न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. बँकेकडे रक्कम रु.10,000/- ची ठेव, ठेवपावती क्र. 0410217 व ठेव खाते नंबर 0401120060000970001 अन्वये, दि. 5/09/2012 रोजी ठेवलेली आहे. तदनंतर तक्रारदारांकडून सदरची ठेवपावती अनावधानाने गहाळ झाली. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांचे डयुप्लीकेट सर्टिफिेकेटची मागणी केली व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे दि. 16/11/2017 रोजी वि.प. यांचेकडे दिली. परंतु त्याची दखल वि.प. यांनी घेतली नाही. तसेच तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे ठेव रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तदनंतर वि.प. बँकेने सप्टेंबर 2019 मध्ये तक्रारदार यांना डयुप्लीकेट पावती दिली. सदर पावतीचे मुद्दल व व्याज वि.प. यांनी अद्याप दिलेले नाही. अशा प्रकारे वि.प. बँकेने सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब, ठेवीची रक्कम रु.10,000/- व त्यावर दि. 05/09/2012 पासून सप्टेंबर 2019 पर्यंत बँकेच्या नियमाप्रमाणे द.सा.द.शे. 9.5 टक्के व्याजाप्रमाणे होणारी रक्कम, तसेच सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने होणारे व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत ठेवपावतीची प्रत, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठवलेली पत्रे, तक्रारदाराचा माहिती अधिकाराखालील अर्ज, वि.प. यांचे उत्तर, वि.प. बँकेला पाठविलेले पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांनी याकामी हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. बँक तक्रारदारास ठरले मुदतीचे ठरले व्याजदराप्रमाणे व्याज देणेस यापूर्वी व आजरोजी सुध्दा तयार आहेत. परंतु तक्रारदार यांनी ठेवीची मुदत संपलेनंतर 14 दिवसांचे आत नूतनीकरण न करता वि.प. बँकेच्या ता. 29/5/2007 रोजीच्या परिपत्रकातील अट क्र.3 चे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या ठेव पावतीमध्ये नमूद असलेल्या 9.5 टक्के दराप्रमाणे ठेवीची रक्कम परत मिळणेसाठी प्रस्तुतचा खोटा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराने ठेवीची मुदत संपलेनंतर बँक धोरणानुसार 14 दिवसांचे आत ठेव पावतीचे नूतनीकरण केले नसले कारणाने तक्रारदारांना ठेवीची मुदत संपले तारखेनंतर ठेव पावतीमध्ये नमूद केले व्याजदराप्रमाणे कायद्याने व्याज मागता येणार नाही. तक्रारदारांनी जाणुनबुजून दि. 5/11/2017 अखेर ठेव रक्कम परत न घेतले कारणे वि.प. यांनी तक्रारदारांची ठेव ही Matured but not paid खाती जमा करुन ठेवली होती. तक्रारदारांनी दि. 16/11/2017 रोजी वि.प. बँकेच्या केनवडे शाखेकडे मुदतबंद ठेव रक्कम परत मिळणेसाठी अर्ज दिला होता परंतु ठेवपावतीच्या दुय्यम प्रतीची मागणी केलेली नव्हती. अशा परिस्थितीत वि.प. बँकेस तक्रारदारांनी केवळ ठेवपावती हरविली आहे व ठेवीची रक्कम परत द्या या कारणांवरुन ठेवीची रक्कम परत देता येत नाही. ठेवीच्या डयुप्लीकेट सर्टिफिेकेटची मागणी तक्रारदारांनी केव्हाही केलेली नव्हती. वि.प. बँकेच्या चीफ अकाऊंटंट यांनी दि. 31/7/2019 रोजी पात्र पाठवून गहाळ झालेल्या ठेवपावतीचे बदली डयुप्लीकेट पावती जरुर तो नुकसानभरपाई करार लिहून घेवून व पावतीवर डयुप्लीकेट अशी नोंद करुन देणेबाबत कळविले होते. त्यानुसार सर्व कार्यवाही पूर्ण झालेनंतर वि.प. बँकेने तक्रारदारांना दि.11/10/19 रोजी डयुप्लीकेट ठेवपावती दिलेली आहे. वि.प. यांनी तक्रारदारांना ठेवीची मुदत संपलेनंतर बँक धोरणाप्रमाणे ठेवीच्या रकमेवर मुदत संपलेनंतर ठेव पावतीचे नूतनीकरण न केलेस सेव्हिंग्ज दराप्रमाणे व्याज देणेस बँक तयार आहे असे सांगितले परंतु तक्रारदार यांनी त्यास नकार देवून प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी शपथपत्र, कागदयादीसोबत वि.प. बँकेचा ठराव, तक्रारदारांनी ठेवीपोटी जमा केलेल्या रकमेची पावती, ठेवपावतीचे नियम, वि.प. बँकेने चीफ अकाऊंटंट यांना दिलेले पत्र, वि.प. बँकेच्या असिस्टंट मॅनेजर यांचे पत्र, डयुप्लीकेट पावती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली पत्रे, वि.प. बँकेचे परिपत्रक, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद इ. दाखल केले आहे.
5. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. संस्थेमध्ये ठेव ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीसोबत ठेवपावतीची डयुप्लीकेट प्रत दाखल केली आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता, त्यावर वि.प. बँकेचे नांव नमूद आहे. वि.प. बँकेनेही सदर ठेवपावतीची प्रत मान्य केली आहे तसेच तक्रारदारांनी ठेव ठेवल्याची बाब वि.प. यांनी मान्य केली आहे. त्याकारणाने ठेव स्वरुपात गुंतवलेल्या रकमेचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
6. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे ठेव रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराची ठेव रक्कम परत न करण्याबाबतची कारणे नमूद केली आहेत. वि.प. चे कथनानुसार, वि.प. बँक तक्रारदारास ठरले मुदतीचे ठरले व्याजदराप्रमाणे व्याज देणेस यापूर्वी व आजरोजी सुध्दा तयार आहेत. परंतु तक्रारदार यांनी ठेवीची मुदत संपलेनंतर 14 दिवसांचे आत नूतनीकरण न करता वि.प. बँकेच्या ता. 29/5/2007 रोजीच्या परिपत्रकातील अट क्र.3 चे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या ठेव पावतीमध्ये नमूद असलेल्या 9.5 टक्के दराप्रमाणे ठेवीची रक्कम परत मिळणेसाठी प्रस्तुतचा खोटा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराने ठेवीची मुदत संपलेनंतर बँक धोरणानुसार 14 दिवसांचे आत ठेव पावतीचे नूतनीकरण केले नसले कारणाने तक्रारदारांना ठेवीची मुदत संपले तारखेनंतर ठेव पावतीमध्ये नमूद केले व्याजदराप्रमाणे कायद्याने व्याज मागता येणार नाही. तक्रारदारांनी जाणुनबुजून दि. 5/11/2017 अखेर ठेव रक्कम परत न घेतले कारणे वि.प. यांनी तक्रारदारांची ठेव ही Matured but not paid खाती जमा करुन ठेवली होती. सर्व कार्यवाही पूर्ण झालेनंतर वि.प. बँकेने तक्रारदारांना दि.11/10/19 रोजी डयुप्लीकेट ठेवपावती दिलेली आहे. वि.प. यांनी तक्रारदारांना ठेवीची मुदत संपलेनंतर बँक धोरणाप्रमाणे ठेवीच्या रकमेवर मुदत संपलेनंतर ठेव पावतीचे नूतनीकरण न केलेस सेव्हिंग्ज दराप्रमाणे व्याज देणेस बँक तयार आहे असे सांगितले परंतु तक्रारदार यांनी त्यास नकार देवून प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे असे वि.प. यांनी कथन केले आहे. वि.प. यांनी सदर कथनाचे पुष्ठयर्थ काही कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदारांना दिलेली ठेवपावती गहाळ झाल्याने वि.प. यांनी तक्रारदारांना डयूप्लीकेट पावती दिल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे ठेवीची मुदत दि. 05/09/2013 रोजी संपलेली आहे. वि.प. यांनी दि.29/5/2007 चे परिपत्रक दाखल केले आहे. सदर परिपत्रकाचे कलम 3 मध्ये मुदत संपलेल्या मुदत बंद ठेवीचे नूतनीकरण न करता परत नेल्या जाणार आहेत, अशा मुदत ठेवींवर मुदत संपलेल्या तारखेपासून ठेव परत देणेच्या तारखेपर्यंत होणा-या कालावधीसाठी सेव्हिंग्ज खातेचे प्रचलित व्याजदराने सरळ व्याज अदा करणेत यावे असे नमूद आहे. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारांनी ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीचे नूतनीकरण केलेले नाही. सदरची ठेव नूतनीकरण न करता ती तशीच वि.प. बँकेकडे ठेवलेली आहे. सबब, वर नमूद परिपत्रकातील कलम 3 नुसार तक्रारदार हे ठेवीची मुदत संपेपर्यंतच्या कालावधीसाठी ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व ठेवीची मुदत संपलेनंतर रक्कम हाती पडेपर्यंत बचत खातेवरील व्याजदराने व्याज मिळणेस पात्र असलेचे दिसून येते. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात ठेवीची रक्कम व त्यावर दि. 5/09/2012 पासून सप्टेंबर 2019 पर्यंत द.सा.द.शे. 9.50 टक्के दराने व्याजाचे रकमेची मागणी केली आहे. सदरची मागणी वरील परिपत्रकातील नियमाप्रमाणे मान्य करता येत नाही असे या आयोगाचे मत आहे.
7. सबब, तक्रारदार हे वि.प. बँकेकडून डयुप्लीकेट ठेव पावती क्र. 0410217 वरील मूळ ठेव रक्कम परत मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे ठेवीवर ठेव ठेवले तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने म्हणजेच द.सा.द.शे. 9.5 टक्के व्याजदराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व ठेवीची मुदत संपलेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो ठेवीचे मूळ रकमेवर सेव्हिंग्ज खातेचे व्याजदराप्रमाणे म्हणजे द.सा.द.शे. 4 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत असाही या आयोगाचा निष्कर्ष आहे.
सबब, याकामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. बँकेने तक्रारदार यांना डयुप्लीकेट ठेव पावती क्र. 0410217 वरील मूळ ठेव रक्कम रु.10,000/- परत करावी व सदर रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने म्हणजेच द.सा.द.शे. 9.5 टक्के व्याजदराने व ठेवीची मुदत संपलेपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो ठेवीचे मूळ रकमेवर सेव्हिंग्ज खातेचे व्याजदराप्रमाणे म्हणजे द.सा.द.शे. 4 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. बँकेने तक्रारदारास अदा करावा.
- जर वरील ठेवीपोटी काही रक्कम वि.प. यांनी यापूर्वी तक्रारदारास अदा केली असेल तर ती वळती करुन घेण्याचा वि.प. यांचा हक्क सुरक्षित ठेवण्यात येतो.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|