निकालपत्र :- (दि.29.04.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी व सामनेवाला यांनी स्वत: युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला हे फिटनेस सेंटरचा व्यवसाय करतात. त्यानुसार त्यांनी माहितीपुस्तिका छापून प्रसिध्द केलेली आहे. त्याप्रमाणे दि.16.12.2009 रोजी तक्रारदारांनी वार्षिक वर्गणी रुपये 14,000/- सामनेवाला यांचेकडे रोखीने भरणा केलेली आहे. त्यावेळेस व्यायामशाळा लगेचच चालू करणार असलेचे तक्रारदारांना सांगितलेले आहे. परंतु सामनेवाला यांनी व्यायामशाळा लगेचच चालू केली नाही. त्यावेळेस चौकशी केली असता तक्रारदारांना कळविणेत येईल असे सांगितले. ऑगस्ट 2010 च्या पहिल्या आठवडयात सामनेवाला यांनी मार्च 2010 मध्ये व्यायामशाळा चालू केलेचे समजून आले. परंतु, त्याबाबत तक्रारदारांना कळविणेत आलेले नाही व सामनेवाला यांनी तक्रारदारांना एस्.एम्.एस्. केला असे खोटे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांच्या व्यायामशाळेकडून योग्य त्या सेवेची खात्री वाटली नाही. त्यामुळे भरलेल्या रक्कम रुपये 14,000/- मागणी केली असता सदर रक्कम देणेस टाळाटाळ केली. याबाबत रजिस्टर्ड पोस्टाने 3 वेळा पत्रे पाठविली. परंतु, सदरची फी सामनेवाला यांनी परत केलेली नाही. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, व्यायामशाळेच्या सभासदत्वाच्या नियमानुसार व्यायामशाळा चालू झालेनंतर सभासदत्व 60 दिवसांनी कार्यान्वित होते. म्हणजेच दि.16.05.2010 रोजीपासून सभासदत्व चालू झालेबाबत कळविले व एस्.एम्.एस्. व फोन करुन कळविले असे खोटे नमूद केले व तक्रारदारांना दोन महिन्यांची वर्गणी वजा करुन बाकी रक्कम दिली जाईल असे कळविले किंवा सभासदत्व अन्य व्यक्तिच्या नांवे करावे असे कळविले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना फोन अथवा एस्.एम्.एस्. केलेला नव्हता. वर्गणी भरुन घेताना व्यायामशाळा लगेच चालू केली जाईल असे खोटे आश्वासन दिले. तसेच, त्याबाबत तक्रारदारांना माहिती दिलेली नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना भरलेली रक्कम रुपये 14,000/- व त्यावर दि.16.12.2009 ते दि.08.12.2010 अखेर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे होणारे व्याज, नोटीस खर्च रुपये 2,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत माहितीपुस्तक, रक्कमेची पावती दि. 16.12.2008, सामनेवाला यांना दि.13.08.2010 रोजी पाठविलेले पत्र, दि.29.09.10 रोजी सामनेवाला यांना पाठविलेला ई-मेल, सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेली दि.04.10.2010 रोजीची नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, व्यायामशाळा नविन असल्याने व त्याचे बांधकाम व मशिनरी पूर्ण करावयाच्या होत्या. व्यायामशाळा चालू करताना त्याचा सुरु करणेचा कार्यक्रम प्रसिध्द वर्तमानपत्रात जाहिरात देवून आगाऊ बुकिंग केलेल्या सभासदांना निमंत्रण पत्रिका देवून तसेच एस.एम्.एस्. व मेल वरुन माहिती देवून सुरु केलेली आहेत. यात तक्रारदारसुध्दा येतात. सर्व बाबींची पुर्तता करुन गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच दि.16.03.2010 रोजी प्रत्यक्ष व्यायामशाळा सुरु केली आहे व तक्रारदारांचा व्यायामशाळेतील प्रवेश आजही त्यांचेसाठी राखून ठेवलेला आहे. (6) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, वास्तविक पहाता तक्रारदारांना व्यायामशाळेत येणेचे नसलेने समानेवाला यांचेवर खोटे आरोप करीत आहेत. तक्रारदारांनी दि.13.08.2010 रोजी, दि.27.08.2010 रोजी, दि.14.09.2010 व दि.27.09.2010 या रोजींच्या पत्रांमध्ये वैयक्तिक कारणासाठी मेंबरशिप रद्द करणार असलेचे कळविले आहे. सामनेवाला यांनी व्यायामशाळा सुरु झालेची माहिती तक्रारदारांना दिलेली आहे. त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी झालेली नाही. व्यायामशाळा सुरु झालेनंतर सर्व आगाऊ नोंदणी केलेल्या सभासदांनी सामनेवाला यांना करारपत्र लिहून दिले आहे. परंतु, तक्रारदारांनी त्याची पुर्तता केलेली नाही. नियमाप्रमाणे कपात होणारी रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम देणेस सामनेवाला तयार होते व आजही तयार आहेत. तक्रारदारांना दि.29.09.2010 रोजीच्या मेलमध्ये त्यांनी मेंबरशिप त्यांच्या सोईने अन्य व्यक्तीच्या नांवे वर्ग करावी असे सुचविले होते. दि.29.09.2010 रोजी सभासदत्व वगर्णी रुपये 18,200/- इतकी होती, जर तक्रारदारांनी दुसरा मेंबर दिला असता तर ती सर्व रक्कम तक्रारदारांना पर्यायी सभासदाकडून मिळाली असती. अशा प्रसंगी सदरची रक्कम रुपये 18,200/- सभासदत्व वर्गणी तक्रारदारांना घेणेचा हक्क व अधिकार होता. जर हा पर्याय तक्रारदारांनी आजही अवलंबिला असता तर त्यानुसार नविन सभासदाला सभासदत्व देणेस सामनेवाला तयार आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी. सेवा कर रुपये 1,310/- दि.13.08.2010 पर्यन्तची 3 महिन्याची मासिक सभासद वर्गणी रुपये 3,173/- अशी एकूण रक्कम रुपये 4,483/- वजा करुन उर्वरित रक्कम रुपये 9,517/- सामनेवाला तक्रारदारांना देणेस तयार आहेत व तशी परवागनी मिळावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दैनिक सकाळ व दै.पुढारीमधील जाहिरात, उदघाटन आमंत्रण पत्रिका, श्री व सौ मंदार कानेटकर तसेच सौ.स्मिता दाते यांनी मेंबरशिप रद्द करणेबाबत पाठविलेले पत्र, सौ.स्मिता गोयल यांचेकडून मेंबरशिप फी स्विकारलेबाबत पावती, मेंबरशिप ट्रान्स्फर सर्टिफिकेट इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी तक्रारदारांकडून दि.16.12.2009 रोजी रुपये 14,000/- स्विकृत केले आहेत व व्यायामशाळा सुरु झालेनंतर तक्रारदारांना कळविले जाईल असे सामनेवाला यांना सांगितले व तसे त्यांना कळविले नाही. त्यामुळे भरलेली रक्कम तक्रारदारांनी परत मागितलेली आहे. परंतु, सदरची वस्तुस्थिती सामनेवाला यांनी नाकारलेली आहे. व्यायामशाळा दि.16.03.2010 रोजीपासून सुरु केली आहे याबाबत काढलेली निमंत्रण पत्रिका प्रस्तुत प्रकरणी दाखल केली आहे. तसेच, दैनिक सकाळ व दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात पहिल्या पानावरती त्याची जाहिरात दिलेली आहे. ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. तसेच, तक्रारदारांनी दि.18.02.2010 रोजी पत्र पाठवून स्वत:हून मेंबरशिप रद्द करुन घेत आहे व भरलेल्या रक्कमेची मागणी केली आहे. इत्यादीचा विचार करता सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. परंतु, सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सेवाकर व तीन महिन्याची मासिक सभासद वर्गणी वजाजाता रुपये 9,517/- तक्रारदारांना परत करणेची तयारी दर्शविली आहे याचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर रक्कम परत करावी असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना फीची उर्वरित रक्कम रुपये 9,517/- (रुपये नऊ हजार पाचशे सतरा फक्त) तक्रारदारांना परत करावी. 3. खर्चाबाबत आदेश नाहीत. |