निकालपत्र :- (दि.01.03.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीसीची बजावणी झाली आहे, याबाबत पोस्टाची नोंद पोच डाकेची पोच प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला क्र.1 हे प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. सामनेवाला क्र.2 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे निवृत्त पेन्शनर आहेत. सामनेवाला क्र.1 ही कंपनी डॉनियर सुटिंग्ज, नवसंजिवनी, बायो फर्टिलायझर, मॅजिक स्टोव्ह इंडक्शन कुकर, बजाज अलायन्स कॅपिटल युनिट गेन पॉलीसी इत्यादी सारखे प्रोडक्ट त्यांचे मेंबरमार्फत विक्री करणारी कंपनी आहे व सामनेवाला क्र.2 हे सदर कंपनीचे विक्री प्रतिनिधी आहेत. सदर सामनेवाला क्र.2 यांनी सदर प्रॉडक्टची माहिती दिली व त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम रुपये 3,030/- चे एक प्रॉडक्ट खरेदी केले. तसेच, सामनेवाला क्र.2 यांनी आणखी 16 युनिटस् घेवून नविन मेंबर्स केलेस सिल्व्हर पॅकमधील टायटन वॉच, ब्रँडेड कलर हॅण्डसट व सिल्व्हर रॉयल्टी क्लबमध्ये प्रवेश असे फायदे सांगितलेने व तक्रारदार वयोवृध्द असलेचा फायदा घेवून सदर 16 प्रॉडक्टस् रक्कम रुपये 53,280/- रोख भरुन घेतले. असे 17 प्रॉडक्टसची एकूण किंमत रुपये 56,610/- सामनेवाला यांना दिली आहे. (3) तक्रारदार पुढे सांगतात, सदर प्रॉडक्टची खरेदी रक्कम भरुनही बरेच महिने न मिळालेने सामनेवाला क्र.1 कंपनीच्या मुख्य कार्यालयात जावून चौकशी केली असता सदर कंपनीने दि.19.02.2008 रोजी सदर प्रॉडक्टस् त्रिमुर्ती एंटरप्रायझेस, इचलकरंजी यांचेकडे पाठविलेसंबंधी सांगून एक कॉम्प्युटराईज्ड प्रिंट तक्रारदारांना दिली. त्यानुसार तक्रारदारांनी त्रिमुर्ती एंटरप्रायझेस यांचेकडे चौकशी केली असता सदर प्रॉडक्टस् तक्रारदारांना दिले नाही याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सबब, सामनेवाला क्र.1 कंपनी व तिचे प्रतिनिधी सामनेवाला क्र.2 यांनी प्रॉडक्टसपोटी स्विकारलेली रक्कम रुपये 56,610/- तक्रारदारांना द्यावी व सदर रक्कमेवर दि.08.06.2007 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज देणेचा आदेश व्हावा. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत माहिती पुस्तिका, त्रिमुर्ती एंटरप्रायझेस यांचेकडे पाठविलेली प्रॉडक्ट लिस्ट व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर सामनेवाला यांनी तक्रारदारांना सामनेवाला क्र.1 कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करणेबाबत केंव्हाही गळ घातलेली नव्हती. तक्रारदार व सदर सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 कंपनीचे ग्राहक आहेत. तक्रारदार व सदर सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून प्रोडक्टस् खरेदी करणेकरिता रक्कम गुंतविली आहे. सदर सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 चे विक्री प्रतिनिधी आहेत. तक्रारदारांनी स्वत:हून सामनेवाला क्र.1 कंपनीचे प्रोडक्टस् सामनेवाला क्र.2 कंपनीकडून स्विकारलेले आहेत याबाबत त्यांना प्रत्यक्ष भेटून सुचना केलेल्या आहेत. सदर सामनेवाला हे प्रोडक्ट देणेस तयार आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. शारिरीक-मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले म्हणणे व सामनेवाला क्र.1 कंपनीची सदर कामी दाखल केलेली माहितीपुस्तिका यांचे अवलोकन या मंचाने केले आहे. सदर माहितीपुस्तिकेचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेले प्रोडक्टस् सामनेवाला क्र.1 कंपनी ही मल्टी लेव्हल मार्केटिंग पध्दतीने विक्री व वितरण करीत असते हे दिसून येत आहे. सदरचे प्रोडक्ट हे सदर मार्केटिंग पध्दतीने स्वत:साठी खरेदी केले जाते, तसेच इतर ग्राहकांसाठी सभासद करुन विक्री व वितरण केले जाते. तक्रारीत उल्लेख केलेले 17 प्रोडक्टस् खरेदी करणेसाठी हे तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कंपनीकडे एकूण रक्कम रुपये 56,610/- भरणा केलेली आहे. ही वस्तुस्थिती प्रस्तुत प्रकरणी या मंचासमोर आणलेली आहे. तसेच, सामनेवाला क्र.2 यांनीही सदरची वस्तुस्थिती मान्य केलेली आहे. सदर बाबींचा विचार करता सामनेवाला क्र.1 कंपनीकडे रक्कम जमा होवूनही सदर कंपनीने तक्रारदारांना एकूण 17 प्रोडक्टस् दिलेले नाहीत. याचा विचार करता सामनेवाला क्र.1 कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 कंपनीचे विक्री प्रतिनिधी आहेत. ही बाब पुराव्यानिशी प्रस्तुत प्रकरणी सिध्द होत नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 कंपनीने तक्रारदारांच्याकडून स्विकारलेली रक्कम रुपये 56,6102- तक्रारदारांना व्याजासह परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी तक्रारदारांना रक्कम द्यावी तसेच तक्रारीचा खर्च द्यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 कंपनीने तक्रारदारांच्याकडून प्रोडक्टस् खरेदीची स्विकारलेली रक्कम रुपये 56,610/- (रुपये छप्पन हजार सहाशे दहा फक्त) तक्रारदारांना द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि.08.06.2007 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.1 कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला क्र.1 कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |