न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35(1) प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदारांचे पती मयत श्री जोतीराम कृष्णा कुंभार हे कापड विक्रेता म्हणून गांधीनगर, कोल्हापूर येथे व्यवसाय करीत होते. त्यांनी वि.प. यांचेकडून विमा पॉलिसी क्र. 01532633 घेतली असून सदर पॉलिसीचे नियम व अटीप्रमाणे तक्रारदाराचे पतीचे मृत्यूसमयी नॉमिनीस खालीलपैकी जी रक्कम जादा असेल ती देणेचे मान्य केले होते.
- वार्षिक विमा हप्त्याचे 10 पट अगर
- मृत्यू समयी भरले एकूण विमा हप्त्याचे 105 टक्के अगर
- रक्कम रु. 9,17,950/- अगर
ड) रक्कम रु. 8,34,500/-
सदरचे विमा प्रस्तावामध्ये व विमा पॉलिसीमध्ये मयत श्री जोतीराम कृष्णा कुंभार यांचे वार्षिक उत्पन्न रु. 6,00,000/- इतके दाखविले होते. सदर पॉलिसीप्रमाणे विमाधारकाने 12 वर्षाचे प्रिमियम देय कालावधीमध्ये सहा महिन्याचे रु. 40,003/- प्रमाणे एकूण प्रिमियम रक्कम रु. 9,18,672/- देय होते व विमाधारक पॉलिसीचे कालावधी संपेपर्यंत जीवंत राहिलेस विमाधारकास गॅरंटेड सर्व्हायवल बेनिफिट म्हणून एकूण रक्कम रु. 16,69,000/- देय होती. तक्रारदाराचे पती श्री जोतीराम कृष्णा कुंभार यांना दि 13/7/2020 रोजी छातीत दुखावयास लागून कळ येवू लागलेने त्यांना फॅमिली डॉक्टरांकडे दाखल केले. तथापि सदर डॅा जवाहर दलाल यांनी श्री जोतीराम कृष्णा कुंभार हे ह्दयविकाराचे धक्क्याने मयत झालेचे सांगितले. तदनंतर तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला. तथपि आजअखेर वि.प. यांनी तक्रारदाराचे विमा प्रस्तावाबाबत काहीही कळविलेले नाही. याउलट वि.प. यांनी तक्रारदाराचे मयत पती श्री जोतीराम कृष्णा कुंभार यांचे कल्लाप्पा आण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., गांधीनगर येथील खात्यावर दि. 5/9/2020 रोजी प्रिमियमची रक्कम रु.79,550/- जमा केली. सदर रक्कम परत देतेवेळी वि.प. यांनी तक्रारदाराशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. सदर विमा पॉलिसीप्रमाणे वि.प. हे तक्रारदारांना रक्कम रु.9,17,950/- मृत्यू समयी विमा संरक्षण लाभ म्हणून देवू लागतात. परंतु सदरची रक्कम अदा न करुन वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 9,17,950/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- व नोटीस खर्च रु. 10,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 5 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी, विमा प्रस्ताव, डॉ जवाहर दलाल यांनी दिलेला मयताचा दाखला, वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोचपावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प.यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) वि.प. यांना तक्रारदाराचा विमादावा दि. 7/10/2020 रोजी प्राप्त झाला होता. सदर दाव्याच्या अवलोकनावरुन वि.प. कंपनीच्या निदर्शनास आले की, सदर विमा पॉलिसीचा विमा हप्ता दि. 18/12/2019 रोजी थकीत होता व सदर विमा हप्त्याची रक्कम वि.प. कंपनीला ठराविक मुदतीत प्राप्त झाली नसल्यामुळे प्रस्तुतची विमा पॉलिसी कालातीत झाली होती.
iv) तदनंतर वि.प. यांनी विमाधारकाला दि. 18/1/20 रोजी स्मरणपत्र पाठवून सूचित केले होते की, विमा हप्ता थकीत झालेपासून 90 दिवसांच्या आत विमा हप्तेचा भरणा केला नसल्यास विमा पॉलिसी कालातीत होईल. तदनंतर सदरची पॉलिसी पुनर्गठित करण्याकरिता दि.3/7/2020 रोजी वि.प. कंपनीस विमाधारक यांचेकडून रक्कम रु. 79,550/- रोख प्राप्त झाले. त्यानुसार वि.प. कंपनीने तक्रारदारांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याबाबत कळविले. विमाधारकाच्या मृत्यू समयी प्रस्तुतची विमा पॉलिसी पुनर्गठीत झालेली नव्हती. म्हणून वि.प. यांनी तक्रारदारास दि. 24/10/20 रोजी पत्र पाठवून आपला निर्णय कळविला.
v) वादातील विमा पॉलिसी ही कालातीत झाली असल्यामुळे वि.प. कंपनी सदर पॉलिसी अंतर्गत कसलीही दावा रक्कम देण्यास जबाबदार नाही. वि.प. विमा कंपनीने पॉलिसीचे अटीनुसार विमाधारकाकडून मिळालेली विमा हप्ता रक्कम रु. 79,950/- त्यांचे बँक खात्यात वर्ग केले आहेत. सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसल्याने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदारांचे पती मयत श्री जोतीराम कृष्णा कुंभार हे कापड विक्रेता म्हणून गांधीनगर, कोल्हापूर येथे व्यवसाय करीत होते. त्यांनी वि.प. यांचेकडून विमा पॉलिसी क्र. 01532633 घेतली होती. सदरची पॉलिसीची प्रत तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता दि. 18/01/2020 रोजी वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना स्मरणपत्र पाठवलेचे स्पष्ट होते. सदर स्मरणपत्राचे अवलोकन करता त्यामध्ये नमूद केले आहे की,
You can revive your policy without documentation for upto 90 days from your last premium due date. After 90 days, you will be required tto provide additional documents and may need to undergo medical test.
We are keen to revive your policy to help you achieve the goals that you set out for looking forward to receiving your payment at the earliest.
वरील नमूद स्मरणपत्रातील मजकूर वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्येही नमूद केला आहे.
वरील मजकूराचा विचार केला असता हप्ता भरणेचे शेवटचे तारखेपासून 90 दिवसांच्या आत कोणत्याही कागदपत्रांशिवाय विमा पॉलिसी revive करता येते. मात्र जर 90 दिवस पूर्ण होईपर्यंत विमा पॉलिसी revive करणे शक्य झाले नाही तर 90 दिवसानंतर विमा पॉलिसी revive करणेसाठी काही जादा कागदपत्रे दाखल करावी लागतात व विमाधारकास मेडीकल तपासणी करुन घेणेची आवश्यकता असते, असे स्मरणपत्रामध्ये नमूद आहे.
8. सदर कामी तक्रारदाराचे पतीने दि. 3/07/2020 रोजी विमा हप्ता रक्कम वि.प. कडे जमा केला आहे. म्हणजेच हप्ता भरणेच्या शेवटच्या तारखेनंतर 90 दिवसानंतर जमा केला आहे. मात्र याकामी वि.प. यांनी विमाधारक जोतीराम कुंभार यांचे मेडीकल चेकअप केले नाही ही जबाबदारी वि.प. कंपनीची असते. परंतु वि.प. ने विमाधारकाची मेडीकल तपासणी करुन घेतली नाही व वि.प. कंपनीने दि. 28/07/2020 रोजी विमाधारकाचे मोबाईल नं. 9823430879 वर तक्रारदारांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणेसाठी संदेश पाठविला. सदर संदेशामध्ये पुढील मजकूर नमूद होता.
Dear customer, we wish to inform you that your request for revival with DGN could not be processed due to below reason(s). Required Covid -19 questioner for processing revival please ignore, if already submitted.
सदर संदेशात कोवीड-19 चे प्रश्नावलीबाबत पूर्ततेसंदर्भात म्हटले आहे. याकामी तक्रारदाराने दि. 3/07/2020 विमा हप्त्याची रक्कम वि.प. कडे जमा केली होती व विमा revive करणेची विनंती केली होती. परंतु वि.प. ने हप्त्याची रक्कम जमा करुन घेतली आहे. तसेच तक्रारदाराला कोवीड-19 चे प्रश्नावली मोबाईलवरुन संदेशाद्वारे दिली म्हणजेच वि.प. ने विमाधारकाकडून विमा हप्ता जमा करुन घेवूनही वि.प. ने तक्रारदाराकडून नियमाप्रमाणे जादा कागदपत्रे तसेच विमाधारकाची मेडीकल तपासणी वेळेवर पूर्ण केली नाही. मात्र वि.प. ने प्रोसेस पूर्ण केली नाही किंवा विमाधारकाची मेडीकल टेस्ट घेतली नाही याला तक्रारदार जबाबदार नाहीत तर वि.प. स्वतःच जबाबदार आहेत कारण विमाधारक मयत जोतीराम कृष्णा कुंभार यांचा मृत्यू दि. 13/07/2020 रोजी झाला आहे ही बाब दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तसेच सदरचे आवश्यक बाबींची पूर्तता करणेबाबतचा संदेश (मॅसेज) हा दि. 28/07/2020 रोजी मोबाईलवर वि.प. ने पाठविला आहे. अशा परिस्थितीत विमाधारकाची मेडीकल तपासणी करणे ही केवळ अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे तक्रारदाराचे पतीने आवश्यक ती पूर्तता करणेचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट तक्रारदाराने तिचे पतीचा मृत्यू झालेनंतर विमाप्रस्ताव वि.प. कडे सादर केलेवर वि.प. ने विमा क्लेम द्यावा लागू नये म्हणूनच मयताच्या म्हणजेच विमाधारकाच्या बँक खातेवर हप्त्याची रक्कम NEFT ने जमा केलेचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर म्हणजेच दि. 13/07/2020 नंतर दि. 06/08/2020 रोजी योग्य त्या सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव वि.प. कंपनीकडे सादर केला. मात्र वि.प. कंपनीने तक्रारदाराला काहीही कळविले नाही. मात्र विमाधारकाचा मृत्यू झालेमुळे त्याचा विमा क्लेम न देता विमाधारकाने वि.प.कडे पॉलिसी Revival साठी जमा केलेल्या हप्त्यापोटी रक्कम रु.79,550/- NEFT ने विमाधारकाचे म्हणजेच तक्रारदाराचे पतीचे कल्लाप्पा आण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. गांधीनगर, कोल्हापूर येथील असणारे बचत खात्यावर जमा केली.
9. वास्तविक, तक्रारदाराचे पतीच्या मृत्यूनंतर तक्रारदाराला विमा क्लेम रक्कम देणे ही वि.प. ची जबाबदारी होती. तथापि वि.प. कंपनीने विमाधारकाकडून विमा हप्ता स्वीकारुन देखील तसेच योग्य ती पूर्तता करणेबाबत विमाधारकाचे मोबाईलवर संदेश पाठवला. परंतु विमाधारकाचा ह्दयविकाराने मृत्यू झालेनंतर तक्रारदाराने प्रस्ताव सादर केलेनंतर विमा पॉलिसी लॅप्स झालेचे कारण सांगून विमा क्लेम देणेस नकार दिला आहे व विमाधारकाकडून वि.प. ने Revival साठी घेतलेला विमा हप्ता विमाधारक मयत जोतीराम कुंभार यांचे बँके खातेवर NEFT ने जमा केला आहे. याकामी विमाधारकाने भरलेल्या विमा हप्त्यांची रक्कम Revival साठीची वि.प. यांनी स्वीकारलेली आहे. मात्र वि.प. ने विमाधारकास त्याच्या मृत्यूचे लाभ द्यावे लागू नये म्हणूनच वि.प. ने मयत विमाधारकाचे असणारे बँक खात्यावर विमा हप्त्याची रक्कम NEFT ने जमा केली आहे हे स्पष्ट होते. विमाधारक मयत जोतीराम कृष्णा कुंभार यांचेकडून पॉलिसी Revival साठी रक्कम स्वीकारुनही वि.प. ने तक्रारदाराचा विमाक्लेम रक्कम द्यायला लागू नये म्हणून विमा हप्ता रक्कम विमाधारकाच्या बँक खातेत जमा केला सदर वि.प. च्या कृत्यामुळे तक्रारदार यांना त्यांच्या पतीचे मृत्यूनंतर वादातील विमा पॉलसीचे लाभ मिळालेले नाहीत. सदर लाभ देणेस वि.प. ने नकार दिला व विमा क्लेम नाकारला आहे ही वि.प. ने तक्रारदाराला दिलेली सेवात्रुटीच आहे असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे.
प्रस्तुतकामी तक्रारदाराने दाखल केलेल्या खालील मे. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
2019 NCJ 216 (SC)
Supreme Court of India
D. Srinivas Vs. SBI Life Insurance Co.Ltd. & Ors
Insurance policy- Accepted premium refunded after more than 1 ½ years – Legality – Held – If premium is accepted without following any pre-condition and later on refunding the same on any ground is impermissible.
10. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 9,17,950/- (रु नऊ लाख सतरा हजार नऊशे पन्नास फक्त) वसूल होवून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारलेचे तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 9,17,950/- अदा करावेत व सदर रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.