंदिया यांना खूलासेवार पत्र पाठवून विरूध्द पक्षकार यांचा हलगर्जीपणा दाखविण्यासाठी लेखी तक्रार पोस्टाने दि. 21/10/2014 ला पाठविली. तरी सुध्दा कुणीही तिळमात्र लक्ष दिले नाही. याउलट, माहे सप्टेंबर 2014 चा रू. 11,150/-,चा विज देयक दिला. तक्रारकर्ता यांस कुणीही न्याय देण्यास तयार नाही. विरूध्द पक्षकार यांच्या सेवेतील त्रृटी, हलगर्जीपणा व अरेरावीपणामुळे अर्जदार यास विनाकारण खुप मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
8. विरूध्द पक्षकार यांनी पुन्हा चुकीचा मिटर क्रमांकाचा व चालु रिडींग Faulty माहे मार्च 2015 चा दि. 30/04/2015 ला रू. 20,570/-,विज देयक पाठविला. सदर विज देयक खुप जास्ती व चुकीचा आहे. तक्रारकर्ता यांचा मिटर चालु असून सुध्दा विरूध्द पक्षकार चुकीचे देयक पाठवित आहे व जबरदस्तीने विज देयक भरण्यास मजबूर करीत आहे. विज देयक न भरल्यास, त्याचे विज कनेक्शन कापण्याची धमकी देतात. तक्रारकर्ता हा 65 वर्षाचा म्हातारा असून तक्रारकर्त्याचे मिटर सुरू आहे. तक्रारकर्त्यावर कोणतीही थकबाकी नाही. तरी सुध्दा तक्रारकर्ता यांची काही चुक नसतांना खोटे व चुकीचे विज देयक पाठवून तक्रारकर्ता यास मानसिक व शारीरीक त्रास देत आहेत. वरच्या अधिका-यांना तक्रार करून कुणीही ऐकायला तयार नाहीत. म्हणून मंचासमोर तक्रार करण्यास भाग झाले आहे. तक्रार अर्जास कारण की, वारंवार तक्रार करून सुध्दा दि. 30/04/2015 ला चुकीच्या मिटर क्रमांकाचा व अवाजवी बिल पाठविल्यानंतर दररोज घडत आहे.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, मार्च 2015 व त्या अगोदरचे मार्च 2014 व सप्टेंबर 2014 चे विज देयक चुकीचे असल्याने रद्द ठरविण्यात यावे. चेक रिपोर्टप्रमाणे व विज वापराप्रमाणे विज बिल देण्याचा आदेश करण्यात यावा. आदेशाप्रमाणे दिलेल्या विज देयकावर कोणत्याही प्रकारचा व्याज किंवा दंड न भरण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू. 25,000/-, व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/-,देण्याचे विरूध्द पक्षांना आदेश देण्यात यावा.
10. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून, विरूध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. विरूध्द पक्षाला नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते प्रकरणात हजर झाले व लेखी उत्तर दाखल केले. विरूध्द पक्षाने लेखी उत्तरात असे कथन केले की, तक्रारकर्ता याने दि. 23/09/2013 ला ऑगष्ट 2013 पर्यंत विरूध्द पक्षकार याने दुरूस्त करून दिलेले बिल पटविल्याबद्दल वाद नाही की, तक्रारकर्ता यांचे बदली झालेल्या मिटरची माहिती संगणकात भरून न झाल्याने चुकीचे बिल तक्रारदारास देण्यात आले. परंतू सदरचे बिल तक्रारकर्त्यास त्वरीत दुरूस्त करून, दिले आहे व ते तक्रारकर्त्याने मान्य करून बिल रकमेचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्ता यांच्या नविन मिटरचे डिटेल माहिती संगणकात न टाकल्यामूळे सप्टेंबर 2013 ते जून 2015 पर्यंत तक्रारकर्त्यास Faulty Average बिल देण्यात आले. तक्रारकर्त्यास वरील कालावधीत गेलेले विज बिल माहे डिसेंबर 2015 मध्ये दुरूस्त करण्यात आले आहे. विरूध्द पक्षकार यांनी तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2013 ते जून 2015 या 24 महिन्याच्या कालावधीचे बिल 18,628/-, रूपयाचे बिलामध्ये रू. 18,126/-,एवढी रक्कम कमी केली आहे व रू. 502/-,चे विदयुत देयक पाठविण्यात आले आहे. तसेच, वरील कालावधीच्या बिलात कोणतेही व्याज किंवा इतर आकार जोडण्यात आले नाही. तक्रारकर्त्याने दि. 23/09/2013 नंतर कोणतेही विदयुत बिल भरलेले नाही व त्याचा कोणताही विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला नाही.
11. उभयपक्षानी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तावेज तसेच लेखी युक्तिवाद यावरून तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरण मंचात प्रलंबीत होते. विरूध्द पक्षकांरानी लेखी जबाबात तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2013 ते जून 2015 या 24 महिन्याच्या कालावधीचे रू. 18,628/-,चे बिलामध्ये तक्रारकर्त्यांनी जमा केलेली रक्कम रू. 18,126/- समायोजीत करून रू. 502/-,चे विदयुत देयक तक्रारकर्त्यास पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे. युक्तीवादाच्या वेळी तक्रारकर्त्याने विदयुत देयक रू. 502/-,मिळाले नाही असे सांगीतले व त्यावर विरूध्द पक्षांनी काही आक्षेप घेतला नाही. मंचाकडे त्याबाबत कोणतेही विदयुत देयक विरूध्द पक्षाने सादर केले नाही.
13. विरूध्द पक्षकार यांनी तक्रारकर्त्यास नियमीतपणे विज देयक बिल दिले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विरूध्द पक्षकार तक्रारकर्त्याच्या वापरात असलेल्या मिटरचे वाचन करून, अचुक बिल तक्रारकर्त्यास पाठविले नसल्याचे निदर्शनास आले. विरूध्द पक्षकाराने अचुक विज देयक तक्रारकर्त्यास पाठविण्यात हलगर्जीपणा दाखविला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला व तक्रारकर्त्यास मंचात तक्रार दाखल करण्यास भाग पाडले.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी सप्टेंबर 2013 ते जून 2015 पर्यंतचे 24 महिन्याचे रू. 502/-,चे विज देयक अर्जदारास देण्यात यावे. विज देयकामध्ये कोणतेही व्याज व दंडाची रक्कम आकारू नये. अर्जदाराने विज देयक बिल सात दिवसाच्या आत भरावे.
3. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.2,000/- द्यावा.
4. विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.