न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प. हे मे. शंकर परशराम माने या सराफी पेढीचे चालक मालक आहेत. तक्रारदार यांनी त्यांची विवाहीत मुलगी सौ दिपाली योगेश देसाई यांच्या सोन्याच्या 4 बांगडया व 2 पाटल्या दुरुस्तीकरीता दि. 21/11/2017 रोजी वि.प. यांचेकडे दिल्या होत्या. सदर बांगडया व पाटल्या 114.300 ग्रॅम वजनाच्या होत्या. सदरचे दागिने दि. 25/12/2017 रोजी दुरुस्त करुन परत देण्याची हमी वि.प. यांनी दिली होती. तथापि दिलेल्या हमीनुसार सदरचे दागिने परत करणेस वि.प. हे टाळाटाळ करु लागले. याबाबत तक्रारदार यांनी वि.प. यांना जाब विचारला असता वि.प. यांनी सदर दागिन्यांची किमत रु.3,55,000/- परत देणेचे मान्य करुन या रकमेचा चेक तक्रारदार यांचे मुलीच्या नावांवर दिला. परंतु, थोडे दिवस थांबा, चेक जमा करु नका, दागिने परत करतो, असे वि.प. यांनी तक्रारदारास सांगितल्याने तक्रारदारांचे मुलीने तो चेक बँकेत जमा केला नाही. परंतु वि.प. यांनी दिलेल्या हमीनुसार दागिने आजअखेर परत केलेले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत वि.प. यांना नोटीस पाठविली. त्यास वि.प. यांनी दि. 31/8/2019 रोजी चुकीचे उत्तर पाठविले. सबब, वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास 114.300 ग्रॅम वजनाच्या बांगडया व पाटल्या बिनशर्त परत मिळाव्यात, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेले बिल, वि.प यांनी दिलेला चेक, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली उत्तरी नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी दि.26/11/19 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे त्यांच्या मुलीच्या सोन्याचा बांगडया व पाटल्या कधीही दुरुस्तीसाठी दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे ते परत करणेचा प्रश्नच उद्भवत नाही. सत्य वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नवीन सोन्याचे दागिने करुन देणेबाबत ऑर्डर दिली होती. तक्रारदार यांचे विनंतीनुसार वि.प. यांनी सदरचे दागिने तक्रारदार व वि.प यांचेपूर्वीचे असणारे संबंधातून तक्रारदार यांना दिलेल्या ऑर्डरप्रमाणे तयार करुन दिले होते. परंतु ते दागिने तक्रारदार यांना पसंत नव्हते. त्यावेळी वि.प यांनी तक्रारदार यांना नवीन करुन दिलेले दागिने परत करा, पुन्हा तुमचे सांगणेनुसार नवीन दागिने देतो व त्याची फक्त मजुरी वेगळी होईल असेही सांगितले आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे वि.प यांनी तक्रारदार यांना उधारीवर 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रक्कम रु.11,600/- चे चांदीचे दागिने दिले आहेत. यापूर्वीही व आजही यातील वि.प. हे पुन्हा तक्रारदार यांचे ऑर्डरप्रमाणे तक्रारदारयां नी वि.प यांचेकडून घेवून गेलेले सोन्याचे दागिने, अंगठी व चांदीचे दागिने परत केले तर ऑर्डरप्रमाणे नवीन दागिने करुन देणेस तयार आहेत व तसे नोटीसीच्या उत्तराने तक्रारदार यांना स्पष्टपणे कळविले आहे. वि.प. यांचेकडून तक्रारदार यांना दागिने मिळाले असल्यामुळे वि.प. यांनी दिलेल्या चेकची रक्कम तक्रारदार यांना भागविणेचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदारांनी याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. परंतु वि.प. यांनी पोलिस अधिका-यांना सत्य वस्तुस्थिती सांगितली असता पोलिसांना वि.प. यांनी कोणतेही गैरकृत्य केले नसलेचे दिसून आले व त्यांनी तक्रारदारांची तक्रार घेतलेली नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, वि.प.यांचे म्हणणे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. प्रस्तुतकामी वि.प. हे सराफी पेढीचे चालक व मालक आहेत. वि.प. हे सोने चांदी विक्री-खरेदी व सोन्याचे दागिने तयार करुन देणे वा दुरुस्त करुन देणेचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी त्यांची विवाहीत मुलगी सौ दिपाली योगेश देसाई यांच्या सोन्याच्या 4 बांगडया व 2 पाटल्या दुरुस्ती करीता ता. 21/11/2017 रोजी वि.प यांचेकडे दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदरची पावती दाखल केलेली आहे. सदरचे पावतीचे अवलोकन करता सदरचे पावतीवर वि.प. यांचे नांव नमूद असून सदरचे पावतीवर वादातील सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी दिले आहेत असे नमूद आहे. सबब, सदरचे पावतीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे विवाहीत मुलीच्या 4 बांगडया व 2 पाटल्या दुरुस्तीकरिता ता. 21/11/2017 रोजी वि.प. यांचेकडे दिल्या होत्या. सदरचे दागिने ता. 25/12/2017 रोजी परत देण्याची हमी वि.प. यांनी दिलेली होती. वि.प. यांनी सदरचे दागिने तक्रारदार यांना परत न करता सदरच्या दागिन्यांची परस्पर विल्हेवाट लावली सदरचे दागिन्यांची किंमत वि.प. यांनी रक्कम रु. 3,55,000/- करुन तक्रारदार यांना रक्कम रु.3,55,000/- ता. 08/03/2018 रोजी चेक दिला. तथापि वि.प. यांनी दिलेल्या हमीनुसार तक्रारदार यांना वादातील दागदागिने आजअखेर परत न करुन अथवा चेकची रक्कम अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे केव्हाही तक्रारदार याचे मुलीच्या सोन्याच्या बांगडया व पाटल्या दुरुस्त करुन देणेसाठी दिलेल्या नव्हत्या. वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नवीन सोन्याचे दागिने करुन देणेबाबत ऑर्डर दिली होती. तक्रारदार यांचे विनंतीनुसार वि.प. यांनी सदरचे दागिने तक्रारदार व वि.प यांचेपूर्वीचे असणारे संबंधातून तक्रारदार यांना दिलेल्या ऑर्डरप्रमाणे तयार करुन दिले होते. परंतु ते दागिने तक्रारदार यांना पसंत नव्हते. त्यावेळी वि.प यांनी तक्रारदार यांना नवीन करुन दिलेले दागिने परत करा, पुन्हा तुमचे सांगणेनुसार नवीन दागिने देतो व त्याची फक्त मजुरी वेगळी होईल असेही सांगितले आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे वि.प यांनी तक्रारदार यांना उधारीवर 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रक्कम रु.11,600/- चे चांदीचे दागिने दिले आहेत. यापूर्वीही व आजही यातील वि.प. हे पुन्हा तक्रारदार यांचे ऑर्डरप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प यांचेकडून घेवून गेलेले सोन्याचे दागिने, अंगठी व चांदीचे दागिने परत केले तर ऑर्डरप्रमाणे नवीन दागिने करुन देणेस तयार आहेत असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. तथापि वि.प. यांनी प्रस्तुतकामी ब-याच संधी देवून देखील पुरावा शपथपत्र दाखल केलेले नसलेने ता. 24/11/2021 रोजी वि.प. यांचेविरुध्द पुरावा नाही असा आदेश आयोगाने पारीत केलेला आहे. सबब, वि.प यांनी त्यांचे कथनामध्ये उधारीवर 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रक्कम रु. 11,600/- चांदीचे दागिने तक्रारदार यांना दिले आहेत असे कथन केले आहे. तथापि त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा परिस्थितीजन्य पुरावा (Circumstantial evidence) वि.प. यांनी आयोगात दाखल केलेला नाही. वि.प. यांनी त्यांचे कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाहीत. परंतु तक्रारदारांनी तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. सदरचे पुराव्याचे शपथपत्रातील कथने व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराने अ.क्र.1 ला वि.प. यांनी ता. 21/11/2017 रोजी तक्रारदार यांना वादातील सोन्याचे दागिने दुरुस्त करुन ता. 25/12/2017 रोजी परत देणेची हमी दिलेची पावती दाखल केलेली आहे. तसेच अ.क्र.2 ला ता. 08/03/2018 रोजीचा चेक नं. 907059 स्टेट बँक ऑफ इंडियाचा रक्कम रु. 3,55,000/- वि.प यांनी तक्रारदारांचे नावे दिलेला चेक दाखल केलेला आहे. सदरचा चेक वि.प. यांनी संधी असताना देखील स्वतंत्र पुरावा शपथपत्र दाखल करुन नाकारलेला नाही. सबब, तक्रारदाराचे पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता सदरचा चेक तक्रारदारांची विवाहीत मुलगी सौ दिपाली योगेश देसाई हिचे नांवे असलेने नमूद तारखेस सदरचा चेक बँकेत जमा करीत असता वि.प. यांनी “ चेक जमा करु नका, तुमचे सर्व दागिने परत करतो ” असे वचन दिले. त्याकारणाने सदरचा चेक वटवणूकीकरिता जमा केला नाही असे पुराव्याचे शपथपत्रात तक्रारदारांनी नमूद केले आहे.
7. तक्रारदारांनी वि.प.यांना ता. 11/10/2019 रोजी नोटीस पाठवून सदरचे वादातील सोन्याची दागिनेची मागणी केलेली आहे. सदरचे नोटीसीस वि.प. यांचे वकीलांनी ता. 31/8/2019 रोजी उत्तरी नोटीस पाठविलेली आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना वादातील सोन्याचे दागिन्यांची दुरुस्ती मुदतीत करुन परत देण्याची हमी दिलेली होती तथापि सदर वादातील सोन्याची दागिन्याची मागणी तक्रारदार यांनी वकीलामार्फत नोटीस पाठवून केली असताना देखील वि.प यांनी सदरचे वादातील सोन्याचे दागिने मुदतीत दुरुस्त करुन दिलेले नाहीत अथवा परत दिलेले नाहीत. तसेच सदरचे वादातील सोन्याचे दागिन्यांची रक्कमही आजअखेर तक्रारदार यांना परत अदा केलेली नाही. सबब, वि.प यांनी वादातील सोन्याचे दागिने तक्रारदार यांना दुरुस्त करुन मुदतीत परत न देवून तसेच सदरचे दागिनेंची रक्कमही परत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
| - आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 21/11/2017 रोजीचे पावतीप्रमाणे 114.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 4 बांगडया व 2 पाटल्या बिनशर्त त्वरित अदा कराव्यात.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|