-स्विकृतीचे मुद्यावर आदेश-
श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. रामचंद्र रामाजी टेकाडे (वि.प.क्र.3) यांचे मौजा गौराळा, ता.हिंगणा, जि.नागपूर येथे शेती असून त्यांचे वि.प.तर्फे त्यांचे शेतीवर विज पुरवठा मीटर क्र. 09314492 द्वारे करण्यात येतो. मृतक महादेव डोमाजी माहूरकर त्यांचे शेतात नोकर म्हणून काम करीत होते आणि तक्रारकर्ता रजनीकांत माहूरकर हा मृतकाचा पुतण्या आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, दि.25.06.2019 रोजी महादेव माहूरकर हा वि.प.क्र. 3 चे शेतामध्ये ड्रममध्ये पाणी भरीत असतांना शॉक लागला व उपचारार्थ नेले असता तेथे त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले. याबाबतची तक्रार क.अभियंता, मराविम यांचेकडे नोंदविण्यात आली. तक्रारकर्त्याच्या मते मृतक हा अतिरिक्त पॉवर सप्लाय झाल्याने दि.25.06.2019 रोजी विज मीटर बोर्डच्या संपर्कात येऊन मरण पावल्याने वि.प.क्र. 1 व 2 यांनी वि.प.क्र. 3 त्यांचे ग्राहक असल्याने त्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्यांकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे.
3. प्रकरण स्विकृतीकरीता प्रथमतः दि.24.03.2022 रोजी आले असता सकृतदर्शनी तक्रारकर्ता हा वि.प.क्र. 1 ते 3 चा ग्राहक दिसून येत नसल्याने आयोगाने तक्रारकर्तीच्या वकीलांना तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 ते 3 चा कसा ग्राहक ठरतो याबाबत विचारणा केली असता तक्रारकर्त्याच्या अधि. प्रीया ठाकरे यांनी तक्रारीमध्ये दुरुस्ती करण्याकरीता व स्विकृतीवर सुनावणीकरीता वेळ मागितला. त्यांनतर तक्रारकर्ता आणि त्यांचे अधिवक्ता सतत गैरहजर आहे, त्यांनी तक्रारीत दुरुस्ती केली नाही व आयोगाने उपस्थित केलेल्या शंकाने निरसन केले नाही.
4. आयोगाने तक्रारीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, ज्यांना वि.प.क्र. 1 म्हणून तक्रारकर्त्याने नमूद केले आहे, ते अधिकारी आणि कार्यालय अस्तित्वात नाही. तसेच वि.प.क्र. 2 यांना तक्रारकर्त्याने वैयक्तीक नावाने प्रतीपक्ष केलेले आहे. मृतक किंवा तक्रारकर्ता हा वि.प.क्र. 2 चा ग्राहक नाही. त्यामुळे मृतकाचा लाभार्थी म्हणून तक्रारकर्ता कुठलीही नुकसान भरपाई वि.प.क्र. 1 व 2 यांचेकडून मागू शकत नाही. तसेच वि.प.क्र. 3 शेत मालक यांचा मृतक महादेव डोमाजी माहूरकर हा शेतीमध्ये काम करणारा नोकर होता. त्यामुळे तो वि.प.क्र. 3 चा ग्राहक ठरत नाही. मृतक महादेव डोमाजी माहूरकर किंवा तक्रारकर्ता यांचेपैकी कोणीही वि.प.क्र. 1 ते 3 ची सेवा मोबदला देऊन घेतलेली नसल्याने ते वि.प.क्र. 1 ते 3 ग्राहक ठरत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत होण्यास पात्र नसल्याचे आयोगाचे मत आहे.
5. विद्युत निरीक्षक कार्यालय, नागपूर यांचे दि.01.07.2019 रोजी केलेल्या चौकशीनुसार महादेव माहूरकर यांचा मृत्यु हा अतिरिक्त पॉवर सप्लायमुळे झालेला नसून तो टेस्ट लॅम्पला असलेल्या उघड्या वायरच्या जोडमधून शॉक लागल्याने झाल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ग्राहकाचे विज मिटरपर्यंत (point of supply) विज पुरवठा करण्याची विज कंपनीची जबाबदारी असते, त्यामुळे मिटरनंतर ग्राहकाचे अंतर्गत परीसरात काही अपघात झाला किंवा विज पुरवठयामध्ये दोष निर्माण झाला त्याची जबाबदारी ग्राहकाची असते. त्यास वि.प. जबाबदार राहू शकत नाही. त्यामुळे वि.प.क्र. 2 ने सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येत नाही.
6. तक्रारकर्ता आणि त्यांचे अधिवक्ता सतत गैरहजर असल्याने सदर तक्रार चालविण्यात त्यांना स्वारस्य दिसून येत नाही. तसेच प्रकरणात त्यांनी सुनावणी केली नाही आणि प्रकरण पुढे जाण्याकरीता कुठलीही पावले उचलली नसल्याने सदर प्रकरण स्विकृतीचे मुद्यावर खारिज करण्यायोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
- आ दे श –
1) तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृतीचे मुद्यावर खारिज करण्यात येते.
2) खर्चाबाबत कुठलाही आदेश नाही.