तक्रार दाखल ता.10/02/2012
तक्रार निकाल ता.21/10/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे हरळी बुll, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदाराच्या मालकी वहिवाटीच्या शेतजमीनी हरळी बुll, ता.गडहिंग्लज येथे आहेत. दि.22.10.2015 रोजी तक्रारदाराने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडहिंग्लज येथील रक्कम रु.6,60,000/- चे कर्ज पाईपलाईन्स, इलेक्ट्रीकमोटर, व्हॉल, इत्यादीसाठी कर्ज काढले व रक्कम रु.5,75,748/- कर्ज मंजूरीचा चेक नं.340579 हा दि.22.10.2005 रोजी वि.प.यांना अदा केला. सदरचा चेक वटवून वि.प.ने रक्कम स्विकारलेली आहे. प्रस्तुत रकक्मेपोटी दिले टॅक्स इनव्हाईस प्रमाणे 140 एम.एस. x 6 के.जी.च्या 1020 पाईप्स किंमत रक्कम रु.2,23,767,/- तक्रारदाराला अदा केल्या. तसेच 140 एम.एस. x 4 के.जी. 1680 पाईप्स यांची किंमत रक्कम रु.2,43,399/- च्या पाईप्स व 110 एम.एस. x 4के.जी. 1000 च्या पाईप्स किंमत रक्कम रु.86,440/- या किंमतीस तक्रारदाराला खरेदी दिला. सदर मालावर 4 टक्के व्हॅट रक्कम रु.22,144/- आकारणी करुन रक्कम रु.5,75,748/- इतक्या किंमतीचा माल वि.प.संस्थेचे डायरेक्टर यांची सही शिक्क्यासह इनव्हाईसप्रमाणे तक्रारदाराला खरेदी दिली. प्रस्तुत माल खरेदी करतेवेळी वि.प.यांनी सदर मालाची 10 वर्षे गॅरंटी दिली होती. त्यामुळेच सदर वर नमुद बॅंकेकडून कर्ज घेऊन वि.प.कडून सदर माल शेतीचे पाणी वापरासाठी खरेदी केला. सदर पाईप लाईन यातील, तक्रारदाराने जमिनीत बसवून पाणी उपसा चालू केला. तथापि त्यानंतरही काही कालावधीनंतर सदर पाईपना तडा जाऊन संपूर्ण पाणी वाया जाऊन पाईप फुटू लागलेने पाण्याचा वापर करणे अडचणीचे झाले. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.ना सदर बाब सांगितली व सदरचा माल निष्कृष्ठ दर्जाचा असलेचे सांगितले. त्यामुळे वि.प.ने सर्व्हे केला व दोनवेळा पाहणी करुन दि.17.05.2008, दि.05.03.2006 व दि.08.04.2011 या तारखांना इनव्हाईसप्रमाणे वि.प.ने काही माल तक्रारदाराला रिप्लेस करुन दिला. त्यानंतर देखील उर्वरीत पाईप्स निष्कृष्ठ दर्जाच्या असलेमुळे फुटू लागल्या व काहींना तडे गेलेने तक्रारदाराला पाणी उपसा करणे अशक्य झाले आहे. सदर पाईपलाईन ही इतर शेतक-यांचे जमिनीतुन जात असलेने वेळोवेळी वर नमुद केलेले पाईप्स पुन्हा पुन्हा वर काढणे, वाहतूक इत्यादीकरीता तक्रारदारांना बराच खर्च सोसावा लागला. तसेच तक्रारदाराला पाणी उपसा करणे अशक्य झालेने तक्रारदाराने शेतीचे उत्पन्नावर परिणाम झाला व त्यामुळे सदर बँकेचे कर्ज फेडणेची प्रामाणिक इच्छा असूनही मुदतीत हप्ते भरता आले नाहीत. सबब, वि.प.ने निष्कृष्ठ दर्जाचा माल तक्रारदाराला पुरवठा केलेने तक्रारदाराला वि.प.ने सेवेत त्रुटी दिली आहे व तक्रारदाराचे झाले नुकसानीस वि.प.क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत. सबब, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केलेला आहे.
3. तक्रारदाराने या कामी मे.कोर्टामार्फत सर्व्हे.कमिशनरची नेमणूक करुन निष्कृष्ठ पार्इप्स रिप्लेस करुन देणेबाबत वि.प.ना आदेश व्हावेत, वैकल्पिकरित्या वि.प.क्र.1 व 2 ने निष्कृष्ठ प्रतीचा माल पुरविला असलेने त्याचा वापर करणे अशक्य असलेने वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून रक्कम रु.5,00,000/- वसुल होऊन मिळावेत. तसेच तक्रारदाराचे निष्कृष्ठ दर्जाचे पाईप्समुळे झाले नुकसानीपोटी वि.प.यांचेकडून तक्रारदाराला रक्कम रु.5,00,000/- वसुल होऊन मिळावी अथवा वि.प.यांनी तक्रारदाराजा नवीन पाईप लाईन करुन देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, तसेच कागद यादीसोबत तक्रारदाराने वि.प.ला पाठवलेली नोटीस, पोस्टाची पावती, नोटीस पाहोचलेची पावती, पाईप खरेदीसाठी दिलेला बँकेचा चेक/डि.डी., डिलीव्हरी चलने, टॅक्स इनवहाईस, बँकेचे पत्र, बँकेची नोटीस, तक्रारदाराचे जामीनदारास पत्र, 7/12 उतारे, वटमुखत्यारपत्र, दुरुस्ती पत्र, पुराव्याचे शपथपत्र, वि.प.क्र.1 ला वगळणेची पुरशिस, पोस्ट खातेचा डिलीव्हरी रिपोर्ट, दुरुस्ती अर्ज, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे या कामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊनही प्रस्तुत वि.प.मे.मंचात हजर राहिल नाहीत अथवा त्यांनी तक्रार अर्जास म्हणणेही दिलेले नाही. सबब, प्रस्तुत वि.प.क्र.1 व 2 यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाहीत.
6. वर नमुद तक्रारदारांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी-तोंडी युक्तीवाद, वगैरेचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.कडून मागणीप्रमाणे नुकसानभरपाई अथवा नवीन पाईपलाईन मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
7. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्याचे मालकीचे शेतजमीनीत पाणीपुरवठा करणेसाठी दि.22.10.2005 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे रक्कम रु.6,60,000/- चे कर्ज घेऊन वि.प.क्र.1 कडून वि.प.क्र.2 कंपनीच्या उत्पादित पाईप्स रक्कम रु.5,75,748/- या किंमतीस खरेदी केला म्हणजेच तक्रारदार वि.प.चे ग्राहक आहेत हे निर्विवाद सिध्द झाले आहे व त्या पाईप लाईनसाठी शेतामध्ये बसवल्या. सदर पाईप्सना वि.प.यांनी 10 वर्षाची वॉरंटी दिलेली होती. परंतु पाईप्स जमिनीत बसवून पाणी सोडले असता, सदर पाईप्सना तडे जाऊन संपूर्ण पाणी वाया गेले. याबाबतची माहिती तक्रारदाराने वि.प.यांना कळविली. परंतु वि.प.ने दखल घेतली नाही. यावेळी निष्कृष्ठ दर्जाच्या पाईप्स बदलून द्या अन्यथा वि.प. विरुध्द तक्रार करणार असे तक्रारदाराने वि.प.ना सांगितले असता, वि.प.ने दोनवेळा सर्व्हे. केला व काही पाईप्स बदलून दिल्या. परंतु उर्वरीत पाईप्स बदलून दिल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची पाईप लाईन वारंवार फुटून पाणी वाया जाऊन शेताचे उत्पन्नाचे नुकसान होऊ लागले. तसेच पाईप लाईन इतर शेतक-यांचया शेतामधून जात असलेने फुटलेलल्या पाईप्स वेळोवेळी बाहेर काढणे, वाहतूक वगैरेसाठी प्रचंड आर्थिक खर्च तक्रारदाराला करावा लागला. तसेच बँकेचे कर्जेही वाढतच राहीलेने तक्रारदाराला मोठा मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. वि.प.ने स्वत: दोनवेळा सर्व्हे. करुन काही पाईप्स बदलून दिल्या. मात्र उर्वरीत निष्कृष्ट पाईप बदलून न दिल्याने होत असलेले नुकसान चालूच राहीले. वि.प.ने तक्रारदाराला सदर पाईप्सची गॅरंटी 10 वर्षांची दिली होती. परंतु पाणी सुरु करताच पाईप्सला तडे जाऊन फुटत असलेने तक्रारदाराने पाईपलाईनसाठी केलेला खर्च वाया गेला व तक्रारदाराचे शेती पिकाचे व इतर मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान झाले आहे ही बाब तक्रारदाराने शपथेवर कथन केली आहे. पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद वगैरेमध्ये नमुद केली आहे. मात्र वि.प.क्र.1 व 2 हे नोटीस मिळूनही मे.मंचात उपस्थित राहिले नाहीत तसेच तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्हणणे /कैफियत दाखल केली नाही. सबब, वि.प.विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारीत झाला आहे. सबब, वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदारचे तक्रार अर्जातल पुराव्याचे शपथपत्रातील व लेखी, तोंडी युक्तीवादातील कथनांवर विशवासार्हता ठेवणे न्यायोचित होणार आहे असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, वि.प.ने प्रस्तुत कामी तक्रारदारांना वि.प.यांनी निष्कृष्ट दर्जाच्या पाईप्स विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराला दिल्या जाणा-या सेवेमध्ये कमतरता/त्रुटी दिली आहे ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुत कामी तक्रारदार हे वि.प.यांचेकडून निष्कृष्ट दर्जाच्या पाईप्स बदलून मिळणेस अथवा पाईप्स लाईनचे सर्व रक्कम परत मिळणेस तसेच शेती उत्पन्नाचे व इतर नुकसानभरपाई वि.प.कडून वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना पुरविलेल्या निकृष्ठ दर्जाच्या उर्वरीत पाईप्स बदलून नवीन पाईप अदा कराव्यात.
अथवा
वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला रक्कम रु.5,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच लाख मात्र) अदा करावेत.
3 वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) अदा करावेत.
4 वरील सर्व आदेशांची पूर्तता वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.