तक्रार दाखल ता.30/08/2016
तक्रार निकाल ता.13/04/2017
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केलेला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 चे वडील श्री.आबा दादू रोहीले (मारलेकर) यांनी घरगुती वापराकरीता वि.प.यांचेकडून विद्युत कनेक्शन घेतले होते व आहे. त्याचा ग्राहक क्र.266510055578 असा असून मीटर क्र.5802852616 असा आहे. वि.प.क्र.1 व 2 हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे अनुक्रमे कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता आहेत.
3. तक्रारदार यांचे पुर्वहक्कदार यांनी सदर वि.प.यांचेकडून बरेच वर्षापूर्वी सदरचे विद्युत कनेक्शन घेतलेले असून त्यांनी आपले हयातीत केव्हाही वीजबिले थकविलेली नव्हती व नाहीत. तसेच त्यानंतर तक्रारदारानेही प्रस्तुत घरगुती वापराची वीज बिले थकविलेली प्रलंबित ठेवलेली नव्हती व नाहीत. तर सदर तक्रारदाराने वि.प.कडून आलेली वीज वापराची देयके कोणतीही कसूर न करता नियमीतपणे वि.प. कंपनीकडे जून-2016 अखेर अदा करीत आलेले होते व आहेत. त्याबाबत तक्रारदार व वि.प.यांचेत कोणताही वाद नाही असे असता, वि.प.यांनी प्रस्तुत तक्रारदार यांना सदर विद्युत कनेक्शनचे जुलै-2016 चे वीजबिल दिले असून सदर बिलामध्ये एकूण वीज वापर 59 युनिट असून त्याचा आकार रक्कम रु.340.76पैसे दर्शविला असून त्याबाबतही वाद नाही. परंतु सदर वीजबिलामध्ये वि.प.यांनी बेकायदेशीररित्या तथाकथित निव्वळ थकबाकी रक्कम रु.14635.04 पैसे अशी दर्शवून सदर देय नसलेली थकबाकी प्रस्तुत वि.प. तक्रारदारकडून सक्तीने वसुल करु पाहत आहेत. तक्रारदार हे जुलै-2016 चे वादातीत बिलामधील प्रत्यक्ष वीजवापराचा आकार रक्कम रु.340.76पैसे अदा करणेस तयार असताना देखील वि.प. तक्रारदारकडून प्रत्यक्ष रक्कम जमा करुन घेणेस टाळाटाळ करु लागले आहेत. तदनंतर वि.प.यांनी ऑगस्ट-2016 चे वीजबिल तक्रारदाराला दिलेले असून त्यामध्येही रक्कम रु.14,836.62पैसे अशी तथाकथित थकबाकी दर्शविलेली आहे. सदरची थकबाकी जमा न केलेस वीजपुरवठा खंडीत करणेची धमकी तक्रारदाराला दिली आहे. वर नमुद जुलै व ऑगस्ट-2016 चे वीजबिलांमधील थकबाकीची रक्कम तक्रारदार हे देय लागत नाहीत तसेच थकबाकीबद्दल वि.प.ने कोणतेही लेखी-तोंडी स्पष्टीकरण दिलेले नाही असे असता, वि.प.हे तक्रारदाराचे वीज कनेक्शन खंडीत करणेचा प्रयत्न करत असून विनाकारण थकबाकी दाखवून ती भरणेसाठी तक्रारदारकडे तगादा लावत आहेत, अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने वि.प.विरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, कागद यादीसोबत अ.क्र.1 ते 6 कडे अनुक्रमे तक्रारदाराची माहे-2016 व जून-2016 ची वीजबिले व प्रस्तुत वीजबिले वि.प.कडे जमा केलेल्या पावत्यां, तसेच माहे जुलै-2016 व ऑगस्ट-2016 ची वीजबिले, पुराव्याचे शपथपत्रे, कागद यादीसोबत वि.प.ने तक्रारदाराला दिलेले वीजबिल, तक्रारदाराने वि.प.कडे दिलेला अर्ज, वि.प.ने तक्रारदाराला दिलेले प्रोव्हीजनल बिल, वि.प.कडे तक्रारदाराने भरलेली पावती, वि.प.ने तक्रारदाराला दिलेले वीजबिल, पुरावा संपलेची पुरशिस, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
5. या कामी तक्रारदाराने तक्रारदाराचा प्रस्तुत तक्रार अर्ज मंजूर करावा, वि.प.यांनी तक्रारदाराचे नमुद वीजमीटरचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा आदेश व्हावा, वि.प.यांनी जुलै-2016 व ऑगस्ट-2016 चे वीजबिलामध्ये बेकायदेशीररित्या दर्शविलेली थकबाकीची रक्क्म तक्रारदारकडून वसुल करु नये व वि.प.यांनी सदर वादातीत वीजबिलांमध्ये दर्शविलेली तथाकथित थकबाकी प्रस्तुत वीजबिलांमधून कमी करणेची आहे असा आदशे वि.प.विरुध्द व्हावा व तक्रारदाराने प्रत्यक्ष वापर केलेल्या युनिटचेच बिल वि.प.ने तक्रारदाराला देणेत यावे असा वि.प.यांना आदेश व्हावा, वि.प.यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- अदा करणेबाबत वि.प.यांना आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
6. प्रस्तुत कामी वि.प.यांनी म्हणणे/कैफियत कागद यादीसोबत अ.क्र.2 व 2 कडे तक्रारदाराला वि.प.ने थकीत बिल भरणेसंदर्भात दिलेले पत्र, मयत आबा दादू रोहीले यांच्या जुन्या वीजकनेक्शनचा खातेउतारा, वि.प.चे पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे वि.प.ने या कामी दाखल केली आहेत.
7. वि.प.ने त्यांचे म्हणणे/ कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
अ तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
ब तक्रारदाराचे पुर्वहक्कदार-आबा दादू रोहीले (मारलेकर) यांनी वि.प.यांचेकडून 10 एच.पी.वीज कनेक्शन औद्योगिक कारणासाठी घेतले असून सदरचे वीजकनेक्शन हे जानेवारी-2002 पर्यंत चालू होते. त्यांचे वीजवापराचे बिल रक्कम रु.14,187.63पैसे हे त्यांचेकडून येणेबाकी असून ते वसुल करणेचा वि.प.यांना हक्क व अधिकार आहे. तसेच तक्रारदाराचे विद्युत कनेक्शन हे घरगुती वापराचे असून ते अद्यापी चालू आहे. दोन्हीं वीज कनेक्शन ही एकाच व्यक्तीचे नावाने व एकाच व्यक्तीच्या अर्जावरुन दिलेली आहेत. त्यामुळे जुन्या मीटरवरील येणेबाकी तक्रारदारकडून वसुल करणेमध्ये काहीही सेवात्रुटी किंवा बेकायदेशीर नाही. वि.प.ने तक्रारदाराने भरलेली वीजबिले कधीही नाकारलेली नाहीत. तक्रारदाराचे पुर्वहक्कदाराने बिले तटविली असलेने ते थकबाकीदार झालेले आहेत. तसेच एकाच व्यक्तीच्या नावाने दोन्हीं मीटर असलेने थकबाकी तक्रारदाराचे बिलात दाखवली आहे. सदरची थकबाकी ही तक्रारदाराचे वडील आबा दादू रोहीले यांची असलेने नवीन कनेक्शन तक्रारदाराचा वापरत असलेने त्यामुळे थकबाकी तक्रारदारकडून वसुल करणेचा अधिकार वि.प.यांना आहे. सदर दोन्हीं कनेक्शन ही आबा रोहीले यांचीच नावे आहेत. ती तक्रारदाराने बदलून घेतलेला नाहीत. त्यामुळे दुस-या मशीनवरील थकबाकी तक्रारदाराचे नावावर वर्ग करणे ही वि.प.चे अधिकारातील बाब आहे. सबब, वि.प.ने तक्रारदाराचे नावावर असले दुस-या विद्युत कनेक्शनवर पहिल्या जुन्या मीटरवरील थकीत बिल ट्रान्सफर केले आहे. यामध्ये वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. उलट तक्रारदारकडूनच वि.प.यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-, अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- वसुल होऊन वि.प.ला अदा करावी अशी विनंती वि.प.ने या कामी केली आहे. सदर रक्कम मागणेचा तक्रारदाराला अधिकार नाही. याउलट तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व लबाडीचा असलेने तक्रारदारकडून रक्कम रु.30,000/- वसुल होऊन वि.प.यांना देणेबाबत आदेश व्हावेत अशा प्रकारे आक्षेप वि.प.ने तक्रारदार यांचे तक्रार अर्जावर घेतलेले आहेत.
8. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | पुढील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
9. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदार मयत आबा दादू रोहीले (मारलेकर) यांचे नावावर वि.प.कडून विद्युत कनेक्शन घेतले आहे व प्रस्तुत वि.प.त्याचा उपभोग घेत होते. आबा दादू रोहीले मयत झालेपासून त्यांचे नावावरील वीज कनेक्शन तक्रारदार क्र.1 ते 3 वापरत आहेत. सदर तक्रारदार क्र.1 ते 3 हे मयत आबा दादू रोहीले यांचे कायदेशीर वारसदार असलेने तक्रारदार क्र.1 ते 3 हे वि.प.कंपनीचे ग्राहक असून वि.प.ही सेवापुरवठादार आहे हे निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द झाला असून वि.प.यांना मान्य आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
10. मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार क्र.1 ते 3 हे त्यांचे घरगुती वापराचे वीजबिल कनेक्शन वरील येणारी विद्युत बिले ही जुन-2016 अखेर नियमीत व वेळेत अदा करत होते व आहेत. त्यांची कोणतीही थकबाकी नव्हती व नाही. तसचे वि.प. व तक्रारदार यांचेत कोणताही वाद नव्हता व नाही असे असता, वि.प. यांनी प्रस्तुत तक्रारदार यांना सदर विद्युत कनेक्शनचे जुलै-2016 चे वीजबिल दिले असून सदर बिलामध्ये एकूण वीजवापर 59 युनिट असून वाद नाही. परंतु सदर बिलामध्ये वि.प. यांनी बेकायदेशीररित्या तथाकथित निव्वळ थकबाकी रक्कम रु.14,635.04पैसे अशी दर्शवून सदरची देय नसलेली रक्क्म थकबाकी म्हणून प्रस्तुत वि.प. तक्रारदारकडून सक्तीने वसुल करु पाहत आहेत. सदर वि.प.हे जुलै-2016 चे वीजबिलामध्ये प्रत्यक्ष वीज वापराचा आकार रक्कम रु.340.76पैसे अदा करणेस तयार असताना देखील वि.प. तक्रारदारकडून सदर रक्कम जमा करुन घेणेस टाळाटाळ करत आहेत. तदनंतर सदर वि.प.यांनी ऑगस्ट-2016 चे वीजबिल तक्रारदाराला दिले असून सदर बिलामध्येही रक्कम रु.14,836.62पैसे अशी तथाकथित थकबाकी दर्शविली आहे. तसेच सदरची थकबाकी जमा न केलेस सदर तक्रारदाराचा वीजपुरवठा खंडीत करणेची धमकी वि.प. तक्रारदाराला देत आहेत.
11. वास्तविक वि.प.ने जुलै-2016 व ऑगस्ट-2016 चे वीजबिलामध्ये दर्शविलेली तथाकथित थकबाकी रक्कम देणेस सदर तक्रारदार हे जबाबदार नाहीत. कारण प्रस्तुत थकबाकीबाबत वि.प.ने लेखी-तोंडी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीत व देत नाहीत असे असता, दि.27.08.2016 रोजी प्रस्तुत वि.प.तर्फे वायरमन यांनी तक्रारदाराचे घरी येऊन वीज पुरवठा खंडीत करणेचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे.
12. वास्तविक वि.प.चे महणण्यानुसार तक्रारदार आबा दादू रोहीले (मारलेकर) यांनी वादातीत वीज कनेक्शन हे औपचारीक कारणाकरीता घेतले होते व त्याची बिलांची थकबाकी होती ती वि.प.ने तक्रारदार क्र.1 ते 3 यांना दिले जुलै-2016 व ऑगस्ट-2016 मधील वीज देयकात नमुद केलेचे म्हटले आहे. परंतु जर आबा दादू रोहीले (मारलेकर) यांचे सदर वादातीत मीटर वरील थकीत बिले होती तर वि.प.ने आबा दादू रोहीले जिवंत /हयात असताना त्यांना किंवा त्यानंतर तक्रारदार क्र.1 ते 3 यांना थकीत रक्कमेबाबत एकही नोटीस का पाठवली नाही ? हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. जर पाठवली असती तर ती वि.प.ने या कामी दाखल का केली नाही ? याचाच अर्थ वि.प.यांनी अचानकपणे तथाकथित थकबाकी तक्रारदाराचे वीजबिलामध्ये नमुद करुन पाठवली आहे हे निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द होत आहे आणि अशी तथाकथित थकबाकी अदा न केलेस तक्रारदार क्र.1 ते 3 यांचे विद्युत कनेक्शन /वीजपुरवठा खंडीत करणेची तक्रारदाराला धमकी देणे ही कृती म्हणजेच सेवेतील त्रुटी आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
13. तक्रारदाराने आजअखेर वेळेवर व नियमीतपणे वीजबिले वि.प.कडे अदा केलेबाबतच्या पावत्यां या ठिकाणी दाखल केल्या आहेत असे असतानाही वि.प.ने तथाकथित वीजबिलांची थकबाकी दाखवून तक्रारदाराला वीजबिले अदा केली आहेत ती रद्द होणेस पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. वर नमुद केलेप्रमाणे, वि.प.ने तक्रारदाराला विनाकारण थकबाकीसह वीजबिले अदा करुन रक्कम न भरणेस वीज कनेक्शन/पुरवठा खंडीत करणेची धमकी तक्रारदाराला देणे हा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब वि.प.करत असून तक्रारदाराला सदोष सेवा पुरवत आहे हे निर्वीवादपणे स्पष्ट व सिध्द होत आहे.
15. सबब, प्रस्तुत कामी सदर तक्रारदार हे त्यांचे माहे जुलै-2016 व माहे ऑगस्ट-2016 या दोन्हीं बिलांमध्ये वि.प.ने दाखवलेली तथाकथित थकबाकी ही सदर विद्युत बिलांवरुन कमी करुन/रद्द करुन मिळणेस तसेच विनाकारण वि.प.यांचेकडून वसुल करु पाहत असलेली थकबाकीची रक्क्म नमुद वादातीत बिलांवरुन रद्द होऊन मिळणेस तसेच प्रत्यक्षात वापरले युनिटप्रमाणेच वीजबिल वि.प.कडून मिळणेस व नुकसानभरपाई वि.प.कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब, सदर कामी आम्हीं पुढीलप्रमाणे आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.यांनी तक्रारदाराला जुलै-2016 व ऑगस्ट-2016 चे बिलामध्ये दर्शविलेली थकबाकीची रक्कम तक्रारदाराकडून वसुल करु नये. सदरची थकबाकी रक्कम वि.प.ने तक्रारदाराचे विद्युत बिलामधून कमी करावी.
3 वर नमुद थकबाकीचे कारणासाठी/वादातीत थकबाकीसाठी वि.प.ने तक्रारदाराचे विद्युत कनेक्शनचा वीजपुरवठा खंडीत करु नये.
4 तक्रारदाराने प्रत्यक्षात वापर केले युनिटचेच बिल वि.प.ने तक्रारदाराला अदा करावे.
5 वि.प.ने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
6 वर नमुद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पुर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
8 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.