न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांची मौजे रुकडी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे भू.ग.क्र. 935 क्षेत्र 0.75 आर व भू.ग.क्र. 940 क्षेत्र 0.21 आर ही शेत मिळकत असून सदर मिळकतीमध्ये तक्रारदार हे ऊसाचे पीक घेतात व त्यापासून त्यांना दरवर्षी अंदाजे रु. 3 ते 4 लाख इतके उत्पन्न मिळते. तक्रारदार यांचे सदर शेतात वि.प. कंपनीचे लाईटचे पोल असून पूर्वेकडील क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करणेचा ट्रान्स्फॉर्मर बसविलेला आहे. सदर डी.पी.ची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण वि.प. यांनी केलेले नसून तेथे स्पार्क पडणे, त्या डी.पी.तून वायरी देखील लोंबकळत असून त्याचा झोल जमीनीपासून 6 फूटावर आलेला आहे. सदर डी.पी.मध्ये दि. 11/1/2015 रोजी शॉर्टसर्किट होवून तक्रारदार यांचा ऊस जळून खाक झाला आहे. तक्रारदारांनी याबाबत वि.प. यांचेकडे तक्रार दिलेली होती. परंतु त्याची दखल न घेतलेने तक्रारदार यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज करुन कागदपत्रांची माहिती मिळविली असता वि.प. यांनी घटनास्थळाचा खोटा पंचनामा करुन यशवंत चव्हाण यांचा खोटा जबाब नोंदवून नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीचे गट वगळून पंचनामा केलेचे तक्रारदारास समजून आले. सदरची बाब तक्रारदारांनी वि.प. यांचे निदर्शनास आणून दिलेनंतर वि.प यांनी तक्रारदाराचे जळीत ऊसाचा पंचनामा दि. 15/1/2015 रोजी केला आहे. तदनंतर तक्रारदारांनी पिकाची नुकसान भरपाई मिळणेकररिता वि.प. यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने वि.प. यांचे मागणीनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली. परंतु तरीही वि.प. यांनी त्यावर कारवाई केली नाही. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना दि. 13/1/2017 रोजी तुटपुंजी रक्कम रु. 23,690/- चा चेक नुकसान भरपाई म्हणून पाठवून दिला. अशा प्रकारे वि.प. यांनी नुकसानभरपाई देणेस विलंब लावल्याने तक्रारदाराचे कर्ज थकीत गेले व तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले. तक्रारदार यांचे ऊस जळीतामुळे रक्कम रु. 3,05,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांनी केलेली पाईपलाईनही जळून गेली आहे. त्यापोटी रक्कम रु. 1,50,000/- चे नुकसान झाले आहे. वि.प. यांनी दिलेली नुकसान भरपाई तुटपुंजी असलेने तक्रारदारांनी त्या रकमेचा चेक वि.प यांना परत पाठविला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून जळीतामुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु. 3,05,000/-, पाईपलाईन जळाल्याने झालेल्या नुकसानीपोटी रु.1,50,000/-, तक्रारदाराचे थकीत झालेल्या कर्जापोटी व त्यावरील व्याजापोटी रु 1,00,000/-, तक्रारदार हे आजारी पडल्याने झालेल्या उपचाराचे खर्चापोटी रु. 50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 25 कडे अनुक्रमे तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेले तक्रारीअर्ज, वि.प. यांनी दिलेला चेक, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसा, सदर नोटीसच्या पोहोचपावत्या, वि.प.क्र.7 यांनी नोटीस परत पाठविलेला लखोटा, वि.प.क्र.4 यांनी वि.प.क्र.6 यांना दिलेले पत्र, वि.प.क्र.4 यांनी वि.प.क्र.5 यांना दिलेले पत्र, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1, 2, 5, 6, 7 व 9 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. क्र.1, 2, 5, 6, 7 व 9 यांनी म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प.क्र.3, 4 व 8 हे सरकारी खात्यातील अधिकारी असून त्यांचा वि.प.क्र.1 चे दैनंदिन कामाशी कोणताही संबंध येत नाही.
iv) तक्रारदार यांचे शेतातून गेलेल्या तारांची दुरुस्ती व देखभाल वि.प.कंपनीकडून वेळोवेळी केली जाते. सदर तारांना कसलाही झोळ आलेला नाही.
v) तक्रारदार यांनी जळीत अपघातानतर त्यांचा ऊस जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी यांचेकडे घातला आहे. त्यांना पहिल्या बिलाची रक्कम रु. 1,97,602/- मिळाली आहे. तदनंतर तक्रारदार यांनी गट नं. 940 मधील ऊस राजाराम सहकारी साखर कारखाना, कसबा बावडा, कोल्हापूर येथे घातला आहे. तेथे पहिल्या बिलाची रक्कम रु. 50,798/- तक्रारदारांना मिळाली आहे.
vi) तक्रारदाराने केलली पाईप लाईन जमीनीखालून जाते. त्यामुळे पाईपलाईनचे नुकसान होण्याचे कारण नाही.
vii) कृषी पर्यवेक्षक हातकणंगले-2 व मंडल कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करुन नुकसानीबाबतचा दाखला तक्रारदार यांना ता. 1/1/2016 रोजी दिला आहे. त्यामध्ये तक्रारदार यांचे जळीत अपघातामध्ये 30 टक्के इतके नुकसान झाल्याचे म्हटले आहे. म्हणून वि.प यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 23,960/- या रकमेचा चेक पाठविला. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प.क्र. 3, 4 व 8 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प.क्र. 3, 4 व 8 यांनी म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प.क्र. 3, 4 व 8 हे महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागा अंतर्गत असणारे विद्युत निरिक्षण विभाग, कोल्हापूर या शासकीय कार्यालयाचे अधिकारी आहे. तक्रारदार व सदरचे वि.प. यांचेमध्ये कोणताही ग्राहक व सेवापुरवठादार असा संबंध नाही.
iv) भारतीय विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 162 नुसार विद्युत अपघातांची चौकशी विद्युत निरिक्षक कार्यालयामार्फत करणेची तरतूद आहे. त्यानुसार चौकशी करणेत येवून त्याबाबत निष्कर्ष संबंधीतांना विद्युत निरिक्षक कार्यालयामार्फत दिला जातो. सदर कार्यालयामार्फत विद्युत अपघाताच्या अनुषंगाने कोणतीही नुकसानभरपाई देण्यात येत नाही.
v) तक्रारदार यांचे ऊस जळीताबाबत कोणतीही तक्रार वि.प.क्र. 3, 4 व 8 यांना प्राप्त झालेली नाही. सदर ऊस जळीताबाबतची चौकशी वि.प.क्र. 3, 4 व 8 यांचे कार्यालयाकडून करणेत आलेली आहे व त्याचा निष्कर्ष संबंधीतांना देण्यात आलेला आहे.
vi) सदर चौकशीनंतर संच मांडणीमधील दोषांचे निवारण करणेसाठी वि.प.क्र. 3, 4 व 8 यांनी म.रा.वि.वि. कंपनीला कळविले आहे.
vii) जळीत अपघात हा म.रा.वि.वि. कंपनीचे सदोष संच मांडणीमुळे झाला असल्याने त्याबाबत नुकसान भरपाई देणेबाबत वि.प. क्र. 3, 4 व 8 यांनी त्यांचे दि. 12/5/2015 चे पत्रान्वये कळविले आहे. सबब, वि.प. क्र. 3, 4 व 8 यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र. 3, 4 व 8 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून ऊस जळीतापोटी नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. तसेच तक्रारदार यांचे शेतात वि.प. कंपनीचे लाईटचे पोल असून पूर्वेकडील क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करणेचा ट्रान्स्फॉर्मर बसविलेला आहे. सदरची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. प्रस्तुत कामी वि.प. क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन केले असता, तक्रारदाराचे शेतात वि.प. यांच्या विद्युत संच मांडणीमुळे ऊस पीकास आग लागून ऊसाचे नुकसान झाले ही बाब वि.प यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे व त्यांनी तक्रारदारांना सदर नुकसानीपोटी रक्कम रु.23,690/- या रकमेचा चेकही देऊ केलेला होता. परंतु सदरची रक्कम तुटपुंजी असल्याने तक्रारदारांनी सदरचा चेक स्वीकारलेला नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदारांनी ऊस बिलाच्या प्रती दाखल केल्या आहेत. सदर ऊस बिलांचे अवलोकन करता, ऊस जळीतामुळे तक्रारदाराचे ऊस बिलातून रक्कम रु.32,680/- ची कपात केलेली आहे. तसेच ऊस जळीतामुळे तक्रारदाराचे पाईपलाईनचे नुकसान झाल्याचेही दिसून येत आहे. तसेच तक्रारदाराचे कथनानुसार ऊस जळीतामुळे तक्रारदारास ऊस ओढणीसाठीही जादा खर्च करावा लागला आहे. परंतु तक्रारदाराच्या सदरच्या झालेल्या नुकसानीचा कोणताही विचार न करता वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु.23,690/- या रकमेचा चेक पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे वर नमूद झालेले नुकसान विचारात घेता सदरची रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे वि.प. क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई पोटी तुटपुंजी रक्कम देवू करुन सेवात्रुटी केली आहे ही बाब याकामी शाबीत झाली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराचे ऊस जळीतामुळे रक्कम रु. 32,680/-, पाईपलाईन जळाल्यामुळे झालेले अंदाजे नुकसान रु.25,000/- व ऊस ओढणीसाठी झालेल्या खर्चाचे रु.25,000/- असे एकूण रु. 82,680/- इतक्या रकमेचे नुकसान झालेचा निष्कर्ष हे आयोग काढत आहे. सदरची रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस पात्र आहे असे या आयोगाचे मत आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात एकूण नुकसान रु.3,05,000/- इतके झालेचे कथन केले आहे परंतु सदर कथनाचे पुष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने थकीत झालेल्या कर्जापोटी व त्यावरील व्याजापोटी रु 1,00,000/- ची नुकसान भरपाई तसेच तक्रारदार हे आजारी पडल्याने झालेल्या उपचाराचे खर्चापोटी रु. 50,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदर मागणीचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदारांच्या सदरच्या मागण्या मान्य करता येत नाही. तथापि ऊसजळीतामुळे झालेल्या नुकसानीमुळे तक्रारदारास मानसिक त्रास सोसावा लागला तसेच प्रस्तुतची तक्रार या आयेागासमोर दाखल करावी लागली. सबब, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प.क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. वि.प.क्र. 3, 4 व 8 हे महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागा अंतर्गत असणारे विद्युत निरिक्षण विभाग, कोल्हापूर या शासकीय कार्यालयाचे अधिकारी आहे. तक्रारदार व सदरचे वि.प. यांचेमध्ये कोणतेही ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते नाही. तसेच सदरचे वि.प. यांनी ऊस जळीत प्रकरणाची चौकशी करुन त्याबाबतचा निष्कर्ष संबंधीतांना दिलेला आहे. सदरचे वि.प.क्र. 3, 4 व 8 यांचेवर नुकसान भरपाई देणेची कोणतीही जबाबदारी नाही. सबब, सदरचे वि.प.क्र. 3, 4 व 8 यांचेविरुध्द कोणतेही आदेश करण्यात येत नाहीत.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 यांनी तक्रारदार यांना ऊस जळीतामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकूण रक्कम रु. 82,680/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारांचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. क्र. 1, 2, 5, 6, 7 व 9 तक्रारदारांना अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.