निकालपत्र (दि.18.03.2015) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. उभयतांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की
3 सामनेवाले ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून तक्रारदारांची सामनेवाले विमा कंपनीच्या सांगली शाखेमार्फत लाईफ इन्शुरन्स पॉलीसी उतरविलेली होती व सदर पॉलीसीचा क्र.942678617 असा आहे. सदर पॉलीसीवर तक्रारदारांनी उचललेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी दि.30.03.2007 रोजी सामनेवाले यांनी सदर पॉलीसी सरेंडर करुन घेऊन तक्रारदारास उर्वरीत रक्कम रु.13,767/- परतावा म्हणून परत करत असलबाबत लेखी कळविले. त्यानुसार, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे संपर्क साधला असता, सामनेवाले यांनी सदर पॉलीसीसंदर्भात रेकॉर्ड त्यांचे ऑफीसमध्ये सापडत नसल्याचे कारण पुढे करुन आजतागायत सदर रक्कम तक्रारदारास अदा करण्याचे टाळलेले आहे व टाळत आहेत. वारंवार सामनेवाले यांचे ऑफीसमध्ये प्रत्यक्ष हेलपाटे मारुनदेखील सामनेवाले कंपनी तक्रारदारांच्या मागणीची दाद घेत नसल्याने व रक्कम परत नसल्याने तक्रारदाराने सामनेवाले यांना दि.14.03.2013 रोजी रजि.ए.डी.ने विनंती पत्र व सोबत स्वत:कडील पॉलीसीबाबत सापडून आलेले झेरॉक्स प्रत देखील सामनेवाले यांच्या सोयीकरीता पाठवून दिलेली आहे. तरीदेखील सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद न दिलेने तक्रारदाराने नाईलाजास्तव दि.12.05.2014 रोजी सामनेवाले यांना वकीलांमार्फत रजि.ए.डी.ने नोटीस पाठवून सदर रक्कम रु.13,767/-ची सव्याज व नुकसानभरपाईसह मागणी केली असता सामनेवाले यांच्या सातारा शाखेमार्फत दि.19.05.2014 रोजी आपल्या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन तक्रारदारास दिलेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांची पॉलीसी त्याच्या कर्ज प्रकरणाला त्वरीत सरेंडर करुन घेतली. परंतु उर्वरीत रक्कम मात्र तक्रारदारास देण्यास जाणूनबुजून विलंब केलेला आहे. सदर रक्कम आजही सामनेवाले यांच्या ताब्यात असून ती देण्यास सामनेवाले हे टाळाटाळ करीत आहेत. त्याकारणाने, तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून येणे रक्कम रु.13,767/- ही दि.30.0.2007 पासून ते संपूर्ण रक्कम वसुल होऊन मिळेपावतो द.सा.द.शे.18टक्के व्याजासहीत मिळावी तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- अशी विनंती सदरहू मंचास केली.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत 4 कागदपत्रे, अ.क्र.1 ला मा.मॅनेजर ऑफ एल.आय.सी.यांना तक्रारदाराचे पत्र, अ.क्र.2 ला सदर पत्राची रजि.ए.डी. पोहोच, अ.क्र.3 ला वकील नोटीस, अ.क्र.4 ला वकील नोटीसीस दि.19.05.2014 रोजी एल.आय.सी. सातारा, शाखेने पाठविलेले उत्तर तसेच दि.20.01.2015 रोजी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दि.26.11.2014 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिेलेले लेखी पत्र सदर पत्राची पोहच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
5 सामनेवाले यांनी दि.08.10.2014 रोजी तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांनी एल.आय.सी.चे कोल्हापूर विभागाकडून अगर कोल्हापूर शाखेकडून तक्रार अर्जात नमुद केलेली तथाकथित पॉलीसी क्र.942678617 ची पॉलीसी घेतली/दिली नाही. तक्रारदारांचे तथाकथित पॉलीसीचा व्यवहार कोल्हापूर येथून झालेला नाही. तसेच तथाकथित पॉलीसीवर कोल्हापूर शाखेने कर्ज दिले नाही व पॉलीसी सरेंडर करुन घेतली नाही व तक्रारदारांना रक्कम रु.13,767/- परत करीत असलेबाबत कळविलेले नाही, अशा परिस्थितीत तक्रारदार हे एल.आय.सी.कोल्हापूर विभाग तसेच स्थानिक शाखा, व्यवस्थापक कोल्हापूर यांचे ग्राहक होत नसल्याने तक्रारदारांची चालणेस अपात्र आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी सदरहू पॉलीसी सांगली शाखेकडून घेतलेचे दिसून येते म्हणून तक्रारदाराची तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर येथे चालणेस अपात्र असून सदरहू मंचास कोणताही क्षेत्राधिकार नाही. तक्रारदाराची मागणी मुदतीत नसलेने व ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीची बाधा येत असलेने सदरहू तक्रारदारांची तक्रार खर्चासह निकाली काढणेत यावी. तक्रारदारांचेकडून सामनेवाले यांचा खर्च वसुल होऊन मिळावा अशी मंचास विनंती केली आहे. दि.20.01.2015 रोजी सामनेवाले विमा कंपनी-विजय रामचंद्र जोशी यांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6 तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांची कैफियत, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार होता न्यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सदरची तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्रात चालणेस पात्र आहे काय ? | होय. |
2 | सामनेवाले यांनी तक्रारदाराला दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1:- सामनेवाले ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी आहे. तक्रारदारांनी सदर विमा कंपनीच्या सांगली शाखेमार्फत ‘लाईफ इन्सुरन्स पॉलीसी’ उतरविलेली होती. सदर पॉलीसीचा क्र.942678617 असा आहे. तथापि सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी एल.आय.सी.चे कोल्हापूर विभागाकडून अगर कोल्हापूर शाखेकडून तक्रार अर्जात नमुद केलेली तथाकथित पॉलीसी क्र.942678617 ची पॉलीसी घेतली/दिली नाही. तक्रारदारांचे तथाकथित पॉलीसीचा व्यवहार कोल्हापूर येथून झालेला नाही. तसेच तथाकथित पॉलीसीवर कोल्हापूर शाखेने कर्ज दिले नाही व पॉलीसी सरेंडर करुन घेतली नाही. सदरची पॉलीसी ही कोल्हापूर विभागाकडून अगर कोल्हापूर शाखेकडून घेतलेला नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी सदरहू पॉलीसी सांगली शाखेकडून घेतलेचे दिसून येते म्हणून तक्रारदाराची तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर येथे चालणेस अपात्र असून सदरहू मंचास कोणताही क्षेत्राधिकार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात चालणेस पात्र आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांपैकी अ.क्र.4 कडील सामनेवाले यांचे सातारा शाखेतर्फे दि.19.05.2014 रोजीचे पत्राचे अवलोकन केले असता, सदर पत्रामध्ये तक्रारदारांची पॉलीसी क्र.942678617 सामनेवाले-विमा कंपनी यांनी मान्य केलेला आहे. त्याकारणाने पॉलीसीबाबत कोणताही वाद नाही हे प्रथमदृष्टीने दिसून येते. तक्रारदारांनी दि.20.01.2015 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले असून सदरचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदर पॉलीसीचा व्यवहार कोल्हापूर येथूनच झालेला असून सामनेवाले विमा कंपनीची स्थानिक शाखा कोल्हापूर येथेच आहे असे नमुद केले आहे. तसेच या मंचाने ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-11 जिल्हा मंचाची अधिकारारीता,
कलम-11 (2) ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमेत,-
(अ) विरुध्द पक्ष किंवा ते एकापेक्षा अधिक असल्यास विरुध्दपक्षांपैकी प्रत्येक व्यक्ती फिर्याद दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल, [किंवा व्यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल] किंवा लाभासाठी व्यक्तिश: काम करीत असेल, किंवा
(ब) विरुध्द पक्ष एकापेक्षा अधिक असल्यास त्यापैकी कोणीही, फिर्याद दाखल करण्याच्यावेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल, [किंवा व्यवसाय करीत असेल किंवा शाख कार्यालय असेल] किंवा लाभासाठी व्यक्तिश: काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्या राहत नसतील [किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल] किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्वे लाभासाठी व्यक्तिश: काम करीत नसतील अशा विरुध्द पक्षांनी फिर्याद दाखल करण्यास मूक संमती दिली असेल, किंवा
(क) वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागश: घडले असेल
अशा जिल्हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्यात येईल.
सबब, तक्रारदारांनी सदरचे पॉलीसीचा व्यवहार, कोल्हापूर येथून केला असलेचा पुराव्याचे शपथपत्रामध्ये नमुद केले असलेने व सामनेवाले विमा कंपनीची स्थानिक शाखा, कोल्हापूर येथे असल्याने ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-11 (2) प्रमाणे सदरची तक्रार या मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत आहे असे या मंचाचे मत आहे. त्याकारणाने, सदरची तक्रार या मंचात चालणेस पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:– उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, सामनेवाला यांचेकडे तक्रारदारांनी पॉलीसी क्र.942678617 उतरविलेली होती. सदर पॉलीसीवर तक्रारदाराने उचलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी दि.30.03.2007 रोजी सामनेवाले विमा कंपनी यांनी सदर पॉलीसी सरेंडर करुन तक्रारदारास उर्वरीत रक्कम रु.13,767/- परत देणेचे लेखी कळविले. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदर पॉलीसीची विचारणा केली असता, पॉलीसी संदर्भात रेकॉर्ड सापडत नसलेचे कारण पुढे करुन सदरची देय रक्कम देणेस टाळाटाळ केली. दि.14.03.2013 रोजी तक्रारदारांनी सदर पॉलीसीची झेरॉक्स प्रत सामनेवाले यांना पाठवून देखील, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरची देय रक्कम रु.13,767/- आजतागायत न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने, या मंचात तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अ.क.1 ते 3 ला तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीकडे सदरची देय रक्कम मिळणेविषयी विनंती केलेले पत्र व नोटीस दाखल केलेली आहे. अ.क्र.4 ला सामनेवाले यांच्या सातारा शाखेमार्फत दि.19.05.2014 रोजी तक्रारदारांना पत्र पाठविलेले असून सदर पत्रामध्ये, we have to inform you that we have taken up the matter with our Sangali Branch and have requested the branch to take necessary action. You will get response shortly from our Sangali Branch-I in this matter. असे नमुद असून सदर पत्रावर मॅनेजर, श्री.एल.सी.वाघ यांची सही आहे. म्हणजेच सदरचे प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन सामनेवाले विमा कंपनी देऊन मान्य केलेले आहे. तथापि सदरचे आश्वासन देऊन देखील अदयाप तक्रारदारांची देय रक्कम रु.13,767/- आजतागायत अदा केलेली नाही.
तक्रारदारांनी दि.26.11.2014 रोजी, तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठविलेल्या लेखी पत्राची प्रत व पोहच दाखल केलेली आहे. सदर पत्राचे या मंचाने अवलोकन केले असता, सामनेवाले विमा कंपनी तक्रारदारांस सदर देय रक्कमेचा चेक पाठविला असून सदरचा चेक तक्रारदारांनी न स्विकारता परत सामनेवाले विमा कंपनीचे सांगली शाखेकडे पाठविलेचा दिसून येतो. सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना सदरची देय रक्कमेची अत्यंत गरज असतानादेखील व सदरची रक्कम परत देणेचे आश्वासन दिले असताना देखील, केवळ तांत्रिक कारणास्तव सदरची देय रक्कम योग्य वेळेत तक्रारदारांना परत न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3:- उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना दयावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली असलेने सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून येणे रक्कम रु.13,767/- दयावेत व सदर रक्कमेवर दि.19.05.2014 रोजीपासून ते सदरची रक्कम मिळपावेतो द.सा.द.शे.9टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने सदरची तक्रार तक्रारदारांना दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून येणे रक्कम रु.13,767/- दयावेत व सदर रक्कमेवर दि.19.05.2014 रोजी पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.