Maharashtra

Pune

cc/2009/476

Shri.Kalu Joshi - Complainant(s)

Versus

Housfull International Ltd - Opp.Party(s)

Kiran Ghone

16 May 2011

ORDER

 
Complaint Case No. cc/2009/476
 
1. Shri.Kalu Joshi
Solapur Road Pune
...........Complainant(s)
Versus
1. Housfull International Ltd
Chandan Nagar Kharadi Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Sujata Patankar PRESIDING MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार,
                                                :-    निकालपत्र :-
                                                   दिनांक 16 मे 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.     वृत्‍तपत्रातील जाहिरात वाचून तक्रारदारानी जाबदेणार यांच्‍याकडून फर्निचर घेण्‍याचे ठरविले. फर्निचर घेतांना जाबदेणार यांनी फर्निचर टिकाऊ व मजबूत असल्‍याची खात्री दिली. तक्रारदारानी एक सफायर बेडरुम सेट रक्‍कम रुपये 23,593/- देऊन जाबदेणार यांच्‍याकडून दिनांक 9/7/2009 रोजी खरेदी केला. किंमतीमध्‍ये वाहतूक व फिटींग चार्जेसचा समावेश होता. जाबदेणार यांनी दिनांक 15/7/2009 रोजी फर्निचर सेटची घरपोच डिलीव्‍हरी दिली. फर्निचर सेट व्‍य‍वस्थित बसवून व फिटींग करुन दिला. दिनांक 26/7/2009 रोजी म्‍हणजेच फर्निचर बसवून दिल्‍यानंतर 11 दिवसांनी बेड मधोमध तुटला. त्‍यानंतर तक्रारदारानी जाबदेणार यांना ही बाब कळविली. रितसर तक्रारही नोंदविली. तरीही जाबदेणार यांनी कुठलीही दखल घेतली नाही. म्‍हणून दिनांक 4/8/2009 रोजी जाबदेणार यांच्‍या कार्यालयात तक्रार नोंदविली. तरीही जाबदेणार यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तक्रारदारानी तुटलेला बेड व फर्निचर सेट फर्निचर क्षेत्रातील काही तज्ञ मंडळींना दाखविला असता अतिशय निकृष्‍ठ व हलक्‍या दर्जाचे मटेरिअल वापरुन बेड तयार केल्‍याचे तक्रारदारास सांगण्‍यात आले. त्‍यानंतर तक्रारदारानी ही सर्व बाब जाबदेणार यांना कळविली आणि जाबदेणार यांच्‍याकडून उत्‍तम दर्जाचे, टिकाऊ व योग्‍य फिटींग असलेल्‍या फर्निचर सेटची मागणी केली किंवा फर्निचरची किंमत रक्‍कम रुपये 23,593/- परत मागितली. त्‍यावेळी तक्रारदारानी फर्निचर आहे त्‍या परिस्थितीत परत देण्‍याची तयारी दर्शविली परंतू तक्रारदाराची ही मागणीही जाबदेणार यांनी अमान्‍य केली. त्‍यानंतर तक्रारदारानी दिनांक 31/8/2009 रोजी कायदेशिर नोटीस दिली. जाबदेणार यांना नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी कारवाई केली नाही. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून रक्‍कम रुपये 23,593/- च्‍या किंमतीचा उत्‍तर दर्जाचा व टिकाऊ फर्निचर सेट जाबदेणार यांनी दयावा किंवा जाबदेणार यांना नवीन सेट बदलून देणे शक्‍य नसेल तर फर्निचर सेट खरेदीपोटी घेतलेली रक्‍कम रुपये 23,593/- परत करावी. शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 10,000/- व तक्रारखर्च रक्‍कम रुपये 5,000/- दयावा. तक्रारदारानी प्रतिज्ञापत्र व कागदपत्र दाखल केली.
2.    जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदाराच्‍या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी तक्रारदारास दिनांक 15/7/2009 रोजी बेडरुम सेट – एक कपाट, एक बेड, एक ड्रेसींग टेबल व एक स्‍टूल यांची घरपोच डिलीव्‍हरी दिली व घरात व्‍यवस्थित बसवून व फिटींग करुन दिला. तक्रारदारानी दिनांक 4/8/2009 रोजी तक्रार नोंदविली हे जाबदेणार अमान्‍य करतात. तक्रारदाराचे फर्निचर सेट निकृष्‍ट दर्जाचा आहे, हे म्‍हणणे तसेच तक्रारदारानी बेड तज्ञास दाखविला, सेट बदलून मागितला हे जाबदेणार अमान्‍य करतात. तक्रारदाराच्‍या बेडला झालेले डॅमेज अॅबनॉर्मल डॅमेज आहे. केअरलेस व रेकलेसपणे वापरल्‍यामुळे बेड तुटलेला आहे. तरीसुध्‍दा जाबदेणार यांनी सुतार तक्रारदाराच्‍या घरी पाठविला परंतू तक्रारदारानी बेड दुरुस्‍त करणेस नकार दिला. जाबदेणार यांचे शोरुम अनेक मोठमोठया शहरात आहेत. जाबदेणार यांच्‍या मालाची /वस्‍तूंची क्‍वालिटी चांगली आहे. सेवेचा दर्जा उत्‍तम आहे. जाबदेणार फर्निचरचे रॉ मटेरिअल मलेशियावरुन मागवितात व उत्‍तम अशा लाकडापासून फर्निचर बनवितात. ग्राहकाने शोरुम मध्‍ये सेट पसंद केल्‍यावर व ऑर्डर दिल्‍यावर जाबदेणार यांच्‍या भिवंडी येथील मोठया गोडावूनमध्‍ये व ग्राहकांच्‍या ऑर्डरप्रमाणे इंपोर्ट केलेल्‍या लाकडापासून फर्निचर तयार केले जाते, तयार केल्‍यानंतर क्‍वालिटी कंट्रोल टीम कडून फर्निचर तपासले जाते. त्‍यांनी टेस्‍टेड व ओके केल्‍यानंतरच व वाळवी प्रतिबंधक पॉलिश केल्‍यानंतरच फर्निचर ग्राहकांना डिलीव्‍हर केले जाते व वाळवी प्रतिबंधक ची वॉरंटी फक्‍त वर्षासाठी घेतली जाते. याव्‍यतिरिक्‍त कुठल्‍याही प्रकारची वॉरंटी जाबदेणार घेत नाहीत. डिलीव्‍हरी देतांना ग्राहकाच्‍या समोरच पॅक असलेले फर्निचर उघडले जाते व सदर डिलीव्‍हरी देतांना काही उत्‍पादकीय दोष असला तरच फर्निचर सेट बदली करण्‍यात येतो अन्‍यथा डिलीव्‍हरी दिल्‍यानंतर जर फर्निचरची काही मोडतोड झाली तर जाबदेणार त्‍याची डिलीव्‍हरी स्विकारत नाहीत. त्‍यानंतर जाबदेणार त्‍यांच्‍या अटी व शर्तीबद्यल नमूद करतात. तक्रारदाराला दिलेल्‍या बीलाच्‍या मागील अट क्र 4 नुसार फर्निचर सेट डिफेक्‍टीव्‍ह असेल व त्‍याचा वापर न करता त्‍वरीत त्‍याबाबतची माहिती जाबदेणार यांनी दिली तरच सदरच्‍या फर्निचर सेटची परिस्थिती पाहून बदलून दिला जातो. अन्‍यथा योग्‍य ती दुरुस्‍ती करुन दिली जाते. जर काही वाद निर्माण झालाच तर सदरचा वाद निवारण करण्‍यासाठी मुंबई हे कार्याधिकारक्षेत्र ठरविण्‍यात आलेले आहे. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारानी घेतलेला बेडचा वापर अत्‍यंत निष्‍काळजीपणे वापरला आहे. सदर बेडवर एकावेळी दहा माणसे बसली तरीसुध्‍दा तुटण्‍याची शक्‍यता नाही किंवा तीन ते चार माणसे झोपली तरीसुध्‍दा तो तुटण्‍याची शक्‍यता नाही. परंतू सदर बेडवर जर थोडया अंतरावरुन मुले किंवा मोठया माणसांनी उडया मारल्‍या तर बेडचे प्‍लायवूड तुटण्‍याची शक्‍यता आहे. सदरचा बेड तक्रारदाराच्‍या अॅबनॉर्मल वापरामुळे मधोमध तुटल्‍याची शक्‍यता आहे. तरीपण जाबदेणार हे सदर बेडवरचा प्‍लायवूड बदलून किंवा दुरुस्‍त करुन दयायला तयार आहेत. परंतू तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे पुर्ण सेट बदलून देण्‍यास जाबदेणार तयार नाही किंवा बांधील नाहीत. वरील कारणांवरुन तक्रार अमान्‍य करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले.
3.          त्‍यानंतर तक्रारदारानी प्रतिउत्‍तर दाखल करुन जाबदेणार यांचे म्‍हणणे खोडून टाकले आहे.
4.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. फर्निचर खरेदी केल्‍यापासून 11 दिवसातच बेड तुटला आहे. तक्रारदारानी तुटलेल्‍या बेडचे फोटोग्राप्‍स दाखल केलेले आहेत. तसेच श्री. नितीन कटारिया, बी.ई सिव्‍हील, इंटेरिअर डेकोरेटेर यांचा दिनांक 20/5/2010 रोजीचा अहवाल दाखल केलेला आहे. फोटोग्राफ मध्‍ये बेडचे दोन तुकडे झालेले, प्‍लायवुड पण तुटलेला दिसून येतो. श्री. नितीन कटारिया यांनी त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये नमूद केले आहे की,
“बेड टॉप साठी प्रमुख तीन सपोर्ट आहेत. सदर सपोर्ट सालवुड लाकडाच्‍या तुकडयापासून बनविलेले असून अखंड नाहीत. सालवुड लाकडाचे तुकडे कैची जॉईंटने जोडून सदरचे सपोर्ट तयार करण्‍यात आलेले आहेत. त्‍यामुळे सदरच्‍या सपोर्टमध्‍ये आवश्‍यक टेन्‍साईल स्‍ट्रेंथ अथवा बेडींग स्‍ट्रेंथ नसल्‍याने केवळ बेडवरील लाईव्‍ह लोड मुळे सपोर्ट तुटून नादुरुस्‍त् झालेले आहेत. बेडला असलेले तीनही सपोर्ट सालवुड लाकडाचे 6 ते 7 वेस्‍टेजमधील तुकडे घेऊन कैची जॉईंटने जोडून तयार केलेले आहेत, त्‍यामुळे बेड निकृष्‍ट दर्जाचा असून तुटला आहे. सदर बेडचा टॉप, फ्रन्‍ट, साईड व बॅक हे भाग कॉम्‍प्रेस पार्टीकल बोड पासून बनविलेले असून सपोर्ट जॉईंट करण्‍यासाठी मजबूत नाहीत. तसेच सदर कॉम्‍प्रेस पार्टीकल बोडमध्‍ये आवश्‍यक बेडींग स्‍ट्रेन्‍थ नसल्‍याने व सपोर्ट तुटल्‍याने बेड टॉप भाग बेंड झाला आहे व बेड फाकला गेला आहे. बेड तयार करतांना उत्‍पादकाने निकृष्‍ठ दर्जाचे लाकूड वापरले असून चुकीच्‍या पध्‍दतीने बेड तयार केला असल्‍याने बेड मधोमध क्रॅक होऊन वापरण्‍याजोगा राहिलेला नाही, ” 
5.          श्री. नितीन कटारिया यांनी दिलेल्‍या अहवालावरुन, फोटो वरुन जाबदेणार यांनी तक्रारदाराकडून भलीमोठी रक्‍कम घेऊन निकृष्‍ठ दर्जाचा बेड दिल्‍याचे सिध्‍द होते. जाबदेणार यांच्‍यानुसार सदरील वाद या ग्राहक मंचास चालविण्‍याचा अधिकार नाही, मुंबई कोर्टालाच आहे असे नमूद केलेले आहे व तसे बिलाच्‍या मागील अटी व शर्तीमध्‍येच नमूद केलेले आहे. परंतू बीलावर तक्रारदाराची सही नसल्‍यामुळे तक्रारदारास त्‍या अटी व शर्ती मान्‍य असतातच असे नाही. जाबदेणार त्‍यांच्‍या लेखी जबाबात त्‍यांचे शोरुम्‍स अनेक मोठमोठया शहरात आहेत, क्‍वालिटी कंट्रोल करुन, तपासणी व टेस्‍टींग करुनच फर्निचर बाहेर विक्रीस दिले जाते असे नमूद करतात. परंतू प्रत्‍यक्ष या ग्राहक मंचातच जाबदेणार यांच्‍याविरुध्‍द अनेक तक्रारी दाखल झालेल्‍या आहेत. फर्निचरची एक वर्षाची वॉरंटी वाळवीसाठी दिलेली नसून उत्‍पादकीय दोषांसाठी दिलेली आहे हे वॉरंटी कार्डवरुन दिसून येते. रोजच्‍या वृत्‍तपत्रातून मोठमोठया जाहिराती देऊन, ग्राहकांना उत्‍पादनाच्‍या मुळ किंमतीवर सुट देऊन, वर पेंडंट, कॅमेरे देण्‍याचे आकर्षण जाबदेणार जाहिरातीद्वारे निर्माण करतात, हे दिसून येते. प्रत्‍यक्षात मात्र खरेदी पासून 11 दिवसातच फर्निचर तुटते. याचाच अर्थ फर्निचर करतांना निकृष्‍ठ दर्जाचे लाकूड वापरले जाते हे दिसून येते. जाबदेणार यांनी कुठल्‍या दर्जाचे लाकूड वापरले यासाठीही पुरावा दाखल केलेला नाही. फक्‍त रॉ मटेरिअल, लाकूड आयात केले जाते असे म्‍हटले आहे. सामान्‍य माणूस, ग्राहक एकदाच जवळजवळ दहा वर्षासाठी फर्निचर सेट घेतो. परंतू खरेदी केल्‍यापासून अकरा दिवसातच सेट तुटत असेल तर त्‍याचा नक्‍कीच मानसिक, आर्थिक, शारिरीक त्रास तक्रारदारास झाला असेल, असे मंचाचे मत आहे. ही नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत. 
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येतो-
                              :- आदेश :-
1.     तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.
2.    जाबदेणार यांनी तक्रारदारास बेड – उत्‍कृष्‍ट दर्जाच्‍या लाकडापासून बनविलेला एक वर्षाच्‍या वॉरंटीसह आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून चार आठवडयात दयावा. बेड मिळाल्‍यानंतर तक्रारदारानी तुटलेला बेड जाबदेणार यांना परत करावा.
                               किंवा
बेडची रक्‍कम रुपये 23,593/- 9 टक्‍के व्‍याजासह दिनांक 9/7/2009 पासून रक्‍कम अदाकरेपर्यन्‍त दयावी. आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून चार आठवडयात करावी.
3.    जाबदेणार यांनी तक्रारदारास रक्‍कम रुपये 5,000/- नुकसान भरपाई व रुपये 1,000/- तक्रारीचा खर्च आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून चार आठवडयात दयावा. 
4.    आदेशाची प्रत दोन्‍ही पक्षास विनामूल्‍य पाठविण्‍यात यावी.
     
     
 
 
[ Smt. Sujata Patankar]
PRESIDING MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.