जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 215/2015.
तक्रार दाखल दिनांक : 05/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 12/07/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 07 दिवस
अच्युत पि. रघुनाथ आवाड, वय 70 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. आवाड शिरपुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 ते 4
हे कंपनीचे प्रशासकीय व जबाबदार अधिकार.
(1) विद्युत निरीक्षक अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(2) कार्यकारी अभियंता, म.वि.वि.कं., उस्मानाबाद.
(3) सहायक अभियंता, म.वि.वि.कं., कळंब, जि. उस्मानाबाद.
(4) कनिष्ठ अभियंता, म.वि.वि.कं.,
शिराढोण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.व्ही. वटाणे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. विरुध्द पक्ष (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये ‘विद्युत वितरण कंपनी’) यांच्या विद्युत वाहिनीमध्ये शॉटसर्कीट होऊन ऊस पीक जळाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा मंचापुढे दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, मौजे आवाड शिरपुरा, ता. कळंब येथील गट नं.45 मध्ये 1 हे. 27 आर. क्षेत्राचे ते मालक व कब्जेदार आहेत. त्यांचा ग्राहक क्र.606890510391 असा आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2011-2012 मध्ये ऊस पीक लागवड केले होते आणि ते ऊस पीक गाळपासाठी तयार होते. तक्रारकर्ता हे रांजनी कारखान्याचे सभासद आहेत आणि ऊस पिकापासून त्यांना रु.3,00,000/- ते रु.3,50,000/- आर्थिक उत्पन्न अपेक्षीत होते. तक्रारकर्ता यांच्या शेजारी असणारे शेतकरी लक्ष्मीबाई आवाड यांचे क्षेत्रातून विरुध्द पक्ष यांची शिराढोण उपकेंद्रातून येणा-या विद्युत वाहिनीद्वारा फिडर गेलेले आहे. त्या फिडरचे खांबाच्या तारेमध्ये झोळ पडत असल्यामुळे माहिती देऊनही विद्युत वितरण कंपनीने दुर्लक्ष केले. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.12/2/2012 रोजी लक्ष्मीबाई आवाड यांच्या क्षेत्रातून गेलेल्या शिराढोण फिडरच्या तारेमध्ये स्पार्कींग होऊन गट नं.45 मधील ऊस पीक व ठिबक संच पूर्णत: जळून खाक झाले. पोलीस स्टेशन, शिराढोण व मंडल अधिका-यांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून ऊस पिकाची नुकसान भरपाई, मशागत खर्च, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व आर्थिक खर्च इ. एकूण रु.5,79,000/- व्याजासह मिळावेत, अशी विनंती
3. विद्युत वितरण कंपनीने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील कथने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे त्यांची विद्युत वाहिनी व्यवस्थित होती आणि विद्युत वाहिनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतून गेलेली नाही. त्यामुळे स्पार्कींग होऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ऊस जळीत घटना विद्युत वाहिनीच्या स्पार्कींगमुळे घडलेली नसून नुकसानीस ते जबाबदार नाहीत. पोलीस खाते व मंडळ अधिका-यांनी केलेले पंचनामे विद्युत वितरण कंपनीच्या अपरोक्ष केलेले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दि.13/2/2012 रोजी पंचासमक्ष पाहणी केली असता कोणत्याही खांबावर स्पार्कींगच्या खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच कोणताही फेज कोणत्याही फेजला चिटकलेला किंवा लाईनला आडी पडली नसल्याचे निदर्शनास आले. त्या वाहिनीवरुन तक्रारकर्ता यांना किंवा ग्राहकास विद्युत पुरवठा दिला जात नसल्यामुळे ‘ग्राहक’ नात्याने तक्रार करता येत नाही आणि जिल्हा मंचाला तक्रार निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांचे ऊस पीक कारखान्याने गाळपासाठी नेल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले नाही. ऊस जळीत घटनेबाबत विद्युत निरीक्षकांचा अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती विद्युत वितरण कंपनीने केलेली आहे.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये तक्रारकर्ता हे
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 :- दि.12/2/2012 रोजी लक्ष्मीबाई आवाड यांच्या क्षेत्रातून गेलेल्या शिराढोण फिडरच्या तारेमध्ये स्पार्कींग होऊन गट नं.45 मधील ऊस पीक व ठिबक संच पूर्णत: जळून खाक झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार मंचापुढे दाखल केलेली आहे. विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्य करताना तक्रारकर्ता यांना त्यांनी वीज पुरवठा दिलेला नसल्यामुळे तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? या प्राथमिक कायदेशीर मुद्याचा विचार होणे न्यायोचित व संयुक्तिक आहे.
6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) मध्ये ‘ग्राहक’ शब्दाची संज्ञा स्पष्ट करण्यात आलेली असून मोबदला देऊन वस्तु किंवा सेवा खरेदी करणारी व्यक्ती ग्राहक ठरते; तसेच ती व्यक्ती व्यवसायिक/व्यापारी हेतूने वस्तु किंवा सेवा खरेदी करत असल्यास 'ग्राहक' संज्ञेत येऊ शकत नाही. तक्रारदार यांच्या वादविषयाचे स्वरुप पाहता, त्यांनी तक्रारीमध्ये ग्राहक क्रमांक 606890510391 असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापृष्ठयर्थ तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर ग्राहक क्रमांक 606890510391 चे वीज आकार देयक दाखल केलेले आहे. त्या देयकाचे अवलोकन केले असता त्यावर श्री. सुनिल अचुतराव आवाड असे नांव नमूद आहे. 7/12 उता-याचे अवलोकन केले असता सुनिल अच्युत आवाड यांचे नांवे गट नं.45 मध्ये 0.24 आर. शेतजमीन क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. तसेच सुनिल अच्युत आवाड यांचे विहीर असल्याचा उल्लेख निदर्शनास येतो. यावरुन तक्रारकर्ता व सुनिल अच्युत आवाड यांचे शेतजमीन क्षेत्र स्वतंत्र आहे आणि सुनिल यांच्या विहिरीची नोंद स्वतंत्र आहे, हे स्पष्ट होते. ज्यावेळी तक्रारकर्ता हे तक्रारीमध्ये त्यांचा ग्राहक क्रमांक 606890510391 नमूद करतात, त्यावेळी त्यांनी पाणी नियोजनाकरिता असणारे स्तोत्र व त्याकरिता त्यांचे नांवे घेण्यात आलेल्या वीज जोडणीचा स्पष्ट उल्लेख तक्रारीमध्ये करणे आवश्यक होते. शेती पंपाकरिता तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून स्वतंत्रपणे त्यांचे नांवे वीज जोडणी घेतल्याबाबत वीज आकार देयक किंवा त्यासंबंधीची उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत. तसेच तक्रारकर्ता हे ग्राहक क्र.606890510391 वीज जोडणीद्वारे वीज वापर करतात, असेही त्यांचे कथन नाही. यावरुन आमच्या मते तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतल्याचे सिध्द होऊ शकत नाही. विद्युत वितरण कंपनीने उपस्थित केलेल्या कायदेशीर आक्षेपाचे पुराव्याद्वारे खंडन करण्यास तक्रारदार हे असमर्थ ठरले आहेत. अंतिमत: तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (डी) नुसार 'ग्राहक' संज्ञेत येत नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचापुढे पात्र ठरु शकत नाही. तक्रारीमध्ये उपस्थित वादाच्या इतर मुद्दयांना स्पर्श न करता तक्रारदार हे ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत, या एकमेव कारणास्तव तक्रार रद्द करणे न्यायोचित ठरते. आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश देत आहोत
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/17616)