- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील रहिवासी आहेत. वि.प.क्र.1 हे व्यवसायाने बिल्डर्स व डेव्हलपर्स असून वि.प.क्र.2 ते 12 हे सि.स.नं. 1053/अ चे जागा मालक आहेत. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, टेंबे रोड येथील सि.स.नं. 1053/अ चे क्षेत्र 193.58 चौ.मी. आणि सि.स.नं. 1054 चे एकूण क्षेत्र 13.9 चौ.मी. या एकत्रित मिळकतीवर बांधणेत आलेल्या राजशंकर अपार्टमेंट मधील तिसरे मजल्यावरील रहिवासी फ्लॅट नं.7 याचे क्षेत्र 82.89 चौ.मी. सेलेबल तसेच याच अपार्टमेंटमधील तळमजले वरील शॉप युनिट नं. 8 याचे क्षेत्र 14.50 चौ.मी. बिल्टअप या दोन मिळकती प्रस्तुत तक्रारअर्जाचा वादविषय आहेत. सदरची मिळकत वि.प.क्र.1 ते 12 यांनी विकसीत केलेली आहे. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ठरले अटी व शर्तीनुसार सदर अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट नं. 7 चे करारपत्र वि.प. यांनी दि. 14/10/2015 रोजी लिहून दिलेले आहे व संचाकारादाखल वि.प. यांनी तक्रारदारकडून रक्कम रु.15,17,244/- स्वीकारलेले आहेत व खरेदीची उर्वरीत रक्कम रु.50,000/- खरेदीपत्राचे वेळी भागविण्याचे करारपत्राने ठरलेले आहे. तसेच वि.प. यांनी शॉप युनिट नं. 8 चे करारपत्र दि. 26/7/2011 रोजी लिहून दिलेले असून सदरचे मिळकतीची खरेदीची संपूर्ण किंमत रक्कम रु.3,00,000/- वि.प. क्र.1 यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेली आहे. सदर दोन्ही मिळकतींचा ताबा वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना अनुक्रमे दि. 5/11/2010 व दि. 4/11/2006 रोजी दिलेला आहे. परंतु वि.प. हे खरेदीपत्राची पूर्तता करण्यास टाळाटाळ करीत आहेत. म्हणून तक्रारदार यांनी अंतिमतः दि. 22/12/2018 रोजी वि.प. यांची भेट घेवून खरेदीपत्र पूर्ण करुन देण्याची मागणी केली. परंतु तरीही वि.प. यांनी वाद मिळकतीचे खरेदीपत्र तक्रारदार यांचे नावे करुन दिलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदारांनी वर नमूद दोन्ही वाद मिळकतीचे नोंद खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत वि.प यांना आदेश व्हावा, नुकसानीपोटी रु. 50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.30,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट व कागदयादी सोबत दोन्ही मिळकतींबाबत झालेली करारपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे.
4. वि.प.क्र.1 ते 12 यांना प्रस्तुत प्रकरणाची नोटीस लागू होऊनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, प्रस्तुत प्रकरण वि.प.क्र.1 ते 12 यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नोंद खरेदीपत्र पूर्ण करुन मिळणेस तसेच अपूर्ण कामांची पूर्तता करुन मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर |
कारणमिमांसा–
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे हे मंच होकारार्थी देत आहे कारण तक्रारदाराने, वि.प. यांनी विकसीत केलेल्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, टेंबे रोड येथील सि.स.नं. 1053/अ चे क्षेत्र 193.58 चौ.मी. आणि सि.स.नं. 1054 चे एकूण क्षेत्र 13.9 चौ.मी. या एकत्रित मिळकतीवर बांधणेत आलेल्या राजशंकर अपार्टमेंट मधील तिसरे मजल्यावरील रहिवासी फ्लॅट नं.7 याचे क्षेत्र 82.89 चौ.मी. सेलेबल तसेच याच अपार्टमेंटमधील तळमजले वरील शॉप युनिट नं. 8 याचे क्षेत्र 14.50 चौ.मी. बिल्टअप या दोन मिळकती वि.प. यांचेकडून खरेदी करणेचे ठरविले. सदर मिळकतीपैकी रहिवासी फ्लॅट नं. 7 चे करारपत्र वि.प. यांनी दि. 14/10/2015 रोजी लिहून दिलेले आहे व संचाकारादाखल वि.प. यांनी तक्रारदारकडून रक्कम रु.15,17,244/- स्वीकारलेले आहेत व खरेदीची उर्वरीत रक्कम रु.50,000/- तक्रारदाराने खरेदीपत्राचे वेळी भागविण्याचे करारपत्राने ठरलेले आहे. तसेच वि.प. यांनी शॉप युनिट नं. 8 चे करारपत्र दि. 26/7/2011 रोजी लिहून दिलेले असून सदरचे मिळकतीची खरेदीची संपूर्ण किंमत रक्कम रु.3,00,000/- वि.प. क्र.1 यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेली आहे. सदरची दोन्ही करारपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत. सदरचे मिळकतींची मोबदला रक्कम तक्रारदाराकडून वि.प. यांना मिळाल्याबाबत सदरचे करारपत्रात स्पष्टपणे नमूद आहे. सदर व्यवहार किंवा करारपत्र वि.प. यांनी हजर होवून याकामी नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे शाबीत होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
7. यातील तक्रारदार यांनी वर नमूद केलेप्रमाणे वि.प. बिल्डर व डेव्हलपर यांचेकडून फ्लॅट नं.7 व शॉप युनिट नं. 8 खरेदी करण्याचा करार केला आहे. सदरची दोन्ही करारपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत. सदर करारांमध्ये तक्रारदार यांनी वि.प. यांना खरेदीपोटी रक्कम अदा केलेची बाब स्पष्टपणे नमूद केली आहे. तक्रारदाराचे कथनानुसार, सदर दोन्ही मिळकतींचा ताबा वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना अनुक्रमे दि. 5/11/2010 व दि. 4/11/2006 रोजी दिलेला आहे. परंतु वि.प. हे खरेदीपत्राची पूर्तता करण्यास टाळाटाळ करीत आहेत. म्हणून तक्रारदार यांनी अंतिमतः दि. 22/12/2018 रोजी वि.प. यांची भेट घेवून खरेदीपत्र पूर्ण करुन देण्याची मागणी केली. परंतु तरीही वि.प. यांनी वाद मिळकतीचे खरेदीपत्र तक्रारदार यांचे नावे करुन दिलेले नाही. वि.प.क्र.1 ते 12 हे याकामी हजर राहिलेले नाहीत तसेच त्यांनी या मंचासमोर आपले लेखी म्हणणे अथवा पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. अशा रितीने वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन तसेच तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान झालेली दोन करारपत्रे खोडून काढलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी वादातील मिळकतींची रक्कम वि.प. यांना अदा केली आहे ही बाब हे मंच मान्य करीत आहे. तसेच वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून वादातील दोन्ही मिळकतींची खरेदी रक्कम स्वीकारुन देखील करारपत्रात नमूद अटी व शर्तीप्रमाणे नोंद खरेदीपत्र करुन न देणे हे वि.प. यांचे कृत्य म्हणजेच निश्चितच तक्रारदाराला दिलेली सदोष सेवा आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प. यांनी तक्रारदारास Maharashtra Ownership Flats Act मधील तरतुदीप्रमाणे नोंद खरेदीपत्र करुन देणे हे बंधनकारक आहे. सबब, वि.प.क्र.1 ते 12 यांनी तक्रारदाराला वादातील फलॅट व शॉप युनिटचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन देणे कायद्याने बंधनकारक व आवश्यक असल्याचा निष्कर्ष हे मंच काढत आहे. सबब, वि.प. क्र.1 ते 12 यांनी वादातील फलॅट व शॉप युनिटचे मोबदल्यापोटी रक्कम स्वीकारुन देखील करारपत्रातील नमूद अटी व शर्तीप्रमाणे योग्य त्या मुदतीत नोंदणीकृत खरेदीपत्र करुन न दिलेने वि.प. यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
8. सबब, वर नमूद विस्तृत विवेचन व दाखल सर्व कागदपत्रे यांचा काळजीपूर्वक ऊहापोह करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 12 यांचेकडूनवैयक्तिक व संयुक्तिकरित्या करारपत्रातील अटी व शर्तीनुसार दोन्ही मिळकतींचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच वि.प च्या कृत्यामुळे तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- वि.प. क्र.1 ते 12 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
आ दे श 1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 2) वि.प.क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.50,000/- स्वीकारुन तक्रारदार यांना कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, टेंबे रोड येथील सि.स.नं. 1053/अ चे क्षेत्र 193.58 चौ.मी. आणि सि.स.नं. 1054 चे एकूण क्षेत्र 13.9 चौ.मी. या एकत्रित मिळकतीवर बांधणेत आलेल्या राजशंकर अपार्टमेंट मधील तिसरे मजल्यावरील रहिवासी फ्लॅट नं.7 याचे क्षेत्र 82.89 चौ.मी. सेलेबल या मिळकतीचे नोंद/रजिस्टर्ड खरेदीपत्र करुन द्यावे. 3) वि.प. क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बी वॉर्ड, टेंबे रोड येथील सि.स.नं. 1053/अ चे क्षेत्र 193.58 चौ.मी. आणि सि.स.नं. 1054 चे एकूण क्षेत्र 13.9 चौ.मी. या एकत्रित मिळकतीवर बांधणेत आलेल्या राजशंकर अपार्टमेंट मधील तळमजले वरील शॉप युनिट नं. 8 याचे क्षेत्र 14.50 चौ.मी. बिल्टअप या मिळकतीचे नोंद/रजिस्टर्ड खरेदीपत्र करुन द्यावे. 4) वि.प. क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- (रक्कम रु.वीस हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावी. 5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी. 6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते. 7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात. |
|
| | |
|