जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 317/2015.
तक्रार दाखल दिनांक : 25/08/2015.
तक्रार आदेश दिनांक : 03/12/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 08 दिवस
श्री. नसीम कासीम शेख, वय 40 वर्षे,
व्यवसाय : मजुरी, रा. वाघोली, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(1) उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
सबडिव्हीजन तेर, ता.जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : एन.एन. वाघोलीकर
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, तो विरुध्द पक्ष याचा ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 591190001396 व जुना ग्राहक क्रमांक आर-1666 आहे. प्रस्तुत वीज पुरवठयाचा तो घरगुती उपयोगासाठी वापर करतो आणि वीज बिलाचा नियमित भरणा करतो. त्याचे अभिकथन असे आहे की, माहे मे 2014 पासून मीटरची रिडींग घेण्याकरिता विरुध्द पक्ष यांचे कर्मचारी आले नाहीत आणि ऑगस्ट 2014 चे वीज बील मिटर रिडींगची पाहणी न करता अंदाजे 1077 युनीटचे रु.5,840/- रकमेचे चुक व अवास्तव दिले. त्याचा वीज वापर प्रतिमहा 10 ते 30 युनीट आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत बिलाबाबत चौकशी केली असता रितसर अर्ज करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने अर्ज करुनही बिलाची दुरुस्ती केली नाही. तक्रारकर्त्याने विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवूनही विरुध्द पक्ष यांनी वीज बिलाच्या दुरुस्तीबाबत दखल घेतली नाही. तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे त्याची प्रत्यक्ष मिटर रिडींगची पाहणी करुन त्या रिडींगप्रमाणे वीज बील दुरुस्त करुन देण्याचा व त्याने वीज बिलाकरिता भरलेल्या रकमेची पडताळणी करुन तपशील देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा आणि मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाबाबत रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. तक्रारकर्ता याने अभिलेखावर वादकथित विद्युत बिलासह इतर बिले, विरुध्द पक्षास पाठवलेली नोटीस, पोस्टाच्या पोहोच पावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील अभिकथने अमान्य केली आहेत. त्यांच्या प्रतिवादाप्रमाणे ज्या-ज्यावेळी मिटरची रिडींग मिळाली, त्या–त्यावेळी रिडींग घेण्यात आली. ऑगस्ट 2014 मागील काही कालावधीत रिडींग मिळाली नव्हती. परंतु ऑगस्ट 2014 मध्ये प्रत्यक्ष पाहणीमध्ये तक्रारकर्त्याने 1077 युनीट वापर केल्याचे दिसून आले आणि त्याप्रमाणे त्यास बील दिले. तक्रारकर्त्याने ऑगस्ट 2014 पूर्वी वापरलेल्या युनीटपेक्षा कमी युनीटची बिले भरलेली असल्यामुळे ऑगस्ट 2014 मध्ये एकूण वापरलेल्या युनीटचे बील देण्यात आले. तक्रारकर्ता यास त्यांनी बील दुरुस्त करुन दिलेले आहे. तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या 12 महिन्यात युनीटची विभागणी करुन त्यावर दंड व व्याज न आकारता बील दुरुस्त करुन दिले. तक्रारकर्त्याने प्रतिमहा 120 युनीट वापरल्याचे दिसून आले. त्या दुरुस्तीप्रमाणे जास्त आकारणी केलेले रु.7,072/- हे माहे सप्टेंबर 2014 मध्ये कमी करुन वापरलेल्या युनीटचे योग्य बील दिले आहे आणि ते बील तक्रारकर्त्याने भरणे योग्य आहे. शेवटी तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
4. विरुध्द पक्ष याने अभिलेखावर तक्रारकर्त्याच्या सी.पी.एल. दाखल केला आहे.
5. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षांच्या कर्मचा-यांनी मे 2014 पासून मीटर रिडींग घेतली नाही. मात्र ऑगस्ट 2014 मध्ये अचानक 1077 युनीटचे रु.5,840/- असे अवास्तव बील दिलेले आहे. तक्रारकर्त्याचा वापर दरमहा 10 ते 30 युनीटचा आहे. तक्रारकर्त्याने ऑक्टोंबर 2014 पासून पुढची बिले हजर केली आहेत. मात्र ऑगस्ट 2014 चे बील हजर केलेले नाही. ऑक्टोंबर मध्ये वीज वापर 48 युनीट दाखवला. त्या पूवीचा 11 महिन्यात 30, 1077, 33, 40, 28, 25, 37, 32, 36, 32 व 30 युनीट एवढा वीज वापर दाखवला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्याचा दरमहा वापर अंदाजे 30 युनीटच्या जवळपास आहे, हे प्रथमदर्शनी योग्य दिसते.
7. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने ऑगस्ट 2014 पूर्वी वापरलेल्या युनीटपेक्षा कमी युनीटचे बिले भरली. याचे कारण विरुध्द पक्षाचे कर्मचा-यांनी कमी युनीटची नोंद रेकॉर्डमध्ये केली, हे उघड आहे. ऑगस्ट 2014 मध्ये प्रथमच प्रत्यक्ष रिडींग घेण्यात आली, तेव्हा 1 महिन्याचा वीज वापर 1077 युनीट असल्याचे नोंदवले आहे. यामध्ये विरुध्द पक्षांच्या कर्मचा-यांचा कामचुकारपणा दिसून येतो. मात्र तक्रारकर्ता याने सुध्दा आपले किती मीटर रिडींग होते व कमी युनीटचे बील का येत आहे, याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. त्याचे उघड कारण असे आहे की, कमी युनीट वापर दाखवून कमी रकमेचे बील मिळत होते, तेव्हा तक्रारकर्ता याला बरे वाटत होते. जेव्हा जास्त युनीट वापराचे जास्त रकमेचे बील आले, तेव्हा तक्रारकर्त्याने तक्रार सुरु केलेली आहे. म्हणजेच या चुकीसाठी विरुध्द पक्षांचे कर्मचारी जबाबदार आहेत; तसेच तक्रारकर्ता पण जबाबदार आहे.
8. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पर्सनल लेजरचा उतारा हजर केलेला आहे. तो जानेवारी 2014 पासूनचा आहे. प्रथम रिडींग 992 होते व ते 1028 झाले. वीज वापर 36 युनीट होता. अशाप्रकारचा वीज वापर ऑगस्ट 2014 पर्यंत दिसून आला. ऑगस्ट 2014 मध्ये मागील रिडींग 1190 व चालू रिडींग 2267 व अशाप्रकारे वीज वापर 1077 युनीट नोंदवला आहे. त्यानंतर डिसेंबर 2014 पासून दरमहाचा वीज वापर 164, 37, 233, 63, 131, 100, 128, 41, 108, 47 असा नोंदवलेला आहे. असा एकदम तिप्पट-चौपट वीज वापर का नोंदवला गेला, याचा खुलासा तक्रारकर्त्याने केलेला नाही.
9. मुख्य वाद ऑगस्ट 2014 चे बिलाबाबत असून 1077 युनीट वीज वापराचे बील रु.9,290/- इतके आलेले आहे. वर चर्चा केल्याप्रमाणे जी कमी युनीटची बिले दिली गेली, त्यासाठी तक्रारकर्ता तसेच विरुध्द पक्षाचे कर्मचारी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे ऑगस्ट 2014 चे बिलापैकी फक्त रु.5,000/- मिळण्यास विरुध्द पक्ष पात्र आहे व रु.4,290/- मिळण्यास विरुध्द पक्ष पात्र नाही, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) विरुध्द पक्ष यांनी ऑगस्ट 2014 च्या मागणीतील रु.4,290/- कमी करावेत व दुरुस्त बील तक्रारकर्त्याला 1 महिन्यात द्यावे.
(2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत. (3) प्रस्तुत न्यायनिर्णयाची प्रथम प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पुरवण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-