ग्राहक तक्रार क्र. 254/2016
अर्ज दाखल तारीख : 25/08/2016
निकाल तारीख : 23/ /2017
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 0 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. धनंजय पि. सिताराम लाटे,
वय – 36 वर्षे, धंदा – नोकरी,
रा. बार्शी रोड, जाधववाडी फाटा चौक, जि.उस्मानाबाद.
ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. हिना टेलिकॉम ( मोबाईल विक्रेते)
प्रोप्रा. काझी ब्रदर्स,
वय-सज्ञान, धंदा-व्यापार,
रा. ताज कॉम्पलेक्स, उस्मानाबाद.
ता.जि.उस्मानाबाद.
2. मोबाईल दुरुस्ती/सेवा केंद्र,
(Gionee मोबाईल सेवा केंद्र)
वय – सज्ञान, धंदा व्यापार,
रा. पोलीस मुख्यालय समोर, औरंगाबाद रोड,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा. श्री.मुकुंद बी.सस्ते, प्र.अध्यक्ष.
2) मा. आर.एस.राठोडकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.आर. अत्रे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.आर. एन. लोखंडे.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश पारित.
न्यायनिर्णय
मा. प्र.अध्यक्ष श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
1) तक हे उस्मानाबाद येथिल रहिवाशी असून विप क्र. 1 यांचेकडून दि.28/08/2015 रोजी Gionee M2 या कंपनीचा मोबाईल रक्कम रु.9,00/- ला 365 दिवसाच्यावॉरंटीसह खरेदी केला. त्या मोबाईलचा IMEI क्र.865346027317503 व बॅटरी क्र.B150205Z04LQ असा असून सदरील मोबाईल हा विप क्र. 1 यांनी तक यांना योग्य व रितसर पावती देवून विक्री केला, जिचा पावती क्र.4787 असा आहे. परंतू सदर मोबाईल 15 ते 20 दिवसच व्यवस्थित चालला व त्यात बिघड झाल्याचे दिसुन आले.चार्जींग होत असल्याचे दिसत नव्हते म्हणून विप यांना दाखविले असता विप यांनी पावतीची झेरॉक्स व मोबाईल ठेऊन घेतला व 10 ते 12 दिवसांनी बोलावले. मात्र त्यानंतर वारंवार विचारणा करुनही दुरुस्त करुन दिला नाही व उडवाउडवीची व वेळ खाऊ पणा केला व अखेर शेवटी परत मोबालईल आला आहे म्हणून दिला मात्र सदर मोबाईल बंद अवस्थेत होता व आजतागायत तसाच आहे. विप यांनी तक यांना वारंवार तारखा देऊन व उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास दिला तसेच वेळही घालवण्याचे काम केले. म्हणून शेवटी सदर तक्रार दाखल करणे भाग पडले.
2) विप यांनी तक यांना सदर मोबाईल बदलून द्यावा किंवा त्याची किंमत द्यावी, तसेच झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- विप क्र. 1 व 2 यांनी द्यावे अशी विनंती केली आहे.
3) विप यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे पुढीलप्रमाणे दाखल केले आहे.
कंपनीचा मोबाईल बिघाड झालयास किंवा तांत्रीक अडचणीने खराब झाल्यास त्यास दुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ कपंनीने अधिकृत केलेल्या केअर सेंटरलाच आहे त्यात दुकानदार हा मोबाईल दुरुस्ती किंवा तपासणी किंवा मोबाईल बदलून दण्याचे अधिकार दुकानदार किंवा विप क्र.1 यांना नाहित केवळ दुकानदाराचे नव खराब व्हावे व विप क्र. 1 यांचा व्यवसायास नुकसान व्हावे या हेतूने सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हणून तक यांची तक्रार खर्चासह नामंजूर व्हावी असे म्हणणे दिले आहे.
4) विप क्र.2 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी स्विकारली नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
5) तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे तसेच उभयतांचा लेखी व तोंडी युक्तिवाद पाहता व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेलया कारंणांसाठी दिलेली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) तक हे विप चे ग्राहक आहेत काय ? होय.
2) विप याने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
4) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 :
6) तक यांची सदर तक्रार मुख्यत: मोबाईल दुरुस्ती संदर्भात असून त्यांनी खरेदी केलेला मोबाईल Gionee M2 या कंपनीचा मोबाईल रक्कम रु.9,000/- ला 365 दिवसाच्या वॉरंटीसह रितसर पावतीसह खरेदी केला. मात्र सदर मोबाईल 15 ते 20 दिवसच व्यवस्थित चालला व त्यात बिघड झाल्याचे दिसुन आले. चार्जींग होत असल्याचे दिसत नव्हते म्हणून विप यांना दाखविले असता विप यांनी पावतीची झेरॉक्स व मोबाईल ठेऊन घेतला व 10 ते 12 दिवसांनी बोलावले व त्यांनतरही त्यांच्या तक्रारीचे निरसन झाले नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यावर मा. मंचाने विप क्र. 1 मोबाईल विक्रेता व 2 सदर मोबाईलची उत्पादक कंपनी यांना नोटीस बजावणी केली असता विप क्र.1 विक्रेता यांनी हजर होऊन आपले म्हणणे दिले त्याप्रमाणे त्यांचे मोबाईल विक्रीचे काम असून ते त्यांनी योग्य प्रकारे पार पाडले आहे व तक यांची विक्रीबाबत कोणतीही तक्रार नाही म्हणून तक यांची तक्रार विप क्र.1 विरुध्द रद्द व्हावी असे म्हणणे दिले आहे व विप क्र.2 उत्पादक कंपनी यांनी मा.मंचाची नोटीसवर No Demand असा शेरा पडून परत आलेली आहे म्हणजेच विप क्र.2 यांनी ती स्विकारलेली नाही. तक यांनी विप क्र.1 यांच्याकडे सदरचा मोबाईल तक्रारीसह दाखल केला असता त्यांनी तो विप क्र.2 यांच्याकडे पाठवल्याबाबत सांगितले मात्र विप क्र. 2 यांनी तो दुरुस्त न केल्याने तो तसाच परत आल्याचे दिसतो मात्र तशी स्पष्ट तक्रार विप क्र.1 हे आपल्या म्हणण्यात करत नाहीत तर केवळ आपली ती जबाबदार नाही असे ते म्हणतात. म्हणून सदर मोबाईलची तांत्रीक दोषाबाबत जाणून घेण्याकरीता तक यांच्या विनंती अर्जाप्रमाणे मा.मंचाने मायक्रोमॅक्स कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला सदर मोबाईल पाठविला असता त्यांनी आमच्याकडे सदर मोबाईल दुरुस्तीचे सॅफ्टवेअर व त्यासाठीचे साहित्यही नसल्याने सदर मोबाईल दुरुस्त करणे शक्य नाही करीता त्याच कंपनीकडे मोबाईल दुरुस्तीसाठी पाठविणे योग्य ठरेल असे नमूद केले आहे.
7) प्रस्तुत प्रकरणात विप क्र. 1 ने से दाखल केला आहे विप क्र. 2 यांनी नोटीस बजावूनही हजर न राहिल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
8) दाखल विप क्र.1 चा से जो दि.14/10/2016 रोजी दाखल झाला त्यामध्ये विप क्र.1 चा आक्षेप असा आहे की व्यवसायीक व्देषापोटी हित-शत्रुंनी कट करुन त्यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे व मोबाईल दुरुस्तीचे सर्व काम व अधिकार हे कंपनीचे अधिकृत केअर सेंटरला आहे. तक ची तक्रार ही मोबाईल मधील दोषा संदर्भात आहे. सदरच्या दोष दुरुस्तीचे काम हे विप क्र. 2 चे आहे. या संदर्भात तक्रारीतील कागदपत्रे पाहिली असता ही बाब खरी आहे की विप क्र. 1 हे मोबाईल इंन्ट्रूमेंट विक्रीचे काम करतो व विप क्र.2 हे दुरुस्तीचे अधिकृत केंद्र आहे. विक्रेत्याने दिलेल्या बिलामध्येच कंपनीचे सर्व्हिस विनामुल्य मिळेल असे नमूद केले असून विक्रेत्याने तसे वॉरंटी कार्डही जारी केले आहे. सदरचे वॉरंटी कार्ड हे उत्पादक कंपनी मार्फत दिले असून सदरची उत्पादक कंपनीस तक ने पार्टी केले आहे तथापि तक्रारीत दाखल वॉरंटी कार्ड हाच त्याचा से समजुन त्या संदर्भात विप क्र.2 मार्फत मोबाईल मधील दुरुस्ती करुन मिळणे गरजेचे होते तथापि विप क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश झाल्याने विप क्र. 2 चा निष्काळजीपणा मान्य करण्याशिवाय या न्यायमंचास पर्याय नाही.
9) अनेक कंपन्या विक्रेत्या मार्फत आपले उत्पादन विक्री करत असतात तसेच या संदर्भात उत्पादकाने दिलेली वॉरंटी कार्डही देतात. विक्री बिलावर अनेक प्रकारचे कायदेशीर सुसंगत नसलेल्या अटी व शर्ती लिहिलेल्या असतात त्याच बरोबर वॉरंटी कार्ड वरील अटी व शर्ती या विक्रेत्याच्या अटी व शर्ती कायद्याशी तसेच ऐकमेकाशी सुसंगतही नसतात त्यामुळे ग्राहकांचा बरेचदा गोंधळ होते. वस्तुची विक्री केल्यानंतर विक्री पश्च्यात सेवा देण्याचे बंधन हे विक्रेता स्वत: अथवा अधिकृत सेवा पुरवठादार यांचे मार्फत विप वर वॉरंटी कार्ड मधील अटी व शर्ती नुसार बंधनकारक असते व त्याला कायदेशीर दायित्व सुध्दा आहे. विप क्र. 1 ने विप क्र. 2 मार्फत सेवा ग्राहकाला मिळणे अपेक्षित आहे असे न करता माझा केवळ/ फक्त विक्रीपुरता संबंध आहे असे म्हणणे कोणत्याही विक्रेत्याला चालणार नाही. वस्तुची विक्री या व्याख्येत दर्जेदार वस्तुची विक्री हे गृहीतक आहे.
10) वॉरंटी कार्ड हे विक्रेत्या मार्फत उत्पादक देत असल्याने उत्पादक, विक्रेता यांच्यामध्ये मास्टर व एजंट असे नाते तयार होते. तसेच उत्पादक याच सर्व्हिस प्रोव्हाईडरला नेमणूक करत असल्याने त्यांच्यामध्येही अश्याच प्रकारे नाते निर्माण होते. त्यामुळे या प्रस्तुत प्रकरणातील कंपनीस त्रुटीपुर्ण सेवेचे अथवा उत्पादनातील दोषाचे निराकरण न होणे याचे दायित्व उत्पादक, विक्रेता व सेवा पुरवठादार या तिन्हींवर येतो.
11) प्रस्तुत प्रकरणात उत्पादक हा पार्टी नसल्याने वॉरंटी कार्ड मधील सुचनांचे पालन विक्रत्याने न केल्यामुळे तसेच विप ने ही न केल्यामुळे Whenever any agent acts against the direction of his master in this personal capacity then master cannot be liable या माष्टर व एजंट या नात्यामधील तत्वानुसार विक्रेत्याने सेवा पुरवठादाराने ग्राहकास सेवा देण्याचे निर्देश उत्पादकाने दिले असल्याने व हे निर्देश विप क्र.1 व 2 यांनी न पाळल्याने विप क्र. 1 व 2 यांनी ग्राहकास सेवा देण्यात त्रुटी केली आहे त्यामुळे विप क्र. 1 व 2 यांनी प्रसतुत प्रकरणामध्ये त्रुटीयुक्त सेवा पुरवठा करण्याबद्दल दोषी धरण्यात येत आहे म्हणून म्हणून आम्ही मुद्दा क्र.1, 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
1) विप क्र.1 व 2 यांनी तक यांना सदर मोबाईल एक महिन्यात ग्राहकास समाधानकारकरित्या दुरुस्त करुन देण्यात यावा किंवा सदर जुना मोबाईल परत घेऊन त्यांचे इन्हाईस बिलावरिल रक्कम विप क्र.1 ने परत द्यावे.
2) विप क्र.1 यांनी तक यांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
3) विप क्र.2 यांनी तक यांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-(रुपये तिन हजार फक्त) द्यावे.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे दाखल तक्रारीतील मा.सदस्यांसाठींचे संच इच्छूक अपीलार्थी पक्षकाराने हस्तगत करावेत.
(श्री.आर.एस.राठोडकर) (श्री.मुकुंद.बी.सस्ते)
सदस्य प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.