श्री.स.वं.कलाल,मा.सदस्य यांच्या व्दारे
1) प्रस्तूत प्रकरणी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत ही तक्रार दाखल केलेली आहे.
2) तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते घाटकोपर, मुंबई येथे तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर राहतात. तर सामनेवाले हे पर्यटन सहली आयोजित करुन सहलीसंबंधी सेवा पुरविणारी खाजगी फर्म आहे. त्यांचे कार्यालय घाटकोपर आणि विलेपार्ले येथे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आहे.
3) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी काश्मिर येथे सात दिवसांच्या सहलीसाठी सामनेवाले यांचे सेवा उपभोगली होती. तक्रारदार यांच्या श्रीनगर व काश्मिर येथील इतर पर्यंटन स्थळांना भेट यासाठी सात दिवसांच्या सहलीचा कार्यक्रम होता. सदर सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी तक्रारदार यांनी एअर इंडिया या विमान कंपनीचे दिनांक 23 मे, 2023 रोजीचे मुंबई ते दिल्ली व आणि पुढे दिल्ली ते श्रीनगर तसेच परतीचे त्याच विमानाचे दिनांक 30 मे, 2023 रोजीच्या तिकीटांचे आरक्षण केले होते. तक्रारदार यांच्या परतीच्या विमानाची वेळ श्रीनगर येथून सकाळी 09.30 अशी होती. तक्रारदार यांच्या श्रीनगर येथील सहलीचा कार्यक्रम संपल्यानंतर आठव्या दिवशी श्रीनगर येथे मुक्काम असलेल्या हॉटेलवरुन श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदारास वाहतूक व्यवस्था किंवा टॅक्सी उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना स्वखर्चाने श्रीनगर या अनोळखी शहरात विमानतळावर पोहोचण्यासाठी तीन वेळा वाहने बदलून प्रत्येकवेळी रु.1,000/- इतका खर्च करावा लागला व त्यासाठी तक्रारदारास बराच मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे व्हाटस्अॅप संदेशाव्दारे संपर्क केला असता सामनेवाले यांनी तक्रारदारास त्यांनी श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी केलेल्या स्थानिक वाहतूक खर्चाची रक्कम दिली नाही व तक्रारदाराला अपमानास्पद वागणूक दिली. सामनेवाले यांनी त्यांच्या व्हाटस्अॅप संदेशाव्दारे श्रीनगर येथील सहलीच्याकार्यक्रमाचे पत्रक (Itinerary) यामध्ये नमूद केल्याप्रमाणे विमानतळावर पोहोचण्यासाठी विमानाचे आरक्षण दूपारी 12.00 नंतर असले पाहिजे असा उल्लेख असल्याचे नमूद केले व त्यांनी तक्रारदार यांच्या विनंतीची दखल घेतली नाही. सामनेवाले यांची सदरची बाब ही सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे म्हणून तक्रारदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
4) सामनेवाले यांना आयोगातर्फे नोटीस पाठविण्यात आली असून सुध्दा सामनेवाले आयोगासमोर हजर झाले नाहीत म्हणून त्यांचेविरुध्द दिनांक 8 एप्रिल, 2024 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे. सामनेवाले यांना नोटीसची बजावणी होऊनही त्यांनी आयोगासमोर हजर होऊन प्रस्तूतच्या तक्रारीत त्यांचा प्रतिवाद दाखल केला नसल्याने तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा अबाधीत राहतो. सबब, सामनेवाले यांचेविरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढण्यात यावा असे या आयोगाचे मत आहे.
5) तक्रारदार यांची तक्रार, तक्रारीसोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार खालीलप्रमाणे न्यायनिर्णय करण्यात येत आहे.
6) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारास श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलबध करुन दिली नाही. यासंदर्भात तक्रारदार यांनी काश्मिर येथील सात दिवसांच्या सहलीच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक प्रवासी वाहतूक व्यवस्था जर तक्रारदाराच्या विमानाचे तिकीट दूपारी 12.00 नंतर असेल तर उपलब्ध होईल असा स्पष्ट उल्लेख नसून केवळ कंसात बारीक अक्षरात विमानाची तिकीटे दूपारी 12.00 नंतर आरक्षित करण्याबाबतचा उल्लेख आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही. तथापि, तक्रारदार यांनी त्यांच्या मुंबई येथील विमान तिकीटांचे आरक्षण दिनांक 16 मार्च, 2023 रोजी केल्यानंतर विमानाची तिकीटे तक्रारदाराने सामनेवाले यांच्या घाटकोपर येथील कार्यालयात नेऊन दाखविली होती व सदर तिकीटांच्या क्रमांकांची नोंद सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी त्यांच्या कार्यालयात घेतली होती. परंतु त्यावेळी सुध्दा सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी तिकीटांचे आरक्षण दूपारी 12.00 नंतर असले पाहिजे याबाबत कोणतीही माहिती तक्रारदारास दिली नाही. परिणामी तक्रारदारास स्वखर्चाने श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी तीन वेळा वाहने बदलून प्रवास करावा लागला व त्याची भरपाई सुध्दा सामनेवाले यांनी दिलेली नाही ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे.
7) वरील मुद्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी काश्मिर येथील सात दिवसांच्या सहलीची कार्यक्रमपत्रिका तक्रारीसोबत जोडली आहे. तसेच सामनेवाले यांचेसोबत व्हॉटस्अॅप व्दारे केलेल्या संवादाची छायाप्रत पुरावा म्हणून दाखल केली आहे. सहल कार्यक्रम पत्रिकेत शेवटच्या दिवशी श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी तक्रारदार यांना विमानाची तिकीटे दूपारी 12.00 नंतर आरक्षित करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट उल्लेख नाही तथापि विमानाचे आरक्षण दूपारी 12.00 नंतर करावा असा मोघम उल्लेख आहे. या कारणास्तव सामनेवाले यांनी तक्रारदारास श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली नाही किंवा तक्रारदारास वाहतूकीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई सुध्दा दिलेली नाही. एकंदरीत सामनेवाले यांच्या म्हणण्यानुसार श्रीनगर विमानतळावरुन विमानाचे उड्डाण दूपारी 12.00 नंतर असेल तर त्यासाठी वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येईल. परंतु विमानाचे तिकीट दूपारी 12.00 वाजतापूर्वी सकाळच्या वेळेत असेल तर त्यांना विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार नाही. सदरच्या सहलीची कार्यक्रमपत्रिका ही तक्रारदार व सामनेवाले यांच्यामधील करारानामा आहे असे दिसून येत नाही. ज्या पर्यटकांच्या विमानाची तिकीटे दूपारी 12.00 नंतर आहेत त्यांना विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाईल व ज्या पर्यंटकांकडे दूपारी 12.00 वाजेच्या आंत सकाळच्या विमानाची तिकीटे आहेत त्यांना विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध केली जाणार नाही अशा पध्दतीने सामनेवाले यांनी भेदभाव केलेला दिसतो. परंतु त्याबाबत स्पष्टता तक्रारदारास दिलेली नाही. केवळ सहलीच्या कार्यक्रमपत्रिकेत मोघम स्वरुपाचा उल्लेख आहे. असे असले तरी दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी सात दिवसांच्या सहलीच्या खर्चामध्ये कोणतीही तफावत नाही. दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी सात दिवसांच्या सहलीचा खर्च मात्र एकसमान असल्याचे निदर्शनास येते. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास संपूर्ण रक्कम भरुन आणि तक्रारदार व त्यांच्या पत्नी हया जेष्ठ नागरीक असून सुध्दा त्यांच्या वयाचा विचार न करता त्यांना श्रीनगर विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली नाही व तक्रारदाराने स्वखर्चाने केलेल्या स्थानिक वाहतूक खर्चाची भरपाई सुध्दा दिली नाही. याव्यतिरिक्त सहलीत सहभागी झालेल्या पर्यटकांची सुरक्षा व प्रवास सुलभ व्हावा यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदारास सौजन्यपूर्वक सेवा देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये सामनेवाले यांनी कसूर करणे ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे या आयोगाचे मत आहे.
8) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत सामनेवाले यांचेकडून मानसिक व शारीरीक त्रास याबाबत रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळावी अशी मागणी केलेली आहे. सहलीची रक्कम पूर्णपणे भरुन केवळ विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक प्रवास सुविधा सामनेवाले यांनी उपलब्ध करुन न देणे आणि तक्रारदारासारख्या ज्येष्ठ नागरीकास स्वतः वाहन शोधून विमानतळावर वेळेत पोहोचणे यासाठी शारीरीक व मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे असे या आयोगाचे मत आहे.
9) वरील मागणीच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्या मागणीबाबत काही अंशी विचार करणे संयुक्तिक होईल असे या आयोगाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रार क्र.CC/107/2023 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास श्रीनगर येथे विमानतळावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन दिली नाही ही बाब सामनेवाले यांची सेवासुविधा पुरविण्यास कसूर व अनूचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) व तक्रारदार ज्येष्ठ नागरीक असल्याने त्यांना सेवासुविधा पुरविण्यास कसूर केल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- (रु.दहा हजार फक्त) इतकी रक्कम अदा करावी.
- वरील आदेशाची पूर्तता सामनेवाले यांनी या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांचे आंत करावी अन्यथा सदर रक्कमेवर 7% दराने व्याज लागू राहील.
- या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात यावी.