| | तक्रार दाखल तारीख – 06/10/16 तक्रार निकाली तारीख – 16/04/18 | | न्या य नि र्ण य |
|
| व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा |
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार कोल्हापूर येथील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था असून या संस्थेने सदर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या “बिल्डींग बांधकाम व देखरेख” प्रॅक्टीकल हॅण्डबुक या पुस्तकाचे आर्टवर्कचे काम वि.प. यांना दिले होते. सदर कामामध्ये स्पेलींग मिस्टेक, फोटो एडीट न करणे, प्रीटींगची क्वालीटी खराब, काम न तपासता पाठवणे, अशा प्रकारे वि.प. ने सेवेमध्ये त्रुटी दिली असलेने वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.45,800/- परत मिळावी म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वि.प. यांचेकडून रक्कम रु.45,800/- परत मिळावेत, प्रस्तुत रकमेवर द.सा.द.शे. 9.50 टक्के व्याज मिळावे व अर्जाचा खर्च रु.1,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती याकामी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत अ.क्र.1 ते 9 कडे अनुक्रमे तक्रारदाराने सतिश रघुनाथ कोगेकर यांना सदरचे काम पाहणेसाठी दिलेले अधिकारपत्र (मुखत्यारपत्र), प्रमोद बेरी यांना तक्रारदाराने दिलेले पत्र, वि.प. ला दि.10/12/2015 रोजी दिले ऑर्डरची प्रत, वि.प. ने तक्रारदाराला दिले बिलाची प्रत, वि.प. ने ईमेलद्वारे मागणी केले बिलाची ईमेलची प्रत, वि.प. ने पुस्तकामध्ये केले चुकांच्या झेरॉक्स प्रती, तक्रारदाराने वि.प. यांनी रक्कम रु.45,800/- तक्रारदाराला परत करावेत यासाठी तक्रारदार संस्थेने केले ठरावाची प्रत, तक्रारदाराने वि.प. यांना केले पत्रव्यववहाराची प्रत, सतिश कोगेकर यांचे आधार कार्ड प्रत, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस, वगैरे कागदपत्रे याकामी दाखल केली आहेत.
4. वि.प. यांनी याकामी तक्रारअर्जास कारण या मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले नसलेने तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र असलेने तो फेटाळण्यात यावा असा दिलेला अर्ज, म्हणणे/कैफियत, पुराव्याचे शपथपत्र, कागदयादीसोबत अ.क्र. 1 ते 11 कडे अनुक्रमे बेरी आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनियरिंग प्रा.लि. यांनी सुमेध शहा यांना पाठवलेला ईमेल, सुमेध शहा यांनी दिलेला रिप्लाय, बेरी आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनियरिंग यांनी सुमेध शहा यांना पाठवलेली ईमेल ऑर्डर, डिलीव्हरी चलने, सुनिल प्रिंटेक्स यांनी डेक्कन इन्स्टिटयूट (तक्रारदार) यांना सांगली ते कोल्हापूर पर्यंत केले ट्रान्स्पोर्टच्या पावत्या, सुनिल प्रिंटेक्स यांनी बेरी आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनियरिंग यांना पाठवलेले पत्र, पोस्टाची पावती व पोहोच पावती, सुनिल प्रिंटेक्स यांनी प्रमोद बेरी यांना पाठवलेले दुसरे पत्र, सदर पत्राची पोस्टाची पावती व तेच पत्र कुरियरने पाठविलेली पावती, तक्रारदाराने वि.प. ला पाठवलेले रिजेक्शन पत्र, वि.प. चे 65बी नुसारचे सर्टिफिकेट, पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदारांचे अॅफिडेव्हीट, पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे वि.प. ने दाखल केली आहेत.
वि.प.ने त्यांचे म्हणणे/कैफियतीत तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
ii) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. कलम 11 नुसार तक्रारदाराला वि.प. विरुध्द या मंचात कोणतीही दाद मागणेचा अधिकार व हक्क नाही. सबब, तक्रारअर्ज चालण्यास पात्र नाही.
iii) तक्रारदाराचा तक्रारअर्ज हा विशिष्ट फॉरमॅटमध्ये नसेलेने तो चालणेस पात्र नाही.
iv) यातील वि.प. हे सांगली येथील रहिवाशी आहेत तसेच त्यांचा व्यवसाय सांगली येथेच आहे. तक्रारदाराने वि.प. यांचेकडे सांगली येथेच सदर पुस्तकांचे काम दिले होते. ते काम सुमेध शहा यांनी सांगली येथेच पूर्ण केले असून डिलीव्हरी सुध्दा सांगलीतून दिली आहे. तसेच तक्रारदाराने वि.प. ला दिलेली रक्कम ही सांगली येथेच दिली आहे.
वि.प. यांचेकडे तक्रारदाराने सुमेश शहा यांना छपाईसाठी दिले पुस्तकांचे पेजिनेशनचे काम म्हणजे तक्रारदाराने दिलेला मजकूर व फोटो पुस्तकात तक्रारदाराचे सांगण्याप्रमाणे बसवणे एवढेच काम दिले होते. या पुस्तकाच्या प्रिटींग, छपाई तसेच या पुस्तकात छपाईवेळी होणा-या चुका व फोटो एडिटच्या कामाशी वि.प. यांचा कोणताही संबंध नव्हता. ही सर्व वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदाराने केले तक्रारीतील घटना या मंचाचे कार्यक्षेत्रात घडले नसलेने या मंचात सदर तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही, तो रद्द करण्यात यावा.
v) तक्रारदाराने मंचापासून ब-याच गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार स्वच्छ हाताने या मंचात आले नाहीत.
vi) तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते नव्हते व नाही. वि.प. ने कोणतीही सेवा दिली नाही याचा स्पष्ट तपशील तक्रारअर्जात नमूद केलेला नाही. सबब, सदर तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही.
vii) सतिश कोगेकर यांना प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करणेचे व चालवणेचे अधिकार नसताना केलेला तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे.
viii) तक्रारदाराने प्रस्तुत वि.प. यांचेकडे पुस्तकातील स्पेलींग मिस्टेक, फोटो एडीट करण्याचे काम दिले नव्हते. त्यामुळे ते काम वि.प. ने स्वतः न करता दुस-याकडून करुन घेणेचा, ते न तपासता पाठवण्याचा तसेच पुस्तक प्रिटींग वेळी हजर राहून वि.प. ने क्वालिटी चेक करणेचा व त्यामुळे क्वालिटी खराब झालेचा तक्रारदाराने नमूद केलेला मजकूर पूर्णपणे खोटा आहे. कारण तक्रारदाराने या वि.प. कडे कोणतेही पुस्तक छपाईचे काम दिलेले नव्हते.
तक्रारदाराने सुमेध शहा याचेकडे दिले पुस्तक छपाईचे काम पूर्ण करुन पहिली पुस्तक प्रत छापून अप्रूव्हलसाठी तक्रारदार यांचेकडे पाठविली होती. तक्रारदाराकडून पुस्तकाचे अप्रूवल आलेनंतरच सुमेध शहा यांनी पुस्तक छपाईचे काम पूर्ण केले आहे व वि.प. यांना दिलेले काम वि.प. ने उत्तम रितीने छपाई होणेपूर्वीच पूर्ण केले आहे.
ix) तक्रारअर्जात तक्रारदाराने केले तक्रारीशी वि.प. चा कोणताही संबंध नाही. त्या छपाईतील तथाकथित चूका आहेत. त्यामुळे त्यासाठी या वि.प. ला संस्थेने अदा केलेली रक्कम ग्राहक संरक्षण कायद्याच्या कोणत्याही तरतुदीखाली मागता येणार नाहीत.
x) या वि.प. यांचेविरुध्द तक्रारदाराला कोणतीही तक्रार नव्हती म्हणूनच तक्रारदाराने वि.प. यांचेशी संपर्क साधून चुका दुरुस्त करणेचा प्रयत्न केला होता, हे दाखवणेसाठी तक्रारदाराने कोणतेही पत्र किंवा नोटीस या वि.प. ला दिलेबाबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
xi) वि.प. यांचेकडे सोपवलेले काम वि.प. ने व्यवस्थित पार पाडलेनंतरच सुमेध शहा यांनी छपाईचे (प्रिटींग) काम केले आहे. त्याच्याशी वि.प. चा कोणताही संबंध नाही. प्रमोद बेरी व सुमेध शहा यांचे दरम्यान झालेल्या वादातून प्रमोद बेरी हे उरलेली रक्कम देणार नाही असे असलेनेच सुमेध शहा यांनी रक्कम अदा केलेशिवाय पुस्तकांची डिलीव्हरी दिली नाही कारण पुस्तके छपाई होऊनही त्यांची डिलीव्हरी घेण्यास श्री बेदी यांनी नवीनच अटी शर्ती घालून खोटया सबबी शोधून टाळाटाळ केली. त्यामुळे यातील वि.प. हे प्रस्तुत तक्रारीत नमूद केले तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
सबब, वि.प. यांचेविरुध्द सदर तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही. त्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी असे आक्षेप वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय ? | नाही. |
3 | वि.प. यांचेविरुध्द तक्रारअर्ज चालणेस पात्र आहे काय ? | नाही. |
4 | प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन-जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण यातील तक्रारदाराने त्यांचे संस्थेच्या “बिल्डींग बांधकाम व देखरेख” प्रॅक्टीकल हॅण्डबुक या पुस्तकाचे आर्ट वर्कचे काम वि.प. यांना दिले होते. तसेच पुस्तक छपाईचे काम सुनिल प्रिंटेक्स द्वारा सुमेध शहा यांना दिले होते हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. सबब,
तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने दाखल केले मुखत्यारपत्राचे अवलोकन करता तक्रारदार डेक्कन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी सुनिल प्रिंटेक्स व वि.प. यांचेविरुध्द कोर्ट काम चालवणेचे अधिकार श्री प्रमोद बेरी यांना दिलेले आहेत. सदर मुखत्यारपत्रात तक्रारदार सतिश रघुनाथ कोगेकर यांना अधिकार दिलेले स्पष्ट होते. परंतु याकामी तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले तक्रारींचा ऊहापोह करता, तक्रारदाराने पुस्तक छपाईचे काम सुनिल प्रिंटेक्स द्वारा सुमेध शहा यांचेकडे दिले होते तर तक्रारदाराने दिलेले फोटो, पुस्तकात बसवून देणेचे काम म्हणजेच पुस्तकाचे पेजीनेशनचे काम वि.प. यांचेकडे दिले होते. तसेच तक्रारदार संस्थेने छपाईचे सुमेध शहा यांचेकडे दिले कामात स्पेलींग मिस्टेक, फोटो एडीट करण्याचे काम वि.प. यांना दिलेले नव्हते. तसेच तक्रारअर्जात केले तक्रारींचा यातील वि.प. किरण अनिल यादव, नाविन्य क्रिएशन, सांगली यांचा कोणताही संबंध दिसून येत नाही. याकामी तक्रारदाराने पुस्तक छपाईचे काम सुनिल प्रिंटेक्स द्वारा सुमेध शहा यांचेकडे दिले होते. सुमेध शहा यांनी तसे शपथपत्र याकामी दाखल केले आहे. परंतु तक्रारदाराने सुमेध शहा किंवा सुनिल प्रिंटेक्स यांना याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे अत्यावश्यक व कायदेशीर होते. परंतु तक्रारदाराने नमूद सुनिल प्रिंटेक्स द्वारा सुमेध शहा यांना याकामी वि.प. म्हणून सामील केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. तसेच तक्रारअर्जातील तक्रारीचे अवलोकन करता नमूद कामे ही वि.प. कडे दिलेली नव्हती तर फक्त पेजीनेशनचे काम वि.प. कडे होते. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारअर्जात केले तक्रारींचा या वि.प.शी कोणताही संबंध येत नाही. ही बाब सुमेध शहा यांनी दाखल केले अॅफिडेव्हीट वरुन स्पष्ट होते.
तसेच तक्रारदाराने प्रस्तुत पुस्तकाची छपाई पूर्ण झालेनंतर सुमेध शहा यांनी सदर पुस्तकाची प्रत छापून Approval साठी तक्रारदाराकडे पाठविली होती. त्यावेळी तक्रारदार संस्थेने पुस्तकाच्या छपाईबाबत अगर इतर कोणतीही तक्रार उपस्थित केली नव्हती. तक्रारदाराचे सूचनेप्रमाणेच सुमेध शहा यांनी काम पूर्ण केलेनेच तक्रारदार संस्थेने पुस्तकांची डिलीव्हरी कोणतीही तक्रार न करता बिनशर्त सुमेध शहा कडून घेतली आहे व त्या कामाचे सुमेध शहा/सुनिल प्रिंटेक्स व वि.प. यांचे पेमेंट तक्रारदाराने चेकने व डीडीने विनातक्रार अदा केले आहे. तसेच वि.प. हे सुनिल प्रिंटेक्स द्वारा सुमेध शहा यांचे भागीदार असलेची तक्रारदाराची केस नाही.
तसेच प्रस्तुत कामी तक्रारदार संस्थेने प्रमोद बेरी यांना सदर कोर्ट कामाबाबत अधिकार दिले होते. परंतु प्रमोद बेरी यांना संस्थेने दिलेले अधिकार स्वतः संस्थेच्या परवानगीशिवाय श्री सतिश रघुनाथ कोगेकर यांना ट्रान्स्फर करता येतील का ? प्रमोद बेरी यांनी सतिश कोगेकर यांना संस्थेच्या कोणत्या मान्यतेने अथवा परवानगीने/ठरावाने अधिकार बहाल केले याबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर तक्रारअर्ज दाखल करणेचे व चालवणेचे अधिकार नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
तसेच वर नमूद केले प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केले कथनांचे अवलोकन केले असता अर्जात केलेल्या तक्रारी या वि.प. ने केलेल्या कामासंदर्भात नाहीत, ही बाब वि.प. कडे सोपविलेल्या कामाचे स्वरुप पाहता स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज वि.प. यांचेविरुध्द चालणेस पात्र नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे सदर तक्रारअर्जास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. सबब, प्रस्तुत तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर होणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.