तक्रारदार - वकील श्रीमती दीपंती सावंत.
सामनेवाले - वकील श्री.राजपूत.
आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 13/05/2016 रोजी घोषित)
तक्रारदार यांनी सामनेवाले बँक यांचेकडून सदनिके करिता कर्ज घेतले होते. त्या करिता त्यांनी शर्ती प्रमाणे संस्थेकडून प्राप्त झालेले मुळ भागप्रमाणपत्र सामनेवालेकडे सादर केले. तक्रारदारांनी संपुर्ण कर्जाची परतफेड केली. सामनेवाले बँकेने त्यांना मुळ भागप्रमाणपत्र वगळून इतर दस्तऐवज परत केले. परंतु वारंवार विनंती करुन सुध्दा त्यांनी मुळ भागप्रमाणपत्र परत केले नाही. सबब, ही तक्रार दाखल करण्यात आली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर सर्व सामनेवाले मंचात हजर झाले व लेखी कैफीयत दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी सहकार्य केले नाही.
2. तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार त्यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून रु.31,56,000/- कर्ज सदनिका क्र.101, पहीला माळा, अे ‘’विंग’ रॉयल अपार्टमेंट, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-57 या करिता घेतले. कर्जाच्या अटी व शर्ती प्रमाणे गृहनिर्माण संस्थेकडून भागप्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी सामनेवाले क्र.2 यांच्याकडे त्यांच्या दि.11/09/2006 च्या पत्राप्रमाणे सादर केले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे संपुर्ण कर्जाची परतफेड केली व त्याबाबत सामनेवाले यांनी दि.18/11/2009 चे पत्र दिले. सामनेवाले यांनी मुळ भागप्रमाणपत्र वगळून इतर कागदपत्रे तक्रारदारांना परत केली. तक्रारदारांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर, त्यांनी लगेच दि.21/11/2009 च्या पत्राप्रमाणे सामनेवाले यांना सुचीत केले. तक्रारदारांनी वारंवार तक्रार देऊन सुध्दा सामनेवाले यांनी त्याला उत्तर दिले नाही. सामनेवाले क्र.3 यांनी दि.01/12/2009 चे पत्र पाठवून मुदतीची विनंती केली. परंतु सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांना दि.31/12/2009 चे पत्र पाठवून मुळ भागप्रमाणपत्र दाखल करण्याकरिता कळविले. तक्रारदारानी सामनेवाले यांना वकीला मार्फत नोटीस पाठविली. परंतु सामनेवाले यांनी त्यास जबाब दिला नाही. तक्रारदारकडे मुळ भागप्रमाणपत्र नसल्यामुळे ते कार्पोरेशन बँकेकडून कर्ज घेऊ शकले नाही. तक्रारदारांना मुळ भागप्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ही तक्रार दाखल करुन, त्यांनी सामनेवाले यांनी त्यांना मुळ भागप्रमाणपत्र दयावे, मानसिक त्रासासाठी रु.4,00,000/-, तक्रारीच्या खर्च रु.25,000/- अश्या मागण्या केल्या आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत कागदपत्रे दाखल केली.
3. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी संयुक्तीक लेखी कैफीयत दाखल केली. तक्रारदार यांना सदरहू सदनिके करिता कर्ज दिले होते व तक्रारदारांनी इतर दस्तऐवजासह मुळ भागप्रमाणपत्र त्यांच्याकडे दाखल केले होते व तक्रारदारांनी संपुर्ण कर्जाची परत फेड केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार आणि त्यांच्या प्रतीनीधींना हे कळवीले होते की, मुळ भागप्रमाणपत्र हे त्यांना सापडत नाही व तक्रारदारांनी अर्ज करुन, त्यांच्या गृहनिर्माण संस्थेकडून मुळ भागप्रमाणपत्राची दुसरी प्रत हस्तगत करावी व त्याकरिता येणारा खर्च सामनेवाले देण्यास तयार आहेत. परंतु तक्रारदारांनी त्यांना सहकार्य केले नाही. तक्रारदार यांच्या असहकार्यामुळे हा वाद सोडविता आला नाही. तक्रारदार कायदयाच्या प्रक्रीयेचा दुरुपयोग करित आहेत. सामनेवाले हे जर हरविलेले/गहाळ झालेले मुळ भागप्रमाणपत्र शोधू शकले तर, ते त्वरीत सुपूर्द करतील. तक्रारदार यांची कोणतीही प्रार्थना स्विकारण्यात येऊ नये. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयती सोबत 9 दस्तऐवज दाखल केले.
4. उभयपक्षांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराच्या वतीने वकील श्रीमती दीपंती सावंत व सामनेवाले तर्फे वकील श्री.राजपूत यांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला.
5. उपरोक्त बाबी विचारात घेता, खालील मान्य बाबी आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदारांनी सदनिका क्र.101,1ला माळा, ‘अे’ विंग, रॉयल अपार्टमेंटस, विलेपार्ले(पु), मुंबई-57 च्या खरेदी करिता सामनेवाले कडून रु.31,56,000/- कर्ज घेतले होते. अटी प्रमाणे तक्रारदारांनी त्यांना मुळ भागप्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ते माहे सप्टेंबर, 2006 मध्ये सामनेवाले यांच्याकडे सुपूर्द केले. तक्रारदारांनी माहे नोव्हेंबर,2009 मध्ये संपुर्ण कर्जाची परत फेड केली. सामनेवाले यांनी मुळ भागप्रमाणपत्र वगळता, इतर दस्तऐवज तक्रारदाराना परत केली. मुळ भागप्रमाणपत्र अजून पावेतो सामनेवाले यांनी तक्रारदाराना परत केलेले नाही.
6. उपरोक्त बाबीवरुन ही तक्रार निकाली काढण्याकरिता खालील बाबी महत्वाच्या ठरतात.
अ.) सामनेवाले हे सिध्द करतात का? की तक्रारदारांनी दुय्यम मुळ भागप्रमाणपत्र प्राप्त करण्या करिता त्यांना सहकार्य केले नाही?
अ.1) मान्य बाबींप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या संपुर्ण कर्जाची परतफेड केली. तक्रारदारांनी दि.11/09/2006 चे दाखल केलेल्या पत्रावरुन, ही बाब स्पष्ट होते की, त्यांनी सामनेवाले यांना दि.15/09/2006 ला मुळ भागप्रमाणपत्र सादर केले होते. अशा परिस्थिती मध्ये मुळ भागप्रमाणपत्र सामनेवाले यांनी तक्रारदाराना परत करणे ही जबाबदारी सामनेवाले यांची ठरते. सामनेवाले यांनी असे एकही पत्र दाखल केले नाही, ज्यावरुन त्यांनी तक्रारदार यांना मुळ भागप्रमाणपत्र परत केल्याचे दिसून येईल. उलटपक्षी, सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये हे मान्य केले की, मुळ भागप्रमाणपत्र त्यांना सापडत नव्हते, व त्यांनी तक्रारदार यांना गृहनिर्माण सहकारी संस्थेकडे दुय्यम प्रती करिता अर्ज करावा असे कळविले होते. तसेच, हे सुध्दा नमुद केले की, जर त्यांना हरविलेले/गहाळ झालेले मुळ भागप्रमाणपत्र सापडल्यास ते तक्रारदारांना परत करतील. यावरुन आमच्यामते हे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना मुळ भागप्रमाणपत्र परत केले नाही.
अ.2) सामनेवाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी त्यांना दुय्यम प्रत प्राप्त करण्यास सहकार्य केले नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गृहनिर्माण संस्थेकडे तक्रारदारांनी अर्ज केल्यास, तक्रारदारांना दुय्यम भागप्रमाणपत्र प्राप्त होऊ शकले असते व त्याचा खर्च ते देण्यास तयार होते. सामनेवाले यांनी ही बाब जरी स्पष्टपणे व ठळकपणे त्यांच्या लेखी कैफीयती मध्ये नमुद केली असली, तरी त्यांनी ही बाब तक्रारदारांना, तक्रार दाखल करण्यापूर्वी कळविली होती याबाबत एकही कागदपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे सामनेवाले यांच्या या निवेदनास दुजोरा प्राप्त होत नाही. सामनेवाले यांनी जर तक्रारदारांना पत्र पाठवून स्पष्टपणे कबूल केले असते की, मुळ भागप्रमाणपत्र त्यांच्याकडून गहाळ झालेले आहे व तक्रारदार दुय्यम भागप्रमाणपत्र प्राप्त करु शकतात, तर आमच्यामते तक्रारदार यांना दुय्यम भागप्रमाणपत्र प्राप्त करण्यास या पत्राचा आधार मिळाला असता, परंतु सामनेवाले यांनी असे कोणतेही प्रमाणपत्र किंवा साधे पत्र तक्रारदार यांना दिले नाही. उलटपक्षी, सामनेवाले यांनी दि.31/12/2009 चे पत्र पाठवून तक्रारदार यांना मुळ भागप्रमाणपत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास कळविले. आमच्यामते सामनेवाले यांची ही प्रक्रीया म्हणजे ‘ जखमेवर मिठ चोळण्या सारखी आहे’’. या पत्रामुळे निश्चीतपणे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला असावा. त्यामुळे आमच्यामते सामनेवाले यांच्या या म्हणण्यामध्ये काही तथ्य दिसून येत नाही की, त्यांना तक्रारदारांनी दुय्यम भाग प्रमाणपत्र प्राप्त करण्या करिता सहकार्य केले नाही. सबब, या प्रश्नाचे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
7. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
8. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापुर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 292/2010 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना दि.17/06/2016 पर्यंत मुळ भागप्रमाणपत्र परत करावे.
4. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी उपरोक्त क्लॉज 3 प्रमाणे मुळ भागप्रमाणपत्र परत न केल्यास, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या दुय्यम भागप्रमाणपत्र प्राप्त करण्या करिता रु.20,000/- (रुपये वीस हजर) दि.30/06/2016 पर्यंत अदा करावे.
5. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासाकरिता रु.20,000/- (रुपये वीस हजर) देण्यास जबाबदार राहतील.
6. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/- (रुपये दहा हजार) देण्यास जबाबदार राहतील.
7. सामनेवाले क्र.1,2 व 3 यांनी उपरोक्त क्लॉज 4,5 व 6 मध्ये नमुद केलेल्या रक्कम दि.30/06/2016 पर्यंत अदा कराव्यात, न केल्यास, त्या रक्कमेवर दि.01/07/2016 पासून 10 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागू राहील.
8. आदेशाच्या प्रती उभयतांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
9. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदाराना परत करावे.
db/-