- नि का ल प त्र -
व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी उपजिविकेकरिता टाटा ए.सी.ई. एम.एच.07/5063 हे वाहन घेतले होते. सदरचे वाहनाला हौद्याचे पत्रा काम करणेसाठी वि.प. यांचेकडे दि.5/1/18 रोजी वाहन दिले होते. त्यावेळी वि.प. यांनी सदर हौद्याचे कामासाठी रु. 50,700/- खर्च येईल असे सांगितले व त्यासंबंधीचे कच्चे कोटेशन व गाडीचे चित्र वि.प. यांनी एका कागदावर रेखाटून देखील दिले होते. वि.प. यांनी सदरचे वाहनाचे काम दि. 15/1/18 रोजी पूर्ण करुन देतो अशी हमी देखील दिली होती. त्यासाठी तक्रारदारांकडून रोख रक्कम रु.30,000/- घेतले व तशा स्वरुपाची रक्कम स्वीकारलेची कच्ची नोंद देखील तक्रारदार यांना दिली आहे. वि.प. यांनी वाहनाची पाहणी केल्यानंतर वाहनाच्या पत्रेमध्ये उत्पादित दोष असल्यामुळे हौदा खराब झाला आहे असे सांगून सदरची बाब टाटा कंपनीला कळवितो असे आश्वासन वि.प. यांनी तक्रारदाराला दिले. तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी हौद्याची किंमत रु. 42,000/- आहे असे सांगितले. तसेच तो हौदा तक्रारदार यांना सदरची रक्कम स्वतः भरुन घ्यावा लागेल व नंतर कंपनी आपणास परत त्याचे पैसे देईल असे देखील सांगितले. त्याकरिता पुन्हा तक्रारदारांकडे रु.20,000/- ची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदरची रक्कम वि.प. यांना बँक खातेतून वर्ग करुन दिली. परंतु तदनंतर वि.प. यांनी हौद्याचे काम पूर्ण करुन देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार हे कोणत्याही स्वरुपाचे काम करु शकत नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी खोललेल्या अवस्थेतील वाहन तक्रारदार यांनी घेतले व ते कमी किंमतीत टाटा कंपनीकडून एक्स्चेंज करुन घेतले. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली एकूण रक्कम रु.50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.40,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- वि.प.कडून मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी रेखाटलेल्या चित्राची प्रत, तक्रारदारांनी दिलेल्या रकमेची पोहोच, नवीन गाडी घेतलेचे पेपर इ. एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांना नोटीसची बजावणी होवूनही ते गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द दि. 11/9/18 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. ता.11/9/18 रोजी तक्रारदार यांनी सदर नोटीस वि.प. यांना लागू झालेबाबतचे कलम 28(अ) प्रमाणे शपथपत्र दाखल केले आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज व दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांनी स्वतःचे व कुटुंबियांचे उपजिविकेकरिता टाटा ए.सी.ई. एम.एच.07/5063 हे वाहन घेतले होते. सदरचे वाहनाचे हौद्याचे पत्राकाम करणेसाठी वि.प. यांचेकडे दि. 5/1/18 रोजी सदरचे वाहन दिले होते. सदरचे वाहनाची पाहणी करुन हौदेच्या कामासाठी रक्कम रु. 50,700/- खर्च येईल असे वि.प. यांनी सांगितले. सदरचे काम ता.15/1/18 रोजी पर्यंत पूर्ण करुन देतो अशी हमी देखील वि.प. ने दिली. सदर व्यवहाराची वि.प. यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.30,000/- रोख स्वीकारले. सदरचे वाहनाचे पत्र्यामध्ये उत्पादित दोष असलेमुळे हौदा खराब आहे. टाटा कंपनीस कळविलेस हौदा Free of cost मिळेल, असे तक्रारदार यांना सांगून हौद्याची एकूण रक्कम रु.42,000/- पैकी रु.20000/- ची मागणी वि.प. यांनी केली. तथापि सदरचे वि.प. यांनी सांगितलेल्या मुदतीत गाडीचे काम करुन दिलेले नाही. वि.प. यांचेकडून खोललेल्या अवस्थेत वाहन तक्रारदार यांनी घेवून कमी किंमतीत सदर वाहन टाटा कंपनीकडे एक्सचेंज करणे तक्रारदार यांना भाग पडले. सबब, वि.प. यांनी सदरचे वाहनाचे दुरुस्तीपोटी तक्रारदार यांचेकडून रक्कम स्वीकारुन देखील सदरचे वाहन तक्रारदार यांना मुदतीत दुरुस्त न करुन देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता अ.क्र.1 ला तक्रारदार यांनी ता. 19/2/18 रोजी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसीची प्रत दाखल आहे. अ.क्र.2 ला ता. 5/1/18 रोजी वि.प. यांनी सदरचे वाहनाची चित्र रेखाटलेची प्रत दाखल केली आहे. अ.क्र.3 ला ता. 15/1/18 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना NEFT द्वारे रक्कम रु.20,000/- दिलेल्या रकमेची पावती दाखल आहे. अ.क्र.4 ला ता. 2/2/18 रोजी तक्रारदार यांनी नवीन वाहन खरेदी केलेची कागदपत्रे दाखल आहेत. दाखल कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता तक्रारदार यांनी NEFT द्वारे वि.प. यांचे खातेवर रक्कम रु.20,000/- जमा केलेची पावती दाखल केलेली आहे. सदरची रक्कम वि.प. यांनी नाकारलेली नाही. सदरचे पावतीवरील रकमेचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे स्पष्टपणे शाबीत होते.
6. प्रस्तुतकामी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, सदरचे वाहनाची पाहणी करुन सदरचे हौद्याचे काम करणसाठी रक्कम रु.50,700/- इतका खर्च वि.प. यांनी सांगितला. त्या संबंधीचे कच्चे कोटेशन व गाडीचे चित्र वि.प. यांनी स्वतः रेखाटलेचे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. त्याअनुषंगाने अ.क्र.2 ला सदरचे चित्र रेखाटलेची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे प्रतीचे या मंचाने अवलोकन केले असता पूर्ण हौदा रक्कम रु.42,000/- नवीन कंपनी स्पेअर पार्ट दर नमूद असून सदरचे प्रतीवर वाहन रिपेअरच्या रकमा नमूद आहेत. प्रस्तुतकामी वि.प. यांना संधी देवून देखील वि.प. यांना पाठविलेली नोटीस Not claimed शे-यानिशी परत आलेने तक्रारदार यांनी त्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण कायदा कलम 28(अ) प्रमाणे पुरावा शपथपत्र दाखल केले असून वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना रोख रक्कम रु. 30,000/- दिलेची बाब मंचात हजर होवून नाकारलेली नाही. त्याकारणाने सदरची रोख रक्कम रु. 30,000/- वि.प. यांना मिळालेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
7. या मंचाने दाखल कागदपत्रांचे व तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता वि.प. यांनी तक्रारदार यांचे वाहनाचे तपासणी केलेनंतर सदर वाहनाचे पत्रामध्ये दोष असलेने हौदा खराब झालेला आहे. त्याकारणाने टाटा कंपनीचा हौदा Free of cost मिळेल असे सांगितले. तक्रारदार यांचेकडून वि.प. यांनी रु.42,000/- रकमेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी NEFT द्वारे रु.20,000/- व रोखीने रु.30,000/- दिलेचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे फोटो तक्रारीसोबत दाखल केले आहेत. सदरचे फोटो वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. सदरचे वाहनाचे फोटोंचे या मंचाने अवलोकन केले असता सदरचे वाहनाचा हौदा खराब झालेचा दिसून येतो. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून ता. 15/1/18 रोजी अखेर वाहनाचे खराब हौदा बदलून देणेपोटी रक्कम रु.50,000/- स्वीकारुन सदरचे वाहनाचे कोणत्याही स्वरुपाचे काम मुदतीत केलेले नाही. सदरचे वाहनाचे काम अर्धवट स्थितीतच ठेवलेचे तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. सदरचे वाहन पूर्णपणे दुरुस्ती केलेचे शाबीत करण्याची संधी वि.प. यांना देवून देखील वि.प. यांनी प्रस्तुतची बाब मंचात हजर राहून शाबीत केलेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून सदरचे वाहनाचे कामापोटी मोबदला स्वीकारुन देखील वाहनाचे काम मुदतीत न करुन व टाळाटाळ करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे वाहन दुरुस्तीसाठी तक्रारदार यांनी वि.प. यांना अदा केलेली एकूण रक्कम रु.50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 30/5/18 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणेा व्याज मिळणेस पात्र आहेत. दाखल कागदपत्रांवरुन सदरचे वाहनावर तक्रारदारांचा पूर्णपणे व्यवसाय अवलंबून असून सदरचे वाहन तक्रारदारांचे उपजिविकेचे साधन आहे. वि.प. यांचे हलगर्जीपणामुळे तक्रारदार हे सदरचे कालावधीत कोणतेही काम करु शकले नाहीत. त्याकारणाने तक्रारदार यांना मानसिक त्रास व शारिरिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार या मंचात दाखल करणे भाग पडले. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 - सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी वाहन क्र. एम.एच.07/5063 चे दुरुस्तीपोटी तक्रारदार यांचेकडून स्वीकारलेली एकूण रक्कम रु. 50,000/- तक्रारदार यांना अदा करावी. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल ता. 30/5/18 रोजी पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावेत.
- वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत वि.प. यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
- सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.