तक्रारदार स्वत:
सामनेवाले क्र. 1 ते 3 - एकतर्फा
- न्यायनिर्णय -
निकाल द्वारा मा. सदस्या श्रीमती श्रध्दा मे. जालनापूरकर
1. सदर तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
2. प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी प्रथम 2013 साली मंचामध्ये दाखल केलेली होती. सदर तक्रार क्रमांक 421/2013 मध्ये दिनांक 22 एप्रिल 2019 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यातील पारित केलेल्या आदेशानुसार तक्रारदारांनी योग्य त्या पक्षकाराला तक्रारीत समाविष्ट न केल्याने कायद्याच्या मुद्द्यावर तक्रार खारीज करण्यात येते. परंतु न्याय हिताच्या दृष्टीने तक्रारदारांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत योग्य पक्षकाराला तक्रारीत समाविष्ट करून पुन्हा त्याच कारणास्तव नवीन तक्रार दाखल करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. मंचाच्या सदर आदेशान्वये तक्रारदारांनी नोकिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पक्षकाराला सामनेवाले क्रमांक 3 म्हणून तक्रारी मध्ये समाविष्ट केले आणि प्रस्तुत तक्रार त्याच कारणास्तव नव्याने दाखल केली.
3. तक्रारीतील कथनानुसार तक्रारदारांनी दिनांक 27 मे 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडून सामनेवाले क्रमांक 3 यांनी उत्पादित केलेला NOKIA LUMIA MODEL NO. 520 AND IMEI NO. 357257051341274 हा मोबाईल रक्कम रुपये 9800/- ला खरेदी केला. मोबाईल खरेदी केल्याबाबतची पावती तक्रारदारांनी पुराव्या अंतर्गत दाखल केलेली आहे. सदर मोबाईल खरेदी केल्यापासूनच सातत्याने हँग होत होता. त्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 17 जून 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांचे मालक श्री मंगेश यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी तक्रारदारांना थांबवून मोबाईल तपासला आणि तक्रारदारांना सांगितले की मोबाईल मध्ये व्हायरस असल्याने आम्ही तो वायरस काढलेला आहे. मोबाईल आता पूर्ववत चालेल परंतु त्यानंतर सुद्धा मोबाईल हँग होत असल्यामुळे तक्रारदारांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी दिनांक 18 जून 2013 ला सामनेवाले क्रमांक 1 यांना भेट दिली तेव्हा सामनेवाले क्रमांक 1 यांनी सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे मोबाईल घेऊन दुरुस्तीस देण्यास सांगितले. तेव्हा तक्रारदार सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे गेले त्यांनी फोन तपासून सांगितले की फोन मध्ये कोणताही बिघाड नाही. परंतु तक्रारदारांचा फोन हँग होत होता या समस्येकडे सामनेवाले क्रमांक 2 यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 19 मे 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. तेव्हा सामनेवाले क्रमांक 2 यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर फोन दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 22 मे 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे फोन घेऊन गेले असता दुकान बंद होते त्यानंतर तक्रारदारांना आवश्यक कारणास्तव गावी जावयाचे असल्याने त्यांनी परत आल्यानंतर दिनांक 27 जून 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे फोन दुरुस्तीसाठी दिला व सामनेवाले क्रमांक 2 यांनी दिनांक 2 जुलै 2013 रोजी तक्रारदारांना मोबाईल परत केला. परंतु सदर मोबाईल दुरुस्त केलेला नव्हता. मोबाईल मध्ये सातत्याने हँग होण्याची समस्या कायम होती. तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना पत्र पाठवून त्यांची तक्रार नोंदवली परंतु सदर पत्र सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी न स्वीकारता परत केले. त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध प्रस्तुत मंचामध्ये तक्रार क्रमांक 421/2013 ही तक्रार दाखल केली. सदर तक्रार 22 एप्रिल 2019 रोजी सदर तक्रार निकाली काढण्यात आली आणि सदर निकालाची प्रत तक्रारदारांना सहा मे 2019 रोजी प्राप्त झाली. सदर आदेशानुसार तक्रारदारांनी निकाल जाहीर झाल्यापासून निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत आवश्यक ते पक्षकार म्हणजे नोकिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सामनेवाले क्रमांक 3 म्हणून नव्याने पक्षकार समाविष्ट केले आणि प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 ते 3 यांनी मोबाईलच्या किमती सहित तक्रारीचा खर्च गृहीत धरून रक्कम रुपये 15,300/- तक्रारदारांना अदा करावेत अशी मागणी मंचासमक्ष केलेली आहे.
4. प्रस्तुत तक्रार दाखल झाल्यानंतर सामनवाले क्र. 1 ते 3 यांना मंचाची नोटीस काढण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन सुद्धा सामनेवाले क्रमांक 1 ते 3 मंचासमक्ष उपस्थित राहिले नाहीत म्हणून प्रकरण त्यांच्या विरुद्ध एकतर्फा चालवण्याबाबत आदेश पारित करण्यात आला. परंतु सदर आदेश पारित केल्यानंतर सामनेवाले करिता वकील हजर झाले. परंतु सामनेवाले यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारित केलेला होता. सदर आदेश, रद्दबातल होणेकरिता सामनेवाले क्रमांक 1 ते 3 यांनी कोणतीही कार्यवाही केल्याचे किंवा अपील किंवा रिविजन पिटीशन दाखल केल्याचे मंचासमक्ष नाही. सबब सामनेवाले 1 ते 3 यांच्या विरुद्ध एकतर्फा पारित केलेला आदेश कायम राहिलेला आहे.
5. तक्रारदारांनी तक्रारीत केलेले कथन तक्रारीसोबत दाखल केलेले पुरावे आणि लेखी युक्तिवाद यावर आधारित मंचाने तक्रारीचे निराकरण खालील प्रमाणे केलेले आहे.
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांच्या नावे दिलेला कॅश मेमो दाखल केलेला आहे. यावरून असे सिद्ध होत आहे की तक्रारदारांनी दिनांक 27 मे 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांच्याकडून सामनेवाले क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेला मोबाईल खरेदी केलेला आहे व त्यासाठी तक्रारदारांनी एकूण रक्कम 9,800/- सामनेवाले क्रमांक 1 यांना अदा केलेले आहेत. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 27 जून 2013 रोजीचे सर्विस जॉब शीट दाखल केलेले आहे. सदर जॉब शीट सामनेवाले क्रमांक 2 यांचे नावे असून यावरून असे दिसून येते की तक्रारदारांनी दिनांक 27 जून 2013 रोजी त्यांचा मोबाईल सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे दुरुस्ती करिता दिलेला होता. सदर सर्विस जॉबशीट मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, Customer concern phone hangs, battery drain within 3 to 4 hours, some time incoming / outgoing voice low, while calling speaker voice listened in mike section, data will get erased in both memory, H/S taken for testing customer request, BL-51-300907 यावरुन असे दिसून येते की तक्रारदारांनी तक्रारीतील नमूद मोबाईल सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 27 जून 2013 रोजी खरेदी केला आणि सदर मोबाईल हँग होत आहे आणि मोबाईलची बॅटरी तीन ते चार तासांत उतरत आहे आणि मोबाईलच्या माईक व स्पीकर सिस्टीममध्ये सुध्दा समस्या आहे. या सर्व समस्येसाठी दिनांक 27 जून 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडे दुरुस्ती करिता दिला. म्हणजे सदर मोबाईल खरेदी केल्यापासून एक महिन्याच्या आतच मोबाईल मध्ये समस्या निर्माण झाली असे दिसते. मोबाईल हँग होत आहे. या समस्येसाठी दुरुस्ती करिता सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे देण्यात आला तसे तक्रारदारांच्या कथनावरून असे दिसून येते की मोबाईल खरेदी केल्यापासून काही दिवसातच सदर मोबाईल हँग होऊ लागला आणि याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 1 यांना भेट देऊन त्यांची तक्रार नोंदवली. परंतु सामनेवाले क्रमांक 1 यांना सदर मोबाईल दुरुस्त करता आला नाही व त्यांनी तक्रारदारांना सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडे मोबाईल दुरुस्त करून घेण्यासंदर्भात विनंती केल्याचे दिसते. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 2 जुलै 2013 रोजीचे सामनेवाले क्रमांक 2 यांनी दिलेली डिलिव्हरी नोट दाखल केलेली आहे. त्यानुसार सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांना दुरुस्तीसाठी घेतलेला मोबाईल दिनांक 02 जुलै 2013 रोजी परत केल्याचे दिसते. परंतु सदर डिलिव्हरी नोट मध्ये मोबाईल पूर्णपणे दुरुस्त करून दिलेला आहे याबाबतची नोंद नाही. त्यामुळे सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे तक्रारदारांनी दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल सामनेवाले क्रमांक 2 यांनी पूर्ण पणे दुरुस्त करून दिला किंवा नाही याची खात्री देता येत नाही. तसेच तक्रारदारांच्या कथनावरून आणि तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 27 ऑगस्ट 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 1 यांना पाठविलेल्या पत्रावरुन असे दिसते की तक्रारदारांचा मोबाईल सामनेवाले क्र. 2 यांनी दुरुस्त न करताच तक्रारदारांचे ताब्यात दिलेला होता. सदर पत्र पाठवून तक्रारदारांनी त्यांची तक्रार सामनेवाले क्र. 1 यांचेकडे नोंदविल्याचे दिसते. परंतु सदर तक्रारीबाबत सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे तक्रारदारांनी प्रथम 2013 मध्ये सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांच्याविरुद्ध मंचामध्ये 421/2013 ही तक्रार दाखल केली. सदर तक्रार मंचाद्वारे गुणवत्तेवर निकाली काढण्यात आली आणि तक्रारदारांना आवश्यक पक्षकारांना समाविष्ट करून नव्याने तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात आली आणि त्यानुसार तक्रारदारांनी नोकिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सामनेवाले क्रमांक 3 म्हणून समाविष्ट केले आणि प्रस्तुत तक्रार नव्याने दाखल केली. त्यामुळे सामनेवाले क्रमांक 3 यांच्या विरुद्ध तक्रार मुदतीत दाखल केलेली आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचे अवलोकन करता आणि दाखल पुराव्याचे अवलोकन करता असे दिसून येते की तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 3 यांनी उत्पादित केलेला मोबाईल खरेदी केलेल्या तारखेपासून एक महिन्याच्या आतच हँग होऊ लागला आणि त्याकरिता तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक 3 यांचे अधिकृत सेवा सर्विस स्टेशन म्हणजे सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे सदर मोबाईल दुरुस्ती करिता दिला. परंतु दाखल पुराव्यावरून असे दिसून येते की सामनेवाले क्रमांक 2 यांना तक्रारदारांच्या मोबाईल मधील हँग होण्याची समस्या दूर करता आली नाही. त्यामुळे त्यानंतरही तक्रारदारांचा मोबाईल सातत्याने हँग होत आहे. सबब यावरून असे दिसते की मोबाईलच्या उत्पादनामध्येच दोष आहे आणि याकरिता सर्वस्वी सामनेवाले क्रमांक 3 हे जबाबदार आहेत. त्यामुळे सामनेवाले क्रमांक 3 यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केला आहे. तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांची मोबाईलच्या संदर्भातील जबाबदारी मर्यादित आहे.
7. तक्रारदारांचा मोबाईल त्यांनी प्रथम सामनेवाले क्र. 1 यांच्याकडे दुरुस्तीसाठी नेला. त्यावेळी सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांच्या मोबाईलची तपासणी केली आणि त्यांना मोबाईल मध्ये सॉफ्टवेअरची समस्या असल्याचे सांगितले व सदर मोबाईल सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे दुरुस्ती करिता द्यावयाचे सुचित केले. तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या मोबाईल खरेदीच्या पावती मध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की मोबाईल मधे समस्या निर्माण झाल्यास किंवा मोबाईलच्या वॉरंटी संदर्भातील तक्रारीस संपूर्णपणे सामनेवाले क्रमांक 3 उत्पादक म्हणून जबाबदार आहेत. सामनेवाले क्रमांक 3 यांच्या तक्रारदारांनी खरेदी केलेल्या मोबाईलच्या उत्पादनामध्ये दोष असल्यामुळे त्याकरिता सामनेवाले क्रमांक 1 यांना दोषी ठरविणे तसेच न्यायोचीत नाही. तसेच मोबाईल खरेदी केला त्यावेळी तक्रारदारांचा मोबाईल हँग होत आहे अशी समस्या नव्हती. त्यामुळे सामन्यावाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांचा मोबाईल ज्यावेळी त्यांना विक्री केला त्यावेळी मोबाईल मध्ये कोणतीही समस्या नव्हती तसेच सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना सविस्तर माहिती देऊन त्यांची तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला व त्यांना सहकार्य केले असे दिसते. त्यामुळे सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केलेला नाही असे मंचाचे मत आहे.
8. परंतु सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांशी अनुचित व्यवहार केल्याचे त्यांच्या तक्रारी मधून दिसून येते तसेच तक्रारदारांनी दिनांक 27 जून 2013 रोजी सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे मोबाईल दुरुस्ती करिता दिलेला होता व सदर मोबाईल सामनेवाले क्रमांक 2 यांनी दिनांक 2 जुलै 2013 रोजी तक्रारदारांना परत केला. परंतु मोबाईल मधील हँग होण्याची समस्या सामनेवाले क्रमांक 2 यांनी दुरुस्त केली नाही व तसाच नादुरुस्त असलेला फोन तक्रारदारांच्या ताब्यात दिला. वास्तविक पाहता जर सदर मोबाईल दुरुस्त होऊ शकत नव्हता तर सामनेवाले क्रमांक 2 यांनी याबाबत सामनेवाले क्रमांक 3 यांना कल्पना देऊन तक्रारदारांना नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे किंवा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त करून देणे ही जबाबदारी सामनेवाले क्रमांक 2 आणि 3 यांची होती. परंतु याबाबत सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांना सहकार्य केले नाही आणि त्यांची तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला नाही असे दिसते. सबब सामनेवाले क्रमांक 2 यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केला आहे असे मंचाचे मत आहे.
9. तक्रारदारांनी विनंती कलमाद्वारे मंचासमक्ष प्रस्तुत केलेली मागणी लक्षात घेता त्यांची मागणी रास्त आहे असे मंचाचे मत आहे. कारण तक्रारदारांनी सदर मोबाईल रक्कम रुपये 9,800/- अदा करून सामनेवाले क्रमांक 1 यांचेकडून खरेदी केलेला आहे. मोबाईलच्या उत्पादनामध्ये दोष असल्याकारणाने सदर मोबाईल खरेदी केल्यापासून एक महिन्याच्या आतच हँग होऊ लागला. वास्तविक सामनेवाले क्रमांक 2 यांनी योग्य ती कारवाही करून तक्रारदारांचा मोबाईल वेळीच बदलून नव्याने दोष मुक्त मोबाईल तक्रारदारांना देणे आवश्यक होते. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की सद्यस्थितीमध्ये तक्रारदारांनी नवीन मोबाईल खरेदी केला याबाबतचा पुरावा दाखल केलेला आहे. त्यामुळे मोबाईलची रक्कम परत मिळावी या मागणीस तक्रारदार पात्र आहेत. कारण तक्रारदारांनी मोबाईलच्या मोबदल्याची संपूर्ण रक्कम अदा करुनही मोबाईलच्या उत्पादनामध्ये दोष असल्याने त्यांना सदर मोबाईलचा उपभोग घेता आला नाही. तसेच सामनेवाले क्रमांक 2 व 3 यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केला आहे हे सिद्ध झाल्यामुळे याचा नाहक मानसिक व आर्थिक त्रास तक्रारदारांना सोसावा लागल्याचे दिसते व सामनेवाले क्रमांक 1 ते 3 यांचे विरुद्ध प्रस्तुत तक्रार करण्याचे करणे भाग पडल्याचे दिसते. सबब मानसिक त्रासापोटीची नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा या मागणीस तक्रारदार पात्र आहेत. सबब, वरील सर्व विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 179/2019 अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले क्र. 3 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु 9,800/- (रु. नऊ हजार आठशे मात्र) ही रक्कम सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांचे आत अदा करावी. तसे न केल्यास मुदतपूर्तीनंतर सदर रकमेवर द.सा.द.शे. 6% व्याज लागू राहील.
4) सामनेवाले क्र. 2 व 3 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तीकपणे तक्रारदारांना मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकूण रक्कम रु. 5,200/- (रु. पाच हजार दोनशे मात्र) ही रक्कम सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांचे आत अदा करावी.
5) सामनेवाले क्र. 1 विरुध्द सदर तक्रार फेटाळण्यात येते.
6) अंतिम न्यायनिर्णयाची प्रत तक्रारदार व सामनेवाले यांना ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) विनियम 2020 मधील 21(1) सहीत विनियम-18 (6) मधील तरतूदीनुसार शेवटच्या पृष्ठावर सदर नोंदी घेऊन साधारण टपालाने पाठविण्यात यावी.
7) अंतिम न्यायनिर्णयाची साक्षांकित सत्यप्रत उभय पक्षकारांना त्यांचे अर्जान्वये ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) विनियम 2020 मधील 21(1) (3) मधील तरतूदीनुसार देण्यात यावी.