जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 302/2011
तक्रार दाखल दिनांक : 29/07/2011
तक्रार आदेश दिनांक 13/10/2014
निकाल कालावधी 03वर्षे02म14दि
1) श्री.पांडूरंग भाऊराव गोडगे
वय 50 वर्षे, धंदा-शेती
2) श्रीमती.इंदूबाई भाऊराव गोडगे
वय 90 वर्षे, धंदा-घरकाम
3) श्रीमती.मंगलवार पांडूरंग गोडगे
वय 42 वर्षे, धंदा-घरकाम
4) श्री.बब्रुवान जनार्धन गोडगे
वय 55 वर्षे, धंदा-शेती
सर्व रा.मु.पो.रोपळे (कव्हे) ता.माढा जि.सोलापूर ..तक्रारकर्ता/अर्जदार नं.1ते4
विरुध्द
1) जैन इरिगेशन सिस्टीम्स प्रा.लि.,
मु.पो.बांबरी ता.जळगांव जि.जळगाव
2) अमित स्पेअर्स,
नवी पेठ कुर्डूवाडी,ता.माढा जि.सोलापूर ..विरुध्दपक्ष /गैरअर्जदार नं.1व2
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.एम.बी.अनपट
गैरअर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.पी.ए.अत्रे
(2) त.क्र.302/2011
निकालपत्र
(पारीत दिनांक:-13/10/2014)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
1. अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार नं.1 ते 4 यांची मौजे बिटरगांव ता.माढा या गावचे हद्दील शेत जमिन गट नं.215/10/अ, 214/4, 213/6, 213/1, 156/1, 6, 23, 215/8, 213/3, 214/2 व 215/5 आहे. अर्जदार यांनी बागायत शेती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचे ठरवून बागायतीसाठी लागणारे साहित्य म्हणजे पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटार यांचेसह एकूण कर्ज प्रकरण रु.9,22,000/- चे होते. त्यापैकी 7,72,000/- कर्ज 2009 मध्ये मंजूर झाले. बँकेच्या कर्ज प्रकरणामुळे तक्रारकर्ता नं.1 ते 4 यांना एकूण 784 पाईप, 140 एम.एम.चे, 50 पाईप 6 के.जी.जाडीचे 20 फुट लांबीचे, व त्यानंतर 4 के.जी.जाडीचे 734 पाईप लागणार होते. सामनेवाला नं.1 हे स्वत: पी.व्ही.सी.पाईप तयार करणारी कंपनी असून सामनेवाला नं.2 हे त्यांचे वितरक आहेत. म्हणून तक्रारकर्ता नं.1 ते 4 यांनी सामनेवाला नं.2 यांचेकडून पाईप खरेदीसाठी रु.7,72,000/- ड्राफ्ट दिला व पाईपचे पेसे वजा जाता रु.46,000/- एवढी रक्कम तक्रारदार नं.1 ते 4 यांना परत दिली. पाईपलाईन पूर्ण झाल्यावर शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू केली असता 4 के.जी.जाडीचे पाईप फुटल्यामुळे शेतापर्यंत पाणी आले नाही, पाहणी केली असता इतर शेतक-यांच्या शेतात पाईप फुटल्याचे निदर्शनास आले, पाईपलाईन ब-याच ठिकाणी फुटली होती व त्याला चिरा पडल्या होत्या. सदरची बाब सामनेवाला नं.2 यांना सांगितली असता दि.24/04/2010 व दि.20/06/2010 रोजी सामनेवाला नं.1 यांचे अधिकारी येऊन फुटलेल्या पाईपलाईनचे दुर्बीणीतून तपासणी केली. त्यांचेमार्फतच त्यांनी सामनेवाला नं.1 यांना सदर तक्रारकर्ता यांची तक्रार सांगितली व सामनेवाला नं.1 यांचे अधिकारी येऊन पाहणी केले व पाईपचे तुकडे त्यांचे जळगांव येथील प्रयोगशाळेत पाठवून काय दोष आहे तो कळवितो असो सांगितले. अद्यापपर्यंत तक्रारकर्ता यांना काहीही कळविले नाही. अर्जदार यांनी त्यांचे गट नंबर 214/14अ व 215/8अ या जमीनीमध्ये ऊसाचे पीक केले होते त्या पिकास डिसेंबर 2009 मध्ये दुस-याचे पाईपलाईनने पिकास पाणी दिले तरीही पिकाचे नुकसान झाले. तक्रारकर्ता यास सोसायटीचे कर्ज दरवर्षी
(3) त.क्र.302/2011
रु.1,28,000/- व्याजासह दि.28/1/2011 ते 29/1/2016 पर्यंत 6 हप्त्यात भरण्याचे आहे. पाईपलाईन मोटार चालू केल्यावर सतत फुटत असल्यामुळे कोणतीही पिके घेता आली नाहीत. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान रु.2,00,000/- झाले आहे. तसेच एकरी 11,00,000/- मागणी केली आहे. मार्च 2010 मध्ये सामनेवाला यांचे अधिकारी व सामनेवाला नं.2 हे अर्जदाराकडे आले व त्यांनी अर्जदार यांना त्यांचे 730 पाईप 20 फूट लांबीचे व 4 के.जी.नग दि.6/4/2011 रोजी कबूल करुन त्याबाबत पावती लिहून दिली व दि.7/4/2011 चे कराराप्रमाणे पाईप व त्यातील अटीप्रमाणे देतो असे सांगितले. परंतू सामनेवाला यांचेकडून 300 पाईप 140 एम.एम.चे मिळाले. व उर्वरीत 430 पाईपची मागणी केलीअसता दिले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ता यांना पिकांचे त्या- त्या वर्षी पिक घेता आले नाही.बँकेचे / सोसायटीचे कर्जाचे हप्ते भरता आले नाही, सन 2011-12 मध्ये रु.10,00,000/- नुकसान झाले आहे. सामनेवाला यांनी दोषयुक्त पाईप पुरविले आहेत. त्यामुळे अर्जदार यांना नुकसान भरपाईपोटी 11,00,000/- व पुढील नुकसानीचे रु.9,00,000/- प्रमाणे एकूण 20,00,000/- मिळावेत. दि.6/4/2011 रोजीच्या कराराप्रमाणे 140 एम.एम.चे राहिलेले 430 पाईप 4 के.जी. जाडीचे व 20 फूट लांबीचे देण्याचा हुकूम व्हावा. तक्रारकर्ता यांना पाईप खोदाई, पाईप जोडणी व मजूरीचा खर्च आणि शेतक-याचे पिकाला नुकसान म्हणून रु.1,00,000/-, मागील नोटीस प्रमाणे मागणी रु.10,00,000/- अशी एकूण 11,00,000/- मिळणेचा आदेश व्हावा. खर्च व वकील फीसाठी रु.15,000/- मिळणेसाठी प्रस्तूत तक्रार केली आहे.
3. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 5 कडे 30 व नि.19 कडे 7 फोटो हजर केलेली आहेत.
4. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार नं.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अनुक्रमे निशाणी 11 व 13 नुसार आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, तक्रारदारानी वादातील पाईप हे व्यावसायिक दृष्टीकोनातून घेतलेले असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कंपनीचे ग्राहक ठरु शकत नाहीत. अर्जाच्या कलम 2,3,4 व 5 मधील मजकूर कंपनी नाकारीत आहे. पाण्याच्या दाबामुळे पाईप फुटले असल्याने कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराने पाईप सदोष पुरवल्याचे कायदयाने शाबीत केलेले नाही. अर्जाच्या कलम 7 मधील मजकूर पूर्णपणे खोटा आहे त्यामुळे कंपनी तो मजकूर नाकारीत आहे. सप्टेंबर
(4) त.क्र.302/2011
2009 मध्ये तक्रारदाराने पाईप जमीनीत गाडल्यानंतर सप्टेंबर 2009 मध्ये पाईपची चाचणी केली असता सदरचे पाईप एप्रिल 2009 ते सप्टेंबर 2009 पर्यंत कोरडया होत्या. त्यामुळे शेतावरुन जाण्या-येणा-या वाहनांच्या व व्यक्तींच्या दाब पडून पाईप फुटल्या आहेत.पाईप गाडल्यानंतर पाणी चालू करणे आवश्यक होते. सहा महिने पाईप लाईन कोरडी ठेवली, कंपनीचे श्री.माने तक्रारदाराच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, पाईपचे नमुने घेतले व पाईपमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. जास्त क्षमतेचा पंप वापरल्याने पाण्याच्या दाबामुळे पाईप फुटलेले आहेत ही बाब तक्रारदारास कळविलेली आहे. तक्रारदाराने जून 2010 नंतर पाईपलाईन चालू केली आहे असे सांगितले आहे. तक्रारदाराने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तरीही तक्रारदारास नविन पाईप देण्याचे कबूल केले व तसा लेखी करारही केला व त्यानुसार पाईप तक्रारदारास दिलेले आहेत. सदरचे पाईप तक्रारदाराने अन्य व्यक्तीला विक्री केलेले आहेत. त्यानंतर कंपनीचे अधिकारी चौकशीसाठी आले असता सदरचे पाईप जमीनीत गाडल्याचे दाखवून दिलेले नाही. अथवा रिकामे ठेवलेले पाईप दाखविलेले नाहीत. अर्जातील कलम 9, 10,11 मधील मजकूर नाकारीत आहे. तक्रारदाराने कलम 12(अ)मध्ये वीस लाखापेक्षा जास्त मागणी केली असल्यामुळे ही तक्रार या मंचात चालवू शकत नाहीत. अर्जातील कलम 12 व 12 अ व ब मधील मागणी अमान्य करणेत येत आहे. तक्रारदाराने गाडलेले पाईप किंवा रिकामे ठेवलेले पाईप हे जैन कंपनीचेच असल्यास कराराप्रमाणे उर्वरीत पाईप देण्यास कंपनी तयार आहे. तक्रारदारास नुकसान भरपाई अथव इतर खर्च कंपनी देणेस जबाबदार नाही. तरी तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विरुध्दपक्ष यांचेकडून विनंती केलेली आहे.
5. गैरअर्जदार यांनी लेखी जबाब पृष्ठयर्थ काहीही कागदपत्रे हजर केलेली नाहीत.
6. अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र व त्यासोबतची कागदपत्रे, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी युक्तीवाद व उभयतांच्या वकीलांच्या तोंडी युक्तीवाद व कागदपत्रे यावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
(5) त.क्र.302/2011
कारण मिमांसा
8. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष नं.2 यांचेकडून विरुध्दपक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेले पीव्हीसी पाईप खरेदी केले आहे हे विरुध्दपक्ष नं.1 व2 यांना मान्य आहे त्यामुळे विरुध्दपक्ष नं.1 व 2 यांचे तक्रारकर्ता हे “ ग्राहक ” ठरतात.
9. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष नं.2 यांचेकडून विरुध्दपक्ष क्रं.1 यांचे उत्पादीत केलेली 6 केजीचे 50 पाईप व 4 केजीचे 730 पाईप खरेदी केले होते व त्यासाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक यांचेकडून सोसायटी मार्फत कर्ज घेतले होते. व त्यांचे शेतीसाठी पाईप लाईन करणेचे ठरवले होते हे नि.5 वरील पाईपलाईन प्रोजेक्ट रिपोट व कर्जाचे कागदपत्रावरुन दिसून येते. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांना रु.7,72,000/- चा चेक पाईप लाईनचे खरेदीसाठी दिला होता याबाबत वाद नाही. वाद उत्पन्न झाला आहे तो म्हणजे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून घेतलेल्या पाईप त्यांचे योजनेप्रमाणे जमीनीत पुरल्यानंतर सप्टेंबर-2009 मध्ये त्यांची चाचणी घेतली असता सदर 4केजीची पाईप ब-याच ठिकाणी चिरे पडले व फुटले त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्यांचे शेतीला पाणी देता आले नाही. सदर पाईप फुटलेचे घटनेनंतर दोन वेळा विरुध्दपक्ष यांचे अधिकारी यांनी सदर पाईपचे तुकडे तपासणीसाठी ताब्यात घेतले व ते लॅबमध्ये तपासले. त्यानंतर सदर पाईप बदलून देणेबाबत किंवा व तक्रारदार यांचेमध्ये दि.06/04/2011 रोजी करार झाला. व त्यामध्ये विरुध्दपक्ष यांनी 4केजी चे 730 पाईप देणेचे मान्य केले. मात्र विरुध्दपक्ष यांनी फक्त 300 पाईप दिले व उर्वरीत दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी पाईपलाईन पूर्ण झाली नाही.
10. दाखल सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष यांनी सदर सदोष पाईपचे बाबतीत सदर पाईप चांगल्या प्रतीचे होत्या याबाबतचा कोणताही पुरावा या कामी दाखल केला नाही. जर पाईप चांगल्या होत्या तर त्यांना दि.20/06/2011 रोजी तक्रारकर्ता यांना पाईप बदलून देणेचा करार कसा काय केला ? हा प्रश्न उपस्थित होतो; विरुध्दपक्षानी त्यांचे पाईप चांगल्या दर्जाचे असतील तर त्याच लॉट मधील पाईप इतर शेतक-यांना विकलेनंतर त्या चांगल्या होत्या याचा पुरावा किंवा प्रतिज्ञापत्र प्रस्तूत कामी दाखल केलेले नाही. विरुध्दपक्ष हे तक्रारकर्ता यांनी जास्त क्षमतेचा पंप वापरला म्हणून पाईप लाईन फुटले असा बचाव करीत आहे. मात्र तक्रारकर्ता यांनी मार्च 2010 मध्ये जास्त एचपी चा पंप वापरला असे स्वत: नमूद करतात. मात्र त्यापूर्वी सप्टेंबर 2009 मध्ये तक्रारकर्ता यांनी कमी दाबाचा पंप वापरला होता तरीही पाईप फुटले ही बाब लक्षात
(6) त.क्र.302/2011
घेणे जरुरीचे ठरते. विरुध्दपक्ष यांनी पुढे असा बचाव घेतला की, जमीनीत पुरलेली पाईप अनेक कालावधी पर्यंत पाणी नव्हते म्हणून त्या फुटल्या असाव्यात असा अंदाज केला आहे. मात्र जर पाईपमध्ये पाणी नसेल तर पाईप फुटतात याबाबतचा कोणताही तज्ञांचा अहवाल दाखल केला नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही. तसेच दोन वेळा विरुध्दपक्ष यांचे अधिकारी यांनी तक्रारकर्ता यांचे कडील पाईपचे तुकडे तपासणीसाठी नेले. मात्र त्यांचा अहवाल या कामी दाखल केलेला नाही. त्यामुळे वस्तूस्थिती व दाखल कागदपत्रावरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सदोष पाईप पुरविल्या हे सिध्द होत आहे. तसेच सदोष पाईप बदलून देणेचे मान्य करुन देखील त्या ठरलेप्रमाणे न देणे ही सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी दि.20/06/2011 रोजी लेखी मान्य केले प्रमाणे उर्वरीत 430 पाईप देणेस विरुध्दपक्ष जबाबदार आहेत. तसेच तक्रारकर्ता यांचे कडील सदोष पाईप स्वखर्चाने काढून नेणेस विरुध्दपक्ष जबाबदार आहेत असे वि.मंचास वाटते.
11. प्रस्तूत प्रकरणात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विरुध्दपक्ष यांनी सदोष पाईप दिलेमुळे तक्रारकर्ता यांची पाईपलाईन पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांचे शेतीचे उत्पन्नाचे नुकसान झाले. मात्र तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत कामी नेमके किती नुकसान झाले याचे कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केला नाही. तक्रारकर्ता यांचे तक्रारीमध्ये त्यांना इतर शेतक-याचे पाण्यावर शेती करावी लागली. त्यामुळे त्यांचे पिक वाया गेले अशी तक्रारकर्ता यांची तक्रार आहे. परंतू सदर पाईप लाईनमुळे नेमके किती एकर क्षेत्रात पिक करता आले नाही, कोणते पीक करता आले नाही व त्यामुळे किती उत्पन्न बुडाले याचा पुरावा दाखल केलेला नाही किंवा तसा तलाठी किंवा कृषी अधिकारी यांचा पंचनामा किंवा अहवाल दाखल नाही. तक्रारकर्ता यांनी एक ठिकाणी एकरी 2,00,000/- व एक ठिकाणी एकरी 11,00,000/- अशी विसंगत मागणी केली आहे व त्याबाबत कोणताही पुरावा दाखल नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येवू शकत नाही.
12. वरील सर्व वस्तूस्थिती वरुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सदोष पाईप पुरविलेचे सिध्द होत असल्यामुळे विरुध्दपक्षानी तक्रारकर्ता यांना ठरल्याप्रमाणे 140 एमएमचे 4केजीचे 430 पाईप द्यावेत व त्या पाईप बसवून देणेबाबतचा सर्वसाधारण खर्च रु.1,00,000/- द्यावा व जूने फुटलेले पाईप विरुध्दपक्ष यांनी स्वखर्चाने काढून न्यावेत असा आदेश पारीत करणे वि.न्यायमंचास न्यायोचित वाटते.
(7) त.क्र.302/2011
13. विरुध्दपक्ष यांचे दोषयुक्त व त्रुटीयुक्त सेवेमुळे व सदोष पाईप पुरविल्यामुळे तक्रारकर्ता यांना त्यामध्ये हेलपाटे मारावे लागले व मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मंजूर करावे असे मंचास न्यायोचित वाटते.
14. एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
-: अं ति म आ दे श :-
1. अर्जदार यांचा गैरअर्जदार विरुध्दचा तक्रार अर्ज अशंत: मंजुर करण्यात येत आहे.
2. विरुध्दपक्ष नं.1 व 2 यांनी एकत्रितरित्या अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना 140 एमएमचे 4 केजीचे एकूण 430 नवीन पाईप द्यावेत. व सदर पाईप जोडण्यासाठी येणारा खर्च रु.1,00,000/- द्यावा. व विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचेकडे असलेले फुटके /सदोष पाईप स्वखर्चाने काढून न्यावेत.
3. गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी एकत्रितरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.25,000/- (रु.पंच्चवीस हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु. 3,000/- (रु.तीन हजार फक्त) द्यावे.
4. गैरअर्जदार यांनी वरील आदेशाचे पालन आदेश प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांत करावे.
5. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
6. तक्रारीमधील मुळ कागदपत्रे तक्रारकर्ता यांना परत करावीत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंनिलि02210140