न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे वाहन क्र. एम.एच.-09-ईएम-7798 असून त्याचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 3003/151022812/00/000 असा असून पॉलिसीचा कालावधी दि.05/07/2018 ते 04/07/2019 असा आहे. दि. 6/12/2018 रोजी तक्रारदार व त्यांचा ड्रायव्हर श्री कृष्णात पंडू राठोर हा उणुसगी जि. सोलापूर येथून भात भरुन कोल्हापूर येथे येत असताना रेंदाळगावच्या हद्दीत तक्रारदार यांच्या पुढे जात असलेला ट्रक अचानक थांबलेने तक्रारदार यांचा ट्रक पुढे थांबलेल्या ट्रकला धडकला. त्यामुळे तक्रारदाराच्या वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे वि.प. कंपनीकडे पाठविली असता तक्रारदार यांचे वाहनाचे अपघातावेळी वैध परमिट घेतलेले नाही असे कारण सांगून वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारलेला आहे. अपघातसमयी तक्रारदार यांचे वाहनाचा महाराष्ट्र शासनाचा वैध परवाना होता. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारुन सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे वाहन क्र. एम.एच.-09-ईएम-7798 असून त्याचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 3003/151022812/00/000 असा असून पॉलिसीचा कालावधी दि.05/07/2018 ते 04/07/2019 असा आहे. दि. 6/12/2018 रोजी तक्रारदार व त्यांचा ड्रायव्हर श्री कृष्णात पंडू राठोर हा उणुसगी जि. सोलापूर येथून भात भरुन कोल्हापूर येथे येत असताना रेंदाळगावच्या हद्दीत तक्रारदार यांच्या पुढे जात असलेला ट्रक अचानक थांबलेने तक्रारदार यांचा ट्रक पुढे थांबलेल्या ट्रकला धडकला. त्यामुळ तक्रारदाराच्या वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरचे वाहन टाटा मोटर्सचे अधिकृत डिलर यांचेकडे दुरुस्तीकरिता सोडलेनंतर सदर वाहनाचे दुरुस्तीकरिता रक्कम रु.7,60,000/- इतका खर्च येणार आहे असे इस्टीमेट दिले. तक्रारदार यांचे वाहन दि.7 डिसेंबर 2018 पासून आजपर्यंत चेतन मोटर्स यांचेकडे दुरुस्तीविना पडलेले आहे. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे वि.प. कंपनीकडे पाठविली असता तक्रारदार यांचे वाहनाचे अपघातावेळी वैध परमिट घेतलेले नाही असे कारण सांगून वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी दि. 5/12/2018 रोजी आर.टी.ओ. कोल्हापूर यांची परमिट काढणेसाठी पैसे भरुन पावती घेतलेली आहे. अपघातसमयी तक्रारदार यांचे वाहनाचा महाराष्ट्र शासनाचा वैध परवाना होता. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारुन सेवात्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास विमाक्लेमची रक्कम रु.7,60,000/- व सदर रकमेवर दि. 7/12/2018 पासून 31/3/2019 पर्यंत बंद असलेने दररोज होत असलेला खर्च रु.3,42,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.50,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, क्लेम नाकारलेचे पत्र, पॉलिसी, परमिट, परवाना रक्कम भरलेची पावती, तक्रारदार यांचे लायसेन्स, तक्रारदार यांचे आर.सी.बुक, पंचनामा, जबाब, वाहन दुरुस्तीस येणा-या खर्चाचे एस्टिमेट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तथाकथित अपघाताची माहिती तक्रारदार यांचेकडून मिळालेनंतर वि.प. यांनी लगेच प्रसाद वंजाळे या त्रयस्थ लायसेन्सधारक सर्व्हेअरची नेमणूक केली. सदर क्लेमबाबत पुढील कारवाई करता असे दिसले की, तक्रारदाराने वाहन साधारणपणे जुलै 2018 ला खरेदी केले व वापर चालू केला. पण वाहनाचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन दि. 16/11/2018 ला केले. तसेच तक्रारदराचे नियमाप्रमाणे परमिट घेतले नाही. असे असताना कथित अपघातापूर्वी दि. 5/12/2018 रोजी वाहनामध्ये अवैधरित्या माल भरुन वाहतूक सुरु केली व त्यानंतर कथित अपघात घडला. सदर अपघातावेळी सदरचे वाहनास वैध मालवाहतूक परमिट व ऑथोरायझेशन नव्हते. तसेच सदरचे वाहन विना परमिट सुमारे 8562 किमी चालविले होते. तक्रारदाराने विमा पॉलिसीतील खालील अटीचा भंग केला आहे.
LIMITATIONS AS TO USE : The Policy covers use only under a permit within the meaning of the Motor Vehicles Act, 1988 falling under sub-section 3 of Section 66 of the Motor Vehicles Act, 1988.
अशा प्रकारे वरील अटीचे उल्लंघन केल्याने अपघातातील नुकसानीच्या क्लेमची जबाबदारी वि.प. यांची नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
5. वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत विमा पॉलिसी, क्लेम फॉर्म, तक्रारदारास पाठविलेली पत्रे, क्लेम नाकारलेचे पत्र, सर्व्हे रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र, वंजाळे सर्व्हेअर यांचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांचे वाहन क्र. एम.एच.-09-ईएम-7798 असून त्याचा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविला आहे. विमा पॉलिसीचा क्र. 3003/151022812/00/000 असा असून पॉलिसीचा कालावधी दि.05/07/2018 ते 04/07/2019 असा आहे. उभय पक्षांनी सदरचे वाहनाची पॉलिसी याकामी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदाराने आपल्या वाहन क्र. एम.एच.-09-ईएम-7798 चा विमा वि.प. विमा कंपनीकडे उतरविलेला होता. वि.प. कंपनीने वाहनास कोणताही अपघात किंवा वाहनाचे कोणतेही नुकसान झालेस त्याची भरपाई विमा कंपनी देईल अशी हमी तक्रारदार यांना दिलेली होती. सदरचे ट्रकने मालवाहतुक केली जात होती. सदर ट्रकवर तक्रारदार व त्यांचा ड्रायव्हर कृष्णात पंडू राठोर यांचा ट्रक दि. 6/12/2018 रोजी दु.3 चे सुमारास उणुसगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथून कोल्हापूर येथे येत होता. दि.6/12/2018 रोजी रात्री 12.30 चे सुमारास बोरगांव रेंदाळ रोडने येत असताना गावाचे हद्दीत शाहूनगर येथे तक्रारदार यांचे वाहनाच्या पुढे जात असलेला ट्रक एम.एच.09-सीयु-7189 हे वाहन अचानक थांबलेने तक्रारदार यांचा ट्रक सदरचे वाहनावर धडकला व तक्रारदार यांचे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. तक्रारदार यांनी वाहन टाटा मोटर्सचे अधिकृत डिलर यांचेकडे रिपेअरीकरिता सोडले नंतर वाहनाचे दुरुस्तीकरिता जवळवळ रक्कम रु. 7,60,000/- इतके खर्चाचे एस्टिमेट दिले. मात्र सदरचे वाहन दुरुस्तीविना चेतन मोटर्स यांचेकडे पडून आहे व वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला आहे.
9. वि.प विमा कंपनीने permit not valid on date of loss या कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारलेला आहे व विमा कंपनीने श्री प्रसाद वंजाळे या त्रयस्थ लायसेन्सधारकाची नेमणूक केली. सदरचे वाहन हे जुलै 2018 मध्ये घेतले असून त्याचा वापर सुरु होता तथापि वाहनाचे रजिस्ट्रेशन दि. 16/11/2018 ला केले तसेच नियमाप्रमाणे परमिट घेतले नाही.
10. तथापि वि.प. विमा कंपनीचे कथन जरी असे असले तरीसुध्दा तक्रारदाराने दाखल केले अ.क्र.8 वर Receipt date 5 Dec. 2018 असलेचे दिसून येते. तसेच अ.क्र.6 चे अवलोकन करता (Permit in respect of national permit multi axle goods) वाहनाचे माल वाहतुकीची वैधता दि. 7/12/2018 ते 6/12/2023 असलेचे दिसून येते व तक्रारदाराने सदरचे पुढील परमिटसाठी (वैधतेसाठी) दि. 5/12/2018 ला म्हणजेच सदरची दि. 6/12/2018 ची validity संपणेपूर्वीच पूर्तता केलेचे दिसून येते व वाहनाचा अपघात हा दि. 6/12/2018 रोजीच झालेला आहे. यावरुन असे दिसून येते की, ज्या कारणास्तव तक्रारदाराचा विमा नाकारलेला आहे की permit not valid on date of loss त्या कारणाकरिता कार्यवाही ही तत्पूर्वीच म्हणजेच दि. 5/12/2018 लाच केली आहे. सबब, सदरची बाब तांत्रिक स्वरुपाची असलेने केवळ या कारणास्तव तक्रारदार यांचा विमाक्लेम नाकारणे हे या आयोगास संयुक्तिक वाटत नाही. वि.प. विमा कंपनीचा तक्रारदार यांनी भरलेल्या विमा हप्त्यांबाबतही कोणता आक्षेप नाही. तसेच परमिटची मुदत संपणेपूर्वीच म्हणजेच दि. 6/12/2018 पूर्वीच तक्रारदाराने परवाना वाढविणेसाठीचे अर्ज दिलेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. सबब, वि.प. विमा कंपनीने घेतलेला permit not valid on date of loss हा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे व तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेचे निर्णयाप्रत हे आयोग येत आहे व असा विमादावा नाकारुन वि.प. कंपनीने त्रुटी केलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. तथापि, तक्रारदार यांना त्यांचे वाहनाचे झालेल्या नुकसानीचा कोणताही पुरावा या आयोगासमोर दाखल केलेला नाही. अ.क्र.14 वर Estimate of accident repairs of vehicle No. MH-09 EM-7798 असे दिसून येते. मात्र सदरचे इस्टिमेटवर चेतन मोटर्सचा शिक्का दिसून येत नाही. तथापि वि.प. विमा कंपनीने अ.क्र.6 ला मोटार सर्व्हेअर व लॉस असेसर प्रसाद वंजाळे यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे व त्या सर्व्हेअर यांचे पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे. यावरुन नुकसानीची असेसमेंट रु. 4,38,660/- इतकी दिसून येते. सबब, सदरचा पुरावा ग्राहय धरीत तक्रारदारास वाहनाचे दुरुस्तीस खर्च हा रक्कम रु. 4,38,660/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदाराने रक्कम रु. 3,42,000/- ची मागणी ही वाहन बंद असलेने दररोज रक्कम रु.3,000/- इतकी नुकसान भरपाई मागितली आहे. तथापि तसा कोणताही पुरावा आयोगासमोर नाही व सदरचे वाहन हे तक्रारदार यांनी दुरुस्त करुन त्याचा होणारा खर्च हा विमा कंपनीकउून मागणेचा होता. असे केले असते तर तक्रारदारास सदरचा खर्चच झाला नसता. सबब, तक्रारदारास खर्चापोटी रक्कम रु. 10,,000/- देणेचे निर्णयाप्रत हे आयेाग येत आहे.
12. तक्रारदार यांनी मागितलेली मानसिक त्रासापोटीची व खर्चापोटीची रक्कम प्रत्येकी रु.50,000/- ही या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने त्यापोटी अनुक्रमे रक्कम रु.5,000/- व रु.3,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना वाहनाचे दुरुस्तीपोटी रक्कम रु.4,38,660/- अदा करावी. सदरचे रकमेवर वि.प. यांनी तक्रारदार यांना विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3. तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात.
4. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7. जर यापूर्वी जाबदार यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
8. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.