सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक :30/09/2013)
1. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांचे कंपनीची ‘आय 20 आस्ता’ ही कार/वाहन दि.12.12.2010 रोजी वैयक्तीक वापराकरीता विकत घेतली. प्रस्तुत वाहनाला मध्यवर्ती नियंत्रणाने (Central Locking System) सर्व दरवाजे बंद करण्याची सुविधा उपलब्ध होती. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर सुविधा उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांनी वि.प.क्र. 1 व 2 यांचेकडे याबाबत तक्रार केली. परंतू त्यांनी दखल न घेतल्याने व त्याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने तक्रारकर्त्याचे मौल्यवान सामान चोरीस गेले. तक्रारकर्त्याने सदर झालेल्या नुकसानादाखल भरपाई मिळण्याकरीता ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अंतर्गत तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
2. वि.प.क्र.1 हे वाहनाचे उत्पादक असून वि.प.क्र. 2 हे विक्रेते आहेत. तक्रारकर्त्याने वाहनात मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) असल्यामुळे विकत घेतले होते. दि.22.03.2011 रोजी तक्रारकर्ता आपल्या वाहनात सक्करदरा रेड सिग्नलवर थांबला असता, अज्ञात व्यक्तीने वाहनाचे डिकीचा दरवाजा उघडून, कॅमेरा व इतर मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरली. यावेळी वाहनाचे इंजिन सुरु होते असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) असल्यानंतर वाहनाची डिकी कशी उघडल्या गेली याबाबत वि.प.क्र.1 ला तक्रारकर्त्याने वेबसाईटवरुन पत्र पाठवून विचारणा केली. तसेच 22.03.11 ला ताबडतोब पोलिस स्टेशन सक्करदरा येथे चोरीची तक्रारसुध्दा नोंदविली. परंतू त्यावर वि.प.क्र.1 ने उत्तर न दिल्याने पुन्हा 03.05.2011 ला वेबसाईटवर पत्र पाठविले. दि.04.05.2011 ला वि.प.क्र.1 ने त्यास उत्तर पाठविले की, सदर वाहनाचे पाचही दरवाजे मध्यवर्ती नियंत्रणाने (Central Locking System) बनविल्या गेले आहेत व मागचा दरवाजा हा इंजिन बंद असल्यावरच उघडता येतो. त्यानंतर 09.05.2011 ला वि.प.क्र.2 ला वेबसाईटवरुन मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) याविषयी अधिक माहिती विचारली. परंतू त्यांनी त्यास उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि.20.06.2011 रोजी स्वतःच पत्र लिहून मध्यवर्ती नियंत्रणात (Central Locking System) असलेल्या त्रुटी दूर करण्यास व चोरी गेलेल्या सामानाची भरपाई करण्यास कळविले. यावर वि.प.क्र.1 ने उत्तर देऊन कळविले की, ड्रायव्हिंग दरवाजाच्या नॉबने बंद करु शकता किंवा रीमोटने बंद करु शकता. परंतू मध्यवर्ती नियंत्रणाने (Central Locking System) बंद झालेले नसतील तर अशाप्रकारच्या चो-या होऊ शकतात. त्यामुळे चालकाने योग्य ती काळजी घ्यावी. गाडीचे प्रत्येच मॉडेल हे वेगवेगळया प्रकारांनी बनविले आहे. प्रत्येक मॉडेलचे एक वैशिष्ट आहे व त्या-त्या वैशिष्टयाचा उपयोग केला गेला पाहिजे आणि त्यामुळे त्याला त्रुटी समजता येणार नाही. तक्रारकर्त्याच्या मते वि.प.क्र.1 हे वाहनातील त्रुटी मान्य करीत आहेत व मध्यवर्ती नियंत्रणाने (Central Locking System) सर्व दरवाजे बंद होण्याची सुविधा योग्यप्रकारे काम करत नसल्याचाच जणु पुरावा देत आहेत. वि.प.ने ही बाब जाणिवपूर्वक लपविली असल्याने तक्रारकर्त्याचे सामान चोरीला गेले आहे आणि या कमतरतेमुळे कोणाचेही जीवनास नुकसान पोहोचू शकते. तक्रारकर्त्याने विवादित वाहनाची मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) पध्दत बदलवून द्यावी, चोरी गेलेल्या सामानाची भरपाई मिळावी, आर्थिक व मानसिक त्रासाची भरपाई व कार्यवाहीचा खर्च मिळावा अशा मागण्या सदर तक्रारीद्वारे केलेल्या आहेत.
3. मंचाने सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांना जारी केल्यानंतर, वि.प.क्र. 1 यांनी लेखी उत्तर दाखल केले. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर ते हजरही झाले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.26.04.2012 रोजी पारित केला.
4. वि.प.क्र. 1 यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याच्या सदर वाहनामध्ये कुठलाही यांत्रिक वा तांत्रिक बिघाड नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्पष्टपणे नमूद केले आहे की, झालेली चोरी ही सदर उत्पादनातील किंवा सेवेतील त्रुटी नाही. यापुढे वि.प. हे लेखी उत्तरात कथन करतात की, गाडीच्या पाचही दरवाजांना Central Locking System आहे व डिक्कीचे दार फक्त अनलॉक असेल तरच उघडू शकते. सर्व दरवाजे ड्रायव्हर सीटचे बाजूला असलेल्या नॉबने बंद करण्याची सोय आहे. जर गाडी अनलॉक असेल तरच कोणीही दार उघडू शकतो आणि या सर्व गोष्टीचे मॅन्युअलमध्ये नमूद केलेल्या आहेत आणि ते तक्रारकर्त्यास गाडी खरेदी करतांना देण्यात आलेले आहे. तसेच वि.प.क्र.1 यांची जबाबदारी ही वारंटी पूरतीच मर्यादित आहे. गाडीतील मौल्यवान सामान चोरीला गेल्यास त्याची नुकसान भरपाई देणे ही उत्पादनकर्त्याची जबाबदारी नाही आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
5. तक्रारकर्ता व वि.प.क्र. 1 यांनी अभिलेखावर दस्तऐवज दाखल केले आहेत. सदर दस्तऐवजांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले असता, मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ता वि.प.चा ग्राहक आहे काय ? होय.
2. वि.प.चे सेवेतील व उत्पादनातील कमतरता सिध्द होते काय ? नाही.
3. आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-कारणमिमांसा-
6. मुद्दा क्र. 1 – वि.प.क्र. 1 हे प्रस्तुत प्रकरणातील कार/वाहन चे उत्पादक असून वि.प.क्र. 2 हे विक्रेते आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत वाहन स्वतःच्या उपयोगाकरीता वि.प.क्र.2 कडून घेतलेले असल्याने, तक्रारकर्ता हा वि.प.क्र. 1 व 2 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
7. मुद्दा क्र. 2 – वि.प.क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या प्रत्येक पत्रास समर्पक अशी प्रत्युतरे पाठविली आहेत. तसेच प्रस्तुत प्रकरणात मंचासमोर प्रत्यक्षपणे हजर होऊन लेखी उत्तर व प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तक्रारकर्ता व वि.प.क्र. 1 यांनी तोंडी व लेखी युक्तीवाद मंचासमोर केला आहे. वि.प.क्र. 1 यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तऐवजांचे संपूर्णपणे अवलोकन केले असता असे दिसून येते की, प्रस्तुत वाहनामध्ये मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) सुविधा अद्यावत होती व त्यात कुठलाही यांत्रिकी वा तांत्रिक बिघाड नाही. तसेच ती मध्यवर्ती नियंत्रण (Central Locking System) कसे Unlock होते याबद्दलची सविस्तर माहिती वि.प.क्र. 1 यांनी दिलेली आहे. गाडीच्या पाचही दरवाज्यांना मध्यवर्ती नियंत्रण बंद सुविधा आहे व डीकीचे दार फक्त अनलॉक असेल तरच उघडू शकते. तसेच सर्व दरवाजे ड्रायव्हर सीटचे बाजूला असलेल्या नॉबने बंद करण्याची सोय आहे. तसेच फक्त इंजिन बंद असतांनाच दार उघडू शकते, असे अभिलेखावर दाखल असलेल्या कागदपत्रांद्वारे सिध्द केले आहे. त्यामुळे ही वि.प.च्या सेवेतील कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही. तसेच वि.प.क्र. 1 हे उत्पादनकर्ता असून त्याची जबाबदारी ही वारंटी पूरतीच मर्यादित आहे. म्हणजेच गाडीच्या कुठल्याही भागात जर त्रुटी किंवा दोष असतील तर त्याची परिपूर्तता करणे ही वि.प.ची जबाबदारी आहे. परंतू गाडीतून वस्तूंची चोरी झाल्यास त्याची नुकसान भरपाई देणे ही उत्पादनातील त्रुटी किंवा उत्पादनकर्त्याच्या सेवेतील कमतरता असू शकत नाही. याबाबत वि.प.क्र.1 ने सविस्तर तोंडी युक्तीवाद केलेला असल्याने, वि.प.क्र.1 ने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ काही निवाडे दाखल केलेले आहेत.
1) BAJAJ AUTO LTD. VS. SUDHA BAVEJA & ORS. I (2005) CPJ 50
2) PAWAN MOTORS & ORS. VS. JAMNA SHARMA III (2004) CPJ 517
3) MS. ANUPRIYA SETHI VS. CMPL MOTORS PVT. LTD. & ORS. III (2003) CPJ 385
8. तसेच तक्रारकर्त्याने उत्पादनातील कमतरता आहे ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने Central Locking System बाबत म्हणजेच या सुविधेमध्ये बिघाड आहे किंवा त्रुटी आहे असा तज्ञांचा अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नसल्यामुळे ती वि.प.क्र. 1 च्या उत्पादनातील त्रुटी आहे हे सिध्द होऊ शकत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येते. करिता मंच पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.