नि का ल प त्र :- (दि. 20-01-2014) (द्वारा- श्री. संजय पी.बोरवाल, अध्यक्ष)
1. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष कंपनीत ठेव स्वरुपात गुंतविलेल्या रक्कमांची मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हे जेष्ठ नागरीक असून त्यांनी त्यांच्या वृध्दापकाळासाठी उपयोगी पडावे म्हणून वि.प. कंपनीमध्ये त्यांनी खाली नमूद रक्कम ठेव स्वरुपात ठेवलेल्या आहेत. वि.प. नं. 1 ही गुंतवणूक क्षेत्रातील कंपनी असून वि.प. 2 ते 12 हे कंपनीचे संचालक आहेत. व वि.प. नं. 13 हे वि.प. कंपनीचे अवसायक आहेत. तक्रारदारांनी वि.प. चे कोल्हापूर येथील कार्यालयात खाली नमूद केलेप्रमाणे ठेवी ठेवलेल्या आहेत व तक्रारदारांनी सदर ठेवीच्या मुदतीनंतर मागणी केली असता ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. व तक्रारदारांनी वि.प. कंपनी यांचेबरोबर पत्रव्यवहार व नोटीस पाठवून आपल्या ठेवीची रक्कमेची मागणी केली आहे. व दि. 21-01-2002 रोजी तक्रारदारांना एकूण ठेवीच्या रक्कमेच्या 20 % रक्कम परत दिली व उर्वरीत रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले परंतु ठेवीची उर्वरीत रक्कम परत दिली नाही. तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे खाली नमूद केलेप्रमाणे ठेवीची रक्कम गुंतविली व दि. 21-01-2002 रोजी देय होती. तक्रारदारांनी ठेवलेल्या ठेवींचा तपशिल खालीलप्रमाणे-
| अ. नं. | ठेव पावती नं. | रक्कम | ठेव दिनांक |
| 1 | F2L06937 | 10,000 | 24-11-2000 |
| 2 | F2L06787 | 15,000 | 26-09-2000 |
| 3 | F2L06469 | 25,000 | 31-07-2000 |
| 4 | F2L06107 | 25,000 | 26-04-2000 |
| 5 | F2L05785 | 25,000 | 22-02-2000 |
| 6 | F2L05786 | 25,000 | 22-02-2000 |
| 7 | F2L05646 | 25,000 | 22-01-2000 |
| 8 | F2L05578 | 25,000 | 01-01-2000 |
| 9 | F2L05643 | 25,000 | 21-01-2000 |
| एकूण रक्कम .......... | 2,00,000 | |
सबब, वर नमूद ठेकवीची रक्कम व्याजासह व मानसिक त्रासापोटी रु. 90,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.
3. वि.प. नं. 1 यांनी म्हणणे देऊन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही. वि.प. कंपनी पुढे कथन करते की, दि. 21-09-2005 रोजी कंपनीची मिटींग मध्ये श्रीमती सी.एच. रुपम यांनी कंपनीविरुध्दच्या दाव्यामध्ये कंपनी तर्फे हजर होणे कामी प्रस्ताव मंजूर करणेत आला त्याची प्रत जोडली आहे. तक्रारदारांकडून एकूण 9 ठेव पावत्या स्विकारल्या आहेत व त्यापैकी एकूण ठेवीच्या रक्कमेच्या 20 % रक्कम परत दिलेली आहे. सदरची तक्रार मुदतीत दाखल केलेली नसलेमुळे तक्रार चालणेस पात्र नाही नामंजूर करणेत यावी.
4. तक्रारदारांनी त्यांचे तक्रार अर्जासोबत वि.प. कंपनीत गुंतविलेल्या (एकूण 9 ) ठेवींच्या Acknowledgement Slip, तक्रारदार यांनी दि. 21-06-2000, 20-12-2001 व 31-09-2002 रोजी वि.प. कंपनीस पाठविलेले पत्र व वि.प. कंपनीचे माहितीपत्रक इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प. नं. 2 यांनी म्हणणे दाखल केले आहे. वि.प. नं. 4,5,8,10 व 11 यांनी पुरसीस दाखल करुन वि.प. 2 चे म्हणणे स्विकारले आहे. सदरची तक्रार ही मुदतीत नसून चालणेस पात्र नाही. सदरची तक्रार कलम 24 A प्रमाणे मुदतीत दाखल केलेली नाही. प्रस्तुत प्रकरणातील ठेवींच्या पावत्या हया 2000 साली देय झालेल्या आहेत. तक्रारदारांना 2002 नंतर एकूण आठ वर्षानंतर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या कारणामुळे सदरचा तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावा. तक्रारदाराची तक्रार ही भौगोलिक अधिकारक्षेत्राच्या कक्षेत बसत नाही. वि.प. 2,4,5,8, 10 व 11 हे कोल्हापूर जिल्हयाचे रहिवाशी नाहीत. किंवा त्यांचे कोणतेही कार्यालय या क्षेत्रात नाही त्यामुळे सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. वि.प. 2,4,5,8, 10 व 11 हे या कंपनीचे संचालक नाहीत त्यांनी 1999 फॉर्म 32 रजिस्टार ऑफ कंपनीचे दि. 20-08-1999 रोजी राजिनामे दिलले आहेत. सदरच्या तक्रार अर्जास नॉन जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीची बाधा येते. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. वि.प. यांना माहिती नाही की राजारामपुरी शाखा कोल्हापूर यांनी ठेव पावत्या स्विकारलेल्या आहेत. तक्रारदारांनी वि.प. कंपनीविरुध्दचे पुर्वीचे प्रलंबित दाव्याची या मे. मंचास माहिती दिलेली नाही. वि.प. पुढे म्हणण्यात कथन करतात की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी कंपनी विरुध्द कंपनी पिटीशन क्र. 2/2000 मा. कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेले आहे. तसेच काही इतर ठेवीदारांनी देखील कर्नाटक हायकोर्टात पिटीशन नं. 214, 257 ते 262/1999 वायंडींग ऑफ दि कंपनी पिटीशन्स दाखल केलेले आहेत. तसेच संचालक यांचे कोणत्याही प्रकारे कंपनीच्या व्यवहारशी संबंध राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द आदेश करता येणार नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.
6. वि.प. वि.प. 2,4,5,8, 10 व 11 यांनी म्हणणेसोबत कंपनी कायदा 1956 फॉर्म 32 दाखल केलेला आहे. कंपनी पिटीशन क्र. 2/2000 मा. कर्नाटक हायकोर्टात दाखल केलेले आहे. पिटीशन नं. 214, 257 ते 262/1999 या कामी दाखल केलेले आहेत.
7. वि.प. 6,7,9 व 12 तक्रारीस म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प. हे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. त्यांचा कंपनीच्या प्रशासकीय किंवा व्यवस्थापन यांचेशी दैनंदिन व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध येत नाही. तसेच वि.प. नं. 6,7,9,12 यांनी प्रस्तुत कामी राजिनामे पत्र दिलेले असून, वार्षिक अहवाल 1998-1999 मध्ये वि.प. चे राजीनामे म्हणणे सोबत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वि.प. यांचा राजीनामा मान्य केलेने वि.प. यांचा कंपनीशी कोणताही संबंध राहिलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी वि.प. 1 यांचेकडे सन 2000 साली गुंतवणुक केलेली असलेने त्यावर्षी वि.प. नं. 6,7,9,12 वि.प. नं. 1 कंपनीचे संचालक नसलेने वि.प. नं. 6,7,9,12 हे वैयक्तीकरित्या जबाबदार नाहीत असे वि.प. 6,7,9,12 चे म्हणणे आहे. वि.प.नं. 6,7,9,12 यांनी वि.प. चे राजीनामे म्हणणे सोबत दाखल केलेली आहेत. व किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, चा सन 1998-1999 चा वार्षिक अहवालाची प्रत दाखल केली आहे. वि.प. यांनी कोणतीही तक्रारदारांना ठेवीची रक्कम देण्याची वैयक्तीक जबाबदारी येत नाही. त्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. प्रस्तुत प्रकरणी वि.प. नं. 3 यांचे म्हणणे दाखल आहे.
8. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे व त्यांचे दाखल केले कागदपत्रे तसेच तक्रारदारांचा व वि.प. चा युक्तीवाद याचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. विरुध्द पक्ष कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत
त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र होय
आहे काय ?
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- वि वे च न -
मुद्दा क्र. 1 व 2 - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, मध्ये ठेवीच्या स्वरुपात रक्कमा गुंतविलेल्या आहेत. तसेच तक्रारदार यांनी ठेव पावतीची Acknowledgement Slip छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी हजर होऊन तक्रारदार यांच्या ठेवीच्या रक्कमा नाकारलेल्या नाहीत. तसेच प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी वि.पक्ष कंपनीत ठेव पावतीची Acknowledgement Slip रक्कमा गुंतविल्या होत्या ही बाब सिध्द होते. वि.प. क्र. 2,4,5,8,10 व 11 यांचे वकिलांचा युक्तीवाद व त्यांनी दाखल केलेले फॉर्म-32 चे रजिस्टर ऑफ कंपनीचे दि. 20-08-1999 रोजी राजिनामे दिले आहेत याची प्रत या कामी दाखल केलेली आहे त्याचे अवलोकन केले असताना असे दिसून येते की, वि.प. 2,4,5,8,10 व 11 यांनी राजीनामे सन 1999 मध्ये दिले आहेत तसेच वि.प. 6,7,9 व 12 हे नॉन एझिक्युटीव्ह डायरेक्टर आहेत असे दिसून येते. वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असताना हे मंच या निष्कर्षाप्रत येते की वि.प. नं. 1 किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि यांनी ठरल्याप्रमाणे रक्कम अदा करावी. तसेच वि.प. नं. 6,7,9 व 12 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता वि.प. 1 कडे त्यांची नेमणूक नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून Annual Report 1998-1999 मधील Exhibit “I” मध्ये Board of Director मध्ये upto 1999 असे नमूद आहे. वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांनी सन 2000 मध्ये वि.प. नं. 1 यांचेकडे रक्कम गुंतविली असलेने सदरची रक्कम वि.प. नं.1 यांनी योग्य मुदतीत अदा न केलेने तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव पावतीची खातेमधील होणारी व्याजासह रक्कम किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, व संचालक यांच्याकडून परत मिळावी अशी विनंती केली आहे, परंतु तक्रारदारांची ठेवीची संपुर्ण रक्कम व्याजासह देण्यास विरुध्द पक्ष कंपनी किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे, त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष नं. 1 किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, कंपनी यांच्याकडून व्याजासह रक्कमा परत मिळण्यास पात्र आहेत. तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब, तक्रारदार विरुध्द पक्ष क्र. 1 किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदारांच्या तक्रारीतील पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदारांना वि. पक्ष कंपनी यांनी दि. 21-01-2002 रोजी तक्रारदारांना एकूण ठेवीच्या रक्कमेच्या 20 % रक्कम अदा केली आहे. वि.पक्ष किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि तक्रारदारांना त्यांच्या उर्वरीत ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षात हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 - वरील विवेचनाचा विचार करता खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. वि. पक्ष क्र. 1 किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, यांनी तक्रारदार यांना न्यायनिर्णयातील कलम 2 मध्ये नमूद असलेल्या ठेवीच्या रक्कमा तक्रारदार व वि.प. कंपनी यांचेमध्ये ठरलेप्रमाणे व्याजासह अदा कराव्यात.
3. वि.पक्ष क्र. 1 किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट अॅन्ड फायनान्स लि, तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4. वर नमूद न्यायनिर्णयातील कलम 2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अदा केली असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
5. उभय पक्षकारांना निकालपत्राच्या प्रतिलिपी प्रती नि:शुल्क देणेत याव्यात.