तक्रार दाखल ता.22/07/2015
तक्रार निकाल ता.28/11/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे कसबा तारळे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. वि.प.क्र.1 हे एच.टी.सी.मोबाईल हॅन्डसेटची कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 चे डिलर आहेत. यातील तक्रारदाराने वि.प.क्र.2 यांचेकडून वि.प.क्र.1 या कंपनीचा एच.टी.सी.मोबाईल हॅन्डसेट दि.10.06.2014 रोजी खरेदी केला. सदर मोबाईल हॅन्डसेट मॉडेल एच.टी.सी. डिझायर डयुएल सिम, ब्लॅक बॅच नं.351745060952394 असा होता. प्रस्तुत हॅन्डसेट वि.प.क्र.2 डिलरकडून दि.10.06.2014 रोजी इनवहॉईस नं.एस.सी./1306 ने रक्कम रु.22,750/- या किंमतीस खरेदी केला होता. सदर मोबाईल हॅन्डसेट खरेदी केलेनंतर फक्त दोन महिने तो व्यवस्थित चालला. त्यानंतर मात्र प्रस्तुत मोबाईल हॅन्डसेट गरम होऊ लागला, त्याची बॅटरी डिस्चार्ज होऊ लागली, चार्जर डॅमेज झाला, डिस्प्ले डॅमेज झाला, मोबाईल हँग होऊ लागला. सदरची तक्रार यातील वि.प.क्र.2 यांना वरचेवर जाऊन तक्रारदाराने तक्रार केली होती. परंतु वि.प.क्र.2 कंपनीने हॅन्डसेट बदलून देणेस किंवा त्यांचे पैसे परत करणेस अथवा रिपेअर करुन देणेस नकार दिला. वि.प.क्र.2 ने सर्व्हीस सेंटरमध्ये जाऊन दुरुस्त करुन घ्या असे सांगितले. यातील तक्रारदाराने एच.टी.सी. केअर सेंटर, अयोध्या टॉवर बिल्डींग, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे वरचेवर जाऊन त्यांचेकडून मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन घेणेचा प्रयत्न केला. परंतु हॅन्डसेट दुरुस्त झाला नाही. त्यावेळी तक्रारदाराने हॅन्डसेट दुरुस्त होत नाही असे लेखी लिहून द्या असे त्यांना सांगितले असता, तक्रारदाराला वि.प.ने अरेरावीची भाषा वापरुन हाकलून दिले. सबब, तक्रारदाराने वि.प.क्र.2 कडेही याबाबत तक्रार केली असता, वि.प.क्र.2 ने मोबाईल दुरुस्त करणेची जबाबदारी आमची नाही तुम्ही कोर्टात जा असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने दि.06.06.2015 रोजी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस पाठवून हॅन्डसेट बदलून द्या अगर रक्कम परत द्या असे कळविले असता, वि.प.यांनी तक्रारदाराचे नोटीसला काहीही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे वि.प.ने तक्रारदाराचा मोबाईल हॅन्डसेट वॉरंटी पिरीयडमध्ये नादुरुस्त झाला असतानाही तो दुरुस्त करुन दिला नाही अथवा बदलून दिला नाही अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रादाराने मे.मंचात प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा, वि.प.यांचेकडून तक्रारदार यांना मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु.22,750/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने (क्लेम तारखेपासून) वसुल होऊन मिळावेत. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी वि.प.कंपनीकडून रक्कम रु.5,000/-, तक्रारदार यांना वि.प.ने मोबाईल हॅन्डसेट बदलून न दिलेने तक्रारदाराचे झाले नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/- तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- वि.प.यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केलेली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, मोबाईल खरेदीचे टॅक्स इनव्हाईस, वि.प.यांना पाठविलेली नोटीस, नोटीस पाठवलेल्या पोस्टाच्या पावत्या, पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, वगैरे कागदपत्रे या कामी तक्रारदाराने दाखल केलेली आहेत.
5. वि.प.क्र.1 यांनी या कामी म्हणणे, दाखल केले आहे तर वि.प.क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र.1 वर पारीत झालेला आहे. वि.प.क्र.1 यांनी म्हणण्यासोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत. तसेच वारंवार संधी देऊनही पुराव्याचे शपथपत्रही वि.प.क्र.1 ने दिलेले नसलेमुळे वि.प.क्र.1 यांना पुरावा देणेचे नाही असे गृहीत धरुन प्रकरण युक्तीवादावर ठेवणेत आले व उभय विधीज्ञांचा युक्तीवाद ऐकणेत आला.
6. वि.प.क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
अ. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबुल नाही.
ब. तक्रारदार हे केअर सेंटरला मोबाईल दुरुस्त करणेसाठी कधीही गेले नव्हते व नाहीत तसा कोणताही पुरावा तक्रारदाराने या कामी दाखल केलेला नाही. त्यामुळे वि.प.ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. तक्रार अर्ज खोटा व चुकीचा असून तो फेटाळणेस पात्र आहे.
क. तक्रारदाराचा हॅन्डसेट हा अत्यंत चांगला असून त्यात कोणताही उत्पादित दोष नाही. सदरचा हॅन्डसेट सदोष असलेची बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही.
ड. तक्रारदाराने वि.प. यांचेकडून पैसे मिळविणेच्या उद्देशाने विनाकारण वॉरंटी संपणेच्या शेवटच्या दिवशी वि.प.यांना खोटया मजकूराची नोटीस पाठवून चुकीची तक्रार दाखल केली आहे.
इ. तक्रारदाराने विनाकारण चुकीचा व खोटा तक्रार अर्ज दाखल केला आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे आक्षेप वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जावर नोंदविले आहेत.
7. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.यांचेकडून मोबाईल हॅन्डसेटची रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.क्र.1 कंपनीचा एच.टी.सी.मोबाईल हॅन्डसेट वि.प.क्र.2 यांचेकडून दि.10.06.2014 रोजी रक्कम रु.22,750/- या किंमतीस खरेदी केला. प्रस्तुत मोबाईलचा मॉडेल एच.टी.सी.डिझायर डयुएल सिम, ब्लॅक, बॅच नं.351754060952394 हा होता. प्रस्तुत हॅन्डसेट खरेदीचे बिल टॅक्स इनव्हाईस तक्रारदाराने या कामी दाखल केले आहे. तसेच वि.प.नेही प्रस्तुत बाब मान्य व कबूल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्वीवादपणे सिध्द झालेली आहे.
9. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचा वादातीत मोबाईल हॅन्डसेट खरेदी केलेनंतर दोन महिने व्यवस्थित चालला. परंतु नंतर तो नादुरुस्त झालेने तक्रारदार वि.प.क्र.2 यांचेकडे जाऊन मोबाईल दुरुस्त करुन मागणी केली असता, वि.प.क्र.2 यांनी केअर सेंटरमधून दुरुस्त करुन घेणेस सांगितलेने तकारदाराने केअर सेंटरमध्ये जाऊन त्यांचेकडून प्रस्तुत मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन घेणेचा प्रयत्न केला परंतु हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला नाही. हॅन्डसेट दुरुस्त होत नाही असे लेखी देणेबाबत तक्रारदाराने सांगितले असता, केअरसेंटरमधून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. उलट अरेरावीची भाषा वापरुन तक्रारदाराला हाकलून दिले. पुन्हा तक्रारदाराने वि.प.क्र.2 यांना मोबाईल दुरुस्त करुन देणेची विनंती केली. परंतु सदर वि.प.क्र.2 यांनी मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त अथवा बदलून देणेची जबाबदारी आमची नाही तुम्ही कोर्टात जावा, दुरुस्त होऊन मिळणार नाही, तुम्ही काय करायचे ते करा ? सबब, तक्रारदाराने वि.प.ना दि.06.06.2015 रोजी वि.प.कंपनीला कळवून हॅन्डसेट बदलून द्या अगर मोबाईलची किंमत परत द्या अशी वकीलामार्फत रजि.पोस्टाने नोटीस पाठवली. प्रस्तुत नोटीस वि.प.यांना मिळालेली आहे ही बाब वि.प.क्र.1 ने दिले म्हणणे/कैफियतीत मान्य व कबुल केली आहे. परंतु वि.प.यांना तक्रारदाराची नोटीस मिळूनही वि.प.ने प्रस्तुत नोटीसला वि.प.ने कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणजेच तक्रारदाराचे पाठवले नोटीसमधील कथन वि.प.यांना मान्य होते असाच अर्थ होतो. प्रसतुत कामी वि.प.क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीतील आक्षेप सिध्द करणेसाठी कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा या कामी दाखल केलेला नाही. तर वि.प.क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी-1 वर पारीत झालेला आहे. वरील सर्व बाबीं तक्रारदारा यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, उभय विधीज्ञांचा तोंडी युक्तीवाद, वगैरेचा ऊहापोह करता, वि.प.यांनी तक्रारदार यांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट व निर्वीवादपणे सिध्द झाले आहे. सबब, सदर कामी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारदारांना वादातीत मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु.22,750/- (अक्षरी रक्कम रुपये बावीस हजार सातशे पन्नास मात्र) अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याज दराने तक्रारदाराला मिळणे न्यायोचित होणार आहे व तक्रारदार व वि.प.यांचेकडून प्रस्तुत रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
9. तक्रारदाराने त्यांचे मोबाईल फोन बदलून न मिळालेने/दुरुस्त करुन न मिळालेने नुकसान रक्कम रु.50,000/- झालेचे म्हटले आहे परंतु हे नुकसान झालेचे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. सबब, सदरची नुकसानभरपाई तक्रारदाराला देणे न्यायोचित होणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सबब, प्रस्तुत कामी, आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला वादातीत मोबाईल हॅन्डसेटची किंमत रक्कम रु.22,750/- (अक्षरी रक्कम रुपये बावीस हजार सातशे पन्नास मात्र) तसेच प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे.9टक्के व्याजाची रक्कम अदा करावी.
3 मानसिक त्रासापोटी वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) वि.प.ने तक्रारदाराला अदा करावी.
4 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.क्र.1 व 2 यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.