न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. मनिषा सं.कुलकर्णी, सदस्या (दि.26/04/2022)
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. वि प यांना आयोगाचे नोटीसचा आदेश होऊन वि प क्र.1 व 2 हे नोटीस लागू होऊनही सदर आयोगासमोर हजर झालेले नाहीत. सबब वि प यांचे विरुध्द नि.1 वर " एकतर्फा आदेश " पारीत करण्यात आला.
2. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे— वि प क्र.1 ही अधिकृत रेडमी कंपनीचे मोबाईलची विक्री व दुरुस्ती करणारी कंपनी आहे. तसेच वि प क्र.2 ही रेडमी कंपनी अधिकृत केअर सेंटर आहे. कोल्हापूर तसेच त्यांचे अंतर्गत मोबाईल संदर्भात ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी ही वि प क्र.2 यांचेवर आहे. तक्रारदार यांनी दि.27/09/2017 रोजी Redmi 4- FDD – in off-line – 4 + 64 GB Black IMEI (MEID (866418033505402, SN 16342/80313553 invoice Date 27/09/2017 Invoice No.6586 Accessories Mobile Phone invoice या वर्णनाचा मोबाईल खरेदी केलेला होता. वर नमुद केलेला मोबाईल 2 वर्षे तक्रारदार वापरत होते. तथापि, डिसेंबर-2019 मध्ये सदर मोबाईलचे Auto power of fault दिसून आले. तदनंतर तक्रारदार यांनी वि प क्र.1 गुरुकृपा मोबाईल सेल्स अॅन्ड सर्व्हीसेस या अधिकृत मोबाईल केअर सेंटरकडे सदर मोबाईल दुरुस्तीकरिता दिला होता. वि प क्र.1 यांचेकडे दि.11/12/2019 रोजी सदर मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदार यांना वि प क्र.1 यांनी दिलेला होता. सदर मोबाईलमध्ये Main Board assembly Redmi-4 हा पार्ट बदलून नवीन घालणेत आलेला होता. तथापि, दि.19/12/2019 रोजी सदर मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदार यांना वि प क्र.1 यांनी दिलेला होता. सदर सर्व्हीस रेकॉर्डचे पत्रक वि प क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेले होते. वि प क्र.1 यांनी तक्रारदार यांना सदरचा पार्ट हा रक्कम रु.6311.82/- इतका सर्व्हीस चार्ज लावून दिलेला होता. मोबाईल 100 टक्के दुरुस्त झालेला असून काही हेाणार नाही अशी हमी वि प क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेली होती. तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल वापरणेस सुरुवात केली. मात्र 8 दिवसातच म्हणजे दि.30/12/2019 रोजी तक्रारदार हे दवाखान्यात जात असताना मोबाईल स्फोट होऊन अचानक तक्रारदारांच्या डाव्या मांडीला एक इंच जखम झाली. तदनंतर तक्रारदार यांना दवाखान्यात अॅडमीट केले. तक्रारदार यांचे कपडे पूर्णपणे जळालेले होते. मोबाईल फुटून आजुबाजूला विखुरला होता. तक्रारदार हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असून वि प क्र.1 व 2 यांचे कंपनीकडील मोबाईलचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रचंड मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तक्रारदार यांनी रितसर दुरुस्ती व मोबाईलचा पार्ट घालूनही मोबाईलचा स्फोट झाला होता. त्यामुळे वि प क्र.1 व 2 या मोबाईल कपंनीचा व मोबाईल पार्ट सेवा त्रुटीचा अभाव आढळून आला आहे. वि प क्र.1 व 2 यांचे कंपनीचा मोबाईल सदोष Main Board Assembly मुळे सदर मोबाईलमध्ये बिघाड होऊन तक्रारदार यांचा मोबाईलचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन शारिरीक नुकसानसुध्दा झालेले आहे. दवाखान्याचे उपचाराकरिता रक्क्म रु.40 ते 50 हजार खर्च आला असून तक्रारदार यांना घरी बसावे लागलेने व्यवसायात एक लाख पन्नास हजारचे नुकसान झालेले आहे. सबब या संदर्भात दि.24/11/20 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. मात्र वि प यांनी त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. सबब वि प यांनी मोबाईल सदोष सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या स्फोटामुळे तक्रारदार यांना झालेला दवाखान्याचा खर्च अंदाजे रक्कम रु.1,00,000/- व व्यावसायिक नुकसान रक्कम रु.1,50,000/- देणेबाबत आदेश वहावा तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी वकील फी व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रक्कम रु.15,000/- मिळावेत यासाठी आयोगात सदर तक्रार दाखल केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र.1 ते 8 कडे कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये अ.क्र.1 कडे वि प क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेले मोबाईल दुरुस्तीचे सेवा रेकॉर्ड पत्र, तक्रारदार मोबाईल स्फोटामध्ये जखमी झालेची छायाचित्रे, फोटोचे बील, वि प यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीसची प्रत, पोस्टाची पावती व वि प क्र.1 यांना नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोहोच, वि प क्र.2 चा पोष्टाचा ट्रॅकींग रिपोर्ट, तक्रारदारांची दै.पुढारी या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेली बातमी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
4. वि प क्र.1 व 2 यांना आयोगाची नोटीस लागू होऊनही तसेच वि प क्र.1 व 2 हे आयोगासमोर हजर होऊन म्हणणे दाखल केलेले नाही. सबब वि प क्र.1 व 2 यांचे विरुध्द "एकतर्फा" आदेश पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | तक्रारदारांना सदोष मोबाईल विक्री करुन व विक्री पश्चात सेवा न देऊन वि प यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. कडून मोबाईलची किंमत तसेच दवाखान्याचा खर्च परत मिळणेस तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. अंशत: |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
6. मु्द्दा क्र.1 :- तक्रारदाराने वि प क्र.1 यांचेकडून Redmi 4- FDD – in off-line – 4 + 64 GB Black IMEI (MEID (866418033505402, SN 16342/80313553 invoice Date 27/09/2017 Invoice No.6586 Accessories Mobile Phone invoice या वर्णनाचा मोबाईल दि.27/09/2017 रोजी खरेदी केलेला होता. या संदर्भात तक्रारदाराने मोबाईल दुरुस्ती केलेले रेकॉर्डपत्र याकामी दाखल केलेले आहे. तसेच सर्व्हीस रेकॉर्ड हे वि प यांचेच आहे. तसेच वि प क्र.2 ही रेड मी कंपनीचे अधिकृत केअर सेंटर आहे. सबब तक्रारदार हे वि प क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. यावरुन तक्रारदार व वि प यांचेमध्ये सेवा घेणारे व सेवा पुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब तक्रारदार हे वि प यांचे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे वि प यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. मु्द्दा क्र.2 ते 4 :- तक्रारदार यांनी तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे वि प क्र.1 यांचेकडून Redmi 4- FDD – in off-line – 4 + 64 GB Black IMEI (MEID (866418033505402, SN 16342/80313553 invoice Date 27/09/2017 Invoice No.6586 Accessories Mobile Phone invoice या वर्णनाचा मोबाईल दि.27/09/2017 रोजी खरेदी केलेला होता. मात्र अर्जात नमुद केलेप्रमाणे दोन वर्षे मोबाईल वापरणेस सुरुवात केलेनंतर अचानक मोबाईलचा स्फोट झालेला आहे. ही बाब तक्रारदारयांनी तक्रारअर्जासोबत दाखल केले कागदपत्राबरोबर स्वत:चे जखम झालेचे फोटोग्राफ दाखल करुन शाबीत केलेले आहे. मात्र ही बाब वि प यांनी हजर होऊन खोडूनही काढलेली नाही. तक्रारदार यांनी डिसेंबर-2019 मध्ये सदरचा मोबार्इल खरेदी केलेपासून दोन वर्षे वापरात असतानादेखील Auto power of fault दिसून आले. सबब वि प क्र.1 गुरुकृपा मोबाईल यांचे अधिकृत मोबाईल केअर सेंटरकडे दुरुस्तीसाठी दि.11/12/2019 रोजी दिलेला होता. Main Board Assembly Redmi-4 हा पार्टदेखील बदलून नवीन घालणेत आला होता. त्यानंतर दि.19/12/2019 रोजी वि प क्र.1 यांनी मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदारास दिलेला होता. सदरचे पार्टचा खर्च रक्कम रु.6,311.82/- अशा पध्दतीने सर्व्हीस चार्ज लावण्यात आलेला होता. तक्रारदार यांना 100 टक्क्े मोबाईल दुरुस्त झालेला असलेचे खात्री वि प क्र.1 यांनी दिलेली होती. मात्र तरीसुध्दा दि.30/12/2019 रोजी म्हणजेच अवघ्या 8 दिवसात सदर मोबाईल स्फोट होऊन तक्रारदार यांच्या डाव्या मांडीला एक इंच खोल जखम झालेचे दाखल फोटोवरुन दिसून येते. याबरोबरच तक्रारदार यांनी ‘’ मोबाईल बॅटरी स्फोटात एक जखमी ‘’ या हेडखाली वर्तमानपत्रात बातमी आलेचे सदर वृत्तपत्र याकामी दाखल केलेले आहे. सदर फोटो व दाखल केलेले कागदपत्रांचा विचार करता मोबाईल दुरुस्त करुनही दुरुस्तीनंतर 8 दिवसात मोबाईलचा स्फोट होऊन तक्रारदार हे या स्फोटात जखमी होणे ही निश्चितच वि प यांनी तक्रारदार यांना दिलेली सेवात्रुटी असलचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. या संदर्भात पुराव्यादाखल तक्रारदार यांनी स्वत:चे सरतपासाचे अॅफिडेव्हीट दाखल केलेले आहे. या सर्व कारणांचा विचार करता तसेच आयोगाची नोटीस लागू होऊनदेखील वि प क्र.1 व 2 हे या आयोगासमोर हजर होऊन त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन त्यांना तक्रार अर्जातील सर्व कथने मान्य आहेत. सबब वि प यांचे विरुध्द प्रतिकुल निष्कर्ष (Adverse Inference ) हे आयोग काढत आहे. वि प यांचेकडे तक्रारदार यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेले दि.11/12/2019 चे सर्व्हीस रिपोर्ट कागदयादीसोबत दाखल केले आहे. यावरुन सदरचा मोबाईल दुरुस्तीस दिला ही बाब प्रथमत: शाबीत होते. मात्र दुरुस्तीनंतर लगेचच मोबाईलचा स्फोट झालेला आहे. ही वस्तुस्थिती या आयोगास नाकारता येणार नाही. यातील तक्रारदार यांनी अर्जात मागणी केलेल्या मागण्या अंशत: मंजूर करण्याच्या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदारास दवाखान्याचा खर्च अंदाजे एक लाख रुपये व व्यवसायाचे नुकसान अंदाजे एक लाख पन्नास हजार अशी मागणी केलेली आहे. मात्र या संदर्भातील कोणताही कागदोपत्री पुरावा या आयोगासमोर नाही. तथापि, तक्रारदार यांना निश्चित दवाखान्याला खर्च आलेला असला पाहिजे व व्यवसायातील नुकसान हे मोबाईल नसल्यामुळे झाले असले पाहिजे व त्याचबरोबर जखमझाली असलेने तोही खर्च झालेला आहे. सबब तक्रारदार हे दवाखान्यातील खर्चापोटी रक्कम रु.15,000/- व व्यवसायीक नुकसानीकरिता रक्कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रासापोटी दोन लाख व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.15,000/- हे या आयोगास संयुक्तिक वाटत नसलेने तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र असलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मोबाईलच्या स्फोटामुळे झालेल्या दवाखान्याच्या खर्चापोटी रक्कम रु.15,000/- व व्यावसायिक नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- अदा करणेचे आदेश करणेत येतात.
3) वि प क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.