तक्रारदार : स्वतः
सामनेवालेकरिता : श्रीमती सुधा कलोटी, वकील
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*
निकालपत्र
तक्रारीचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले क्र.1 ही संगणकांचे उत्पादन, विक्री व वितरण करणारी कंपनी आहे. तक्रारदारांच्या वडीलांनी सामनेवाले यांनी उत्पादित केलेला एक संगणक हरिओम कॉम्प्युटर सर्व्हिसेस, दोस्ती नेपच्युन, शॉप क्र.3, दोस्ती इस्टेटस्, वडाळा-पूर्व, मुंबई यांचेकडून दि.20.10.2006 रोजी रक्कम रु.41,200/- किंमतीस खरेदी केला. त्या संगणकाची दोन वर्षांची वॉरंटी देण्यात आली होती.
2 तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे दि.06.06.2009 रोजी संगणकाचा सी.डी.रायटर खराब झाला व त्याबद्दल तक्रारदारांनी तक्रार दिली व सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने त्याची दुरुस्ती करुन दिली. त्यानंतर, जुलै, 2009 मध्ये संगणक अचानक बंद पडणेचा दोष दिसुन आला, त्याबद्दल ही तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे तक्रार दिली व तक्रारदारांना काही किरकोळ दुरुस्त्यां करुन तो चालु करुन देण्यात आला तरी देखील संगणक व्यवस्थित चालू शकत नव्हता. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे तक्रार केल्यानंतर सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणकातील डी.व्ही.डी.रायटर, मदर बोर्ड व माऊस बदलणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. दरम्यान संगणकातील उघडझाप (flickering) हा दोष दिसुन आला. सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणकातील सदोष भाग बदलला तरी देखील संगणक व्यवस्थित चालत नव्हता. त्यांनतर, सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणकाची तपासणी करुन संगणकामध्ये अन्य दोष आहेत असे तक्रारदारांना सांगितले. या प्रकारे, तक्रारदारांचे असे कथन आहे की, सामनेवाले यांनी उत्पादित केलेला संगणक सदोष असून त्यामुळे तक्रारदारांना संगणकाचा वापर व्यवस्थितपणे करता येत नाही. तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन संगणक हे त्यांच्या व्यवसायाकामी आवश्यक आहे व सदोष संगणकामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. संबंधीत सदोष संगणक व्यवस्थित चालत नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सामनेवाले यांनी तक्रारदारांना संगणकाच्या संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली आहे असा आरोप केला व तक्रारदारांना संगणकाची किंमत रु.45,000/- व्याजासह अदा करावी असा आदेश देणे कामी दाद मागितली.
3 सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये वॉरंटी कराराप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत संगणकाची किंमत ग्राहकास परत मिळु शकत नाही असे कथन केले. संगणकाचे विक्रेते हरिओम कॉम्प्युटर सर्व्हिसेस यांना तक्रारदारांनी पक्षकार केलेले नसल्याने तक्रार चालु शकत नाही असे कथन केले. सामनेवाले यांनी आपल्या कैफियतीत असे कथन केले की, तक्रारदारांनी दि.20.10.2006 रोजी संगणक विकत घेतला होता. त्याची वॉंरंटी एक वर्षाची होती व त्याप्रमाणे, दि.19.10.2006 रोजी ती वॉरंटी संपली. त्यानंतर, तक्रारदारांनी दोन वर्षांची वॉंरंटी वाढवुन घेतली जी दि.19.10.2006 रोजी संपली. सामनेवाले असे कथन करतात की, त्यांची सेवा जर समर्थनीय नसती तर निश्चितच तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून वॉरंटी कालावधीची मुदत वाढवुन घेतली नसती.
4 सामनेवाले असे कथन करतात की, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे, सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारांच्या संगणकाची तपासणी करुन वेळोवेळी दुरुस्ती करुन दिलेली आहे. याप्रमाणे, तक्रारदारांना संगणकाचे संदर्भात सामनेवाले यांनी सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली. या आरोपास सामनेवाले यांनी नकार दिला आहे.
5 तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले तर सामनेवाले यांनी त्यांचे अभियंते-श्री.मिलींद आयरे यांचे शपथपत्र दाखल केले. तसेच कैफियतीसोबत सामनेवाले यांचे व्यवस्थापक यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्हीं बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला व आवश्यक ती कागदपत्रं दाखल केली.
6 प्रस्तुत मंचाने, तक्रार, कैफियत, शपथपत्रे, कागदपत्रं व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन, तक्रारीच्या निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष संगणक संच विक्री करुन सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही, परंतु दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविणेत कसुर केली. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून संगणकाची किंमत वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही |
3 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून अन्य काही निर्देष मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारणमिमांसाः-
7 तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत हरिओम कॉम्प्युटर सर्व्हिसेस यांचेकडून सामनेवाले यांनी उत्पादित केलेला संगणक विकत घेतल्याची पावती दि.20.10.2006 रोजीची हजर केलेली आहे. त्यावरुन, तक्रारदारांनी संगणक संचाची एकुण किंमत रु.47,000/- विकत घेतल्याचे दिसुन येते. त्यासोबत, वॉरंटी कार्डची प्रत आहे. त्यामध्ये संगणकाची वॉरंटी एक वर्षाची असल्याचे दिसुन येते. दरम्यान, तक्रारदारांनी दोन वर्षाकरिता वॉंरंटीचा कालावधी वाढवुन घेतला, त्याची नोंद तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक-18 वर हजर केलेल्या कार्डामध्ये नमुद आहे. तक्रारदारांनी आपले तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले यांच्या विनंतीवरुन रक्कम रु.3,800/- भरुन परत तक्रारदारांनी पुढील दोन वर्षांकरिता वॉरंटीचा कालावधी वाढविला व ती वॉरंटी दि.19.10.20011 पर्यंत होती. या बद्दलची नोंद निशाणी-क-3 यामध्ये केल्याचे दिसुन येते.
8 तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक-24-निशाणी-सी-6 येथे एक पत्र दि.04.01.2010 चे दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रारदार असे कथन करतात की, संगणक हा सदोष होता व खरेदी केल्यानंतर चार महिन्याच्या आत त्याचा मदर बोर्ड बदलावा लागला. तथापि, तक्रारदारांनी जॉबकार्डच्या ज्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत, त्यामध्ये हयाबद्दलची नोंद दिसुन येत नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत देखील असे कथन केले नाही की, संगणक खरेदी केल्यानंतर चार महिन्याच्या आत त्याचा मदर बोर्ड बदलावा लागला. तक्रारदारांनी संगणकाच्या संदर्भात तक्रार ही दि.06.06.2009 रोजी डी.व्ही.डी.रायटरच्या संदर्भात होती ती मदरबोर्डच्या संदर्भात नव्हती. त्यापूर्वी, देखील तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे संगणक दुरुस्तीच्या संदर्भात तक्रार केल्याचे दिसुन येते. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.13 मध्ये असे कथन केले आहे की, संगणकामध्ये मुलभूत दोष असल्यामुळे संगणकाचा मदर बोर्ड खरेदीपासुन चार महिन्याच्या आत बंद झाला व तो बदलावा लागला. या संदर्भात, तक्रारीच्या निशाणी-क-10 येथे जॉबकार्डच्या प्रतीं हजर केलेल्या आहेत. त्याचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, दि.10.02.2007 रोजी सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारांच्या तक्रारीवर संगणकाची तपासणी केली व जॉबकार्डमध्ये संगणक चालू नाही असा अभिप्राय नोंदविला व मदर बोर्डमध्ये बिघाड आहे असे कथन केले. त्यानंतर, तक्रारीचे पृष्ठ क्रमांक-36 वर दि.13.02.2007 चे जॉबकार्ड आहे. त्यामध्ये, सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणक चालू होत नाही असा अभिप्राय नोंदविला आहे. जॉबकार्डमध्ये असाही अभिप्राय आहे की, विद्युत प्रवाह अचानक बंद झाल्याने संगणक दुरुस्तीची कार्यवाही करता आली नाही. त्यानंतर, दोन दिवसानंतर म्हणजे दि.15.02.2007 रोजी तक्रारदारांच्या तक्रारीवरुन सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणकाची पुन्हा तपासणी केली व जॉबकार्ड पृष्ठ क्र.37 मध्ये अशी नोंद घेतली की, संगणक चालू नाही. पुढील कार्यवाहीबद्दल आपला अभिप्राय दिला की, मदर बोर्ड बदलावा लागेल. संपुर्ण संगणकाची तपासणी केली व सी.पी.यु. देखील बदलावा लागेल. त्यानंतरचे, जॉबकार्ड दि.20.02.2007, पृष्ठ क्र.38 यामधील नोंदी असे दर्शवितात की, सी.पी.यु.चालु होत नव्हता व पुढील कार्यवाहीबद्दल अशी नोंद आहे की, सी.पी.यु. पंखा बदलला. तसेच मदर बोर्ड बदलावा लागेल अशी नोंद केली. जॉबकार्ड पृष्ठ क्र.39 चे दि.27.02.2007 चे पत्रामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना लिहून दिले की, सी.पी.यु. दूरुस्त कामी ताब्यात घेतलेला आहे. तो सी.पी.यु. दि.01.03.2007 रोजी दुरुस्त करुन तक्रारदारांना परत दिला अशी नोंद जॉबकार्ड पृष्ठ क्र.40 मध्ये आहे. याप्रमाणे, निशाणी-अ जॉबकार्डाच्या प्रतीं असे दर्शवितात की, संगणक खरेदी केल्यानंतर काही दिवसानंतर संगणकामध्ये दोष दिसुन आले व सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने वेळोवेळी संगणकाची तपासणी केली व मदर बोर्ड तसेच सी.पी.यु. बदलणे व त्यात दुरुस्ती करणे ही कार्यवाही केली. त्यानंतर, 2009 मध्ये म्हणजे दि.12.06.2009 रोजी तक्रारदारांनी डि.व्ही.डी.रायटर नादुरुस्त झाल्याचे तक्रार केली. त्याची नोंद जॉबकार्ड निशाणी-क-2 तक्रारीच्या पृष्ठ क्र.19 वर आहे. सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तो दोष दुर केला. त्यानंतर, जॉबकार्ड दि.26.09.2009 चे पृष्ठ क्र.21 मधील नोंदी असे दर्शवितात की, संगणक बंद होता व सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने त्याची पाहणी केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना काही सुचना दिल्या व त्याप्रमाणे संगणक वापर करावा असे सांगितले. तरीदेखील संगणकामध्ये बिघाड होत राहीला व जॉबकार्ड पृष्ठ क्र.22, दि.03.12.2009 मधील नोंदी असे दर्शवितात की, संगणक बंद होता व सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने तपासणी केल्यानंतर त्यांना असे दिसुन आले की, मदर बोर्ड, डि.व्ही.डी.रायटर व माऊस यामध्ये दोष असुन ते बदलावे लागतील. जॉबकार्ड पृष्ठ क्र.29, दि.13.01.2010 मधील नोंदी असे दर्शवितात की, डी.व्ही.डी., एस.एम.पी.एस. व माऊस तसेच मदर बोर्ड यामध्ये दोष असुन ते बदलावे लागतील. तथापि दोष कायम राहीला व तक्रारदारांनी ही बाब त्यांचे पत्र दि.22.01.2010 (पृष्ठ क्र.30) याव्दारे सामनेवाले यांना कळविले व त्यामध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, दि.13.01.2010 रोजी सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने संगणकाचे दुरुस्तीची कार्यवाही केल्यानंतरही व सी.डी.ट्रे अन्ड माऊस बदलल्यानंतरही संगणक अद्याप बंद आहे यावरुन, दि.13.01.2010 चे दुरुस्तीनंतर देखील दि.22.01.2010 रोजी संगणक बंद होता असे दिसुन येते. जॉबकार्ड दि.27.01.2010 पृष्ठ क्र.33 मधील नोंदी असे दर्शवितात की, संगणक बंद होता व सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने मदर बोर्ड व रॅम (RAM) तपासणीकामी ताब्यात घेतली. दुस-याच दिवशी म्हणजे दि.28.01.2010 रोजीची नोंद अशी दर्शविते की, 250 वॅट एस.एम.पी.एस. बदलूनही युएसबी पोर्ट व माऊस समाधानकारक काम करीत नव्हते.
9 दरम्यान, वर नमुद केल्याप्रमाणे, तक्रारदारांनी सन-2007 नंतर दोन वर्षाची वॉरंटी वाढवुन घेतली होती व ती दोन वर्षाची वॉंरंटी दि.20.10.2009 रोजी संपल्यानंतर पुन्हा दोन वर्षाची वॉरंटी वाढवुन घेतली त्याच्या प्रतीं तक्रारीच्या पृष्ठ क्र.18 व 20 वर आहे.
10 वरील, सर्व पुराव्यावरुन असे दिसुन येते की, सामनेवाले यांनी उत्पादित केलेला व तक्रारदारांनी त्यांच्या विक्रेत्याकडून खरेदी केलेला संगणक यामध्ये वारंवार दोष निर्माण होत होता व तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडे वारंवार संपर्क प्रस्थापित करावा लागला होता. सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने ब-याच वेळेस त्यातील काही भाग बदलला व दुरुस्तीची कार्यवाही केली. परंतु संगणक वारंवार बंद पडत होता. त्याबद्दल सामनेवाले यांच्या कैफियतीमध्ये असे कथन आहे की, तक्रारदारांच्या विनंतीवरुन वेळोवेळी संगणकात दुरुस्ती करुन देण्यात आली होती परंतु तक्रारदारांना संगणकाची किंमत परत पाहिजे होती व वॉरंटीच्या कराराप्रमाणे संगणकाची किंमत मिळु शकत नाही. वॉरंटीच्या कालावधीमध्ये संबंधीत कंपनीने संगणकाची दुरुस्ती करुन देणे ही बाब अपेक्षित असते. जी जबाबदारी सामनेवाले यांनी पार पाडली ती देखील संगणक वारंवार बंद पडल्याने तक्रारदारांची गैरसोय व कुंचंबना झाली. तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन संगणक हा त्यांच्या करिता महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. या प्रकारचे कथन तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत तसेच लेखी युक्तीवादात केले आहे.
11 तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये संगणक दुरुस्त होऊन मिळावा अथवा अन्य संगणक मिळावा अशी दाद मागितली नसुन संगणकाची किंमत परत मिळावी अशी दाद मागितली आहे, या संदर्भात सामनेवाले यांनी आपल्या कैफियतीसोबत त्यांचे अभियंता-श्री.मिलींद अहिरे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये, श्री. मिलींद अहिरे यांनी असे कथन केले की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे प्रतिनिधींना धमक्या देत होते, कायदेशिर कार्यवाही करण्याची धाक दाखवत होते व शिवीगाळ करीत होते. तरी देखील सामनेवाले यांच्या प्रतिनिधीने वेळोवेळी संगणकाची दुरुस्ती केली. श्री.अहिरे यांनी आपले शपथपत्रामध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, दि.08.03.2010 रोजी संगणक संपुर्णपणे दुरुस्त करुन तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला व त्यानंतर, संगणक अद्याप व्यवस्थित चालु आहे. सामनेवाले यांचे अभियंत्याचे वरील शपथपत्र प्रस्तुत मंचाकडे दि.13.08.2010 रोजी दाखल करण्यात आले. त्याच दिवशी, तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. त्यानंतर, तक्रारदारांनी दि.21.01.2011 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला. त्या लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदारांनी असे कथन केले नाही की, दि.08.03.2010 रोजी संगणक पुन्हा बंद पडला होता व चालू होत नव्हता. थोडक्यात, दि.08.03.2010 नंतर म्हणजे श्री.अहिरे यांनी आपले शपथपत्रात कथन केल्याप्रमाणे, संगणकाची संपुर्ण दुरुस्त करुन तो तक्रारदारांना परत दिल्यानंतर, पुन्हा संगणक बिघडला आहे, बंद आहे, याबद्दलचे तक्रारदारांचे कथन नाही व त्याबद्दल पुरावा नाही. यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, मार्च, 2010 नंतर संगणक व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये पुन्हा बिघाड झाला असता किंवा बंद पडला असता तर निश्चितच तक्रारदारांनी जादा शपथपत्र दाखल करुन त्या स्वरुपाचे कथन करुन अभिलेखात दाखल केले असते. यावरुन, संगणक बदलुन देणे किंवा दुरुस्तीची कार्यवाही करणे, या स्वरुपाचे निर्देश सामनेवाले यांना देण्याची आवश्यकता नाही. त्याच प्रमाणे, सध्या संगणक व्यवस्थित चालु आहे असा निष्कर्ष नोंदविले नंतर, तक्रारदारांना सामनेवाले यांनी किंमत परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य होणार नाही.
12 तथापि, वर नमुद केल्याप्रमाणे, सामनेवाले यांनी उत्पादित केलेला व त्यांचे विक्रेत्याने विक्री केलेला संगणक वारंवार बिघडणे व दुरुस्ती कामी तो बराच काळ वापरात न आल्याने तक्रारदारांची कुचंबना व गैरसोय निश्चितच झाली असणार. वर नमुद केल्याप्रमाणे, तक्रारदारांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ती आवश्यक बाब ठरते. तक्रारदारांच्या कथनाचा व पुराव्यांचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व खर्चाबद्दल एकत्रितपणे रु.30,000/- नुकसानीबद्दल अदा करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
वरील चर्चेवरुन व निष्कर्षावरुन, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार अंशतः मंजुर करण्यात येतो.
(2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना संगणकाच्या दुरुस्तीच्या संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली हे जाहीर करण्यात येते.
(3) सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईबद्दल रक्कम रु.30,000/- प्रस्तुतच्या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन आठ आठवडयाच्या आत अदा करावी अन्यथा त्यावर विहीत मुदत संपल्यापासुन ते रक्कम अदा होईपर्यंत 9% दराने व्याज द्यावे.
(4) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.