नि का ल प त्र:- (व्दारा- मा.श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि. 31-12-2015)
1) वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांनी दि. 15-11-2014 रोजी वि.प. 3 कडून ‘इंटेक्टस आय’ (स्टार पॉवर) रक्कम रु. 7500/- इतक्या किंमतीस विकत घेतला. वि.प. नं. 1 हे इंटेक्स या कंपनीचा उत्पादन व विक्री व्यवसाय करतात. वि.प. नं. 2 हे वि.प. नं. 1 चे इंटेक्स मोबाईलचे अधिकृत ग्राहक सेवा केंद्र असून वि.प. नं. 3 हे वि.प. नं. 1 चे अधिकृत विक्रेते आहेत.
3) सदर मोबाईलला एक वर्षाची तसेच बॅटरी व चार्जरला 6 महिन्याची वॉरंटी होती. सदर मोबाईल सुरुवातीपासूनच योग्य प्रकारे चालत नव्हता. तक्रारदार यांनी वि.प. नं. 3 कडे तक्रार केल्यावर, मोबाईल दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले.
4) तक्रारदार यांनी वि.प.नं. 2 व 3 कडे दुरुस्तीसाठी मे-2015 मध्ये दिला, नंतर 15 दिवसांनी मोबाईल दुरुस्त करुन परत आणल्यावर पुन्हा बंद झाला. सदर मोबाईलचे चार्जिंग होणे बंद झाले. सदर मोबाईल व्यवस्थित चालत नसल्याने, तक्रारदाराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वि.प. नं. 3 यांनी दि. 3-06-2015 रोजी बदली मोबाईल दिला. वि.प. यांनी बदलून दिलेला मोबाईलही उत्पादित दोषयुक्त असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार यांनी दि. 4-07-2015 रोजी वकिलामार्फत वि.प. नं. 1 ते 3 यांना नोटीस पाठविली पण वि.प. यांनी उत्तर दिले नाही.
5) तक्रारदार यांना वि.प. यांनी दिलेला दोषयुक्त मोबाईलची किंमत मिळावी अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांनी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. सदर प्रस्तुत दि. 5-10-2015 रोजी दाखल केल्यावर, मंचाने दि. 15-10-2015 रोजी स्विकृत करुन वि.प. नं. 1 ते 3 यांना दि. 14-12-2015 रोजी मंचात हजर राहण्याचा आदेश दिला. वि.प. हे नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत. मंचाने दि. 30-12-2015 रोजी ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 13 (ब) (2) प्रमाणे एकतर्फा आदेश पारीत केला.
6) तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त
मोबाईल दिला काय ? होय
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा –
7) तक्रारदार यांचेतर्फे अॅड. आर.डी. ठाकूर यांनी युक्तीवाद केला. तक्रारदार यांनी दि. 15-11-2014 रोजीची मोबाईल खरेदी पावती, अॅड. गजानन कुलकर्णी यांचेमार्फत वि.प. यांना पाठविलेली नोटीस दाखल केली आहे.
8) तक्रारदार यांनी आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, दि. 15-11-2014 रोजी घेतलेला मोबाईल घेतल्यापासूनच व्यवस्थित चालत नव्हता. माल विक्री कायदा, 1930 प्रमाणे ज्या उद्देशासाठी वस्तु विकत घेतली जाते. त्यासाठी सदर वस्तु योग्य असली पाहिजे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात, सदर मोबाईल घेतलेल्या दिवसांपासून व्यवस्थीत चालत नसल्याचे सांगितले.
9) तक्रार अर्जामध्ये असे नमूद केले आहे की, सदर मोबाईल दुरुस्त करुनही कांही उपयोग झाला नाही. तक्रारदार यांचा मोबाईल दोषयुक्त असल्यामुळे वि.प. नं. 3 यांनी सन 2015 रोजी बदलुन दिला. सदर बदलुन दिलेला मोबाईल हा तक्रारदार यांनी विक्रेत्याच्या निर्णयावर घेतला. माल विक्री कायद्याचे कलम 16 प्रमाणे खरेदीदाराने खरेदी केलेली वस्तु त्याच्या उपयोगी आलीच पाहिजे असे ध्वनित आश्वासन व्यापारी क्षेत्रातील रुढीप्रमाणे विक्री करारात असते. तक्रारदार यांना दुसरा बदलून दिलेला मोबाईल पण पुर्वीच्या मोबाईलपेक्षा कमी गुणवत्तेचा व कमी किंमतीचा असल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते.
10) प्रस्तुत प्रकरणी असे दिसून येते की, दुसरा मोबाईल हा वि.प. नं. 3 च्या कौशल्यावर किंवा निर्णयावर अवलंबून राहुन असल्याने, तो तक्रारदाराच्या कामाला उपयोगी पडणारा असला पाहिजे अशी अट माल-विक्री कायदयात अभिप्रेत आहे. सदर सदर दोन्ही मोबाईल व्यापारीपर्यायी नसल्याचे दिसून येते.
11) मंचाचे मते वि.प.नं. 1 ते 3 हे तक्रारदारास ग्राहक सरंक्षण कायदा कलम 14 (1) (क) प्रमाणे मोबाईलची किंमत रक्कम रु. 7,500/-(अक्षरी रुपये सात हजार पाचशे) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 30-12-2015 रोजीपासून व्याजासह देणेस जबाबदार आहेत.
12) तक्रारदार यांचा मोबाईल वि.प. कडे दुरुस्त करण्यास दिला असतो, तो मुदतीत दुरुस्त करुन देणे बंधनकारक होते कारण वॉरंटीच्या मुदतीत असतानाही वि.प. यांनी तक्रारदारास योग्य सेवा देणे तर नाहीच पण अपमानित केले ही सेवेतील त्रुटी आहे. तसेच वि.प. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/-(रुपये एक हजार फक्त) द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
13) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. नं. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना मोबाईलची किंमत रक्कम रु. 7,500/- (अक्षरी रुपये सात हजार पाचशे) द.सा.द.शे. 9 % तक्रार दाखल दि. 30-12-2015 रोजीपासून व्याजासह द्यावेत.
3) वि.प. नं. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/-(रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.