जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक : 258/2012
तक्रार दाखल दिनांक:29/12/2012
तक्रार आदेश दिनांक 26/11/2014
निकाल कालावधी01वर्षे10म28दि
1) श्री.हणमंत मारुती जाधव
वय 60 वर्षे, धंदा- शेती,
2) सौ.कौशल्या हणमंत जाधव
वय 56 वर्षे, धंदा- घरकाम,
3) हरीशचंद्र तुळशीराम जाधव
वय 40 वर्षे,धंदा- शेती व नोकरी,
4) विमल तुळशीराम जाधव
वय 65 वर्षे, धंदा-शेती,
सर्व रा.मळोली ता.माळशिरस जि.सोलापूर
अर्जदार नं.1 हा स्वत: करीता व अर्जदार नं.2ते4
यांचा कुलमुखत्यार म्हणून. ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्यादीत,
उपविभाग वेळापूर. ता.माळशिरस जि.सोलापूर.
(समन्स / नोटीस शाखा अभियंता यांचेवर
बजावणेत यावी.) ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
(2) त.क्र.258/2012
अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.एल.ए.गवई
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.एस.डी.नरुटे
निकालपत्र
(पारीत दिनांक:-26/11/2014)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
1. अर्जदाराने विरुध्द पक्ष यांच्या अखत्यारीतील विद्युतवाहिनीची तार ऊस पिकावर पडल्यामुळे शॉटसर्कीट होऊन ऊस पीक जळाल्यामुळे तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे.
2. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार नं.1 ते 4 यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांची मौजे मळोली, ता. माळशिरस येथे तक्रारदार नं.1 ते 4 यांची अनुक्रमे गट नं.650/2, 650/1ब, 650/3, 650/1अ ची बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीत तक्रारकर्ता नं.1 व तक्रारकर्ता नं.3 व 4 यांचे पूर्व हक्कदार तुळशीराम जाधव यांचे नावाने वीज कनेक्शन आहे. प्रस्तुत शेतजमीन क्षेत्रामध्ये मशागत करुन 2011-2012 साली कर्ज घेऊन ऊस पिकाची लागण केली होती. ऊस पिकास ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी पुरवठा करण्यासह खतांचा वापर व योग्य मशागत केली होती. तसेच शेताचे बाजूने आंबा व नारळ सारखी झाले लावलेली आहेत. दि.22/03/2012 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान विरुध्द पक्ष यांच्या विद्युतवाहिनीच्या विजेच्या तारांमध्ये शॉटसर्कीट झाले. ज्यामुळे तक्रारदार यांच्या ऊस पिकास आग लागून ऊस पीक क्षेत्र व त्यासोबत ठिबक सिंचन संचही जळून गेले. आंबा व नारळ झाडांचेही नुकसान झाले. विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे आणि विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे. ऊस जळीत घटनेबाबत पोलीस स्टेशन, माळशिरस यांनी घटनास्थळ पंचनामा करुन जाब-जबाब नोंदवले आहेत. तसेच गांवकामगार तलाठी, मळोली यांनीही पंचनामा केलेला आहे. कृषि सहायक यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला आहे. तक्रारदार यांना अपेक्षीत ऊस उत्पादनापासून वंचित रहावे लागले आहे आणि तक्रारकर्ता नं.1 ते 4 यांचे अनुक्रमे रु.2,80,000/-, रु.1,20,000/-, रु.2,35,000/- व रु.1,20,000/- अशाप्रकारे तक्रारदार नं.1 ते 4 यांचे रु.7,55,000/- ऊस उत्पन्नाचे व इतर पिकांचे व ठिंबकाचे नुकसान सहन करावे लागले आहे. मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- असे एकूण रु.7,65,000/- नुकसान भरपाईची मागणी विरुध्द पक्ष यांच्याकडून केलेली आहे.
(3) त.क्र.258/2012
3. विरुध्द पक्ष यांनी दि.24/07/2013 रोजी नि.11 कडे अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारीतील कथने व मजकूर त्यांनी अमान्य केला आहे. अर्जदाराने ऊस पिकाची लागण उशीरा केली, सन 2011-12 साली ऊस कारखान्यास जाणार नव्हता म्हणून तो अर्जदाराने स्वत: पेटवून दिला आहे. 7/12 उतारेवर पिकांची नोंद नाही, खोटे व बनावट दाखल जोडले आहेत. पंचनाम्याप्रमाणे ठिंबक संच जळालेला नाही. अर्जदारास दिलेल्या सेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. अंतत: विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांनी नुकसान भरपाईची मागणी फेटाळून तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती करुन तक्रारदारास कॉम्पेंसेटरी कॉस्ट रु.5,000/- करावी अशी विंनती केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचे ऊस
पीक जळाल्याचे सिध्द होते काय ? आणि विरुध्द पक्ष यांनी
तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे
.
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार तक्रारदार नं.1 ते 4 यांनी अभिलेखावर 7/12 उतारा हे नि.5/1 ते 5/4 वर दाखल आहे. तक्रारदार यांचे नांवे र्निगमित वीज आकार देयक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील,सहकारी साखर कारखाना, शंकरनगर अकलूज यांनी तक्रारदार यांचे नांवे ऊस पिकाची नोंद केल्याचा दाखला नि.14/1 ते 14/9 कडे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना वीज पुरवठा दिल्याचे व तक्रारदार यांनी ऊस पिकाची लागण केल्याचे अमान्य केले असले तरी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे खंडन
(4) त.क्र.258/2012
करण्यासाठी व लेखी म्हणण्याच्या समर्थनार्थ उचित पुरावे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. त्यामुळे मंचासमोर दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी ऊस पिकाची लागण केली होती आणि तक्रारदार हे शेतीकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज पुरवठा घेत होते हे तक्रारदार यांनी पुरावेनिशी सिध्द केले आहे या अनुमानास आम्ही येत आहोत.
6. तक्रारदार यांचे ऊस पीक विद्युत तारांमधील घर्षणामुळे निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे जळाले नसल्याचे विरुध्द पक्ष यांनी नमूद केले व तक्रारकर्ता यांनी पाण्याअभावी वाळलेला ऊस कारखान्यास जावा म्हणून स्वत: पेटवलेचे नमूद केले आहे. याचा कोणताही खुलासा किंवा कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. तक्रारदार यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या ऊस पिकामध्ये तार तुटून पडण्याची क्रिया घडताना तारा एकमेकांस घर्षण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ज्यामुळे ठिणग्या पडल्यामुळे तक्रारदार यांचे ऊस पीक जळाले हे उपलब्ध पंचनामेवरुन सिध्द होते.
7. उलटपक्षी, तक्रारदार यांच्या शेतामध्ये विद्युत वाहिनीची तार तुटल्याची बाब माहिती असताना व ऊस जळीत दुर्घटना घडल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी स्वत: काय कार्यवाही केली ? याचा कोणताही ऊहापोह केलेला नाही. केवळ तार तुटल्यामुळे ठिणग्या उडाल्या नाहीत आणि त्यामुळे ऊस पीक जळाले नाही, हे त्यांचे कथन पुराव्याअभावी मान्य करण्यास कठीण ठरते.
8. तक्रारदार यांचे ऊस पीक जळाल्यानंतर पोलीस खात्याने पंचनामा व जाब-जबाब नोंदवले आहेत. तसेच कृषि सहायक यांनीही पंचनामा करुन जबाब नोंदवला आहे. नि.5 सोबत रेकॉर्डवर दाखल आहेत. ऊस जळीत दुर्घटनेचे छायाचित्रे काढण्यात आले आहेत.
9. निर्विवादपणे, विजेचे वितरण व पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या उपरी तारमार्ग, त्याचे संलग्न विद्युत संच मांडणी, ग्राहकांना वीज जोडणी देण्यात येणारी सर्व्हीस वायर इ. बाबत वेळोवेळी आवश्यक देखभाल व दुरुस्ती करुन सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनीवर आहे. आमच्या मते, विद्युत दुर्घटना घडण्यामागे मानवी चुका, निकृष्ठ देखभाल, विद्युत उपकरणांची चूक मांडणी, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, त्यांच्यातील समन्वय यासह अनेक कारणे असू शकतात. तसेच विद्युत कायद्यानुसार अशा दुर्घटनाची चौकशी करण्याचे अधिकार विद्युत निरिक्षकांना आहेत आणि विद्युत दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी ते सक्षम व तज्ञ व्यक्ती आहेत. गैरअर्जदार यांनी
(5) त.क्र.258/2012
तक्रारकर्ता यांचा दि.30/03/2012 रोजीचे जबाबाचा उल्लेख करुन तक्रारकर्ता नं.1 यांनी आग 10 मिनिटात विझली व पूर्वी कधीही तारा लूज झाल्या नसल्याचे सदर जबाबात नमूद असल्याची बाब सांगितली. परंतू सदर जबाब कोणापुढे दिला हे सदर जबाबावरुन दिसून येत नाही. त्यामुळे तो पुरावा म्हणून गृहीत धरता येत नाही.
10. तक्रारदार यांच्या शेतजमिनीमध्ये ऊभ्या असलेल्या ऊस पिकावर विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्यामुळे निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे ऊस पिकाने पेट घेतल्याचे सिध्द करण्यासाठी अभिलेखावर आवश्यक तलाठी व कृषिसहाय्यक यांचे नुकसानीचे पंचनामे व पुरेसे कागदपत्रे दाखल आहेत. निर्विवादपणे, विजेच्या ठिणग्या आग स्वरुपात असल्यामुळे व ऊस परिपक्व व गाळपासाठी तयार असल्यामुळे ठिणग्या ऊस पिकावर पडल्यानंतर ऊसाने पेट घेतल्याचे मान्य करावे लागेल. आमच्या मते, तक्रारदार यांच्या कृषि विद्युत पंपाकरिता ज्या विद्युत वाहिनीवरुन वीज पुरवठा करण्यात येतो, त्यावरील तारा सुस्थितीत न ठेवल्यामुळे तार तुटून जळीत ऊस दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे ऊस पीक केवळ विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे जळाल्याचे व त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होते, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
11. ऊस पीक जळण्याच्या घटनेकरिता जबाबदारी निश्चित करण्याबाबत मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या निवाडयांचा आम्ही परामर्श करीत आहोत.
मा.राष्ट्रीय आयोगाने 'कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कार्पो. लि. /विरुध्द/ मनी थॉमस, 2 (2006) सी.पी.जे. 245 (एन.सी.) या निवाडयामध्ये विद्युत तारांच्या एकमेकांशी स्पर्श होऊन उडालेल्या ठिणग्यामुळे जळालेल्या पिकाच्या नुकसानीस कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कार्पो. लि. यांना जबाबदार धरुन त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे म्हटले आहे. असेच तत्व मा.राष्ट्रीयआयोगाने 'दी असिस्टंटएक्झीक्युटीव्ह इंजिनियर, हुबळी /विरुध्द/ श्री.निळकंठगौडा सिध्दगौडा पाटील, 1986-2004 कंझ्युमर 7145 (एन.एस.) या निवाडयामध्ये विषद केले आहे.
12. मा.राष्ट्रीय आयोगांनी नमूद केलेले तत्व व तक्रारीची वस्तुस्थिती पाहता, विरुध्द पक्ष यांनी विद्युत वाहिनीच्या तारा सुस्थितीत न ठेवल्यामुळे ठिणग्या पडून ऊस पीक जळाल्याचे सिध्द होते आणि असा विवाद ग्राहक मंचाच्या कार्यकक्षेत येतो आणि प्रस्तुत विवाद ‘ग्राहक विवाद’ ठरतो, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
(6) त.क्र.258/2012
13. विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो असल्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून जळीत ऊस पीक व नारळ व आंबा ठिबक सिंचन संचाच्या नुकसानीची भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. तक्रारदार यांनी त्यांचे क्षेत्रावरील ऊस पीक जळाल्यामुळे झालेले नुकसान तसेच ठिंबक सिंचन व आंबा आणि नारळ पिकांची झालेली नुकसानी अशी एकूण रु.7,55,000/- रकमेची नुकसान भरपाई मागितली आहे. अभिलेखावर दाखल पंचनाम्यामध्ये अंदाजे रु.7,55,000/- नुकसान झाल्याचा उल्लेख आहे. तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर, अकलूज यांनी दिलेल्या दाखल्यामध्येही तक्रारकर्ता यांचे क्षेत्रावरील ऊस पीक केलेची नोंद नमूद केलेले आहे. वरील पुराव्यांचे विरुध्द पक्षातर्फे स्वतंत्रपणे पुरावे दाखल करुन खंडन केलेले नाही. अभिलेखावर दाखल छायाचित्रांचे अवलोकन करता, निश्चितच यांचे ऊस पीक हे परिपक्व व गाळपासाठी तयार असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदार यांच्या ऊस पिकाचे ठिंबक सिंचन व आंबा आणि नारळ यांचे झालेले नुकसान तक्रारकर्ता नं.1 ते 4 हे अनुक्रमे रु.2,80,000/-, रु.1,20,000/-, रु.2,35,000/- व रु.1,20,000/- अशी एकूण रु.7,55,000/- नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
14. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले असून शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
-: आदेश :-
1. अर्जदार नं.1 ते 4 यांचा गैरअर्जदार विरुध्दचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार नं.1 ते 4 यांना जळीत ऊस, आंबा व नारळ पिकाच्या नुकसान भरपाईपोटी व ठिंबक सिंचनाचे नुकसानी करीता अशी अनुक्रमे अर्जदार नं.1यांना रु.2,80,000/-(रु.दोन लाख ऐंशी हजार फक्त), अर्जदार नं.2 यांना रु.1,20,000/-(रु.एक लाख वीस हजार फक्त), अर्जदार नं.3 यांना रु.2,35,000/-(रु.दोन लाख पस्तीस हजार फक्त) व अर्जदार नं.4 यांना रु.1,20,000/-(रु.एक लाख वीस हजार फक्त) द्यावेत.
(7) त.क्र.258/2012
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार नं.1 ते 4 यांना मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी प्रत्येकी रु.2,000/- प्रमाणे रु.8,000/- (रु.आठ हजार फक्त) द्यावेत.
4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
5. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यांत.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिंनि00512140