न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 (1) प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे मालकीचे शहर कोल्हापूर महानगरपालीका हद्दीतील ए वॉर्ड, राधेय कॉलनी येथील 1017/1अ/14, या मिळकतीमध्ये वि प क्र.1 यांचेकडून जल पुरवठा घेतलेला असून त्याचा जोडणी क्र.1073439 असा असून ग्राहक क्र.76546 असा आहे. तक्रारदार हे नोकरी निमित्त कराड जि.सातारा येथे असलेने सदर नमुद मिळकतीत फेब्रुवारी,2019 पासून राहणेस नाहीत. त्यामुळे सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा पाणी वापर होत नव्हता व नाही. तक्रारदार यांना नियमित रक्कम रु.600/- पाणी बील येत होते. तथापि, सदरचे पाणी मिटर बंद असलेचे सबबीखाली वि प यांचेकडून ऑगस्ट, सप्टेंबर, 2017 पासून रक्कम रु.600/- ऐवजी रक्कम रु.1,040/- ची बीले देणेत येत होती. याबाबत तक्रारदार यांनी वि प यांचेकडे दि.03/12/2019 रोजी तक्रारअर्ज देऊन बील दुरुसत करुन मिळणेबाबत विनंती केलेली होती. त्यास वि प यांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यानंतर वि प यांनी तक्रारदारास दि.08/07/2020 रोजीने पाणी बीलाचे रक्कम रु.14,604/- इतके भरमसाठ देयक क्र.10110434 चे पाठविले. तक्रारदाराने दि.14/07/2020 रोजी तथाकथीत व अवास्तव बीलाची दुरुसती होऊन सरासरी दराने बीलाची आकारणी करणेबाबतचा तक्रार अर्ज वि प यांचेकडे दिला होता. सदर अर्जास वि प यांनी कोणताही खुलासा न देता दि.14/09/2020 रोजीने सदर मिळकतीत कुळाकडून पाणी वापर झालेचे खोटे नमुद केलेले आहे. वास्तविक तक्रारदार यांनी सदर मिळकतीत केव्हाही कुळ ठेवलेले नव्हते व नाही. अशाप्रकारे वि प यांनी व्यापारी अनुचित प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी करुन तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास दिेलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास वि प यांचेविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
तक्रारदाराने वि प यांनी तक्रारदाराचे ग्राहक क्र.76546 पाणी जोडणी क्र.1073439 चे दि.08/07/2020 चे बील दुरुस्त करुन केवळ स्थिर आकार रु.190/- प्रति दोन महिनेचे बील देणेबाबत मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- वि प यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि प यांनी दिलेले पाणी बील, पत्र, तक्रारदार यांनी वि प यांचेकडे दिलेला दि.14/07/20, दि.04/02/2020 व 03/12/2019रोजीचा तक्रार अर्ज इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
तक्रारदार यांनी दिलेल्या नि.5 चे अंतरिम मनाई अर्जावर दि.12/11/2020 रोजी तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्ज मंजूर करण्यात येऊन सदर अंतरिम आदेशाचे तारखेपासून 15 दवसाचे आत थकीत पाणी बिलापैकी रक्कम रु.4,000/- जिल्हा आयोगात जमा करणेचे अटीवर यातील वि प यांनी सदर आयोगाचे पुढील आदेशापर्यंत तक्रारदार यांचे वादातील जल/पाणी पुरवठा खंडीत करु नये अशी तुर्तातुर्त ताकीद वि प क्र.1 व 2 यांना देण्यात येते असा आदेश पारीत करण्यात आला.
4. वि.प. क्र.1 व 2 हे सदर कामी वकीलांमार्फत दि.10/12/2020 रोजी हजर झाले. वि प क्र.1 व 2 यांना संधी देऊनही त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल न केलेने वि प क्र.1 व 2 यांचे विरुध्द दि.28/01/2021 रोजी म्हणणे नाही आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी/कमतरता दिली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून बस प्रवास भाडे व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
मुद्दा क्र.1 ते 4
6. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी कागदयादीसोबत अ.क्र.1 कडे दाखल केलेल्या पाणी बीलाचे अवलोकन करता सदरचे पाणी बीलावर जलजोडणी धारकाचे नांव यात तक्रारदाराचे नांवे असून ग्राहक क्र.76546 व जोडणी क्र.1073439 असा आहे. वि प यांनी सदरचे पाणी बील नाकारलेला नाही. यावरुन तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते. तक्रारदार व वि प यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेने स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांचे मालकीचे शहर कोल्हापूर महानगरपालीका हद्दीतील ए वॉर्ड, राधेय कॉलनी येथील 1017/1अ/14, या मिळकतीमध्ये वि प क्र.1 यांचेकडून जल पुरवठा घेतलेला असून त्याचा जोडणी क्र.1073439 असा असून ग्राहक क्र.76546 असा आहे. तक्रारदार हे नोकरी निमित्त कराड जि.सातारा येथे असलेने सदर नमुद मिळकतीत फेब्रुवारी,2019 पासून राहणेस नाहीत. त्यामुळे सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा पाणी वापर होत नव्हता व नाही. तक्रारदार यांना नियमित रक्कम रु.600/- पाणी बील येत होते. तथापि, सदरचे पाणी मिटर बंद असलेचे सबबीखाली वि प यांचेकडून ऑगस्ट, सप्टेंबर, 2017 पासून रक्कम रु.600/- ऐवजी रक्कम रु.1,040/- ची बीले देणेत येत होते. याबाबत तक्रारदार यांनी वि प यांचेकडे दि.03/12/2019 रोजी तक्रारअर्ज देऊन बील दुरुस्त करुन मिळणेबाबत विनंती केलेली होती. त्यास वि प यांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यानंतर वि प यांनी तक्रारदारास दि.08/07/2020 रोजीने पाणी बीलाचे रक्कम रु.14,604/- इतके भरमसाठ देयक क्र.10110434 चे पाठविले. तक्रारदाराने दि.14/07/2020 रोजी तथाकथीत व अवास्तव बीलाची दुरुसती होऊन सरासरी दराने बीलाची आकारणी करणेबाबतचा तक्रार अर्ज वि प यांचेकडे दिला होता. सदर अर्जास वि प यांनी कोणताही खुलासा न देता दि.14/09/2020 रोजीने सदर मिळकतीत कुळाकडून पाणी वापर झालेचे खोटे नमुद केलेले आहे. वास्तविक तक्रारदार यांनी सदर मिळकतीत केव्हाही कुळ ठेवलेले नव्हते व नाही. ही वि प यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे.
तक्रारदार यांनी कागदयादीमध्ये दाखल केलेल्या दि.03/12/19 व दि.04/02/2020, 14/07/2020 रोजी वि प यांना दिलेल्या पत्रामध्ये तक्रारदार हे नोकरीसाठी कराड येथे असलेने फेब्रुवारी,2019 ते ऑगस्ट,2019 सदर मिळकतीमध्ये कोणीही राहात नसलेने पाणी आकारणी बील कमी होऊन दुरुस्ती करुन मिळणेबाबत विनंती केली असलेचे दिसून येते. सदर अर्जावर वि प यांना पत्र मिळालेची पोहोच आहे. सदर पत्रांबाबत वि प यांनी कोणतीही कार्यवाही केलेचे दिसून येत नाही.
याउलट वि प यांनी तक्रारदारास दि.14/09/2020 रोजी दिेलेल्या पत्रामध्ये पाणीपुरवठा विभाग प्रचलित नियम व धोरणानुसार स्थीर आकार दराने पाणी बील पाठविण्यात आलेली आहेत व ती बरोबर आहेत असे कथन केले आहे. तसेच जागेवर रिडींग घेतेवेळी सदर प्रॉपर्टीमध्ये पाण्याचा वापर कुळाकडून होत असल्याचे आढळून आले आहे असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या पाणी बीलाचे अवलोकन करता सदरचे बील हे माहे एप्रिल-मे-2020 या दोन महिन्याकरिता असून 8जुलै-2020रोजीचे जलमापक वाचन 21 युनिट दिसून येते. पूर्वीचे ऑक्टो-नोव्हें- 4 डिसें-जाने-7 फेब्रु-मार्च-7 व 8मे-2020चे 0 रिडींग दिसून येते. चालू देयकाची रक्कम रु.190/- व मागील थकबाकी रु.10,193/- दिसून येते. वि प हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले, परंतु वि प यांना संधी देऊनही त्यांनी मुदतीत आपले म्हणणे दाखल केलेले नाही किंवा तक्रारदाराची कथने खोडून काढणेसाठी कोणताही पुरावा अथवा शपथपत्र दाखल केलेले नाही. यावरुन वि प कंपनीने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेचे सिध्द होते. तक्रारदाराने सादर केलेला पुरावा हा त्याची संपूर्ण केस शाबीत करण्याकरिता पुरेसा आहे. हा सर्व पुरावा जसाच्या तसा मान्य करण्यासारखा आहे, कारण वि प यांनी प्रस्तुत प्रकरणात म्हणणे अथवा पुरावा देऊन तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतीही कथने नाकारलेली नाहीत किंवा त्याचा पुरावा देखील नाकारलेला नाही. वि.प. यांनी तक्रारदारास चुकीचे पाणी बील पाठवून तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. वि.प. यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे आपली लेखी कैफियत दाखल केलेली नाही आणि तक्रारदाराचे कोणतेही कथन अमान्य केलेले नाही. त्यामुळे वि.प. यांना तक्रारदाराची संपूर्ण कथने मान्य आहेत असेच गृहित धरावे लागेल. यावरुन तक्रारदार यांनी तक्रार अर्ज देऊनही त्याचे निराकरण न करता वि प यांनी तक्रारदारास पाण्याचे वाढीव रक्कमेचे बील देऊन तक्रारदारास सेवा देणेमध्ये वि.प. असमर्थ ठरले आहेत ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदाराने आपली केस पूर्णतया शाबीत केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असा या आयोगाचा निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
8. सबब तक्रारदार हे कराड जि.सातारा येथे नोकरी निमित्त रहात असलेने व त्यांचे सदर मिळकतीमध्ये कोणीही भाडेकरु रहात नसलेबाबत शपथपत्रात नमुद केलेले आहे. त्यामुळे यातील वि प यांनी तक्रारदारास ग्राहक क्र.76546 पाणी जोडणी क्र.1073439 चे दि.08/07/2020 रोजीचे बील दुरुस्त करुन स्थिर आकार रु.190/- प्रति दोन महिन्याप्रमाणे बील करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या आयोगाचा निष्कर्ष आहे. परंतु तक्रारदार यांनी मानसिक त्रासापोटी मागणी केलेली रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.10,000/- ही अवाजवी व अवास्तव वाटते. परंतु प्रस्तुत प्रकरणाचा एकूण सारासार विचार करता मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करणे न्यायाचित वाटते. म्हणून हे आयोग मुद्दा क्र.3 चे उत्तर होय अंशत: असे देत आहोत.
सबब प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श –
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदारास ग्राहक क्र.76546 पाणी जोडणी क्र.1073439 चे दि.08/07/2020 रोजीचे बील दुरुस्त करुन स्थिर आकार रु.190/- प्रति दोन महिन्याप्रमाणे नवीन सुधारित बील करुन दयावे.
3) वि.प.यांनी तक्रारदाराला मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावी.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 कलम 71 व 72
प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.