निकालपत्र :- (दि. 28/08/2013)(द्वारा-श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे.
1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.पक्ष यांचेविरुध्द नोटीसचा आदेश झाला. वि.पक्ष यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व वि.पक्ष तर्फे वकिलांनी युक्तिवाद केला.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
तक्रारदार हे त्यांचे नातेवाईकासह दि. 21-03-2012 रोजी वि.पक्ष यांचे हॉटेलमध्ये रात्री जेवण घेणेसाठी गेले होते. त्यावेळी वि.प. हॉटेलमध्ये तक्रारदारांनी हाफ गावरान चिकन हंडी व तीन भाकरी अशी ऑर्डर दिली. तक्रारदारांना वि.प. यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे न देता ब्रॉयलर चिकनची डिश देवून ते गावरान चिकन आहे असे सांगितले. वि.प. हॉटेल मधील वेटर श्री. विकास सुतार यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गावरान चिकन म्हणून हीच डिश देतो असे सांगितले. तक्रारदारांनी हॉटेलचे मॅनेजर यांचेकडे सदर बाबत तक्रार केली असता त्यांना अपमानित करुन, धमकावून, उडवाउडवीची उत्तरे दिली. व हॉटेलमधून बाहेर घालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदारांनी जेवण न करता हॉटेलचे बिल देवून पार्सल सोबत घेऊन गेले. दि. 22-03-2012 रोजी तक्रारदार यांनी वि.प. हॉटेलमधील ऑर्डरप्रमाणे दिलेले चिकन हे गावठी चिकन आहे किंवा नाही याची खात्री करणेकरिता प्रसिध्द व अनुभवी पोल्ट्री व्यावसायिक श्री. भुषण शंकरराव माने, कृष्णा पोल्ट्री फॉर्म, वाशी, ता. करवीर यांना सदर चिकन पार्सल दाखवली व त्यांनी ती पाहून ते गावरान (गावठी) चिकन नसलेचे सांगितले. व तसा दाखलाही दिला. तक्रारदार यांना वि. प. हॉटेलमध्ये गावरान चिकन म्हणून ब्रॉयलर चिकन देऊन तक्रारदारांची व अन्य ग्राहकांची फसवणूक करीत आहेत म्हणून आरोग्य अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका व अन्न निरिक्षक, अन्न आणि औषध प्रशासन, भारत सरकार, कोल्हापूर यांचेकडे सदर जेवणाचे पार्सल व बिलासह रितसर लेखी तक्रार नोंदवली. व तक्रारदारांना कारवाई करीत असलेचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 25-04-2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून रु. 25,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. वि.प. यांनी दि. 3-05-2012 रोजी तक्रारदारातर्फे वकिलांचे नोटीसीला खोटे उत्तर दिले. तक्रारदारांना वर नमूद घटनेमुळे मानसिक त्रास सहन करावा लागला व अपमानित व्हावे लागले. वि.पक्ष यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई पोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 1,000/- वकिलामार्फत पाठविलेली नोटीसीचा खर्च अशी एकूण रु. 31,000/- ची मागणी मागणी वि.पक्ष यांचेकडून तक्रारदारांनी केली आहे.
3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत हॉटेलचे बिल, आरोग्य अधिकारी व फूड इन्स्पेक्टर यांना दिलेल्या प्रत्राच्या प्रती, दाखला, वकील नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती व नोटीसीस उत्तर इत्यादीच्या व शपथपत्र दाखल केले आहे.
4) वि. पक्ष यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि. पक्ष यांचे म्हणणेत तक्रारदारांच्या तक्रारीबाबत काहीही माहिती नाही. अथवा तक्रारदार हे समक्ष भेटलेले नाहीत. त्यांना वकिलामार्फत नोटीसीस उत्तर दिलेले आहे. हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना द्याव्या लागणा-या सेवेचा भंग केलेला नाही. तक्रारदार यांचे तक्रारीतील जेवण व बिल हे समक्ष हॉटेलमध्ये येऊन जेवून गेलेबाबतचे आहे. जेवणाचे पार्सल नेलेबाबत कोठेही पोहच नाही. तक्रारदारांनी केवळ त्रास देणेसाठी पुर्वग्रहदुषित हेतूने तक्रार अर्ज केलेला आहे. तक्रारदारांचे बिले हे हॉटेलमधील जेवण जेवलेले आहे ते पार्सलचे नाही. वि.पक्ष यांचे हॉटेलमध्ये समक्ष भेट देऊन योग्य तो निरिक्षण अहवाल दिलेला आहे. तक्रारीत तथ्थ नसलेचे कळविले आहे. चिकन पोल्ट्री व्यावसायिक श्री. भूषण माने यांनी सदर चिकन बाबत दाखला देऊन अभिप्राय दिलेला आहे तो चुकीचा आहे. श्री. भूषण माने हे शासनाचे मान्यताप्राप्त चिकन टेस्टर नाहीत किंवा त्यांचेकडे अभिप्राय देणेचा कोणताही शासकीय परवाना नाही. त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करीत आहोत. तक्रारदारांनी वि.प. हॉटेलमधून जेवणाचे पार्सल नेलेबाबतचे बिल अथवा पुरावा नाही. तक्रारदारांनी हजर केलेले बिल हे हॉटेलमध्ये जेवून गेलेचे आहे. तक्रारदारांनी वि. प. हॉटेलमधून जेवणाचे पार्सल बाबत असणारी तक्रार योग्य त्या सरकारी कार्यालयाचा अहवाल व कोणत्याही कायदेशीर पुरावा घेऊन दाखल केलेली नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. व तक्रारदारांकडून वि.पक्ष यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रु. 25,000/- देणेत यावेत अशी विनंती मे. मंचास केली आहे.
4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदार व वि. पक्ष यांचे वकिलांचा युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी मंचापुढे उपस्थित होतात.
मुद्दे
1. वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
ठेवेली आहे काय ? ----- होय
2. तक्रारदार कोणता अनुतोष/नुकसानभरपाई
मिळणेस पात्र आहेत ? ----- होय
3. काय आदेश ? ------ अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1:
दिनांक 21-03-2012 रोजी रात्री तक्रारदार त्यांचे नातेवाईकाबरोबर वि.प. यांचे हॉटेल एलिगंट/ग्रीनलँन्ड येथे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हाफ गावरान चिकन हंडी व 3 भाकरी अशी ऑर्डर देण्यात आली. वि.पक्ष यांनी मान्य केले आहे त्यांचे म्हणणेत की, तक्रारदार हे त्यांचेकडे दि. 21-03-2012 रोजी आले होते. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी हॉटेल बिल याकामी दाखल केले आहे. म्हणून तक्रारदार हे वि. पक्ष यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. या तक्रारीत वि. पक्ष यांनी गावरान चिकन हंडीची ऑर्डर दिली असताना वि.प. यांनी त्यांना ब्रॉयलर चिकनची डिश देवून ते गावरान चिकन आहे हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो ? तक्रारदार यांचे बिलाचे अवलोकन केले असता सदरचे टेबल नं. 6 चे बिल हे घेतल्याचे दिसून येते. तक्रारदार तक्रारीत शपथपत्रामध्ये कथन करतात की, तक्रारदार यांचे बरोबर तेथील कर्मचारी यांनी हुज्जत व अपमानित वागणूक दिलेमुळे शेवटी तक्रारदार यांना चिकन पार्सल घेऊन जावे लागले. तक्रारदार यांनी चिकन नामवंत कृष्णा पोल्ट्रीफॉर्म यांचेकडून सदर चिकनची तपासणी केली असता त्यांनी सदरचे चिकन हे गावरान चिकन नसून ते ब्रॉयलर चिकन असा दाखला दि. 22-03-2012 रोजी दिला आहे. त्यावर पोल्ट्रीफॉर्मचा शिक्का व सही आहे. सदरचे कागदपत्रे नि. ¾ वर दाखल आहे. त्यावरुन असे स्पष्ट होते की, सदरचे देण्यात आलेले पार्सल हे गावरान चिकन नसून ब्रॉयलर चिकन आहे हे सिध्द होते. तथापि या कामी वि.पक्ष यांनी लेखी युक्तीवादासोबत ता. 26-08-2013 रोजी अन्न सुरक्षा एल ए. दराडे यांचा तपासणी अहवाल दाखल केला असून मधील कलम 7 पाहिले असता त्यामध्ये योगेश पाटील या ग्राहकाने जेवणासाठी गावरान हाफ चिकन हंडी मागितली असता आपण सदर ग्राहकास जेवणामध्ये गावरान चिकन हाच अन्न पदार्थ दिल्याचे सांगून सदर ग्राहकाने गैरसमजातून तक्रार केली असावी असे नमूद केले आहे. परंतु त्या अनुषंगाने वि.पक्ष यांनी सदर हजर व्यक्तीचा जबाबाचे शपथपत्र दाखल केलेले नाही. अथवा तसा स्वतंत्र साक्षीदार या कामी तपासलेला नाही त्यामुळे सदरचा तपास अहवाल हे मंच मान्य करीत नाही. सबब, वि.पक्ष यांनी ऑर्डरप्रमाणे (गावरान चिकन) न देऊन सेवेत त्रुटी करुन वि.पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणून मुद्दा क्र .1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत
मुद्दा क्र. 2 : वर मुद्दा क्र. 1 मधील विवेचनाचा विचार करता वि.पक्ष यांनी तक्रारदार यांचे ऑर्डर प्रमाणे गावरान चिकन न देता गावरान चिकन म्हणून ब्रॉयलर चिकन दिल्यामुळे वि. पक्ष यांनी तक्रारदाराला बिलाची रक्कम रु. 220/- व तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे व सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. म्हणून तक्रारदार हे बिलाची रक्कम रु. 220/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3- सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष यांनी तक्रारदारास बिलाची रक्कम रु. 220/- (अक्षरी रुपये दोनशे वीस फक्त) 30 दिवसांत अदा करावेत.
3. वि. पक्ष यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्त) अदा करावेत.
4. सदर निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.