तक्रारदारातर्फे वकील :- श्री. सी.एस.मल्होत्रा
सामनेवाले क्र 1 तर्फे वकील :. श्री. अमित तुंगारे
सामनेवाले क्र 3 तर्फे वकील ः- श्री.किरण पाटील
सामनेवाले क्र 2,5,6 ः- मयत.
सामनेवाले क्र ः- 4,7,8,9,10,11,12,13,14,15 व 16 एकतर्फा.
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्र
निकालपत्र
(दिनांक 19/09/2016 रोजी घोषीत )
1. तक्रारदार ही सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. सामनेवाले क्र 1 विकासक आहेत सामनेवाले क्र 2 ते 16 हे भूमी स्वामी किंवा त्यांचे वारसदार आहेत. (सामनेवाले यांचे अनुक्रमांक अंतिमतः सूधारीत तक्रारीप्रमाणे देण्यात येत आहे.) तक्रारदार संस्थेला भोगवटा प्रमाणपत्र, अभिहस्तांतरण प्रमाणपत्र व इतर सुविधा न दिल्यामूळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रथमतः तक्रार फक्त विकासक यांचेविरूध्द दाखल करण्यात आली होती. नंतर भूमी स्वामी सम्मीलीत करण्यात आले व नंतर टप्याटप्याने वारसदारांना सम्मीलीत करण्यात आले. बरेचशे सामनेवाले हे मयत आहेत. सामनेवाले क्र 1,3 यांनी वेगवेगळी लेखीकैफियत दाखल केली. इतर हयात असणा-या सामनेवाले विरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले क्र 1 हे प्रोप्रायटरशिप असून सामनेवाले लखुबा दरबार हे त्यांचे प्रोप्रायटर आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी मौजे दहिसर ता.बोरीवली जि. मुंबई येथील सर्व्हे नं 153 हिस्सा 1 (P) आणि 152 हिस्सा 1 (P) व सिटी सर्व्हे नं 2593 (Part) आणि 2645 (Part) येथील भूमी विकसीत करीत होते. सामनेवाले क्र 1 यांनी सदरहू भूमीवर तक्रारदार संस्थेच्या दोन इमारती उभ्या केल्या आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी सेवेमध्ये कसुर केल्यामूळे व अनुचित व्यापार पध्दत अवलंबल्यामूळे तक्रारदार यांच्या दिनांक 14/04/2009 च्या सर्वसाधारण सभेमध्ये तक्रार दाखल करण्याबाबत ठराव पारीत करण्यात आला. तक्रारदार संस्था दि. 25/01/1999 ला नोंदणीकृत झाली. तक्रारदार यांच्या संस्थेच्या इमारती ‘ए’ विंग व ‘बी’ विंग अशा असून त्यामध्ये 40 सदस्य आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी दि. 11/11/1986 च्या करारपत्राद्वारे उपरोक्त सर्व्हे नंबरवर स्थित असलेले 22 घरे, जे बैठया चाळीचे होते ती भूमी, जिचे क्षेत्रफळ 2600 चौ.र्याड आहे, विकत घेतली. तक्रारदार यांच्या सदस्यांनी वेळोवेळी करारपत्राप्रमाणे सामनेवाले क्र 1 कडून सदनिका विकत घेतल्या. सामनेवाले क्र 1 यांनी इमारतीकरीता मुंबई महानगर पालीकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केले नाही. तक्रारदार संस्थेला रस्त्याकरीता अंदाजे रू. 90,000/-,खर्च आला. तसेच या खर्चामध्ये कंम्पाऊंड वॉलचा खर्च सम्मीलीत आहे. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार यांच्या सिमेमध्ये असलेले बांधकाम पाडले नाही व त्यामध्ये काही कुटूंबे राहत असल्यामूळे तक्रारदार संस्थेला त्यापासून उपद्रव व त्रास होतो. सामनेवाले क्र 1 यांनी गृहनिर्माण संस्थेच्या निर्माण व नोंदणीकरीता पाऊले उचलली नसल्यामूळे सदनिकाधारकांनी एकत्र येऊन संस्थेची नोंदणी केली. सामनेवाले यांनी इमारतीची व भूमीचे हस्तांतरण तक्रारदार संस्थेच्या हक्कामध्ये केले नाही. तक्रारदार संस्थेनी दि. 22/08/2008 ला पत्र लिहून त्याबाबत विनंती केली. सामनेवाले यांनी त्या पत्राला मोघम व त्रोटक असे कारणे देत उत्तर दिले. तक्रारदार संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्यांना शिल्लक असलेला एफएसआय प्राप्त होतो. इमारती व जमीनीचे अभिहस्तांतरण न झाल्यामूळे सदनिकाधारकांना बँकेकडून घरे दुरूस्ती करण्याकरीता कर्ज प्राप्त करण्यास अडचण भासत आहे. तक्रारदारानी तक्रार दाखल करून विविध मागण्या केल्या आहेत. तक्रारदार संस्थेनी आवश्यक कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केली.
3. सामनेवाले क्र 1 नूसार तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्यामूळे ती कालबाहय ठरते. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार संस्थेच्या सदस्यांनी भोगवटा प्रमाणपत्र नसतांना त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सदनिकेचा ताबा घेतला व त्याकरीता त्यांनी सामनेवाले क्र 1 यांना विनंती केली होती. काही सदनिकाधारकांनी केलेल्या बांधकामामध्ये फेरफार केल्यामूळे मुंबई महानगर पालीकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे तक्रारदार स्वतः त्याकरीता जबाबदार आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी कम्पाऊंड वॉल बांधली होती. जो इमला तक्रारदार संस्थेच्या हद्दीमध्ये आहे तो इमला पूर्वीपासून तिथे अस्तित्वात आहे व तेथील तीन खोल्यामध्ये कुटूंबे वास्तव्य करतात. सामनेवाले क्र 1 त्यांचेशी चर्चा करून त्यांच्याकडून ते इमले रिक्त करण्याबाबत प्रयत्न करीत आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार संस्थेला सोसायटीची नोंदणी करण्याकरीता पूर्ण सहकार्य केले. सदरहू भूमी ही महसुल खात्यामध्ये श्री. अवध नारायण पांडे यांचे नावे आहे. त्यामुळे सामनेवाले क्र 1 ती भूमी अभिहस्तांतरण करू शकत नाही. इमारतीकरीता असलेल्या रस्त्यावर काही राजकारनी व्यक्तींनी बांधकाम केल्यामूळे मुंबई महानगर पालीका यांना विनंती करून ते तिथून हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तक्रार ही कालबाहय असल्यामूळे ती फेटाळण्यात यावी.
4. सामनेवाले क्र 3 श्री. अवध नारायण पांडे यांचेनूसार सदरहू तक्रार ही कालबाहय आहे. तक्रारदारानी महत्वाच्या बाबी दडवून ठेवल्या. तक्रारदारांनी सामनेवाले हे मयत झाले असून व चौकशी न करतांना त्यांची नावे पक्ष म्हणून नमूद केली. श्रीराम जगदुविर पांडे हे त्यांचे वडील होते व श्रीमती. विदयावती देवी त्यांची वहिनी आहे व त्या मृत्यु पावल्या. त्यांना तीन मुले आहेत त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे व त्याला तीन मुले आहेत. सामनेवाले जगनारायन व विदयावती देवी यांचे वारसदार वाराणसी जिल्हयामध्ये आपल्या गावी राहतात. सामनेवाले क्र 3 यांनी त्यांच्या भूमीपैकी काही भाग सामनेवाले क्र 1 यांना विकला होता. ही विक्री श्रीमती. विदयावती देवी, जगनारायण सह त्यांनी केली होती. आज सुध्दा उर्वरीत भूमी त्यांच्या ताब्यात असून तेथील रहिवासी त्यांचे भाडेकरी आहेत. सामनेवाले क्र 1 यांनी नोंदणी न केलेल्या करारपत्राद्वारे भूमी विकत घेतली आहे. संपूर्ण भूमीचे क्षेत्रफळ 3,620 चौ.र्याड आहे व त्यापैकी सामनेवाले क्र 1 यांना फक्त 2600 चौ.याड भूमी विकली आहे व उर्वरीत 1,020 चौ.यार्ड भूमी त्यांच्या व इतर वारसदारांच्या ताब्यामध्ये आहे. सामनेवाले क्र 1 यांनी भूमीबाबत कागदपत्रे सादर करतांना त्यांच्या वडीलांची त्या कागदपत्रावर बनावट सही असल्याचे दिसून येते. सामनेवाले क्र 3 यांचे वडील हे दि. 18/08/1978 ला मरण पावले होते. सन 1987 व 1988 मध्ये दाखल झालेल्या कागदपत्रांवर त्यांच्या वडिलांच्या सहया दिसून येतात. सामनेवाले क्र 1 यांनी सामनेवाले क्र 3 यांना 500 चौ.फुटाची क्षेत्रफळ असलेली सदनिका देण्याचे मान्य केले होते. सामनेवाले क्र 1, व तक्रारदार संस्थेनी संगनमत करून ही तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. सामनेवाले क्र 3 यांनी तक्रार खर्चासह फेटाळण्याची विनंती केली. सामनेवाले क्र 3 यांनी भाडेपावती, इतर कागदपत्रे दाखल केली.
5. तक्रारदारांनी, सामनेवाले क्र 1 व सामनेवाले क्र 3 यांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. तक्रारदारातर्फे वकील श्री. सी.एस.मल्होत्रा व सामनेवाले क्र 1 तर्फे वकील श्री. अमित तुंगारे व सामनेवाले क्र 3 तर्फे वकील श्री. किरण पाटील यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
6. उपरोक्त बाबी विचारात घेता खालील बाबी मान्य आहेत असे समजता येईल.
(अ) सामनेवाले क्र 1 ही नोंदणीकृत संस्था आहे व ही नोंदणी दि. 25/01/1999 ला करण्यात आली होती. तक्रारदार यांचे ‘ए’ व ‘बी’ विंग अशा दोन इमारती आहेत. त्यांचे 40 सदस्य आहेत. सामनेवाले क्र 1 हे विकासक आहे. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार संस्थेच्या इमारतीचे पूर्ण बांधकाम केले. सामनेवाले क्र 1 यांनी सदनिकेची विक्री तक्रारदार यांच्या सदस्यांना केली. सामनेवाले क्र 1 यांनी सामनेवाले क्र 3,4,5,6,13,14 सह (किंवा त्यांच्या पूर्वजांसोबत करार केला होता.) दि. 11/11/1986 ला कराराप्रमाणे 3620 चौ.यार्ड(3027.28 चौ.मि) पैकी 2600 चौ. याड (2174.27 चौ.मि) भूमीचा सौदा केला होता. सदरहू भूमीवर तक्रारदार यांच्या ताब्यातील इमारती उभ्या आहेत. परंतू तक्रारदार यांच्या हक्कामध्ये अभिहस्तांतरण झालेले नाही. इमारतीकरीता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त नाही.
7. तक्रारदार हे रस्त्यांच्या व कंम्पाऊंडच्या भिंतीकरीता केलेल्या खर्चाबाबत रू. 90,000/-,च्या मागणीस पात्र ठरत नाही. तक्रारदार संस्था ही दि. 25/01/1999 ला अस्तित्वात आली. त्यामुळे या सुविधेकरीता किंवा त्याबाबत पैशाच्या मागणीकरीता ही तक्रार दोन वर्षाचे आत दाखल करणे आवश्यक होते. परंतू, ही तक्रार उद्भवलेल्या कारणापासून दोन वर्षाचे आत दाखल केली नसल्यामूळे ती मागणी कालबाहय ठरते.
8. सदरहू भूमीबाबत सामनेवाले क्र 1 सामनेवाले क्र 3,4 व 5 विदयावती देवी (मयत) यांचे वारसदार सामनेवाले क्र 6 (मयत) 13,14 यांच्या मध्ये झाला होता. ही भूमी सामनेवाले क्र 1 यांच्या नावे खरेदी व अभिहस्तांतरण झाली आहे याबाबत अभिलेखात पुरावा नाही. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार यांच्या सदस्यांसोबत केलेल्या सदनिकेच्या कराराच्या परिच्छेद 10 मध्ये सामनेवाले क्र 1 यांना ही भूमी अभिहस्तांतरण करण्याबाबत त्यांना अधिकार व हक्क असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे ते या जबाबदारीतुन मुक्त होऊ शकत नाही. सामनेवाले क्र 1 यांच्यासोबत भूमी विक्री बद्दल झालेल्या कराराचे पक्ष म्हणून किंवा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भूमी अभिहस्तांतरण करण्याकरीता सामनेवाले क्र 3,4,13,14,7,8,9 हे सुध्दा जबाबदार ठरतात. ही जबाबदारी कायदयाप्रमाणे असल्यामूळे तिला कालबाहयची बाधा होत नाही. सामनेवाले क्र 7,8,9 हे विदयावती देवी यांचे मयत मुलगा श्री. अमरनाथ यांचे वारसदार आहेत.
9. कराराप्रमाणे सामनेवाले क्र 1 यांनी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करण्याचे मान्य केले होते व त्याप्रमाणे सदनिकाधारकांकडून रू. 2,000/-,कायदेशीर खर्चाकरीता, रू. 251/-,भागाच्या अर्जाकरीता व रू. 1,000/-,संस्थेचे निर्माण व नोंदणीकरीता असे एकुण रू. 3,251/-,सदनिकेचा ताबा देतांना कराराप्रमाणे सामनेवाले क्र 1 यांनी घेतले होते. परंतू, हे काम तक्रारदार संस्थेनी स्वतः केले. सामनेवाले क्र 1 यांनी त्या कामाकरीता सहकार्य केल्याचे लेखीकैफियतीमध्ये नमूद केले आहे. सबब, सामनेवाले क्र 1 यांनी ही रक्कम परत करणे आवश्यक ठरते. सामनेवाले क्र 1 यांनी कर, पाण्याचे व विदयुत मापकासाठी राखीव रक्कम भरली नाही हे सिध्द होत नाही. सबब सामनेवाले क्र 1 यांनी प्रत्येक सदनिकाधारकाला रू. 3,251/-,परत करणे योग्य आहे.
10. मान्य बाबीवरून हे स्पष्ट होते की, सामनेवाले क्र 1 यांनी व तक्रारदार यांच्या सर्व सदस्यांनी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र/बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतांना सदनिकेचा ताबा दिला व घेतला. हे कृत्य मोफाच्या कलम 3,13 सह व मुंबई महानगर पालीका कायदा 1988 कलम 353-अ, 471 सह शिक्षेस पात्र आहे. परंतू सामनेवाले क्र 1, व तक्रारदार यांच्या सदस्यांना गुन्हयाबाबत शासन झाल्याचे अभिलेखावरून दिसून येत नाही. प्रत्येकानी देशातील सर्व कायदयाचे पालन करणे आवश्यक आहे. असे आमचे मत आहे. याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाने (रिव्हीजन पिटीशन नं 626/2013 मे. अरोमा पेन्टस् लि. आणि इतर विरूध्द न्यू इंडिया अॅश्युरन्स कं.लि. आणि इतर निकाल तारीख 12/08/2013) चा आधार घेत आहोत. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्राबाबत आदेश पारीत करतांना ही बाब विचारात घेण्यासारखी आहे. भोगवटा प्रमाणपत्र इमारतीकरीता आवश्यक आहे व प्राथमीक जबाबदारी सामनेवाले क्र 1 यांची करार व कायदयाप्रमाणे आहे. सामनेवाले क्र 1 यांनी काही सदस्यांनी अनधिकृत बांधकाम केल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करता आले नाही असे लेखीकैफियतीमध्ये नमूद केले आहे. हे विधान फार मोघम व त्रोटक स्वरूपाचे आहे. शिवाय कागदोपत्री पुराव्याचा दुजोरा नाही.
11. तक्रारदार ही कायदेशीर व्यक्ती आहे. त्यामुळे ती मानसिक त्रासासाठी व गैरसोय या कारणास्तव मागणीस पात्र ठरत नाही.
12. सामनेवाले क्र 1 यांचे वकील श्री. तुंगारे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयानी श्री. सुरेश कुमार डागला विरूध्द सर्वांन व इतर 2016 (4) All MR. 487 (SC) मा. बॉम्बे उच्च न्यायालयानी नरेश लचमन दास आसवानी विरूध्द हरीदास ऊर्फ हरदास लचमन आसवानी आणि इतर 2016 (4) All MR पृ.क्र 286 चा आपल्या निवेदनापृष्ठर्थ आधार घेतला आहे.
13. मा. बॉम्बे उच्च न्यायालयाचा दाखल केलेला न्यायनिवाडा हा अर्धवट आहे. दोन्ही न्यायनिर्णयाचा अभ्यास केला असता हे न्यायनिर्णय या तक्रारीच्या बाबींना लागु पडत नाही.
14. तक्रारदारांनी वेळोवेळी तक्रारीमध्ये दुरूस्ती करून भूमी मालक व त्यांचे वारसदार पक्ष म्हणून सम्मीलीत केले आहे. परंतू तक्रारदारानी त्याबाबत योग्य ती दुरूस्ती तक्रारीमध्ये केल्याचे दिसून येत नाही. सामनेवाले क्र 3 यांनी दाखल केलेल्या लेखीकैफियतीवरून त्यांना या त्रुटीमुळे काही फरक पडल्याचे जाणवत नाही. त्यामुळे आमच्या मते या बाबीला फार तांत्रीक महत्व न देता न्यायनिर्णय देणे योग्य होईल असे वाटते.
15. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्षानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
16. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
1. तक्रार क्रमांक 333/2009 बहूतांशी मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र 1,3,4,13,14,7,8,9 यांनी सेवा देण्यात कसुर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार यांच्या प्रत्येक सदस्यास रू. 3,251/-,(तीन हजार दोनशे एकावन) दि. 01/02/1999 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याजानी दि. 30/11/2016 पर्यंत अदा करावे. तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/12/2016 पासून 15 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
4. तक्रारदार यांचे प्रत्येक सदस्यांनी रू. 10,000/-,(दहा हजार) व सामनेवाले क्र 1 यांनी रू. 4,00,000/-,(चार लाख) सदनिकेचा ताबा गैरकायदेशीर रित्या घेतला व दिल्यामूळे मंचाच्या जिल्हा ग्राहक कल्याण निधीमध्ये दि. 30/11/2016 पर्यंत जमा करावे. या आदेशाला अंतिमतः प्राप्त होईपर्यंत ही रक्कम कार्यालयाच्या (पीएलए) खात्यामध्ये जमा करावी. उपरोक्त मुदतीत रक्कम जमा न झाल्यास प्रबंधकानी रक्कम वसुलीकरीता कायदेशीर कार्यवाही करावी. ही रक्कम दंड म्हणून समजण्यात येऊ नये.
5. तक्रारदार यांच्या सर्व सदस्यांनी वरील प्रमाणे रक्कम जमा केल्यानंतर सामनेवाले क्र 1 यांना तक्रारदारांनी लेखी स्वरूपात त्याबाबत कळवावे.
6. सामनेवाले क्र 1 यांनी उपरोक्त क्लॉज 5 प्रमाणे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी 4 महिन्याच्या आत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करावे व त्याची प्रत तक्रारदार यांना दयावी.
7. मुंबई महानगरपालीका यांच्या अधिका-याच्या निरीक्षणामध्ये इमारतीमध्ये सदस्यांनी अनाधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले, तर हे अनाधिकृत बांधकाम सदस्यांनी पाडल्यानंतर व स्थिती मंजूर आराखडयाप्रमाणे केल्यानंतर, सामनेवाले क्र 1 यांची 4 महिन्याची मुदत त्यानंतर सुरू होईल. एकापेक्षा जास्त असे सदस्य असल्यास सर्वात शेवटच्या सदस्यांनी पूर्तता केल्यानंतर सामनेवाले क्र 1 यांची 4 महिन्याची मुदत सुरू होईल.
8. तक्रारदार यांचे सर्व सदस्यांनी महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अॅक्ट व मुंबई महानगरपालीका कायदयाच्या गुन्हयाबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मा. आयुक्त, मुंबई महानगरपालीका यांनी सामनेवाले क्र 1 यांच्या भोगवटा प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जाचा विचार करावा.
9. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत सामनेवाले क्र 1, सामनेवाले क्र 3,4,13,14,7,8,9 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकरीत्या मौजे दहिसर ता. बोरीवली जि. बृन्हमुंबई येथील सर्व्हे नं. 153 हिस्सा 1 (Part) 152 हिस्सा 1 (Part) पैकी 2600 चौ.यार्ड भूमी तक्रारदार संस्थेच्या नावे करावी, सामनेवाले क्र 1 यांनी सदरहू भूमी वरील इमारत तक्रारदार यांचे नावे हस्तांतरण करावे. सामनेवाले क्र 1 यांनी भूमी व इमारतीशी संबधीत मूळ कागदपत्रे तक्रारदार यांना अभिहस्तांतरण करतेवेळी दयावे. भूमी अभिहस्तांतरण वरील प्रमाणे न केल्यास सामनेवाले क्र 1, सामनेवाले क्र 3,4,13,14,7,8,9 हे व्यक्तीशः किंवा संयुक्तिकरीत्या तक्रारदार संस्थेला दरमहा रू. 15,000/-,(पंधरा हजार) देण्यास जबाबदार ठरतील.
10. सामनेवाले यांनी उपरोक्त क्लॉज 9 प्रमाणे भूमी व इमारतीचे अभिहस्तांतरण न केल्यास तक्रारदार हे डिम्ड कन्वेन्सकरीता कार्यवाही करू शकतात. तक्रारदार यांची प्रबंधकामार्फत अभिहस्तांतरण करण्याची मागणी दरखास्त दाखल करतेवेळी करण्याची मुभा देण्यात येते.
11. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च म्हणून रू. 20,000/-,(वीस हजार) दिनांक 30/11/2016 पर्यंत अदा करावे तसे न केल्यास त्या रकमेवर दि. 01/12/2016 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याज लागु राहील.
12. तक्रारदार यांची इतर मंजूर न झालेली मागणी फेटाळण्यात येते.
13. आदेशाच्या प्रती -
(अ) तक्रारदार
(ब) सामनेवाले क्र 1,3,4,13,14,7,8 व 9
(क) मा.आयुक्त मुंबई महानगर पालीका, महानगरपालीका मार्ग,फोर्ट,
मुंबई- 400001
(ड) मा.पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, महात्मा फुले मंडई जवळ
मुंबई- 400001 यांना माहिती व योग्य कार्यवाहीकरीता निःशुल्क
पाठविण्यात याव्या.
14. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदारांना परत करावे.
npk/-