श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
:- निकालपत्र :-
दिनांक 13 मे 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणा-यांच्या “ विनायक नगरी ”त सदनिका घेण्याचे ठरविले. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 1/8/1996 रोजी करार होऊन सदनिका क्र.8, 605 चौ.फुट, विंग 1, बिल्डींग नं.ए, रक्कम रुपये 3,63,000/- देऊन विकत घेण्याचे ठरविले. सदरहू सदनिकेच्या ताब्यासंदर्भात उभय पक्षकारांत डीड ऑफ कर्न्फेमेशन दिनांक 19/5/2005 रोजी झाले. नंतर उभय पक्षकारात दिनांक 14/1/2009 रोजी डीड ऑफ कॅन्सलेशन झाले व दिनांक 15/1/2009 रोजी उभय पक्षकारात नोंदणीकृत करारनामा होऊन तक्रारदारांनी जाबदेणा-यांच्या “ विनायक नगरी ”त सदनिका क्र.35, 5वा मजला, बिल्डींग नं 2, विंग नं ए, 650 चौ.फुट. विकत घेण्याचे ठरविले. करारनाम्यात जाबदेणा-यांनी सदनिकेचा ताबा करारापासून तीन महिन्यांच्या आत दिनांक 31/3/2009 पर्यन्त देण्याचे कबूल केले. खरेदीपोटी तक्रारदारांनी रक्कम रुपये 2,70,000/-जाबदेणार यांना दिले. जाबदेणार यांनी तक्रारदारास पावती दिली. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी बिल्डींग क्र.1, विंग ए मधील सदनिका क्र.4, 5 व 6 चे बांधकाम पुर्ण केले व नंतर बांधकाम अपुर्ण ठेवले. तक्रारदारानी बांधकाम पुर्ण करणेविषयी, कराराप्रमाणे सोयी-सुविधा देण्याविषयी जाबदेणार यांना वारंवार विनंती केली. जाबदेणार यांनी बांधकाम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले, सोयी सुविधा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर एके दिवशी जाबदेणार विनायक नगरी, सर्व्हे नं. 450ए, 450बी, 344 व 181 व टाऊन प्लॅनिंग स्कीम फायनल प्लॉट नं 102 व 103 पार्ट संगमवाडी, पुणे येथील डेव्हलपमेंट राईट्स विकणार असल्याचे तक्रारदारास कळाले. यासंदर्भातील पब्लिक नोटीस सकाळ पेपर्स मध्ये दिनांक 10/8/2007 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. त्यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला. त्यानंतर जाबदेणार क्र. 2 यांनी जागेचा काही भाग व नंतर उर्वरित भूखंड सुध्दा श्री. बेळवलकर हौसिंग स्कीम चे प्रोप्रायटर श्री.बेळवलकर यांना विकल्याचे तक्रारदारास कळाले. जाबदेणार यांनी कराराप्रमाणे सदनिकेचा मोबदला स्विकारुनही कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा दिला नाही, सोयी-सुविधा दिल्या नाहीत, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून करारानुसार पुर्ण सोयी-सुविधांयुक्त बांधकाम करुन सदनिका क्र.35, बिल्डींग 2, विंग ए चा ताबा मागतात. तसेच नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,00,000/- व तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांचेविरुध्द मंचानी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी मंचानी केली. तक्रार दाखल करतांनाच विलंबाचा मुद्या मंचानी उपस्थित् केला होता. परंतू जाबदेणार यांनी कराराप्रमाणे सदनिकेचा मोबदला स्विकारुनही बांधकाम पुर्ण केले नाही, सर्व सोयी-सुविधांयुक्त सदनिकेचा ताबा तक्रारदारास दिलेला नसल्यामुळे घटना घडण्याचे कारण सतत चालू राहते असे मंचाचे मत आहे. मंचानी मा. सर्वोच्च न्यायालयानी दिलेला निवाडा [2000] I Supreme Court Cases 586 लता कन्स्ट्रक्शन व इतर वि. डॉ. रमेशचंद्र रमणिकलाल शहा व इतर, चे अवलोकन केले. या निवाडयानुसार सदनिकेचा ताबा दिलेला नसल्यास घटना घडण्याचे कारण सतत चालू राहिल असे नमूद केले आहे. म्हणून प्रस्तूतची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे.
4. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी मंचानी केली. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात सदनिका क्र.35, 650 चौ.फुट, विंग ए, बिल्डींग 2 खरेदीसंदर्भात दिनांक 15/1/2009 रोजी करारनामा झाला. त्यानुसार, सदनिकेच्या खरेदीपोटी तक्रारदारानी जाबदेणार यांना रक्कम रुपये 2,70,000/- अदा केल्याचे करारनाम्याच्या क्लॉज क्र.2 मध्ये दिसून येते. करारातील पान क्र.11, कलम 10 चे अवलोकन केले असता जाबदेणार यांनी सदनिकेचा ताबा कराराच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत 31 मार्च 2009 पर्यन्त देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात जाबदेणार यांनी सदनिकेची अंशत: रक्कम स्विकारुनही, बांधकाम पुर्ण केले नाही व करारात नमूद केलेल्या सोयी-सुविधांयुक्त सदनिकेचा ताबा तक्रारदारास दिला नाही, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. दिनांक 15/1/2009 च्या कराराचे अवलोकन केले असता करारातील कलम 2 नुसार सदनिकेची किंमत तक्रारदारांनी स्लॅबवाईज दयावयाची होती असे दिसून येते. परंतू जाबदेणार यांनी स्लॅबवाईज बांधकाम केले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी पुढील हप्ते जाबदेणार यांना अदा केले नाहीत. जाबदेणार यांनी स्लॅबवाईज बांधकाम केले नाही, म्हणून तक्रारदारांनी त्यानुसार हप्ते दिले नाहीत, हे एकमेकांवर अवलंबून असल्यासारखे आहे. यात उभय पक्षकारांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. म्हणून प्रस्तूत प्रकरणात मंच तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम न देता तक्रारदारांनी जाबदेणार यांना उर्वरित रक्कम रुपये 6,44,450/- [रुपये 9,14,450/- वजा रुपये 2,70,000/- = रुपये 6,44,450/-] देऊन सदनिका क्र.35, 5 वा मजला, 650 चौ.फुट, विंग ए, बिल्डींग नं.2, चा करारात नमूद सर्व सोयी-सुविधांयुक्त ताबा मिळण्यास, वीज मिटर, पाणी, सदनिके संदर्भातील पुर्णत्वाचा दाखला मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 6,44,450/- या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात अदा करावेत. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर सहा आठवडयांच्या आत जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तीकरित्या तक्रारदारास करारातील सोयी-सुविधांसहित सदनिका क्र.35, 5 वा मजला, 650 चौ.फुट, विंग ए, बिल्डींग नं.2 चा ताबा, पुर्णत्वाचा दाखला दयावा.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी.
4. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य पाठविण्यात यावी.