तक्रारकर्तीतर्फे वकील ः- श्री. पी.पी.थेर
विरूध्द पक्ष क्र. 1 तर्फे वकील ः- श्री. अंनत दिक्षीत
विरूध्द पक्ष क्र 2 तहसिलदार गोंदिया ः-श्री. सी.आर. भंडारी
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- श्री. भास्कर बी. योगी अध्यक्ष, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 15/06/2019 रोजी घोषीत )
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) जिवन विमा प्राधीकरण यांनी ‘आम आदमी’ विमा योजना अंतर्गत विमा दावा फेटाळल्याने सदरची तक्रार दाखल केली.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तिचा मृतक पती श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर हे राज्य शासनाने राबविलेली ‘आम आदमी’ विमा योजना मॉस्टर पॉलीसी क्र. 693498 अंतर्गत विरूध्द पक्ष क्र 2 मार्फत उतरविला आहे. या योजेमध्ये जर सदस्याची नैसर्गिक मृत्यु झाला असेल तर, रू. 30,000/-,आणि दुर्घटनामूळे झाली असेल तर त्या सदस्याचे नॉमीनीदारांना रू. 75,000/-,विमा रक्कम मिळण्याची तरतुद आहे. मयत श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर हे मुंबईला आपला परिवाराच्या उदरर्निवाहकरीता मजुरीचा काम करीत होते. दि. 05/03/2017 रोजी बांधकामाचे काम करीत असतांना, तिस-या माळयावरून खाली पडल्यामूळे त्यांचे मृत्यु त्याचदिवशी झाले. त्यांचा शवविच्छेदन जवळच्या कुपर हॉस्पीटल खार (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आला आणि कुपर हॉस्पीटलचा कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेटनूसार मृत्युचा कारण “Septicemia following craniofacial trauma (unnatural) ” असे नमूद आहे.
तक्रारकर्ती हि नॉमिनी असून त्यांनी ‘आम आदमी’ विमा योजनेचा दावा विरूध्द पक्ष क्र 2 कडे सादर केला. विरूध्द पक्ष क्र 2 यांनी, विरूध्द पक्ष क्र 1 कडे विमा दावा तसेच त्यासोबत जोडलेले दस्ताऐवज पाठवून दिले. परंतू, विरूध्द पक्षाकडून दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याबाबतचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारकर्तीने आपल्या वकीलामार्फत विरूध्द पक्षाला दि. 31/05/2018 रोजी नोटीस पाठविली आहे. दोन्ही पक्षाने त्या नोटीसला सुध्दा कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तिने सदरची तक्रार या मंचात दाखल करून विम्याची रक्कम रू. 75,000/-, द.सा.द.शे 12 प्रतिशत व्याजाने रक्कम मिळेपर्यंत दयावा तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/-.व शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 20,000/-,अशी मागणी केली आहे.
3. विरूध्द पक्ष क्र 1 यांना या मंचाची नोटीस मिळाल्यानंतर आपला लेखीजबाब मंचात दाखल केला. तक्रारकर्तीने दाव्याची रक्कम मिळाल्याबाबत शवविच्छेदन अहवाल, पहिली खबर आणि पोलीस फॉयनल समरी याची पूर्तता न केल्यामूळे, त्यांना विम्याचा दावा देण्यात आला नाही. विरूध्द पक्ष क्र 1 यांचे कथनानूसार जर तक्रारकर्तीने हि तिन्ही अहवाल आजही दाखल केले तर, तक्रारकर्तीला विम्याचा दावा देण्यास तयार आहोत आणि जर हे दस्ताऐवज दाखल केले नाही तर तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु हा नैसर्गिक मृत्यु ग्राहय धरून रू. 30,000/-,देण्यास तयार आहोत असे नमूद केले. तक्रारकर्तीने वरील नमूद दस्तऐवज दाखल न केल्यामूळे त्यांना विमा दाव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामध्ये विरूध्द पक्षाची सेवेत कोणतीही कमरता नाही. म्हणून त्यांना या तक्रारीतुन मुक्त करण्यात यावे.
विरूध्द पक्ष क्र 2 यांनी सुध्दा आपला लेखी जबाब दाखल करून हे नमूद केले की, सदर प्रकरण ‘आम आदमी’ विमा येाजनेचा क्लेम फॉर्म या कार्यालयास मिळाले आहे. सदर प्रकरण मंजूर करणे हे भारतीय आर्युविमा महामंडळाचे अधिकार आहे. त्यांनी त्याचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले आहे.
4. तक्रारकर्तीची तक्रार, तसेच त्यासोबत जोडलेले कागदपत्र, त्यांचे शपथपत्र व पुरावा तसेच लेखीयुक्तीवाद दाखल केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) यांनी सुध्दा लेखी उत्तर व शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद व व 2) लेखीजबाब या मंचात दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे विद्वान वकील श्री. पी.पी.थेर आणि विरुध्दपक्ष क्र 1 तर्फे विद्वान वकील श्री. अनंत दिक्षीत विरूध्द पक्ष क्र. 2 गैरहजर. दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. सदर तक्रारीचा दस्त क्र 1 पृष्ठ क्र 13 कुपर हॉस्पीटल मुंबई यांचा शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, मृतक श्री. सुरेश भैय्यालाल ब्राम्हणकर वय- 42 वर्ष याचे मृत्यु दि. 05/03/2017 जवळपास सायकांळी 5.45 मिनीटांनी डोक्याला जबर मार लागल्यामूळे झालेला आहे आणि अहवालामध्ये मृत्युचे कारण “Septicemia following craniofacial trauma (unnatural) ” नोंदविलेला आहे. तसेच दस्त क्र 2 ईन्कवेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनाम्यामध्ये असे नमूद आहे की, मृतक हा कलर देण्यचे काम करीत असतांना त्याचे पायाखालील बांबु तुटून तो खाली पडल्याने मृत्यु झाला आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, मयत श्री. सुरेश भय्यालाल ब्राम्हणकर याचे मृत्यु नैसर्गिक नसून तो ‘अपघात’ आहे. म्हणून ‘आम आदमी’ विमा पॉलीसी अंतर्गत विरूध्द पक्ष क्र 1 तक्रारकर्तीला रक्कम रू. 75,000/-, देण्यास बांधील आहे. परंतू फक्त तांत्रीक कारण दाखवून तक्रारकर्तीचा विमा दावा आजपर्यंत दिला नाही. यावरून हे स्पष्ट आहे की, त्यांनी तक्रारकर्तीला सेवा पुरविण्यात कमतरता केली आहे. म्हणून तक्रारकर्तीला मानसिक व शारिरिक त्रासापोटी रू. 20,000/-,तसेच या तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, मंजूर करणे हे योग्य व न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे
06. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने ‘आम आदमी’ विमा योजने अंतर्गत अपघाती मृत्युचे देय विमा रक्कम रुपये-75,000/- (अक्षरी पंच्याहत्तर हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/-(अक्षरी रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष – (2) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र 2 व 3 ची 30 दिवसांत पालन न केल्यास, द.सा.द.शे 6 टक्के व्याज देय राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.