श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांकः 19/09/2014)
तक्रारकर्त्यांनी यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची संक्षिप्त पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे –
1. वि.प. क्र. 2 मे. हुंडई मोटर्स इं. लि. ही मोटर वाहन निर्माती कंपनी असून वि.प.क्र. 1 हे त्यांचे नागपूर स्थित अधिकृत विक्रेता आहेत.
वि.प.क्र. 1 ने दि.20.04.2012 रोजी ‘दि हितवाद’ या दैनिक वृत्तपत्रात जाहिरात दिली होती की, एप्रिल महिन्यात 25 एप्रिल, 2012 पर्यंत त्यांचेकडून हुंडई कंपनीची सेंट्रो अथवा आय 10 ही कार खरेदी करण्या-या ग्राहकास की, रु.30,900/- किंमतीचा सोनी ब्राविया एल सी डी टी व्ही – 32 (81 सेंमी.) मोफत देण्यात येईल व त्यासोबत गाडींची अदलाबदल केल्यास रु.20,000/- इतकी किंमत बदललेल्या गाडीसाठी देण्यात येईल.
सदर जाहिरात वाचून तक्रारकर्तीने नविन कोरी सँट्रो एक्स – जी एल एस बी/एस/आय/वी ही कार खरेदीसाठी वि.प.क्र. 1 कडे गेली, तेव्हा त्यांनी हुंडई कंपनीचे सदर कारबद्दल संपूर्ण माहिती असलेले रंगीत माहितीपत्रक व सोबतच दि.01.04.2012 पासूनच दरपत्रक तक्रारकर्तीस दिले. त्यानुसार वरील कारची किंमत रु.4,34,114/- इतकी होती.
वरील माहितीपत्रक व दरपत्रकाप्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 कडे सँट्रो जी एल एस ऑडिओ बीएसआयवी ही कार रु.11,000/- चा आय सी आय सी आय बँक, सिव्हिल लाईन्स, नागपूर चा धनादेश क्र. 822628 दि.17.04.2012 चा देऊन बुक केली. त्यानंतर रु.48,000/- चा आय सी आय सी आय बँकेचा धनादेश क्र. 822629 दि.21.04.2012 चा आणि त्यानंतर रु.2,75,000/- दि.21.04.2012 चा आणि त्यानंतर रु.2,75,000/- दि.21.04.2012 रोजी एस. बी. आय. चे क्रेडीट कार्ड क्र. 4317575645239956 नुसार वि.प.क्र. 1 ला दिले. तसेच रु.1,00,000/- चा आय सी आय सी आय बँकेचा धनादेश क्र. 533125 दि.21.04.2014 चा दिला व रु.89/- नगदी देऊन कारच्या पूर्ण किंमतीचा रु.4,34,089/- चा भरणा वि.प.क्र. 1 कडे केला. वरील सर्व पैसे वि.प.क्र. 1 च्या शोरुमधून कारची डिलीवरी घेण्यास सांगितले. याशिवाय, तक्रारकर्तीने रु.8,800/- कारचे सिट कव्हर, खिडक्यांच्या तावदानांना फिल्म लावण्याकरीता पावती क्र. एम आर 82903 दि.01.05.2012 प्रमाणे दिले आहेत.
तक्रारकर्ती दि.01.05.2012 रोजी दुपारी 3-30 वा. वि.प.क्र. 1 च्या शोरुममध्ये कारचा ताबा घेण्यास गेली, तेव्हा पहिल्यांदाच कार दाखविण्यात आली. त्यात वि.प.क्र. 1 ने दिलेल्या दरपत्रकात देण्याची नमूद केलेली वि.प.क्र. 2 कंपनीकडून फिटींग केलेली डोअर लॉकिंग सिस्टम नसल्याचे तक्रारकर्तीस आढळून आले. तक्रारकर्तीने केलेली कारची बुकींग 01.04.2012 पासून अस्तित्वात असलेल्या व 17.04.2012 रोजी अस्तित्वात असलेल्या कार करिताच होती. मात्र वि.प. तक्रारकर्तीस प्रथमतः दि.01.05.2012 रोजी दाखविलेली कार ही 2011 च्या जून महिन्यात निर्मित होती. त्यामुळे तक्रारकर्तीने वाहनाचा ताबा घेण्याचे नाकारले. वि.प. तक्रारकर्तीस व तिचे नातेवाईकांवर रात्री 10-30 वा. पर्यंत सदर वाहन नेण्यासाठी दबाव आणला. वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीची दिशाभूल फसवणूक करुन सदर वाहन तिच्या माथी मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला व योग्य वाहनाची विक्री तक्रारकर्तीस केली नाही. वि.प.क्र. 1 ची सदर कृती ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
सदरची कार वि.प.क्र. 2ने निर्माण केली असून निर्माण वर्षाप्रमाणे ठरलेली किंमत घेणे आवश्यक असतांना 2011 साली निर्मित कार 2012 साली ठरलेल्या नविन सुविधा असलेल्या कारच्या किंमतीस विकणे ही वि.प.क्र. 1 विक्रेता व वि.प.क्र. 2 निर्माता यांनी संगनमताने केलेली कृती असून यासाठी वि.प.क्र. 1 व 2 वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत.
वि.प.कडून नविन कारच्या किंमतीत मागिल वर्षाची निर्मित आणि माहिती पत्रकाप्रमाणे अद्यावत सुविधा नसलेली कार तक्रारकर्तीस विकण्याचा वि.प.क्र. 1 चा प्रयत्न लक्षात आल्यावर तक्रारकर्तीने कारचा ताबा घेतला नाही व वि.प.क्र. 1 आणि 2 यांना दि.03.05.2012 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठविली. ती वि.प.क्र. 1 यांना 05.05.2012 रोजी व वि.प.क्र. 2 यांना 15.05.2012 रोजी मिळाली. वि.प.क्र. 1 तर्फे अधिवक्ता श्री. वोरा यांनी दि.18.05.2012 रोजी उत्तर दिले. त्यात दि.01.02.2012 पासूनचे दरपत्रक तक्रारकर्तीस दाखविल्याचे व कारची किंमत रु.4,34,089/- सांगितल्याचे व रु.20,900/- किंमतीचा सोनी एलसीडी टीव्ही मोफत देण्याचे मान्य केले आहे. परंतू वि.प.क्र. 1 यांनी 2012 मधील निर्मित कार देण्याचे मान्य केले नव्हते असे म्हटले आहे. कारची किंमत रु.4,34,089/- तक्रारकर्तीकडून घेतल्याचेही मान्य केले आहे.
वि.प.ने नोटीसच्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ती दि.01.05.2012 रोजी अन्य 2 व्यक्तीसोबत शोरुममध्ये आली व तिने कारच्या रजि. कागदपत्र, इंशूरंस कागदपत्र, तसेच रु.150/- चे मोफत पेट्रोल कुपन घेतले आणि कारचा ताबा घेतला व कार घेऊन शोरुम बाहेर गेले. त्यांना असे लक्षात आले की, कंपनीकडून लागून येत असलेली सेंट्रल लॉकिंग सिस्टम कारमध्ये नाही. त्यामुळे ते कार घेऊन परत आले व त्याबाबतची तक्रार केली. त्यावेळी सदर कारच्या चेसीससोबत कीलेस लॉकिंग सिस्टम नसल्याचे मान्य केले. वि.प.चे म्हणणे असे की, डिलिव्हरी चालानवर सही करुन तक्रारकर्तीने गाडी ताब्यात घेतली व रात्री 8-30 वा. कार परत आणली आणि “Delivery Refused” असे लिहिले. वि.प.ने दिलेल्या रंगित माहितीपत्रकात कीलेस एंट्री हे सदर कारचे वैशिष्टय दाखविले आहे. परंतू वि.प.ने तक्रारकर्त्यास जी कार विकण्याचे प्रस्तावित केले होते. त्यात किलेस एंट्री नव्हती कारण सदर कार तक्रारकर्त्यास दिलेले माहितीपत्रक तयार करण्यापूर्वी जून 2011 प्रमाणे निर्मित केली होती व 21.07.2011 चे दरपत्रकाप्रमाणे तिची किंमत रु.4,23,423/- म्हणजे रु.10,666/- इतकी कमी होती, म्हणून माहिती पत्रकात नमूद वरिल वैशिष्टपूर्ण की लेस एंट्री त्यात नव्हती. अशी किलेस एंट्री सुविधा असलेल्या कारसाठी किंमत वाढवून 01.04.2012 पासून दरपत्रक अस्तित्वात आणले होते व नविन दर पत्रकाप्रमाणे कारची किंमत घेऊन 2011 साली उत्पादित कीलेस एंट्री नसलेली कमी किंमतीची कार तक्रारकर्तीस विकण्याचा प्रयत्न करुन वि.प.क्र. 1 ने ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग केला आहे.
तक्रारकर्तीने कीलेस एंट्री नसलेली कार बदलवून वि.प.ने घेतलेल्या किंमतीची किलेस एंट्रीसह सर्व सुविधा असलेली कार देण्याची मागणी केली. परंतू वि.प.ने घेतलेल्या किंमतीची कार दिली नाही, म्हणून सदर कार आजही वि.प.चे शोरुम मध्येच आहे व त्यासाठी वि.प. नोटीसमध्ये बेकायदेशीररीत्या तक्रारकर्तीस 01.05.2012 पासून दररोज रु.1,000/- प्रमाणे पार्किंग चार्जेसची मागणी केली आहे.
वि.प.क्र. 1 ने सदर कारची आरटीओ नागपूरकडे स्वतःच नोंदणी करुन घेतली आहे व यासाठी कार सुपूर्द करण्यापूर्वी काही कागदपत्रावर तक्रारकर्तीच्या घेतलेल्या सह्यांचा बेकायदेशीर वापर केला आहे.
तक्रारकर्तीने माहिती अधिकारी तथा सह प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर यांचेकडून माहिती अधिकारात वि.प.ने सादर केलेल्या दस्तऐवजांच्या छायाप्रतींची मागणी केली व ती वरील कार्यालयाने दि.30.05.2012 रोजी पुरविली. सदर छायाप्रतीवरुन तक्रारकर्तीच्या असे लक्षात आले की, वि.प.क्र. 1 ने परिवहन अधिका-याकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये पत्याच्या पुराव्यासाठी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, त्यावर तक्रारकर्तीची बनावट स्वाक्षरी केली आहे. तक्रारकर्तीने त्याबाबतची तक्रार दि.08.06.2012 रोजी परिवहन अधिका-यांकडे केली असून त्यांनी वि.प.क्र. 1 ला दि.12.07.2012 चे पत्राप्रमाणे 7 दिवसांचे आत खुलासा मागितला आहे. यावरुन वि.प.क्र. 1 ने खोटे दस्तऐवज दाखल केल्याचे निष्पन्न होते व ही त्यांची कृती बेकायदेशीर आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदींच्या विरुध्द आहे.
वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्तीचा नोटीस प्राप्त होऊनही त्याबाबत कोणताही खुलासा दिलेला नाही किंवा वि.प.क्र. 1 यांनी सदर नोटीस संबंधाने कोणत्याही खुलाश्याची मागणी केली नाही, यावरुन त्यांचे आपसात संगनमत असल्याचे दिसून येते. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1) दि.01.04.2012 चे दरपत्रकानुसार व ब्रोशरनुसार फुल्ली लोडेड सँट्रो जिएलएस पांढ-या रंगाची नविन कोरी कार तक्रारकर्तीस तिचे नावे नोंदणी करुन व सोबत वि.प.क्र. 1 यांनी कारसोबत देण्यात येणा-या भेट वस्तुंसह देण्याचे आदेश वि.प.क्र. 1 व 2 यांना द्यावेत. कारची संपूर्ण किंमत अदा केल्याने त्यावर द.सा.द.शे. 24 टक्के व्याज द्यावे.
2) मानसिक, शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.2,00,000/- मिळावे व वकील फी व इतर फी यांचा खर्च मिळावा.
3) तक्रारीचा खर्च वि.प.क्र. 1 कडून वसुल करावा.
तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ तक्रारीसोबत ‘दि हितवाद’ मध्ये वि.प.ची आलेली जाहिरात, सँट्रो झिंगचे ब्रोशर, हुंडाई कंपनीचे सँट्रो व आय-10 या वाहनाचे दि.01.04.2012 पासूनचे लागू असलेले दरपत्रक व परफॉर्मंस, फिचर, सँट्रो जिएलएस पांढ-या कारसाठी अदा केलेल्या किंमतीची पावती, हुंडाई कंपनीचे सँट्रो व आय-10 या वाहनासाठी दि.21.07.2011 पासून लागू असलेले दरपत्रक व परफॉर्मंस, फिचर, परिवहन अधिकारी नागपूर शहर यांना माहितीचे अधिकारात दिलेला अर्ज, परिवहन अधिकारी नागपूर शहर यांचेकडे रु.24/- भरल्याची पावती, माहिती अधिकारी तथा सह प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर यांचे पत्र क्र. 1817 द्वारे वि.प.क्र. 1 यांस बनावट सहीबाबत खुलासा देण्याचे पत्र, वकिलामार्फत वि.प.क्र. 1 व 2 यांना दिलेल्या नोटीसची प्रत व पोस्टाची पावती, प्राप्ती स्विकृतीची पोच पावती, वि.प.क्र. 1 चे वकिलांनी दिलेले नोटीसला उत्तर असे एकूण 13 दस्तऐवज दाखल केले आहेत. नंतर पुढे तक्रारकर्तीने दि.17.08.2013 च्या यादीप्रमाणे कारची डिलीवरी घेत नसल्याबाबत पत्र व वि.प.क्र. 2 द्वारा जुन्या कारची माहिती देण्यात येणारे पत्रक दाखल केले.
2. वि.प.क्र. 1 यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. वि.प.क्र. 1 हे वि.प.क्र. 2 निर्मित कारचे अधिकृत विक्रेता असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र वि.प.ने ‘द हितवाद’ मध्ये सँट्रो कार 20.04.2012 पर्यंत खरेदी करणा-या ग्राहकास Sony Bravia LCD T.V. 32” रु.30,900/- किंमतीचा मिळेल, तसेच जुनी कार दिल्यास त्याबाबत रु.20,000/- सुट देण्याबाबत व्यावसायिक जाहिरात दिली होती व त्याप्रमाणे तक्रारकर्ती वि.प.क्र. 1 कडे सँट्रो जीएलएस कार खरेदीसाठी आली होती हे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्ती वि.प.क्र. 2 ने निर्मित कार खरेदीसाठी वि.प.क्र. 1 च्या शोरुममध्ये आली होती व तिला शोरुममध्ये उपलब्ध असलेल्या कारचे सर्व मॉडेल दाखलविण्यात आले होते व प्रत्येक मॉडेलमध्ये असलेल्या वैशिष्टयाची माहिती देण्यात आली होती. तक्रारकर्तीने कारची उपलब्ध असलेल्या सर्व मॉडेलपैकी सँट्रो जिएलएस मॉडेल पसंत केले आणि निर्मिती कंपनीने प्रसिध्द केलेले माहिती पत्रक आणि दर पत्रक वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीला दिले. Hyundai Santro Model GLS या कारची किंमत वि.प.ने तक्रारकर्तीला रु.4,34,114/- सांगितली होती हेदेखील त्यांनी नाकबूल केले. वरीलप्रमाणे सर्व माहिती दिल्यानंतर तक्रारकर्तीने Xing Model (GLS Variant) Coral White Colour, bearing Chasis No. MALAA 51HLBM690425, Engine No. G4HGBM311478 पसंत केली आणि त्यासाठी रु.11,000/- नोंदणी रक्कम दिली. सदर मॉडेलच्या खरेदीपोटी तक्रारकर्तीने तक्रारी नमूद केल्याप्रमाणे रु.4,34,089/- दिल्याचे देखील वि.प.क्र. 1 ने मान्य केले आहे.
त्यांचे पुढे असे म्हणणे की, कारचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तक्रारकर्तीने फॉर्म क्र. 20 वर सही करुन दिली. तसेच पॅन कार्डची प्रत, पोस्टल ऍड्रेस डिक्लेरेशन, अंगठयाचा ठसा, पत्याबाबत पुरावा, टॅक्स ईनव्हाईस या दस्तऐवजांवर सही केली. सदर कारच्या नोंदणीबाबत औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्यास गाडीचा ताबा घेण्यासाठी 01.05.2012 रोजी सुचित केल्याचे मान्य केले. तसेच गाडीला लागणा-या अतिरिक्त साधनांसाठी (Accessories) रु.8,800/- तक्रारकर्तीकडून दि.01.05.2012 रोजी घेतल्याचे मान्य केले आहे.
दि.01.05.2012 तक्रारकर्ती कारचा ताबा घेण्यासाठी वि.प.क्र. 1 च्या शोरुममध्ये आली तेव्हाच पहिल्यांदा तिला Central Locking System कार दाखविण्यात आल्याचे आणि त्या कारमध्ये निर्मात्याकडून बसविलेले Central Locking System नसल्याचे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, वि.प.क्र. 2 कडून निर्मित तक्रारीचा विषय असलेल्या कारमध्ये Central Locking System उपलब्ध आहे.
वि.प.क्र. 1 ने दि.01.05.2012 पूर्वी तक्रारीतील कार Chasis No. MALAA 51HLBM690425, Engine No. G4HGBM311478 तक्रारकर्तीस दाखविली नव्हती व तिचे निर्मिती वर्ष सांगितले नव्हते हे नाकबूल केले आहे. तक्रारकर्तीला कारचे सर्व वैशिष्टयाबाबत आणि निर्मिती वर्षाबाबत देखील पूर्ण माहिती दिली असल्याने व कारचे पूर्ण निरीक्षण करुन तिने कार विकत घेण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता कारचा ताबा घेतल्यानंतर ती 2011 साली निर्मिती असल्याबाबत तक्रारकर्ती वाद उपस्थित करु शकत नाही. तक्रारकर्तीने खरेदी केलेल्या कारमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या हे वि.प.ने नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, सदर कारमध्ये निर्मिती कंपनीने खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.
Power steering, A.C. + Heater, Front Power Window, Body Colored Bumpers, Central Locking, Day and Night Mirror, Tinted Glass, 1 DIN M.P.3 with AUX. USB Port with 4 Speakers, Vestline Molding, Internally Adjustable ORVM’s, full Wheel Cover and the rare spoiler
तक्रारकर्तीने पसंत केलेल्या कारची नोंदणी करुन ताबा देण्यासाठी पूर्ण तयारी होती. वि.प.ने सांगितलेल्या सर्व सुविधा कारमध्ये अस्तित्वात आहे आणि यासाठी मंच कारचे निरीक्षणदेखील करु शकते. वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस नविन कार न विकता सन 2011 मध्ये निर्मित कार विकली हे नाकबूल केले आहे आणि विकलेल्या कारचे एप्रिल 2012 मध्ये जी किंमत होती, तीच तक्रारकर्तीकडून घेतलेली असल्याने ग्राहक संरक्षण अधिनियमांच्या कोणत्याही तरतूदींचा भंग केलेला नाही.
त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्ती 01.05.2012 रोजी दुपारी 2-30 वा. कारची डिलीवरी घेण्यासाठी दोन व्यक्तीसोबत वि.प.क्र.1 कडे आली, तेव्हा तिला कारच्या चाव्या, रजिस्ट्रेशन व विम्याचे कागदपत्रें, मॅन्यूअल, सर्विस कुपन्स, गेट पास, डिलिवरी चालान आणि 150 रुपयांचे मोफत पेट्रोल कुपन सुपूर्द करण्यात आले. तक्रारकर्तीने कारची पूर्ण पाहणी करुन समाधानी झाल्यावर कार वि.प.च्या शोरुमबाहेर घेऊन गेली. त्यानंतर कार परत आणली आणि कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम नाही म्हणून विक्री प्रतिनीधीवर ओरडून आकांडतांडव सुरु केला. विक्री प्रतिनीधीने तक्रारकर्ती व तिच्या सोबतच्या दोन व्यक्तींना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यास तक्रारकर्तीने व तिच्या सोबतच्या दोन व्यक्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि शिवीगाळ देणे सुरु केले. विक्री प्रतिनीधीने तक्रारकर्तीस सांगितले की, गाडीत सेंट्रल लॉकिंग सिस्टम निर्मात्याकडून लावण्यात आली आहे, परंतू तिने कि लेस एंट्री सिस्टम पाहिजे असाच आग्रह धरला. कि लेस एंट्री सिस्टम ही जीएलएस मॉडेल ज्याचा चेसिस नंबर तक्रारकर्तीस दिला होता, त्यामध्ये स्टँडर्ड फिचर्समध्ये मोडणारी बाब नव्हती आणि म्हणून तक्रारकर्तीने कारची डिलिवरी घेतली नाही हे म्हणणे धादांत खोटे असून तक्रारकर्ती स्वच्छ हाताने मंचासमोर आलेली नाही. तक्रारकर्तीच्या अधिवक्त्याकडून प्राप्त नोटीसला वि.प.कडून 18.05.2012 रोजी योग्य उत्तर दिले आहे. तक्रारकर्तीने कारची डिलीवरी घेतल्यानंतर अनधिकृतपणे सदर कार वि.प.च्या आवारात त्यांच्या परवानगीशिवाय उभी ठेवली आहे. त्यामुळे वि.प.ची तक्रारकर्तीविरुध्द दररोज रु.1,000/- पार्किंग चार्जेसची मागणी कायदेशीर व वाजवी आहे.
तक्रारकर्तीने केलेल्या तक्रारीवरुन आर टी ओ नागपूर यांनी प्रतिज्ञालेखासंबंधी मागविलेले स्पष्टीकरण वि.प.ने सादर केले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही कायदेशीर तरतूदींचा दुरुपयोग करणारी खोटी व अवास्तव असल्याने खारीज करण्याची विनंती केली आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याकडून कारची रु.10,666/- अधिकची किंमत घेतली आहे, तसेच अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे किंवा तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे हे नाकबूल केले आहे. वि.प.ने तक्रारकर्तीची नविन कार तसेच कारच्या वि.प.ला दिलेल्या किमतीवर 25.04.2012 पासून द.सा.द.शे. 24 टक्केप्रमाणे व्याज, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च या सर्व मागण्या नाकबूल केल्या आहेत.
3. वि.प.क्र.2 यांनी स्वतंत्र लेखी बयान दाखल करुन तक्रार अर्जास विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, ते वि.प.क्र. 1 ला प्रींसीपॉल टू प्रींसीपॉल तत्वावर कारची विक्री करीत असतात. त्यामुळे वि.प.क्र. 1 या विक्रेत्याकडून तक्रारकर्तीस कोणतीही न्यूनतापूर्ण सेवा दिली असल्यास त्यासाठी वि.प.क्र. 2 जबाबदार नाही. वि.प.क्र. 2 या निर्मात्या कंपनीने वि.प.क्र. 1 या विक्रेत्यास कार विकल्यानंतर सदर कारची मालकी विक्रेत्याची होते. त्यामुळे विक्रेत्याने ग्राहकाशी केलेल्या व्यवहारासंबंधाने उत्पादक कंपनी जबाबदार राहू शकत नाही. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीने कारमध्ये कोणताही निर्मिती दोष असल्याबाबतची तक्रार केलेली नाही, त्यामुळे सदर कारसंबंधी वि.प.क्र. 1 आणि तक्रारकर्ती यांच्यात झालेल्या व्यवहारासाठी निर्माता कंपनी जबाबदार नाही. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये वि.प.क्र.2 विरुध्द कोणतीही दाद मागितलेली नाही. त्यामुळे वि.प.क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केलेली आहे.
ग्राहकास विकावयाच्या कारची किंमत वि.प.क्र. 1 व 2 मिळून ठरवितात हे त्यांनी नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, वि.प.क्र. 2 हे त्यांनी निर्मित केलेल्या कारची एक्स शोरुम प्राईस ठरवितात. त्यांनी विक्रेत्यास कार विकल्यानंतर विक्रेता एक्स शोरुम प्राईस आणि त्यावर आवश्यक कर जोडून ग्राहकास कारची विक्री करीत असतो. याशिवाय, अधिकची रक्कम ग्राहकांकडून वसुल करण्याचा विक्रेत्यास अधिकार नाही. वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस जून 2011 मध्ये निर्मित कार विकली किंवा नाही याबाबत वि.प.क्र. 2 ला कोणतीही जाणिव नव्हती. तक्रारकर्तीकडून नोटीस मिळाल्यावरच त्याबाबत वि.प.क्र.2 ला माहिती मिळाली आणि त्यांनी वि.प.क्र. 1 ला तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यांचे म्हणणे असे की, कारचे उत्पादक म्हणून वारंटी संबंधाने जी जबाबदारी असेल तेवढीच त्यांच्यावर आहे. त्याशिवाय, वि.प.क्र. 1 ने केलेली चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे माहिती देऊन तक्रारकर्त्यास कार विकली असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विक्रेत्याची आहे आणि त्यासाठी वि.प.क्र. 2 वर कोणतीही जबाबदारी येत नाही. वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 कडून खरेदी केलेली कार स्वतःच्या व्यवहाराचा भाग म्हणून तक्रारकर्त्यास विकली असल्याने त्याबाबतची जबाबदारी निर्माता कंपनीची नाही. त्यांचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने तक्रारकर्तीस त्यांच्याविरुध्द कोणतीही मागणी करण्याचा अधिकार नाही. वि.प.क्र. 2 विरुध्दची तक्रारकर्त्याची तक्रार अनावश्यक व खोटी असल्याने खारीज करावी अशी विनंती केली आहे. वि.प.क्र. 2 ने आपल्या कथनाचे पुष्टयर्थ दि.10 डिसेंबर, 2008 चे डिलरशिप एग्रीमेंट दाखल केले आहे.
4. तक्रारकर्ता व वि.प. यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास वाहन सुपूर्द करतांना अनुचित व्यापार प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? व तक्रारकर्ता नविन वाहन मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
2) वि.प. नी तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणांत तक्रारकर्ती रितू बागरी हिने वि.प.क्र. 2 निर्मित सँट्रो जीएलएस ऑडिओ बीएसआयवी ही कार दि.17.04.2012 रोजी वि.प.क्र. 1 कडे बुक केली आणि सदर कारची संपूर्ण किंमत रु.4,34,089/- 21.04.2012 पर्यंत वि.प.क्र. 1 ला दिली याबाबत उभयपक्षांत वाद नाही. याशिवाय, तक्रारकर्तीने कारचे सिट कव्हर व खिडक्यांच्या तावदानांना फिल्म लावण्याकरीता दि.01.05.2012 रोजी रु.8,800/- वि.प.क्र. 1 ला दिल्याचे देखिल वि.प.क्र.1 ने कबुल केले आहे. वि.प.क्र. 1 ने दि.20.04.2012 रोजी ‘दि हितवाद’ या दैनिक वृत्तपत्रात दि. 25 एप्रिल, 2012 पर्यंत त्यांचेकडून हुंडई कंपनीची सेंट्रो अथवा आय 10 ही कार खरेदी करण्या-या ग्राहकास की, रु.30,900/- किंमतीचा सोनी ब्राविया एल सी डी टीव्ही – 32” (81 सेंमी.) मोफत देण्यात येईल व त्यासोबत गाडींची अदलाबदल केल्यास रु.20,000/- इतकी किंमत बदललेल्या गाडीसाठी देण्यात येईल असे व्यावसायिक वार्तापत्र प्रसिध्द केले होते. वरील वार्तापत्राचे कात्रण तक्रारकर्तीने दस्त क्र. 1 वर दाखल केले असून ते बनावट असल्याने वि.प.क्र. 1 ने म्हटलेले नाही.
तक्रारकर्ती नविन सँट्रो एक्स – जीएलएसबी/एस/आय/वी ही कार खरेदीसाठी वि.प.क्र. 1 कडे गेली, तेंव्हा त्यांनी हुंडई कंपनीचे सदर कारबद्दल संपूर्ण माहिती असलेले रंगीत माहितीपत्रक व सोबतच दि.01.04.2012 पासूनचे दरपत्रक तक्रारकर्तीस दिले व त्यानुसार वरील कारची किंमत रु.4,34,114/- इतकी सांगितली ही बाब देखिल वि.प.क्र. 1 ने आपल्या लेखी जबाबात मान्य केली आहे. वि.प.क्र. 1 ने दिलेले रंगित माहितीपत्रक तक्रारकर्तीने दस्त क्र. 2 वर आणि दरपत्रक दस्त क्र. 3 वर दाखल केले आहे. तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री देशपांडे यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले कि, पूर्ण किंमत मिळाल्यावर वि.प.क्र.1 ने तक्रारकर्तीस दि.01.05.2012 रोजी कारची डिलिवरी घेण्यासाठी बोलाविल्याने ती दुपारी 3-30 वा. वि.प.क्र. 1 च्या शोरुममध्ये गेली तेंव्हा पहिल्यांदाच तिला कार दाखविण्यात आली. त्यात वि.प.क्र. 1 ने दिलेल्या दरपत्रकात नमूद केलेली वि.प.क्र. 2 कंपनीकडून फिटींग केलेली डोअर लाकिंग सिस्टम नसल्याचे तक्रारकर्तीस आढळून आले. तक्रारकर्तीने केलेली कारची बुकींग 01.04.2012 पासून अस्तित्वात आलेल्या व 17.04.2012 रोजी अस्तित्वात असलेल्या कार करिताच होती. मात्र वि.प. तक्रारकर्तीस दि.01.05.2012 रोजी दाखविलेली कार ही 2011 च्या जून महिन्यात निर्मित होती. त्यांचे म्हणणे असे कि, 2011 साली निर्मित कार व 2012 साली निर्मित कारच्या किंमतीमध्ये व वैशिष्ठयांमध्ये फरक आहे. वि.प.ने तक्रारकर्तीस दि.17.04.2012 रोजी दिलेल्या माहितीपत्रकाप्रमाणे तक्रारकर्तीने निवडलेल्या व बुक केलेल्या कारची किंमत व वैशिष्ठे खालील प्रमाणे आहेत.
1.04.2012 च्या दरपत्रकाप्रमाणे SANTRO Xing Model GLS ची किंमत रु.4,34,114/-
माहिती पत्रकाप्रमाणे KEY FEATURES - GLS Model
Keyless Entry
Central Locking
Self Locking Door
याउलट 2011 साली निर्मित GLS Model चे 21 जुलै, 2011 रोजी अस्तीत्वात आलेले दरपत्रक तक्रारकर्तीने दस्त क्र. 5 वर दाखल केले आहे त्याप्रमाणे GLS Model ची किंमत रु.4,23,423/- दर्शविली आहे.
जुन्या मॉडेलच्या माहिती पत्रकाची झेरॉक्स प्रत तक्रारकर्तीने दि.17.08.2013 च्या दस्तावेज यादी सोबत दस्त क्र. 2 प्रमाणे दाखल केली आहे. त्यांत KEY FEATURES - GLS Model खालीलप्रमाणे दर्शविले आहेत.
Central Locking
Self Locking Door
म्हणजेच रु.10,666/- किंमत वाढवून कंपनीने 2012 च्या GLS Model मध्ये समाविष्ट केलेली
Keyless Entry ची सुविधा 2011 च्या मॉडेलमध्ये नाही हे स्पष्ट होते.
तक्रारकर्तीने कार बुक केली ती वि.प.ने पुरविलेल्या रंगित माहितीपत्रकात दर्शविलेल्या Keyless Entry वैशिष्ठयांसह आणि याच वैशिष्ठयांसह कंपनीने 01.04.2012 पासून वाढविलेली किंमत वि.प.ने तक्रारकर्तीकडून स्विकारली असल्याने 2012 साली उत्पादित SANTRO Xing Model GLS मॉडेल Keyless Entry सह पुरविण्याची जबाबदारी असतांना वि.प.क्र. 1 ने दि.01.05.2012 रोजी जी कार देऊ केली ती 2011 साली निर्मित Keyless Entry नसलेली आणि 2011 च्या दरपत्रकाप्रमाणे जिची किंमत कंपनीने रु.4,23,423/- ठरविलेली होती. त्यामुळे हया कारची डिलिव्हरी स्विकारण्यासाठी तक्रारकर्ती बांधील नाही व ती स्विकारली नाही, म्हणून वि.प.क्र.1 ने डिलिव्हरी स्विकारण्यासाठी तिच्यावर दबाब आणणे व ज्या कार मॉडेलची किंमत घेतली होती ती न पुरविणे ही वि.प.ने आचरलेली सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. वि.प.क्र. 1 ने कांही कागदपत्रांवर तक्रारकर्तीच्या सहया घेतल्या होत्या, परंतु नोंदणीसाठी तक्रारकर्तीच्या पत्त्याबाबत आवश्यक शपथपत्रावर तक्रारकर्तीची सही नसून कोणाच्यातरी सहीने तक्रारकर्तीच्या नावाने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन कारची आरटीओ कडे नोंदणी करण्यासाठी सादर केले आहे. वि.प.क्र.1 ची सदर कृती बेकायदेशीर आहे. म्हणून तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे.
याउलट वि.प.क्र. 1 चे अधिवक्ता श्री वोरा यांचा युक्तिवाद असा कि, तक्रारकर्ती कार बुक करण्यासाठी आली, तेंव्हा वि.प.क्र.1 ने तिला शोरुमध्ये उपलब्ध असलेले सर्व कार मॉडल दाखविले होते आणि प्रत्येक मॉडेलच्या वैशिष्ठयांबाबत तसेच निर्मिती वर्षाबाबत पूर्ण माहिती दिली होती. तक्रारकर्तीने प्रत्यक्ष निरिक्षण केल्यावरच तक्रारीतील कार Chasis No. MALAA 51HLBM690425, Engine No. G4HGBM311478 विकत घेण्याचा निर्णय घेतला. सदर कारमध्ये निर्माता कंपनीने खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या.
Power steering, A.C. + Heater, Front Power Window, Body Colored Bumpers, Central Locking, Day and Night Mirror, Tinted Glass, 1 DIN M.P.3 with AUX. USB Port with 4 Speakers, Vestline Molding, Internally Adjustable ORVM’s, full Wheel Cover and the rare spoiler
तक्रारकर्ती 01.05.2012 रोजी दुपारी 2-30 वा. कारची डिलीवरी घेण्यासाठी दोन व्यक्तीसोबत वि.प.क्र.1 कडे आली, तेंव्हा तिला कारच्या चाव्या, रजिस्ट्रेशन व विम्याचे कागदपत्रें, मॅन्यूअल, सर्विस कुपन्स, गेट पास, डिलिवरी चालान आणि 150 रुपयांचे मोफत पेट्रोल कुपन सुपूर्द करण्यात आले. तक्रारकर्तीने कारची पूर्ण पाहणी करुन समाधानी झाल्यावर कार वि.प.च्या शोरुमबाहेर घेऊन गेली. त्यानंतर कार परत आणली आणि कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम नाही म्हणून वाद घातला व की-लेस एंट्री सिस्टम पाहिजे असा आग्रह धरला. तक्रारकर्तीस ज्या चेसिस नंबरचा GLS मॉडेल दिला होता त्यामध्ये की-लेस एन्ट्री ही स्टँडर्ड फिचर्समध्ये मोडणारी बाब नव्हती. तक्रारकर्तीने कारची डिलीवरी घेतल्यानंतर अनधिकृतपणे सदर कार वि.प.च्या आवारात त्यांच्या परवानगीशिवाय उभी ठेवली आहे. तक्रारकर्तीने केलेल्या तक्रारीवरुन आर टी ओ नागपूर यांनी प्रतिज्ञालेखासंबंधी मागविलेले स्पष्टीकरण वि.प.ने सादर केले आहे. वि.प. 1 ने तक्रारकर्तीकडून अधिकची किंमत घेतलेली नसून तिने पसंत केलेलीच कार तिला दिली असल्याने वि.प.क कडून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब, सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा तक्रारकर्तीची फसवणूक झालेली नसून सदरची तक्रार खोटी असल्याने खारीज होण्यास पात्र आहे.
6. वि.प.क्र.2 यांनी त्यांचा लेखी जबाब हाच युक्तिवाद समजावा अशी पुरसीस सादर केली आहे. त्याचा युक्तिवाद असा कि, तक्रारीचा विषय असलेली कार त्यांनी Principal to Principal वि.प.क्र. 1 ला विकलेली असून ती कार वि.प.क्र. 1 च्या मालकीची झाली असल्याने तिच्या तक्रारकर्तीस विक्रीसंबंधाने झालेल्या व्यवहारात वि.प.क्र. 2 चा कोणताही सहभाग नाही व सदर व्यवहाराची कोणतीही जबाबदारी कायदेशीररित्या वि.प.क्र. 2 वर नाही. तक्रारकर्तीने देखिल वि.प.क्र. 2 विरुध्द कोणतीही मागणी केलेली नसल्याने त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
तक्रारकर्ती व वि.प.क्र.1 च्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद आणि त्यांनी दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन खालील बाबी निदर्शनास येतात.
तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 कडे दि.17.04.2014 रोजी रु.11,000/- देऊन Santro Zing GLS BSIV ही रु.4,34,144/- किंमतीची कार बुक केली. सदर कारचे निर्मात्याकडून प्राप्त रंगीत माहितीपत्रक व दि.01.04.2012 पासून लागू झालेल्या किंमतीचे दरपत्रक वि.प.क्र.1 ने तक्रारकर्तीस दिले, ते तक्रारकर्तीने यादीसोबत दस्त क्र. 2 व 3 वर दाखल केले आहे. सदर माहितीपत्रकात कारच्या वैशिष्ठयांमध्ये KEY FEATURES - GLS Model
Keyless Entry
Central Locking
Self Locking Door
असे नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्तीस नवीन दरपत्रकाप्रमाणे किंमत देऊन मिळणारी कार वरील वैशिष्ठयासह असावी हे अपेक्षित आहे. मात्र दि.01.05.2014 रोजी तक्रारकर्ती कारची डिलिव्हरी घेण्यासाठी वि.प.क्र.1 कडे गेली, तेंव्हा वि.प.ले तिला विकलेली कार Chasis No. MALAA 51HLBM690425, Engine No. G4HGBM311478 ही जून 2011 ची निर्मित होती व तिच्यात KEY FEATURES
Central Locking
Self Locking Door
एवढी वैशिष्ठये होती व वि.प.ने दिलेल्या रंगीत माहितीपत्रकात नमुद केलेली Keyless Entry ही सुविधा नव्हती. सदर कारचे निर्मिती वर्ष जून 2011 असल्याचे दर्शविण्यासाठी तक्रारकर्तीने प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांचेकडून सदर कारसंबंधाने माहितीचे अधिकारात मागितलेली माहिती दाखल केली असून सदर माहिती दस्त क्र. 8 वर आहे. तसेच उपलब्ध सुविधाबाबतचे माहितीपत्रकाची झेरॉक्स प्रत तक्रारकर्तीने दि.17.08.2013 च्या यादीसोबत दस्त क्र. 2 वर दाखल केली आहे. आणि या Keyless Entry ही सुविधा नसलेल्या 2011 साली निर्मित कारची किंमत रु.4,23,423/- असल्याबाबत दि.21 जुलै 2011 पासूनच्या दरपत्रकाची प्रत यादी सोबत दस्त क्र. 5 वर दाखल केली आहे.
वरील पुराव्यावरुन हे स्पष्ट होते कि, तक्रारकर्तीने बुक केलेली कार ही नविन माहितीपत्रक दस्त क्र. 2 मध्ये दर्शविलेल्या Keyless Entry सुविधेसह होती. परंतू वि.प.ने तक्रारकर्तीस प्रत्यक्षात Keyless Entry सुविधा नसलेली कार दिली आणि त्या कारचे कागदपत्र तक्रारकर्तीच्या नावाने करुन दिले. कागदपत्र तयार झाल्यानंतरच कार ग्राहकाच्या ताब्यात देण्यात येते व त्यामुळे कारमध्ये माहितीपत्रकाप्रमाणे सर्व सुविधा आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची संधी तक्रारकर्तीस कारची चाबी मिळाल्यानंतरच पाहता येते. म्हणून सदरच्या प्रकरणात वि.प.ने कार विक्रीचे सर्व कागदपत्र तयार करुन त्यावर तक्रारकर्तीच्या सह्या घेतल्या असल्या तरीही प्रत्यक्षात माहितीपत्रकाप्रमाणे सुविधा उपलब्ध नसलेली कार विकत घेण्यासाठी वि.प.क्र. 1 तक्रारकर्तीला बाध्य करु शकत नाही. म्हणून ज्यावेळी सदर कारमध्ये माहिती पत्रकाप्रमाणे Keyless Entry नाही हे तक्रारकर्तीच्या लक्षात आले, त्यावेळी तिने कार वि.प.क्र. 1 कडे परत करुन टॅक्स ईनव्हाईसवर डिलिवरी ‘नॉट एक्सेपटेड’ अशा शेरा लिहून कार वि.प.क्र. 1 च्या स्वाधीन केली यात तिचे काही चुकले असे म्हणता येणार नाही.
तक्रारकर्तीने कार विकत घेण्यापूर्वी कारचे निरीक्षण केले होते व तक्रारीत वर्णन केलेली कार पसंत केली होती, म्हणून तक्रारकर्ती आता कारमध्ये Keyless Entry सुविधा नाही या कारणाने कार परत करु शकत नाही हा वि.प.क्र. 1 च्या अधिवक्त्याने केलेला युक्तीवाद स्विकारणे कठीण आहे. कारण तक्रारकर्तीने माहिती पत्रकाप्रमाणे वर्णन केलेली कार विकत घेण्यासाठी वि.प.क्र. 1 ला रु.4,34,089/- दिल्यानंतर प्रत्यक्षात Keyless Entry सुविधा नसलेली तक्रारीतील वर्णनाची कार तक्रारकर्ती पसंत करील हा युक्तीवाद न पटणारा व म्हणून स्विकारण्यायोग्य नाही. वरील सर्व वस्तूस्थितीवरुन वि.प.क्र. 1 ने Keyless Entry सुविधा असलेल्या कारची किंमत रु.4,34,089/- घेऊन प्रत्यक्षात Keyless Entry सुविधा नसलेली रु.4,23,423/- किमतीची 2011 साली निर्मित कार तक्रारकर्तीस विकून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
7. मुद्दा क्र. 2 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.क्र. 1 यांनी तक्रारकर्तीकडून रु.4,34,089/- घेऊन दि.01.05.2012 रोजी माहितीपत्रकाप्रमाणे वर्णन केलेली कार देण्यात कसूर केला आहे आणि म्हणून तक्रारीतील नमूद कार आणि तक्रारीत नमूद टी.व्ही. किंवा त्याची किंमत रु.30,900/- आणि अतिरिक्त साहित्याची किंमत रु.8,800/- वि.प.च्या वर्कशॉपमध्ये तक्रारकर्तीने ठेवलेली आहे. कारची पूर्ण रक्कम देऊनही तक्रारकर्तीस माहितीपत्रकाप्रमाणे कार मिळाली नाही म्हणून तक्रारकर्ती Keyless Entry सुविधा असलेली नविन कार मिळण्यास पात्र आहे. तसेच वि.प.क्र. 1 ने 01.05.2012 पर्यंत कारची पूर्ण किंमत रु.4,34,089/- तक्रारकर्तीकडून घेऊन तिला योग्य ती कार न दिल्यामुळे तक्रारकर्तीस तिच्या वरील पैश्याच्या उपभोगापासून किंवा त्या पैश्याच्या मोबदल्यात विकत घेण्याचे ठरलेल्या कारच्या उपभोगापासून वंचित राहावे लागले. यामुळे तक्रारकर्तीस जो शारिरीक व मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला त्याबाबत नुकसान भरपाई म्हणून तक्रारकर्ती 01.05.2012 पासून वरील रकमेवर प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे व्याज रुपात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तसेच सदर तक्रारीचा खर्च रु.10,000/- तक्रारकर्तीस मंजूर करणे न्यायोचित होईल असे मंचास वाटते.
सदरच्या प्रकरणात वि.प.क्र. 2 ही वाहन निर्माता कंपनी आहे. त्यांनी वि.प.क्र. 1 यांना विकलेल्या वाहनाची ग्राहकांना विक्री करण्याची जबाबदारी फक्त वि.प.क्र. 1 यांचीच आहे. त्यामुळे वि.प.क्र. 1 च्या कोणत्याही कृत्यास वि.प.क्र. 2 हे जबाबदार नसल्याने त्यांचेविरुध्द सदरची तक्रार खारिज होण्यास पात्र आहे.
म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्तीची तक्रार वि.प.क्र. 1 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस अधिकची कोणतीही रक्कम न घेता नविन सँट्रो कार माहिती पत्रकात दर्शविल्याप्रमाणे कंपनीने बसविलेल्या Keyless Entry सुविधेसह आणि अतिरिक्त साहित्याची किंमत रु.8,800/- द्वावी व कार न दिल्यास तक्रारकर्तीने भरणा केलेली रक्कम परत करावी.
4) वि.प.ने तक्रारकर्तीकडून कारची किंमत रु.4,34,089/- आणि अतिरिक्त साहित्याची किंमत रु.8,800/- घेऊनही योग्य कार न दिल्याने तक्रारकर्तीस सदर कारच्या उपभोगापासून वंचित राहावे लागले, म्हणून मानसिक व शारिरीक त्रासाबाबत वरील रकमेवर दि.01.05.2012 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के नुकसान भरपाई द्यावी.
5) वरील आदेशाची पूर्तता 30 दिवसांचे आत करावी. मुदतीत पुर्तता न केल्यास नुकसान भरपाई दाखल व्याजाचा दर द.सा.द.शे. 15 टक्केप्रमाणे राहिल.
6) तक्रारीचा खर्च रु.10,000/- वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस द्यावा.
7) वि.प.क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
8) प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल्स तक्रारकर्तीस परत करावी.