तक्रारदार :प्रतिनिधी वकील दिनेश ददिच हजर.
सामनेवाले :वकील श्री.निलेश दास हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही त्यांचे ग्राहकांना प्रर्यटन स्थळावर निवासाचे आरक्षण पुरविणारी मुंबई येथील कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 यांचा व्यवसाय लोणावळा पर्यटन स्थळ येथे असून ते पर्यटकांना निवासाची जागा पुरवितात. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचे मार्फत लोणावळा येथे त्यांचे कुटुंबियाकरीता निवासाचे आरक्षण करण्याची विनंती केली व सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांचे विनंती प्रमाणे सा.वाले क्र.2 यांचे जागेमध्ये तक्रारदारांचे निवासाचे आरक्षण केले. तक्रारदारांनी त्या बद्दल सा.वाले क्र.1 यांना दिनांक 10.7.2009 रोजी रु.19,200/- अदा केले.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक असे एकंदर 12 वयस्कर व्यक्ती व 12 अज्ञान व्यक्ती अशा व्यक्तींकरीता एकाच बंगल्यामध्ये व एकत्रित राहण्याचे हेतुने आरक्षण पाहिजे होते. परंतु सा.वाले क्र.2 यांचे जागेमध्ये एका लगत एक अशा 7 खोल्या होत्या, ज्यामध्ये तक्रारदार व त्यांचे कुटुंबिय यांना एकत्रित निवास करणे शक्य नव्हते व वेग वेगळे निवास आवश्यक होते. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचे कडील जागा स्विकारली नाही. व पर्यायी व्यवस्था करुन घेतली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना नोटीस देऊन आरक्षणाचे पैसे परत मागीतले. त्यास सा.वाले यांनी नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन स्थळावरील आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व आरक्षणाची रक्कम रु. 19,200/- 18 टक्के व्याजासह परत मागीतली. तसेच नुकसान भरपाई बद्दल रु.8 लाख वसुल होऊन मागीतले.
3. सा.वाले क्र..1 व 2 वकीलामार्फत हजर झाले. व सा.वाले क्र.1 यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांचे सूचने प्रमाणे आरक्षण करण्यात आलेले होते. त्याच प्रमाणे वेग वेगळया खोल्यांचे आरक्षण मिळेल याची कल्पना तक्रारदारांना देण्यात आलेली होती. परंतु तक्रारदारांनी कमी किंमतीमध्ये आरक्षण पाहिजे असल्याने सा.वाले क्र.1 यांनी आरक्षीत केलेली जागा स्विकारली नाही. या प्रकारे तक्रारदारांना निवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला.
4. सा.वाले क्र.2 यांनी आपली कैफीयत दाखल केली नाही. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व त्यासोबत कागदपत्र दाखल केली. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन स्थळावरील निवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
होय. |
2 |
सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रु.19,200/- ही आरक्षणाची रक्कम व्याजासह वसुल करण्यास पात्र आहेत काय ? |
होय. |
3 |
अंतीम आदेश ? |
तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी लोणावळा येथील पर्यटन स्थळावर सा.वाले क्र.1 यांच्या मार्फत जागेचे आरक्षण केले. व सा.वाले क्र.1 यांना त्या बद्दल रु.19,200/- अदा केले या बद्दल उभयपक्षी वाद नाही. तक्रारदारांचे कथना प्रमाणे त्यांना एका बंगल्यामधील वेग वेगळया खोल्या असलेली जागा पाहिजे होते जेणेकरुन तक्रारदार त्यांचे नातेवाईक व पाहुणे एकत्रित राहून सुट्टीचा आनंद उपभोगू शकले असते. परंतु सा.वाले क्र.1 यांनी आरक्षित केलेली जागा ही चाळ वजा सलग 7 खोल्यांची निवासाची जागा होती. ज्यामध्ये तक्रारदार त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना एकत्रित निवास करणे अशक्य होते.
7. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रासोबत दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये सा.वाले क्र.1 यांनी आरक्षणाची दिलेली मुळ पावती दाखल केलेली आहे. त्यातील नोंदीचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिनांक 11.7.2009 रोजीचे 12 वयस्कर व्यक्ती व 12 अज्ञान व्यक्ती अशा एकंदर 24 व्यक्तींकरीता बंगल्याचे आरक्षण केले होते. आरक्षणाची पावती निशाणी अ संपूर्ण बंगला ( Total Bunglow ) अशी नोंद आहे. त्याखाली 7 खोल्या अशी नोंद आहे. तक्रारदारांनी त्या बद्दल रु.19,200/- रोख अदा केले अशी देखील नोंद पावतीमध्ये आहे. आरक्षणाचे पावतीमध्ये वरील नोंदी तक्रारदारांचे कथनास पुष्टी देतात की, तक्रारदारांनी लोणावळा येथील संपूर्ण बंगला ज्यामध्ये 7 खोल्या आहेत. अशा जागेचे आरक्षण मागीतले होते. व तसे पुरविण्याचे सा.वाले क्र.1 यांनी कबुल केले होते. तक्रारदारांनी बंगल्याची मागणी केली नसती व केवळ 7 खोल्यांची मागणी केली असती तर निश्चितच आरक्षणाचे पावतीमध्ये संपूर्ण बंगला अशी नोंद दिसण्याचे काही कारण नव्हते. या प्रकारे आरक्षण पावती मधील नोंदी तक्रारदारांच्या कथनास पुष्टी देतात. तक्रारदारांना आरक्षण पावती प्रमाणे संपूर्ण बंगला निवासकामी उपलब्ध करुन दिला होता असे सा.वाले यांचे कथन नाही. या वरुन सा.वाले क्र.1 ही बाब मान्य करतात की, त्यांनी तक्रारदारांकरीता 7 वेग वेगळया व सर्व सोईंनी युक्त अशा खोल्या उपलब्ध करुन दिल्या होत्या. परंतु आरक्षण पावतीमधील नोंदी प्रमाणे तक्रारदाराची मागणी तसेच अपेक्षा संपूर्ण बंगल्याची हेाती ज्यामध्ये एकत्र निवास शक्य होऊ शकेल. तक्रारदारांनी 7 वेग वेगळया खोल्या स्विकारण्याचे नाकारले व अन्य जागेमध्ये आपली पर्यायी व्यवस्था करुन घेतली.
8. तक्रारदारांनी दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 12.7.2009 पूर्वी लोणावळा सोडण्यापूर्वी पोलीस स्टेशन लोणावळा यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यामधील कथने तक्रारदारांचे तक्रारीतील कथनास पुष्टी देतात. तक्रारदारांनी त्यानंतर वकीलामार्फत सा.वाले यांना नोटीस दिली. सा.वाले यांनी त्या नेाटीसीस उत्तर दिले. व त्यामध्ये एका बंगल्यामध्ये 7 खोल्या आरक्षीत होत्या असे कथन केले. तथापी या स्वरुपाचे कथन सा.वाले क्र.1 यांचे कैफीयतीमध्ये दिसून येत नाही. सा.वाले यांनी एका बंगल्यामध्ये असलेल्या खोल्या जर तक्रारदारांना उपलब्ध करुन दिल्या असत्या तर तक्रारदारांना मुंबईहुन रात्रभर प्रवास करुन आल्यानंतर सा.वाले यांचेकडील आरक्षण नाकारण्याचे कारण नव्हते. परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांनी पुरविलेली जागा नाकारली व पर्यायी जागेमध्ये व्यवस्था करुन घेतली. ही बाब तक्रारदारांचे पुराव्याचे कागदावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांचे या स्वरुपाचे वर्तन त्यांचे तक्रारीतील कथनास पुष्टी देते. या वरुन सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांकडून बंगल्यामध्ये खोली असलेले जागेचे आरक्षण करणेकामी रु.19,200/- वसुल केले परंतु वेग वेगळया खोल्या तक्रारदारांना देऊ केल्या ही बाब सिध्द होते. या प्रकारे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना जागेच्या आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते.
9. तक्रारदारांनी आरक्षणाची रक्कम सा.वाले क्र.1 यांना अदा केली व सा.वाले क्र.1 यांनी ती सा.वाले क्र.2 यांना अदा केली. मुळात सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केलेली नाही. या वरुन सा.वाले क्र.1 व 2 यांची जबाबदारी संयुक्त आणि वैयक्तिक राहील.
10. तक्रारदारांनी मुळ रक्कम रु.19,200/- सा.वाले यांचेकडून परत मागीतली आहे. त्यावर 18 टक्के व्याज रक्कम देय तारखेपासून मागीतले आहे. तसेच नुकसान भरपाई बद्दल रु.8 लाख मागीतले आहे. तथापी मुळ रक्कम रु.19,200/- सा.वाले यांनी रक्कम देय तारखेपासून 12 टक्के व्याजाने परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. तक्रादारांना मुळ रक्कमेवर व्याज देय होत असल्याने वेगळा नुकसान भरपाईचा आदेश करणेची आवश्यकता नाही असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 736/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना पर्यटन स्थळावरील जागेच्या
आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर
करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना संयुक्त अथवा वैयक्तिकपणे
रु.19,200/- त्यावर 12 टक्के व्याज दिनांक 10.7.2009 पासुन अदा
करावीअसा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.3000/- अदा
करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 08/05/2013