न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार क्र.1 हिचा विवाह पै.रमजान बाबालाल नाकाडे यांचेबरोबर झाला होता. त्यांना तक्रारदार क्र.2 व 3 ही दोन मुले आहत. रमजान यांना गुदद्वाराचे मार्गात त्रास होवून लागलेने ते वि.प.क्र.1 यांचेकडे दि. 3/10/2016 रोजी गेले असता वि.प.यांनी तक्रारदारांचे पतीस तपासले व गुदद्वारामध्ये गाठ असून सदरची गाठ कॅन्सरची असलेचे सांगितले. तसेच तक्रारदारांना दुसरे कोणत्याही डॉक्टरांचे मत घेणेची गरज नाही, आम्ही तुमचा पेशंट शंभर टक्के बरा करु, त्यास कॅन्सरपासून दिलासा देऊ, अशी खात्री वि.प.क्र.1 यांनी दिल्याने तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांचेकडे उपचार घेणेचे ठरविले. गुदद्वाराजवळस मुत्रपिंड असलेने त्या ठिकाणी वि.प.क्र.1 यांनी केमोथेरपी व शेक याची ट्रीटमेंट दिली. सदरची ट्रीटमेंट ही अत्यंत गैर व निष्काळजीपणाची होती, ज्यामुळे केवळ तीन दिवसांत मयत रमजान यांच्या दोन्ही किडन्या पूर्ण निकामी झाल्या. या सर्व गोष्टीस वि.प.क्र.1 यांचा निष्काळजीपणा हेच कारण होते. सदरची चूक लक्षात आलेनंतर वि.प.क्र.1 यांनी मयत रमजान यांस वि.प.क्र.2 या किडनी तज्ञ डॉक्टरांचेकडे पाठविले. त्यांनी मयत रमजान यांचेवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वि.प.क्र.2 हे काहीही करु शकले नाहीत. रमजान यांच्या दोन्ही किडन्या वि.प.क्र.1 यांनी दिले केमोथेरपी व रेडिएशन थेरपी यांचेमुळे अशा अवस्थेत पोहोचल्या होत्या की त्यातून त्या सुधारु शकल्या नाहीत. रमजान हे किडनी फेल्युअरमुळे संपूर्ण शरीरात जंतूंचा प्रादुर्भाव होवून मरण पावले. वि.प.क्र.1 यांनी औषधाची मात्रा देणेत जी चूक केली, त्यामुळे रमजान यांच्या किडन्या बाद झाल्या व ते अत्यल्प वयात मरण पावले आहेत. या सर्वांस वि.प.क्र.1 हेच जबाबदार आहेत. मयत रमजान हे आखाती देशात काम करीत होते. त्यातून ते मासिक रु.40,000/- तक्रारदारांना पाठवित होते. रमजान यांचे मृत्यूमुळे तक्रारदार क्र.1 यांना अकाली वैधव्य आले आहे तसेच तक्रारदार क्र.2 व 3 यांना अकाली पितृछायेपासून वंचित रहावे लागले आहे. या सर्वांस वि.प.क्र.1 हेच जबाबदार आहेत. म्हणून तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना नोटीस दिली असता वि.प.क्र.1 यांनी नोटीस उत्तरात आपली जबाबदारी ही वि.प.क्र.2 यांचेवर ढकलणेचा प्रयत्न केला. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.19,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 4 कडे अनुक्रमे मयत रमजान यांचा मृत्यू दाखला, तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांनी दिलेली नोटीस, सदर नोटीसची पोचपावती, सदर नोटीसीस वि.प.क्र.1 यांनी दिलेले उत्तर वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत मयत रमजान यांचे औषधोपचाराची कागदपत्रे व रिपोर्ट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. क्र.1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प.क्र.1 यांच्या हॉस्पीटलमधील डॉक्टर हे रुग्णांना अत्यंत काळजीपूर्वक व उच्च दर्जाची व्यावसायिक रुग्ण सेवा रुग्णांना देतात. वि.प.क्र.1 यांचे डॉक्टरांनी मयत रमजान यांचेवर औषधोपचार करताना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केलेला नाही. वि.प.क्र.1 हे भारतातील कॅन्सर आजारावरील उपचाराकरिता एक सुप्रसिध्द हॉस्पीटल आहे. कॅन्सर रुग्णांना उत्तम औषधोपचार केलेमुळे कोल्हापूर व परिसरातील लोकांच्या मनामध्ये सदर सेंटरने आदराचे व आशादायी स्थान निर्माण केले आहे.
iii) दि. 3/10/2016 रोजी मयत रमजान हा वि.प.क्र.1 हॉस्पीटलमध्ये तक्रार घेवून दाखल झाल्यानंतर त्यांचे दि. 26/9/2016 चे रिपोर्टनुसार Growth in Rectum नमूद होता तसेच Histopathology Report dated 26/9/16 revealed Poorly Differentiated Adenocarcinoma असे नमूद होते. तदनंतर रुग्णाची पत्नी शबानासह सर्व नातेवाईक यांनी डॉ सूरज पवार यांचेशी चर्चा केली. त्या दरम्यान large tumour mass, lymphonodal metastasis ही बाब लक्षात घेवून रुग्णावर ऑपरेशन करण्यापूर्वी रेडिओथेरपी व केमोथेरपी करण्याचे निश्चित झाले.
iv) त्यानंतर रुगणाच्या नातेवाईकांनी डॉ योगेश अनाप यांचेशी चर्चा केली. त्याप्रमाणे डॉ अनाप यांनी रुग्णाला Radiotherapy &Tab Capecitabine (Chemotherapy) घेणेबाबत सल्ला दिला. त्यानंतर रुग्णाची पत्नीची संमती घेण्यात येवून दि. 7/10/2016 रोजी रुग्णावर रेडिओथेरपीचे उपचार सुरु करणेत आले. तदनंतर मयत रमजान यास औषधे देण्यात आली. वि.प.क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये त्यांनी मयत रमजान यांचेवर दि. 7/10/16 ते 15/10/16 या कालावधीत केलेल्या औषधोचाराचा सविस्तर तपशील नमूद केला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वैद्यकीय शास्त्राने ठरवून दिलेली मापे याप्रमाणे वि.प.क्र.1 यांचे तज्ञ डॉक्टरांनी रुग्णास योग्य तो औषधोपचार केलेला आहे. तक्रारदार हे वि.प.क्र.1 हॉस्पीटलचा निष्काळजीपणा सिध्द करण्यास पूर्णपणे असफल झालेले आहेत. सबब, तक्रारदार यांना वि.प.क्र.1 यांचेकडून कसलीही नुकसान भरपाई मागणेचा अधिकार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प.क्र.2 यांनी याकामी लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार व वि.प.क्र.2 यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध निर्माण होत नाहीत.
iii) मयत रमजान याचेवर उपचार करताना वि.प.क्र.2 यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. मयत रमजान हा वि.प.क्र.2 यांचे हॉस्पीटलमध्ये दि. 17/10/2016 रोजी दाखल झाला. त्यावेळी वि.प.क्र.2 यांनी मयत रमजान यांची सर्व तपासणी विस्तारपणे पाहिली. मयत रमजान यांचे गुदद्वारामार्गे साधारणतः तीन महिन्यांपासून रक्तस्त्राव होत होता. वि.प. क्र.2 यांचे हॉस्पीटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मयत रमजान यास उत्सर्जित किरण व केमोथेरपीचे तीन सायकल मिळाले होते. मयत रमजान हे वि.प.क्र.2 यांचे हॉस्पीटलमध्ये अॅडमिट झाले, त्यावेळी त्यांचा रक्तदाब खूप कमी होता, लघवीही कमी झालेली होती व पांढरे पेशींचे प्रमाण कमी झाले होते. त्यांना मूत्रपिंड विकार होण्याचे कारण सेप्टीसेमिक शॉक (संपूर्ण शरीरात जंतूचा प्रादुर्भाव) हे होते. मयत रमजान यांना सलाईन व नॉनअॅन्ड्रीनॅलीन (रक्तदाब वाढवणेसाठी दिले जाणारे औषध) सुरु केले. रमजान यांना झालेला जंतू संसर्ग आटोक्यात आण्ण्यासाठी प्रतिजैविके सुरु केली. पुढील 24 तासात रमजान यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. रुग्ण कोमात गेला. त्याचेवर कृत्रिम श्वासोश्वास सुरु करण्यात आला.
iv) दि. 18/10/2016 रोजी संध्याकाळी 7.00 वा. रमजान यांचे ह्दयकार्य थांबले. ह्दयक्रिया पुन्हा सुरु करण्याचा वि.प.क्र.2 यांचे डॉक्टरांनी 30 मिनिटे प्रयत्न केला. पण त्यामध्ये वि.प.क्र.2 यांना व त्यांचे सहकारी डॉक्टरांना यश आले नाही.
v) मयत रमजान यांच्या मृत्यूची कारणे, सेप्टीसेमिक शॉकसह मल्टीऑर्गन फेल्युअर, गुदद्वारामध्ये पसरलेला कर्करोग, केमोथेरपीशी संलग्न पांढरे पेशींचे व प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे ही आहेत.
vi) मयत रमजान हा वि.प.क्र.2 हॉस्पीटलमध्ये फक्त एकच दिवस होता. त्या काळात वि.प. यांनी त्याचेवर चांगले औषधोपचार करुन त्याला बरे करणेसाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्याचे मृत्यूची जबाबदार वि.प.क्र.2 वर नाही. सबब, तक्रारदार यांना वि.प.क्र.2 यांचेकडून कसलीही नुकसान भरपाई मागणेचा अधिकार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.2 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.2 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी मयत रमजान याचेवर उपचार करताना निष्काळजीपणा केला हे तक्रारदाराने शाबीत केले आहे काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण मयत रमजान याचेवर उपचार केलेची बाब वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये स्पष्टपणे मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांनी तक्रारअर्जात केलेले आरोप/कथने सिध्द करणेसाठी किंवा वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारावर केले उपचारात निष्काळजीपणा केलेबाबतचा कोणताही ठोस व सबळ पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. तसेच याकामी वि.प.क्र.1 व 2 चे डॉक्टरांनी तक्रारदार क्र.1 चे पतीवर केले उपचारात हलगर्जीपणा/निष्काळजीपणा केलेबाबतचे तक्रारदाराने केलेले आरोप सिध्द करणेसाठी तक्रारदाराने कोणताही वैद्यकीय तज्ञांचा अहवाल याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केलेली कथने सबळ पुराव्यांसह सिध्द केलेली नाहीत असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर होणेस पात्र आहे.
9. वि.प.क्र.1 यांनी याकामी वरिष्ठ न्यायालयांचे खालील निवाडे दाखल केलेले आहेत.
- Civil Appeal No. 3971/2011 before Hon’ble Supreme Court decided on 1/10/2018
S.K. JhunjhunwalaVs.Dhanwanti Kumar & Anr.
- Consumer Case No. 128/98 before Hon’ble National Commission decided on 3/1/2011
Ashok AmondikarVs.Dr. Sharad & Others
- Consumer Case No. 109/11 before Hon’ble National Commission decided on 15/2/2017
Mandar Jadhav Vs.Dr. Riya & Others
- Rev. Petition No. 603/201398 before Hon’ble National Commission decided on 9/1/2019
Dr. Ramesh Vs. Manchikanti & Others
सदरचे निवाडयांमध्ये, डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारामध्ये केलेला निष्काळजीपणा शाबीत करण्याची जबाबदारी ही तक्रारदारांची आहे असे निरिक्षण मा. न्यायालयांनी नोंदविलेले आहे. सबब, सदर निवाडयांचा विचार करता, प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 2 यांनी मयत रमजान याचेवर वैद्यकीय उपचार करताना केलेला कथित निष्काळजीपणा शाबीत केलेला नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.