न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. रुपाली डी. घाटगे,सदस्या )
1) वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. यांनी मंचापुढे उपस्थित राहून म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. यांचे वकिलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला.
2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार -
तक्रारदार हे साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असून ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तक्रारदार हे वि.प. कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद असून सभासद नं. 13385 आहे. तक्रारदार वि. प. कारखान्यास ऊस पुरवठा केल्याबद्दल वि.प. एफ.आर.पी. प्रमाणे रक्कम देतात. त्यामुळे तक्रारदार व वि.प. यांचे मालक व ग्राहक हे नाते आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांना अर्थसहाय्य-अनुदान मागणीची नोटीस दि. 23-12-2015 रोजी रजि. पोस्टाने पाठविली आहे. वि.प. यांना सदर नोटीस दि. 28-12-2015 रोजी मिळूनही वि.प. यांनी दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी वि.प. कडे अर्थसहाय्याची तोंडी मागणी केली होती त्यावेळी वि.प. नी शस्त्रक्रियेची बिल मागितली होती परंतु ती मिळत नसलेचे तक्रारदारांनी वि.प. स सांगितले होते. तक्रारदार यांनी दि. 7-07-2015 रोजी बिले मिळत नसल्याबाबत व अर्थसहाय्य मागणीचा अर्ज व शस्त्रक्रियेचे कागद व डॉक्टरांचे सर्टिफिकेट पाठविले आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना बिलाबाबत लेखी कळवूनही वि.प. यांनी अर्थसहाय्य करणेची जबाबदारी टाळली आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात, वि.प. यांनी सन 2014-15 चे कारखान्याच्या वार्षिक अहवालात पान नं. 8 वर उत्पादक सभासदांसाठी अर्थसहाय्य या सदरात “कारखान्याकडे ऊसांचा नियमित पुरवठा करणा-या उत्पादक सभासदांना हृदयविकार, मुत्रपिंड विकार, कॅन्सर यापैकी एखाद्या आजारावरील उपचाराकरिता रु. 50,000/- पर्यंत अर्थसहाय्य ” देण्याचे जाहीर करुन त्या वर्षाअखेर 1 कोटी 25 लाख 46 हजार 430 इतकी रक्कम अदा म्हटले आहे. सदर अर्थसहाय्यास तक्रारदार पात्र असूनही केवळ पावतीचे कारण पुढे करुन वि.प. यांनी तक्रारदारांचे अर्जाचा विचार न करुन अन्याय केला आहे. सबब, वि.प. कडून तक्रारदार यांना शस्त्रक्रियेचे अर्थसहाय्य रक्कम रु. 50,000/- मिळावेत व मानसिक त्रासाबद्दल रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 3,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रारीसोबत कागदपत्रे दाखल केली. दि. 23-12-2015 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, दि. 22-07-2015 रोजी तक्रारदार यांना वि.प. यांनी कागद पुर्ततेबाबत पाठविलेले पत्र, दि. 7-07-2015 रोजी तक्रारदारांनी चेअरमन, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांना पाठविलेला अर्ज, सदरचा अर्ज व नोटीस वि.प. यांना पोहचलेची पोहच, वि.प. यांचेकडील तक्रारदाराचे शेअर सर्टिफिकेट, दि. 12-02-2015 रोजीचे श्रीकृष्ण कार्डिअॅक कॅथलॅब यांचेकडील तक्रारदाराचे मेडीकल रिपोर्ट, श्रीकृष्ण कार्डिअॅक कॅथलॅब येथील तक्रारदारांची Summary Sheet, Angiography Data, यांचेकडील 26 वार्षिक अहवाल 2014-2015, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4) वि.प. यांनी दि 1-06-2016 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांचा तक्रार अर्ज खरा व बरोबर नसून वि.प. मान्य व कबूल नाही. वि.प. हा बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 मधील तरतुदीप्रमाणे नोंदणीकृत साखर कारखाना आहे. तक्रारदार हे वि.प. चे सभासद आहेत. तक्रारदार यांचा वि.प. कारखान्याकडे रु. 10,000/- रक्कमेचा एक शेअर्स आहे. त्यामुळे तक्रारदार हे वि.प. कारखान्याचे भागधारक म्हणजेच मालक आहेत. त्यामुळे तक्रार फेटाळणेत यावे. वि.प. हे उत्पादक सभासदांना हृदयविकार, मुत्रपिंड, नेत्रविकार इ. कारणाने शस्त्रक्रिया करणा-या सभासदास शस्त्रक्रियेसाठी भरावी/द्यावी लागलेल्या रक्कमेची काही प्रमाणात भरपाई म्हणून वैद्यकीय अर्थसहाय्य योजना लागून करण्यात आलकेली आहे. सभासदांना शस्त्रक्रियेसाठी रक्कम खर्च करावी लागलेस अगर द्यावी/भरावी लागलेस त्याची भरपाई त्या शस्त्रक्रियेच्या बिल पावती आधारावर वैद्यकीय अर्थसहाय्य देणेचे ठरलेले आहे. ज्या व्यक्तीने/सभासदाने प्रत्यक्ष शस्त्रक्रियेसाठी रक्कम खर्च केलेली नाही, दिलेली नाही अशांना भरपाई देणेचा विषय उपस्थित होत नाही. त्यामुळे पैसे खर्च न केल्याने अर्थसहाय्य भरपाई देता येणार नाही.
वि.प. त्यांचे म्हणण्यात पुढे नमूद करतात की, तक्रारदारांनी वि.प. कारखान्याकडे प्रथम दि. 7-07-015 रोजी अनुदान मिळणेसाठी केलेल्या विनंती अर्जामध्ये स्पष्टपणे सदरची शस्त्रक्रिया राजीव गांधी अनुदान योजना या शासकीय अनुदानातून केलेले आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी तक्रारदारांनी काहीच पैसे खर्च केलेले नाहीत. तक्रारदार त्यांची बिले सादर करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी सदर वस्तुस्थिती व परिस्थिती मान्य केल्याने त्यांना सदर योजनेचे अनुदान मागणी व मिळणेचा हक्क व अधिकार नाही. तक्रारदारांनी काही पैसे खर्च न करता शस्त्रक्रियेच्या रक्कमेबाबत आग्रह धरत आहेत. वि.प. यांनी दि. 22-07-2015 रोजी तक्रारदार यांना दवाखाना शस्त्रक्रियेची बिले, पावती हजर करण्याचे कळविलेले आहे. तक्रारदारांनी कागदपत्रे हजर केली नसलने त्यांना अर्थसहाय्य देण्याच विषय राहत नाही. तक्रारदार यांना शासकीय अनुदान मिळालेनंतर पुन्हा वि.प. यांचेकडे अनुदान व अर्थसहाय्य मागत आहेत ते त्यांना मागता व देता येणार नाही. वि.प. यांनी वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी विशिष्ट अर्थसहाय्य योजना लागू केलेली आहे. पण ती योजना व सेवा नसून अनुदान व अर्थसहाय्य आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारास तक्रार करणेचा विचार झालेस त्याबाबत अधिकार केवळ कायदयातील कलम 85 लवाद यांनाच आहे. सदरचा तंटा हा सभासद व संस्था याबाबत असून कार्यक्षेत्र व हक्क अधिकाराबाबत आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा.
5) वि.प. यांनी दि. 16-11-2016 रोजी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, दि. 2-10-2008 रोजीचा वि.प. कारखानेचा ठराव नं. 11, वैदयकीय अर्थसहाय्य योजनेबाबतचा, दि. 27-01-2011 रोजीचा ठराव नं. 19, दि. 21-11-2012 रोजीचा ठराव क्र. 15, दि. 22-05-2015 रोजीचा ठराव क्र. 23, दि. 16-11-2016 रोजीचे वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, वि.प. नं. 1 व 2 यांचे म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रांचा विचार करता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होकता.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अर्ज नामंजूर. |
का र ण मि मां सा -
मुद्दा क्र. 1 –
तक्रारदार हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तक्रारदार हे वि.प. कारखान्यास ऊस रवठा करतात. ऊस पुरवठा केलेबद्दल वि. प. हे एफ.आर.पी. प्रमाणे पैसे देतात. त्या कारणाने तक्रारदार व वि.प. यांचे ग्राहक व मालक असे नाते आहे. तथापि, तक्रारदार हे वि.प. कारखान्याचे सभासद आहेत. तक्रारदार यांचे वि.प. कारखान्याचे सभासद आहेत. तक्रारदार यांचे वि.प. कारखान्याचे रक्कम रु. 10,000/- रकमेचा शेअर्स आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. कारखान्याचे भागधारक म्हणजेच मालक आहेत त्या कारणाने तक्रारदार हे ग्राहक नाहीत असे वि.प. यांनी कथन केले आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने या मंचाने ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2 (d) “consumer” means any person who- (i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose.
तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार हे वि.प. यांना ऊस पुरवठा करतात. तसेच तक्रारदारांनी त्यांचे शेअर सर्टिफिकेट क्र. 26033 दाखल केलेले असून वि.प. यांचेकडे वेळोवेळी रक्कम जमा करुन शेअर्स खरेदी केलेले आहेत. व त्यानुसार तपशिलाप्रमाणे तक्रारदारांनी वि.प. यांचे वेळोवेळी रक्कम भरलेली आहे. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे रक्कम जमा करुन (consideration paid) सदरचे शेअर्स खरेदी केलेले असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. – 2
उपरोक्त मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांना अर्थसहाय्य (अनुदान) मागणी नोटीस दि. 23-12-2015 रोजी पाठविली. सदरची नोटीस वि.प. यांना दि. 28-12-2015 रोजी प्राप्त झाली. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे अर्थसहाय्याची मागणी केली. वि.प. यांनी शस्त्रक्रियेची बिले मागतिली तथापि सदरची बिले प्राप्त न झालेने तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे सदर शस्त्रक्रियेचे अनुषंगाने अर्थसहाय्य मागणीचा अर्ज व शस्त्रक्रियेचा कागद व डॉक्टर यांचे सर्टिफिकेट पाठविले. परंतु, वि.प. यांना बिलाबाबत लेखी कळवून वि.प. यांनी तक्रारदारांना अर्थसहाय्य करणेची जबाबदारी टाळून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली असलेने सदरची तक्रार तक्रारदारांनी मंचात दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वि.प. यांनी सन 2014-15 चे कारखान्याचे वार्षिक अहवालात पान नं. 8 वर उत्पादक सभासदांसाठी अर्थ सहाय्य :- “कारखान्याकडे ऊसाचा नियमित पुरवठा करणा-या उत्पादक सभासदांना हृदयविकास, मुत्रपिंड विकार, कॅन्सर यापैकी एखादया आजारावरील उपचाराकरिता रु. 50,000/- पर्यंत आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रु. 3,000/- इतके वैद्यकीय अर्थसहाय्य तसेच कारखान्याच्या सभासदाचा दुर्दैवाने रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून, इलेक्ट्रिक शॉक, सर्पदंश, जनावर चावल्यामुळे किंवा मारल्यामुळे मृत्यू झाल्यास संपूर्ण ऊसाचा नियमित पुरवठा करणा-या सभासदांच्या वारसांस रु. 50,000/- आणि उर्वरीत सभासदांच्या वारसास रु. 25,000/- कारखान्याकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेतून आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 46 हजार 430 इतकी रक्कम अदा केलेली आहे ” असे नमूद आहे.
दि. 7-07-2015 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना एंन्जोग्राफी व अॅन्जोप्लास्टीचे व तदनुषंगिक औषधोपचारासाठी अनुदान मिळणेबाबत पत्र पाठविलेले आहे. सदर पत्रामध्ये माझ्या शारिरीक त्रासामुळे एंन्जोग्राफी व अॅन्जोप्लास्टी जानेवारी 2015 मध्ये राजीव गांधीजी आरोग्य योजनेतून केली आहे. मला एन्जेओप्लास्टीसाठी खर्च आला नसला तरी दरमहा रक्कम रु. 1500/- औषधासाठी लागतात असे नमूद केलेले आहे. त्यासोबत एंन्जोग्राफी व अॅन्जोप्लास्टीचे कागदपत्रे जोडले आहेत तसेच राजीव गांधी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया केलेने पावती मिळाली नसलेचे कथन केले आहे.
दि. 22-07-2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना कारखान्याची वैदयकीय अर्थसहाय्य योजना कागदपत्र पुर्ततेबाबत पत्र पाठविलेले आहे. सदर पत्रानुसार दवाखाना व औषधोपचार खर्चाचे पावतीसह बिलाची मागणी वि.प. यांनी केलेली आहे. तथापि तक्रारदारांनी दि. 23-12-2015 रोजी सदर नोटीस उत्तर देवून पावती मिळत नसलेचे वि.प. यांना सांगितले आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदाराची एंन्जोग्राफी व अॅन्जोप्लास्टी झालेली असून अॅन्जोप्लास्टीचा खर्च तक्रारदारांनी राजीव गांधी योजनेतून केलेला होता हे स्पष्टपणे दिसून येते.
वि.प. यांनी त्याचे लेखी म्हणणेमध्ये सभासदांना हृदयविकार, मुत्रपिंड, नेत्रविकार इत्यादी कारणाने शस्त्रक्रिया करणेस भाग पडलेस त्याप्रसंगी शस्त्रक्रियेसाठी येणा-या खर्च करावी लागलेस त्या खर्च केलेल्या रकमेची काही प्रमाणात भरपाई म्हणून वैद्यकीय अर्थसहाय्य योजना करण्यात आलेची मान्य केलेले आहे. त्याअनुषंगाने वि.प. यांनी प्रस्तुत कामी ठराव नं. 11, ठराव नं. 19, ठराव नं. 23 व ठराव नं. 15 दाखल केलेले आहेत. सदरचे ठरावाचे या मंचाने अवलोकन केले असता हृदयविकार, अॅन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी व कॅन्सर मुत्रपिंड विकारावर अर्थसहाय्य देणेचे वि.प. यांनी मान्य केलेले आहे. वि.प. यांनी सदरची अर्थसहाय्य योजना, शस्त्रक्रिया करणा-या सभासदासाठी शस्त्रक्रियेसाठी खर्च करावी लागणेस त्या खर्च केलेल्या रक्कमेची काही प्रमाणात भरपाई म्हणून वैद्यकीय अर्थसहाय्य योजना करण्यात आलेली आहे. सदर अर्थसहाय्य योजनेत शस्त्रक्रियेसाठी सभासदांना रक्कम खर्च करावी लागलेस किंवा दयावी, भरावी लागलेस त्याची भरपाई त्या शस्त्रक्रियेची दिलेली बिले, पावतीचे आधारे व त्यावर विसंबून राहुन दवाखान्यात अथवा प्रत्यक्ष वैदयकीय अर्थसहाय्य देणेचे ठरलेले असते असे वि.प. यांनी कथन केलेले आहे. वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी दि. 7-07-2015 रोजीचे अर्जामध्ये सदरची शस्त्रक्रिया राजीव गांधी अनुदान योजनेत म्हणजेच शासकीय अनुदानातून केलेली असून अॅन्जोप्लास्टीसाठी खर्च तक्रारदारांना वैयक्तीकरित्या आलेला नाही अशी वस्तुस्थिती स्पष्टपणे दिसून येते. म्हणजेच सदर शस्त्रक्रियेसाठी तक्रारदारांनी स्वत: कोणतीही रक्कम खर्च केलेले नाही हे तक्रारदारानी देखील मान्य केलेले आहे. त्याकारणाने तक्रारदारांने सदर उपचारासाठी केलेली शस्त्रक्रियेचे बिले, पावती वि.प. यांचेकडे सादर करणेस तक्रारदार असमर्थ असलेचे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदार हे प्रस्तुत कामी औषधोपचारासाठी खर्चाची मागणी वि.प. यांचेकडे करीत आहेत. तथापि, वि.प. यांनी दाखल केलेल्या ठरावामध्ये शस्त्रक्रियेचे औषधोपचाराची खर्च देणेची तरतुद असलेचे हे दिसून येत नाही.
सबब, वि.प. यांची सदरची योजना ही ‘अनुदान व अर्थसहाय्य योजना’ आहे. तक्रारदार यांनी हृदयरोगाचे उपचारासाठी राजीव गांधी योजनेतून शासकीय अनुदान घेतलेले असलेने त्यांनी सदरचे उपचारासाठी, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेसाठी वैयक्तीक रक्कम खर्च केलेली नाही हे स्पष्टपणे शाबीत होते. त्या कारणाने तक्रारदार हे एकदा शासकीय अनुदानाव्दारे सदरची शस्त्रक्रियेचे उपचार घेतले असताना पुन्हा त्याच शस्त्रक्रियेसाठी वि.प. यांचे सदर अर्थसहाय्य योजना अंतर्गत अनुदान मिळणेस तक्रारदार अपात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नसलेने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते. मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 –
वरील सर्व विस्तृत विवेचनाचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.