द्वारासौ.मोहिनीजयंतभिलकर, सदस्या
अर्जदार श्रीधर महादेवराव मानकर यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी नियमित विद्युत देयक दि. 01.12.06 ते 01.01.07 या कालावधीचे 141 युनिटचे रु.480 चे बील पाठविले ते त्यांनी वेळेवर भरलेले आहे. अर्जदार यांच्या घराजवळच्या विद्युत खांबावर करंट आलेला होता तो त्यांनी लाईनमन वरखडे यांना दाखवून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
2. अर्जदार यांनी ‘स्वेच्छा विद्युत योजना 2006 चे अंतर्गत दि. 27.12.06 रोजी अर्ज करुन मीटरचे सील तुटलेले असल्याचे कळविले व अर्ज मिळाल्याची पोच पावती गैरअर्जदार यांचेकडून घेतली.
3. जवळपास पाच महिन्यानंतर श्री. पालेवाल यांनी अचानक येवून तपासणी केल्यानंतर मीटरचे सील तुटलेले असल्याचे दिसले. गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यासाठी रु.45800/- भरण्यास सांगितले गैरअर्जदार यांनी दबाव आणल्यामुळे व वीज चोरीच्या खोटया केसमध्ये अडकविण्याची धमकी दिल्यामुळे अर्जदार यांनी वीज बिल भरले.
4. अर्जदार म्हणतात की, विद्युत बिल पाठविणे ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्युनता आहे. अर्जदार मागणी करतात की, गैरअर्जदार यांच्या सेवेत न्युनता आहे असे घोषित करण्यात यावे, दि. 24.05.07 रोजी भरलेले रु.45800/- चे विद्युत बील हे रद्द करण्यात यावे. गैरअर्जदार यांनी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/- अर्जदार यांना द्यावे.
5. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे आपल्या लेखी बयानात नि.क्र. 9 वर म्हणतात की, दि. 23.05.07 रोजी ज्युनियर इंजिनियर यांनी भरारी पथकाद्वारे केलेल्या तपासणीत वीज चोरी सोबतच मीटरचे सील तुटलेले असल्याचे आढळले. मीटर तपासणीत मीटर हे 89.08% हळू फिरत असल्याचे आढळून आले. यावरुन अर्जदार हे स्वच्छ हाताने न्यायालयात आलेले नाहीत असे दिसून येते.
6. वीज चोरीचा गुन्हा हा कलम 135 व 138 विद्युत कायदा 2003 प्रमाणे विशेष न्यायालयात चालतो. त्यामुळे या ग्राहक मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. भरारी पथकाने पंचांच्या समक्ष अर्जदार यांचे बयान घेतले तेव्हा अर्जदार यांनी वीज चोरी केल्याचे कबुल केले.
7. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी वीज चोरी लक्षात घेवून त्याप्रमाणे वीज बिलाची आकारणी केलेली आहे. जी मीटरच्या किंमतीसह रु.45798.16/- अशी आहे. अर्जदार यांनी खोटी व बनावट तक्रार सदर ग्राहक मंचात दाखल केलेली असल्यामुळे ती नुकसान भरपाई खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
8. अर्जदार व गैरअर्जदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि. 27.12.06 रोजी ग्राहक स्वेच्छा विद्युत योजना 2006 चे अंतर्गत अर्ज करुन मीटरचे सील तुटलेले आहे असे सांगितले. त्यात अर्जदार म्हणतात की, ‘‘ग्राहक स्वेच्छा वीज योजनेच्या अंतर्गत सर्व अटी व शर्तीनुसार मीटरचे सहा महिन्याचे विद्युत आकारणी बील मला मान्य आहे. व ते मी भरण्यास तयार आहे. त्यामुळे माझ्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कार्यवाही करु नये.’’
9. दि. 23.05.07 रोजी भरारी पथकाद्वारे अर्जदार यांच्या घरच्या मीटरची तपासणी झाली. तेव्हा घटना स्थळावरील पंचनाम्यात पंचांसमक्ष गैरअर्जदार यांच्या दस्ताऐवजातील बी-4 वर असे लिहिलेले आहे की, ‘‘अर्जदार यांच्या मीटरची दोन्ही बाजुची लोड सील तुटलेली आहे, डॅमेज आहे, टर्मीनलला कोणतेच सील नाही. मीटर अक्युचेकने चाचणी केले असता मीटरचा फेस आणि न्युट्रेल सी.टी.मध्ये रेजिस्टंट लावलेले दिसत आहे.’’
10. गैरअर्जदार यांच्या दस्ताऐवजातील बी’5 वरील बयानात दि. 23.05.07 रोजी भरारी पथकासमोर अर्जदार स्वतः म्हणतात की, ‘‘श्री. वरखडे लाईन हेल्पर या भागाचे प्रभारी होते. आमच्या घरी अंदाजे 1½ वर्षापुर्वी आले होते. त्यांनी आम्हास विचारले की, मीटर मागे फिरविने आहे काय किंवा मीटर स्लो करणे आहे काय ? मला त्यांनी असे करुन देण्याची व्यवस्था करुन देतो असे सांगितले. माझी संमती दिल्यावर तो 2-3 दिवसाने दुपारी 11.30 वाजता घरी एका मुलाला घेवून आला. त्या दोघांनी मीटर काढून त्यामध्ये फेरफार माझे उपस्थितीत केले आणि दुरुस्त करुन मीटर जसेच्या तसे लावून दिले. माझा मीटर तेव्हा पासून स्लो झाला होता. बील कमी येवू लागले.’’ यावरुन अर्जदार यांनी स्वतःच्या संमतीनेच मीटर मध्ये फेरफार केल्याचे दिसून येते.
11. दि. 24.05.07 रोजी अर्जदार यांनी वीज चोरी साठी आकारणी करण्यात आलेले रु.45,798.16 चे बील मीटरच्या किंमतीसह भरले. सोबतच दि. 6.6.07 रोजी चे रु.12000/- कंपाउंडिंग चार्ज भरलेले आहे.
12. यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांनी स्वतःच्या संमतीनेच मीटरमध्ये फेरफार करवून घेतलेले होते. वीज चोरी केल्याचेही कबुल केलेले आहे. यावरुन असे दिसून येते की, अर्जदार यांची ही तक्रार खोटी व बनावट आहे.
अश्या स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
सदर ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.