जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 201/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 25/09/2023.
तक्रार दाखल दिनांक : 06/10/2023. तक्रार निर्णय दिनांक : 18/12/2024.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 23 दिवस
श्री. अनिकेत दिलीप जगदाळे, वय 25 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. जगदाळे रुग्णालयाच्या पाठीमागे, राजीव गांधी चौक,
लातूर, तालुका व जिल्हा : लातूर - 413 512. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) लातूर अरमानी इंटरप्रायजेस, प्रोप्रा. श्री. आर्यन निंबाळकर,
दुकान नं. 184, 185, 186 व 187, पहिला मजला, महानगरपालिका
व्यापारी संकुल, गांधी मार्केट, बस स्थानकाजवळ, लातूर-413 512,
महाराष्ट्र, भारत. मोबा. 9822406450 / 9822306450.
(2) मोबिटेक क्रिएशन्स् प्रा. लि., ए-2, युनीट नं. 1, 2 व 4,
मुंबई-नाशिक महामार्ग, गाव : वाहुली, पोस्ट : पडघा,
ता. भिवंडी - 400 027, महाराष्ट्र, इंडिया.
(3) वनप्लस टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, यु.बी. सिटी,
24, विठ्ठल मल्ल्या मार्ग, के.जी. हळ्ळी, डी'सुझा लेआऊट,
अशोक नगर, बेंगलुरु - 560 001, कर्नाटका, भारत. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. दिपक टी. फेरवानी
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.3 हे वनप्लस भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच व अन्य वस्तुंचे उत्पादक असून त्यांच्या वस्तुचे विरुध्द पक्ष क्र.1 हे अधिकृत सेवा पुरवठादार व विरुध्द पक्ष क्र.2 हे अधिकृत पुन:विक्रेते आहेत. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, दि.19/8/2022 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या संकेतस्थळावरुन नेट बँकींगद्वारे रु.66,999/- मुल्य असणारा OnePlus 10 Pro 5G NE2211 IN (Dual Sim) (यापुढे "वादकथित भ्रमणध्वनी संच") खरेदी केला. वादकथित भ्रमणध्वनी संचाच्या खरेदी पावतीचा क्रमांक MHEC222300219288 आहे. दि.25/8/2022 रोजी तक्रारकर्ता यांना वादकथित भ्रमणध्वनी संच प्राप्त झाला. वादकथित भ्रमणध्वनी संचाकरिता 1 वर्षाची वॉरंटी व खोक्यातील साहित्याकरिता 6 महिन्याची वॉरंटी उपलब्ध करुन दिलेली होती.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी भ्रमणध्वनी संच कार्यान्वित केला असता त्याच दिवशी ALWAYS ON DISPLAY, FINGERPRINT ICON SHAKING, BLURRING, DATE, TIME, Notifications shaking etc. व डाऊनलोड केलेल्या 2 नवीन सॉफ्टवेअरबद्दल निर्माण झालेल्या अनपेक्षीत दोषास सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी वनप्लस संकेतस्थळावर दिलेल्या सेवा केंद्र क्रमांकाशी संपर्क केला. सेवा केंद्राने केलेल्या सूचनांचे पालन करुनही भ्रमणध्वनीतील दोषाचे निराकरण झाले नाही. भ्रमणध्वनी बदलून मिळावा किंवा त्याचे मुल्य परत मिळावे, याकरिता त्यांनी सेवा केंद्राशी बोलणी केली असता कंपनीचे त्याप्रमाणे धोरण नसल्यामुळे स्थानिक अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधण्यास कळविले. तक्रारकर्ता यांनी दि.26/8/2022 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 सेवा केंद्राशी संपर्क साधला असता त्यांनी वादकथित भ्रमणध्वनी संचामध्ये असणारे दोष नमूद करुन पावती दिली. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी खोटे व तथ्यहीन कारण देऊन वादकथित भ्रमणध्वनी संच बदलून देण्यास असमर्थता दर्शवली.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.31/8/2022, 1/9/2022, 2/9/2022 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे संपर्क केला असता संदिग्ध व खोटे आश्वासने देऊन तक्रारकर्ता यांचा वादकथित भ्रमणध्वनी संच एक ते दीड महिना ताब्यात ठेवून अत्यंत वाईट सेवा दिली. त्यानंतर वादकथित भ्रमणध्वनी संच बदलून घेण्याबद्दल कळविल्यानुसार तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे गेले असता त्यातील दोषाबद्दल खोटी पावती दिली आणि 8 दिवसामध्ये निराकरण केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार नोंदविली.
(4) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांना भ्रमणध्वनी संचाचे खोके प्राप्त झाले. परंतु त्यामध्ये नवीन भ्रमणध्वनी संचाऐवजी वापर केलेला व मृत स्थितीतील धुळ साचलेला, बॅटरी गरम होऊन आपोआप कमी होत असलेला भ्रमणध्वनी संच पुरविण्यात आला. त्याबद्दल विचारणा केली असता तो नवीन असल्याचे व त्यामध्ये दोष नसल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सांगितल्यामुळे तक्रारकर्ता यांनी त्याचा वापर सुरु केला. तसेच पुन्हा पूर्वी निर्माण झालेल्या दोषास सामोरे जावे लागू नये म्हणून विरुध्द पक्ष यांच्या संकेतस्थळावरुन रु.3,499/- शुल्क असणारे screen protection plan घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या भ्रमणध्वनी संचाच्या IMEI क्रमांकावरुन तो प्लान खरेदी करता येणार नसल्याचे दर्शविण्यात आले. यावरुन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना वापर केलेला भ्रमणध्वनी संच बदलून देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी दखल न घेता तक्रारकर्ता यांची तक्रार बंद केली. त्यामुळे विधिज्ञांमार्फत विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना सूचनापत्र पाठविले असता प्रतिसाद दिलेला नाही. अशाप्रकारे, उक्त कथनांच्या अनुषंगाने भ्रमणध्वनी संचाचे संपूर्ण मुल्य रु.66,999/- व्याजासह परत करण्याचा; मानसिक त्रास, आघात व गैरसोईकरिता रु.30,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा व ग्राहक तक्रारीकरिता खर्च देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(6) ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांचा युक्तिवाद ऐकला.
(7) ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वाद-तथ्याच्या अनुषंगाने अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी दि.22/8/2022 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून रु.66,999/- मुल्य अदा करुन वादकथित भ्रमणध्वनी संच खरेदी केल्याचे पावती क्र. MHEC222300219288 वरुन निदर्शनास येते. वादकथित भ्रमणध्वनी संचामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या सेवा केंद्रामध्ये जमा केला आणि विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्याबद्दल दिलेले सेवा अभिलेख दस्त अभिलेखावर दाखल आहेत. तक्रारकर्ता यांना वादकथित भ्रमणध्वनी संचाऐवजी अन्य भ्रमणध्वनी संच बदलून दिला आणि त्यामध्ये दोषाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी Screen Protection Plan घेण्याचा प्रयत्न केला असता Current IMEI has a limitation of time, you can not buy it. संदेश प्राप्त झाल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांनी त्याबद्दल ई-मेलद्वारे तक्रारी केल्याचे निदर्शनास येते. शिवाय, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना विधिज्ञांमार्फत पाठविलेल्या सूचनापत्राच्या अनुषंगाने प्रतिसाद दिलेला नाही, असेही निदर्शनास येते.
(8) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने व त्यांच्याद्वारे अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांबद्दल विरुध्द पक्ष यांच्याद्वारे खंडन, प्रतिकथन व पुरावा नाही.
(9) तक्रारकर्ता यांचा युक्तिवाद असा की, विरुध्द पक्ष यांनी सुरुवातीस त्यांना दोषयुक्त असणारा वादकथित भ्रमणध्वनी संच विक्री केला आणि त्यानंतर त्याऐवजी बदलून दिलेला भ्रमणध्वनी संच हा पूर्वी वापरण्यात आलेला होता. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी सुरुवातीपासून त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
(10) वाद-तथ्ये, अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे व युक्तिवाद यांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून वादकथित भ्रमणध्वनी संच खरेदी केला आणि त्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दुरुस्तीकरिता देण्यात आला, हे दर्शविणारे कागदपत्रे दाखल आहे. तसेच वादकथित भ्रमणध्वनी संचामध्ये निर्माण झालेल्या दोषाबद्दल व त्यानंतर बदलून दिलेल्या भ्रमणध्वनी संचाबद्दल तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे ई-मेल व अन्य प्रकारे तक्रारी केल्याचे पुरावे दाखल आहेत. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता भ्रमणध्वनी संचाचे मुल्य परत करण्याबद्दल विरुध्द पक्ष प्रतिसाद दिलेला नाही. उक्त स्थिती पाहता, वादकथित भ्रमणध्वनी संच दोषयुक्त असल्यामुळे तो बदलून त्याऐवजी अन्य भ्रमणध्वनी संच बदलून दिला, हे सिध्द होते. तक्रारकर्ता यांना बदलून दिलेल्या भ्रमणध्वनी संचाकरिता सुरक्षा कवच घेण्याचा प्रयत्न केला असता तो पूर्वी वापरलेला होता, असेही निदर्शनास येते. यावरुन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त वादकथित भ्रमणध्वनी विक्री केला आणि त्यानंतर त्याऐवजी वापर केलेला भ्रमणध्वनी देऊन सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, हाच निष्कर्ष निघतो. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 39 अंतर्गत भ्रमणध्वनी संचाचे मुल्य रु.66,999/- परत मिळण्यास व त्या रकमेवर व्याज मिळण्यास पात्र ठरतात.
(11) तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडून मानसिक त्रासाकरिता रु.30,000/- व ग्राहक तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाई निश्चित करताना त्या–त्या वस्तुस्थितीनुसार गृहीतके निश्चित झाले पाहिजेत. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त असणारा वादकथित भ्रमणध्वनी संच दिल्यामुळे व त्याऐवजी पूर्वी वापर केलेला भ्रमणध्वनी बदलून दिल्यामुळे तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागल्याचे सिध्द होते. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्याबद्दल उचित दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. शिवाय, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना विधिज्ञामार्फत सूचनापत्र पाठविणे, विधिज्ञांचा सल्ला व सहायता घेणे, विधिज्ञांचे शुल्क देणे इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. उक्त स्थिती पाहता, तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मंजूर करणे न्यायोचित राहील. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना भ्रमणध्वनी संचाचे मुल्य रु.66,999/- परत करावे आणि त्याचवेळी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडे वाद असणारा भ्रमणध्वनी परत करावा.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना रु.66,999/- रकमेवर ग्राहक तक्रार दाखल केल्यापासून म्हणजेच दि.25/9/2023 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 201/2023.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ती यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-