Dated the 06 Aug 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार यांनी ठाणे येथुन IRCTC च्या Website WWW.irctc.co.in हया साईटव्दारे Online Payment करुन स्लिपर क्लास ट्रेन क्रमांक-01014 नागरपूर – सीएसटी ही तिकीट बुक केली. सदर गाडीची ता.05.05.2013 रोजी सुटण्याची वेळ-19.40 hrs. अशी होती. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर गाडीबाबत पीएनआर-नं.8311803387 या क्रमांकाचे तिकीट सदर वेबसाईटव्दारे पाठवले. तक्रारदार अमरावती येथे ता.05.05.2013 रोजी मुंबईला परतण्यासाठी पोहोचले, तक्रारदार यांना सदर ट्रेन निश्चित वेळेऐवजी नमुद वेळेच्या तब्बल 4 तास 30 मिनीटे उशिरा धावणार असल्याने व तक्रारदार यांना दुस-या दिवशी वेळेत त्यांच्या कार्यालयात पोहोचावयाचे असल्याने तक्रारदार यांना दुस-या ट्रेनचे रु.180/- चे तिकीट घेऊन जनरल क्लासमधून अतिशय हाल अपेष्टा सहन करुन अमरावती ते सीएसटी या गाडीने मुंबईपर्यंत प्रवास करावा लागला. तक्रारदार यांनी नागपूर ते सीएसटी स्पेशल ट्रेनचे IRCTC च्या वेबसाईटव्दारे ता.22.03.2013 रोजी ठाण्यावरुन बुक केलेले तिकीट पीएनआर-नं.8311803387 अभिलेखात उपलब्ध आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांना ट्रेनच्या विलंबाबाबत ई-मेलव्दारे कळवून सामनेवाले यांचेकडून भरलेल्या तिकीटाची रक्कम रु.300/- (Refund of TDR) सामनेवालेकडून परत मागितली आहे.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.23.05.2013 रोजी ट्रेन नेहमीच्या वेळेत चालत असल्याचे कळविले आहे. परंतु तक्रारदार यांनी आरटीआय अँक्टनुसार रेल्वेचे वेळापत्रक प्राप्त केले असुन ते अभिलेखात उपलब्ध आहे. त्यानुसार NGP – MUMBAI-CST ट्रेन नं.01014 बडनेरा येथे ता.05.05.2013 रोजी 19.40 hrs. ला पोहोचणे आवश्यक असतांना ती ता.06.05.2013 रोजी 00.25 ला पोहचल्याचे दिसुन येते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना याबाबत ता.24.10.2014 रोजी कायदेशीर नोटीस दिली आहे. सामनेवाले यांनी IRCTC च्या दिल्ली येथील डायरेक्टरच्या नांवे पाठविलेल्या ई-मेलमध्ये सामनेवाले यांनी सदर ट्रेन 5.40 hrs. विलंबाने आली असल्याचे नमुद केले आहे, व दिल्ली IRCTC यांनी तक्रारदार यांना सदर ट्रेन नॉर्मल वेळेत धावत असल्याचे खोटे कळवून अनुचित व्यापारी प्रथेचा सामनेवाले यांनी अवलंब केल्याचे म्हटले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे रु.300/- रेल्वेच्या नियमानुसार परत केले असल्याचे तक्रारदार यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात नमुद केले आहे, व तक्रारीतील इतर मागण्यांबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पुर्तता करण्याचे आदेश मंचाने दयावे असे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रेल्वेच्या तिकीटाचे पैसे रु.300/- परत दिल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर ट्रेनच्या नियोजित वेळेपेक्षा 5 तास 40 मिनीटे ट्रेनला विलंब झाल्याचे मान्य केल्याचे दिसुन येते. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे मान्य केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आरटीआय बाबत झालेला खर्च रु.150/- व नविन तिकीट घेण्यासाठी आलेला खर्च रु.180/- ता.05.05.2013 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजाने परत करावा. सदर आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत करावे.
3. तक्रारदार यांनी सदर तक्रार ग्राहक मंचात दाखल केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पहिल्या ट्रेनच्या तिकीटाचे पैसे परत दिले, परंतु तक्रारदार यांना सदर ट्रेन क्रमांक-01014, 5 तास 40 मिनीटे विलंबाने धावल्याने दुस-या ट्रेनने जनरल डब्यातुन हाल अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागल्याने, तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत.
4. ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चापोटी रक्क्म रु.2,000/- सामनेवाले यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत. वरील आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत करावे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1.तक्रार क्रमांक- 790/2013 अंशतः मंजुर करण्यात येते.
2.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नविन तिकीटाचा खर्च रु.180/- तसेच आरटीआय बाबतचा
खर्च रु.150/- यावर ता.05.05.2013 हया तारखेपासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याज
देऊन सदर रक्कम व्याजासह आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत तक्रारदार यांना
परत करावी.
4.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी
रुपये पाच हजार) नुकसानभरपाई तसेच न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी
रुपये दोन हजार) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावे.
5.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.06.08.2016
जरवा/